पुरोगामित्वाचे कातडे

 विवेक मराठी  08-Feb-2018

जळावाचून तळमळणाऱ्या माशाचे दुसरे रूप म्हणजे शरद पवार. शरद पवार सत्तेशिवाय जगू शकत नाहीत, हा त्यांचा राजकीय इतिहास आहे. सत्तेत येण्यासाठी ते कोणत्याही थराला जाऊ शकतात. अगदी ज्यांनी त्यांना घडवले, वाढवले, त्यांच्या पाठीत खंजीर खुपसून सत्तापटावर स्वतःचे स्थान निर्माण करू शकतात आणि नेतृत्वाच्या मुद्दयावर ज्यांच्याशी फारकत घेऊन वेगळी चूल मांडली, त्यांच्याबरोबरच आघाडी केली, तर सत्तासुंदरीशी लगट करण्यासही त्यांनी मागेपुढे पाहिले नाही. शरद पवार यांचा आजवरचा हा राजकीय प्रवास आणि त्यांनी मांडलेली भूमिका पाहता ते केवळ सत्ता आणि सत्ता या गोष्टीसाठी आहेत आणि ते सत्तेसाठी कोणत्याही स्तराला जाऊ शकतात, याचा अनुभव महाराष्ट्राने घेतला आहे. 2014च्या सत्तांतरानंतर शरद पवार यांनी न मागताच पाठिंबा दिला होता. आणि गेली तीन वर्षे ते अधूनमधून सत्ताधाऱ्यांना चुचकारण्याचा प्रयत्न करत असतात. आपले अस्तित्व दाखवण्यासाठी नाना प्रयोग करत असतात. हिवाळी अधिवेशनापूर्वी आणि आता सुरू असलेला हल्लाबोल मोर्चा हा त्यातीलच एक प्रकार आहे. प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून पवारांनी विरोधी पक्षांची मोट बांधत संविधान बचाव रॅली काढली होती. या रॅलीच्या निमित्ताने त्यांनी विरोधी पक्षांचे राष्ट्रीय नेतृत्व आपल्या पदरात पाडून घेतले. कोणताही प्रभाव आणि अस्तित्व नसलेल्या टुकार पक्षांना आणि त्यांच्या नेत्यांना पवारांसारखा नेता हा सत्तेसाठी हवा आणि त्यांचा पवारांशी आणि पवारांचा नीतिमत्तेशी काहीही संबंध नाही. पण बुडत्याला काडीचा आधार म्हणतात, त्याप्रमाणे शरद पवार या मरू घातलेल्या विरोधकांसाठी तारणहार झाले आहेत. सव्वीस जानेवारीला पवारांनी मुंबईत 'संविधान खतरे में'चा राग आळवला आणि आडवडयाभरातच शरद पवार यांनी 'इस्लाम खतरे मे'ची बांग दिली आणि सरडयासारखे रंग बदलण्याची आपली कला पुरोगामी महाराष्ट्रासमोर सादर केली.

