पूर्वांचलातील यशाचा अन्वयार्थ

 विवेक मराठी  12-Mar-2018

पूर्वांचलातील राज्ये छोटी असली, तरी या विजयाचा अर्थ हा छोटा नाही. भारताच्या भवितव्यावर दीर्घकालीन परिणाम करण्याची त्यांची शक्ती आहे. या सर्व राज्यांतून लोकसभेच्या पंचवीस जागा आहेत. त्यातील दहा जागांवर मागील निवडणुकीत भाजपाने यश मिळवले. पुढील निवडणुकीत आणखी दहा जागांची भर पडू शकते; परंतु हे यश तेवढया दहा जागापुरते मर्यादित नसून भारताच्या सांस्कृतिक राष्ट्रवादात आपल्या वैशिष्टयांसह सर्व जाती, भाषा यांच्यासह सर्व जनजाती समूह सामावू शकतात, असा विश्वास देणारी ती घटना असेल.

भारतीय जनता पक्षाला ईशान्य भारतात जे यश मिळाले, त्यांचे गुणात्मक महत्त्व समजणे आवश्यक आहे. तिथल्या निकालाचा कर्नाटकच्या निवडणुकांवर काय परिणाम होईल, किंवा 2019च्या लोकसभा निवडणुकीवर त्यांचे किती परिणाम होतील हे प्रश्न येथे अप्रस्तुत आहेत, कारण प्रत्येक राज्याची परिस्थिती वेगवेगळी असते, त्याचप्रमाणे एका राज्याचा परिणाम दुसऱ्या राज्यावर होत नाही असा अनुभव आला आहे, तसेच विधानसभा आणि लोकसभांच्या निवडणुकीला लोक वेगवेगळा विचार करतात असेही स्पष्ट झाले आहे. त्यामुळे या दोन्ही निवडणुकांचा संदर्भ न घेता पूर्वांचलातील निवडणुकीचे महत्त्व समजून घेणे आवश्यक आहे.

महाभारतकाळापासून सांस्कृतिकदृष्टया पूर्वांचल भारताशी जोडला गेला असला, तरी गेल्या सात-आठशे वर्षांत संपूर्ण भारतच स्वत:च्या अस्तित्वाच्या लढयात गुंतलेला असल्यामुळे पूर्वांचलातील राज्ये सांस्कृतिकदृष्टया एकाकी पडल्यासारखी स्थिती झाली होती. त्यातच पंडित जवाहरलाल नेहरूंच्या अदूरदर्शीपणामुळे या सर्व राज्यांत ख्रिश्चन मिशनऱ्यांना धर्मप्रचारांसाठी मोकळे रान मिळाले होते. त्यांचा परिणाम उर्वरित भारताकडे अलगतेने पाहण्याच्या भावनेत झाला आणि येथील फुटीर वृत्तींना मोकळे रान मिळाले. एकेकाळी काश्मीर खोऱ्याइतकाच पूर्वांचलाचा प्रश्न गंभीर बनला होता. त्यातच बांगला देशच्या घुसखोरांची भर पडली. त्यांचा राजकीय प्रभावही निर्माण झाला आहे. येथील जनजातींच्या मनामध्ये स्वतंत्र अस्मिता जागृत झाल्या आहेत. त्रिपुरामध्ये साम्यवादी प्रभाव असलेले शासन असल्यामुळे राष्ट्रवादी विचाराच्या प्रसाराला त्यांचाही मोठा अडसर होत होता. या चारही कारणांमुळे पूर्वांचलामध्ये राष्ट्रीय वृत्तीने काम करणे अवघड होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघासारख्या राष्ट्रवादी शक्तीकडे संशयाने, उपेक्षेने, विरोधाने बघण्याचा एक दृष्टीकोन तयार झाला होता.

