स्वरोपासक पं. विनायक नारायण पटवर्धन

 विवेक मराठी  05-Feb-2018

*** विष्णू दिनकर आपटे***

पंडित विनायक पटवर्धन यांचा जन्म 22 जुलै 1898 रोजी मिरज येथे झाला. प्रसिध्दीची हाव न धरता त्यांनी अत्यंत निष्ठेने, शिस्तीने आणि गांधर्व महाविद्यालयाची परंपरा सांभाळून शिष्यवर्ग तयार केला. संगीताच्या प्रचारासाठी, व्याख्याने, भारतभर होणाऱ्या संगीतसभा तर त्यांनी गाजविल्याच, त्याशिवाय 'रागविज्ञानाचे' सात खंड आणि इतर संगीतविषयक ग्रंथही त्यांनी लिहिले. आयुष्याच्या अखेरच्या काळात मिरजेमध्ये वास्तव्य असताना त्यांनी पं. विष्णू दिगंबर स्मारकाची स्थापना केली.

    पद्मभूषण स्वरोपासक आणि पं. विष्णू दिगंबरांचे शिष्य म्हणून विख्यात असणाऱ्या पंडित विनायक पटवर्धन यांचा जन्म 22 जुलै 1898 रोजी मिरज येथे झाला. बालपणीच आईवडील हरपलेल्या विनायकाचे शिक्षण सुरू झाले. सन 1907मध्ये मिरज संस्थानचे अधिपती श्रीमंत बाळासाहेब पटवर्धनांनी दिलेल्या दरमहा सोळा रुपये शिष्यवृत्तीच्या जोरावर ते लाहोर येथे पं. विष्णू दिगंबर पलूसकर यांच्या गांधर्व महाविद्यालयात गेले. तेथे सन 1914पर्यंत शिक्षण घेऊन ते मिरजेस परत आले.

मध्यंतरीच्या काळात गंधर्व नाटक मंडळीत त्यांनी काम केले. परंतु सन 1932नंतर त्यांनी नाटक मंडळीला रामराम ठोकला. आपल्या गायनाला अधिक परिपक्वता यावी, म्हणून नंतर काही काळ रामकृष्णबुवा वझे यांची तालीम घेतली. बापूराव पलूसकरांना तालीम देऊन, त्यांना तयार करून गुरुऋण फेडले. पुण्यात गांधर्व महाविद्यालयाच्या शाखेची स्थापना करून तिला नावारूपास आणले. त्यानंतर स्वत:च्या 'विष्णू दिगंबर पलूसकर' विद्यालयाची स्थापना करून अनेक विद्यार्थी घडविले. त्यांना संगीताचे शास्त्रशुध्द शिक्षण दिले.

प्रसिध्दीची हाव न धरता अत्यंत निष्ठेने, शिस्तीने आणि गांधर्व महाविद्यालयाची परंपरा सांभाळून शिष्यवर्ग तयार केला. संगीताच्या प्रचारासाठी, व्याख्याने, भारतभर होणाऱ्या संगीतसभा तर त्यांनी गाजविल्याच, त्याशिवाय 'रागविज्ञानाचे' सात खंड आणि इतर संगीतविषयक ग्रंथही त्यांनी लिहिले. हिंदुस्थानी रागांची लक्षणगीते त्यांनी मराठीत करून घेतली. बापूराव पलूसकर, मुकुंदराव गोखले, कालिंदी केसकर आणि कमल केतकर असा नामवंत शिष्यवर्ग तयार केला. अखिल भारतीय आकाशवाणीच्या आणि अनेक विद्यापीठांच्या संगीतविषयक परीक्षक मंडळाचे ते सल्लागार होते.

पं. विनायकबुवांना त्यांच्या कार्याबद्दल विविध पुरस्कार मिळाले. नाशिक येथे त्यांना शंकराचार्य डॉ. कूर्तकोटींकडून 'संगीत चुडामणी', पं. ब्रिजनारायण यांच्या संस्थेकडून 'स्वरविलास', श्री अक्कलकोट स्वामी संगीत संसदेकडून 'सूरयोगी' आणि भारताचे राष्ट्रपती व्ही.व्ही. गिरी यांच्या हस्ते पद्मभूषण असे सन्मान मिळाले. भारतीय सांस्कृतिक शिष्टमंडळाचे सदस्य म्हणून त्यांनी रशियाचा दौरा केला होता. 'संगीत नाटक अकादमी'ची फेलोशिपही पंतप्रधान इंदिरा गांधींच्या हस्ते त्यांना मिळाली होती.

ग्वाल्हेर घराण्याची गायकी त्यांनी सांभाळली. बहार, अडाणा, मुलतानी, मल्हार आणि जयजयवंती हे त्यांचे आवडते राग होते. तराणा म्हणणे हे त्यांचे वैशिष्टय होते.

आयुष्याच्या अखेरच्या काळात मिरजेमध्ये वास्तव्य असताना त्यांनी पं. विष्णू दिगंबर स्मारकाची स्थापना केली. त्यानंतर 23 ऑगस्ट 1975 रोजी, भारतीय संगीताच्या अभिजात परंपरेचा अभिमान असणारा आणि ती परंपरा प्राणपणाने जपणारा एक थोर संगीतोपासक नादब्रह्मात विलीन झाला.

8600119220