 औरंगाबाद येथे तीन जानेवारी रोजी झालेल्या हल्लाबोल सभेत बोलताना शरद पवार यांनी विद्यमान केंद्र व राज्य सरकार यांच्यावर टीका करताना लांगूलचालनाचा मार्गही चोखाळला आहे. नुकताच लोकसभेत तिहेरी तलाकविरोधी कायदा संमत झाला. राज्यसभेने तो कायदा प्रवर समितीकडे अधिक अभ्यासासाठी पाठवला आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांचे वक्तव्य अनेक प्रश्न उपस्थित करणारे आहे. आपल्या भाषणात शरद पवार म्हणाले की, ''तलाक हा कुराणाचा आदेश, त्यात हस्तक्षेप करण्याचा राज्यकर्त्यांना अधिकार नाही.'' शरद पवारांचे हे वक्तव्य वरवर पाहता खूप साधे आणि सहज पटत असले, तरी ते तसे नसणार, कारण शरद पवार एका दगडात अनेक पक्षी मारण्यात तरबेज आहेत. त्यांच्या या तरबेजपणाचा अनुभव महाराष्ट्राने अनेक वेळा घेतला आहे. प्रश्न असा आहे की शरद पवार यांनी आपले हेच म्हणणे सभागृहात का मांडले नाही? त्यांना राज्यसभेत हे मत मांडण्यासाठी कुणी आडकाठी केली होती काय? या प्रश्नांची उत्तरे केवळ शरद पवारच देऊ शकतात. कारण त्यांची प्रत्येक चाल ही त्यांच्याशिवाय अन्य कुणाला चटकन कळत नाही आणि शरद पवार यांच्या चालीचे आकलन होते, तेव्हा खूप वेळ निघून गेलेला असतो. शरद पवार यांनी औरंगाबाद येथे तिहेरी तलाकबाबत जे मत व्यक्त केले, त्यामागे आपल्यापासून दुरावलेल्या मुस्लीम समाजाला पुन्हा जवळ करण्याची रणनीती आहे. एका प्रादेशिक राजकीय पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून आपण शरद पवार यांची ही राजकीय भूमिका समजू शकतो; पण ज्यांनी स्वतःला पुरोगामी विचाराचा वाहक घोषित करून घेतले आणि स्वतःच्या पुरोगामित्वाचे ढोलताशे वाजवले, त्या शरद पवारांच्या वरील भूमिकेबाबत काय म्हणायचे? मुस्लीम माता-भगिनींचे दुःख आणि शोषण शरद पवारांना कळत नाही काय? की कुराणाच्या, शरियतच्या कायद्याच्या जोखडाखालीच त्या माता-भगिनींनी पिचून मरावे अशी शरद पवार यांची भूमिका आहे? तिहेरी तलाकविरोधी कायदा लोकसभेत मंजूर झाल्यावर ज्या प्रकारचा आनंद मुस्लीम महिलांनी व्यक्त केला, तो पाहता राज्यसभेतही तो कायदा तातडीने पारित करून अमानवी प्रथा बंद करण्यास मदत करायला हवी होती. पण राज्यसभेत विरोधकांनी आपल्या संख्याबळाच्या जोरावर कायदा प्रवर समितीकडे पाठवला. यामागे मतपेढीचे राजकारण होते. शरद पवार यांनीही तेच राजकारण केले. एका बाजूला संविधान बचाव म्हणणारे शरद पवार असंवैधानिक गोष्टीचा पुरस्कार कशासाठी करतात? तिहेरी तलाक आणि कुराण यांच्याबाबत पवार वगळता अन्य कुणी बोलले असते, तर पुरोगामी छावणीतून प्रचंड मोठया प्रमाणात हल्ला झाला असता. संविधानविरोधी, मूलतत्त्ववादी, प्रतिगामी अशी असंख्य दूषणे दिली गेली असती. पण शरद पवारांनी कुराणाचे आणि तिहेरी तलाकचे समर्थन केल्यावर कोणीही विरोधी सूर लावला नाही. कोणत्या बिळात लपून बसले आहेत महाराष्ट्रातील पुरोगामी? ज्या हमीद दलवाईंनी तिहेरी तलाकविरुध्द दीर्घकाळ आंदोलन छेडले, त्यांचेच वारसदार शरद पवार यांच्या छावणीत शिलेदार आहेत, मग बाकींच्या बाबत काय बोलणार?

शरद पवार यांनी विद्यमान सरकारवर जरूर टीका करावी. विरोधी पक्षाचे महत्त्वाचे नेते म्हणून तो त्यांचा अधिकार आहे. पण आपल्या पुरोगामित्वाच्या बुरख्याआडून त्यांनी समाजात धार्मिक कलह माजवण्याचा प्रयत्न करून संविधानासमोर प्रश्नचिन्ह उपस्थित करू नये. शरद पवार यांच्या राजकीय कारकिर्दीला नुकतीच पन्नास वर्षे झाली आहेत. त्यामुळे संसदीय राजकारण आणि संसदेबाहेरचे राजकारण यातील फरक त्यांना चांगला कळतो. आपली सत्तेची अभिलाषा पूर्ण करण्यासाठी त्यांनी राजकीय नीतिमत्ता पायदळी तुडवू नये. शरद पवार सत्तेच्या लाभासाठी वारंवार अशा प्रकारचा दुटप्पी व्यवहार आणि व्यक्तव्य करू लागले, तर जनताच जाहीर करेल की शरद पवार हे पुरोगामी महाराष्ट्राचे नेतृत्व नसून त्यांनी सोईसाठी पुरोगामित्वाचे कातडे पांघरलेले आहे.     q