या पार्श्वभूमीवर अत्यंत चिकाटीने वेगवेगळया माध्यमांतून पूर्वांचलातील राष्ट्रीय धागा मजबूत करण्याचे काम संघप्रेरणेतून निर्माण झाले आहे. अनेक व्यक्तींच्या, संस्थांच्या माध्यमातून झालेले आहे. या सर्वांचा परिणाम अशा कामाबद्दल सामाजिक विश्वास निर्माण करण्यात झाला. पूर्वांचलातील विविध विद्यार्थी संघ योजनेतून देशाच्या विविध भागांत जाऊन शिकतात. त्यांच्या कुटुंबीयांच्या मनात इतर भारतीयांविषयी आत्मीयता आणि विश्वास निर्माण झाला असून मध्यंतरीच्या काळात एका इंग्लिश साप्ताहिकात अशा शिक्षणासाठी आलेले विद्यार्थी म्हणजे मुलांचे अपहरण करण्याचा प्रकार आहे, अशा प्रकारची मुखपृष्ठ कथा प्रकाशित झाली होती. समाज कसा उभा राहतो याची सुतराम कल्पना नसलेल्या प्रसारमाध्यमांच्या आणि त्यात लिहिणाऱ्या संपादकांच्या अज्ञानाचे ते प्रदर्शन होते. कोणतीही शासकीय मदत नसताना प्रसारमाध्यमांच्या विरोधाकडे, उपहासाकडे दुर्लक्ष करून विविध उपक्रमांच्या माध्यमातून जे काम सुरू ठेवले, त्यांचे फळ या विजयाच्या निमित्ताने आकार घेताना दिसते. त्यामुळे चर्च, कट्टरतावादी मुस्लीम संघटना, विविध फुटीरतावादी गट यांनी विरोध करूनही भारतीय जनता पक्ष आपली पाळेमुळे पूर्वांचलात रुजवू शकला.

राजकीय यश आभासी असते हे खरे असले, तरी विविध समाजगटात जे अंत:प्रवाह असतात, त्यांच्या परिणामांमुळे राजकीय प्रभाव निर्माण होत असतात. दिल्लीतील केंद्र सरकारमध्ये भाजपाची सत्ता आहे, त्याचा स्वाभाविक परिणाम पूर्वांचलावर झाला असला, तरी पूर्वांचलात सेवाकामाची पाळेमुळे नसती, तर केवळ केंद्र सरकारच्या प्रभावामुळे असा परिणाम दिसला नसता. राजकीय प्रभावाचा उपयोग करून स्थायी परिवर्तनासाठी विविध संघटनांच्या ढाच्यामध्ये तयार झालेल्या कार्यकर्त्यांनी पूर्वांचलातील वातावरणात बदल घडविणे आवश्यक आहे. त्याचा परिणाम पूर्वांचलातील राष्ट्रीय प्रवाहाच्या शक्ती अधिक मजबूत व प्रवाही करण्यात होईल. केवळ राजकीय सत्तेमुळे स्थायी समाजपरिवर्तन होत नसले, तरी राजकीय सत्ता कोणाची आहे, त्याचा परिणाम सामाजिक परिवर्तन कोणत्या दिशेने होणार यावर होत असतो. काँग्रेसच्या राजवटीत जातीय व फुटीरतावादी वृत्तींना पाठबळ मिळाले. त्यामुळे एकेकाळी पूर्वांचलातील राज्य या देशात राहतील की नाही अशी परिस्थिती निर्माण झाली होती. या विजयानंतर ज्या शक्तींना बळ मिळाले, त्यामुळे पूर्वांचलातील राष्ट्रीय एकात्मतेला पोषक असणाऱ्या शक्तींची वाढ होईल आणि हा संशय कायमचा निघून जाईल अशी चिन्हे दिसत आहेत. संघ संस्थांच्या कार्यपध्दतीतून असे परिवर्तन घडवता येऊ शकते, असा विश्वास यातून निर्माण झाला आहे.

केरळ, तामिळनाडू या दोन्ही राज्यांत धार्मिक आणि वैचारिक अराष्ट्रीय प्रवाहाने आपला प्रभाव निर्माण केला आहे. केरळमध्ये कम्युनिस्ट, मुस्लीम आणि ख्रिश्चन या शक्तींनी उभे केलेले आव्हान समर्थपणे स्वीकारत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शक्ती मोठया प्रमाणात वाढली आहे. तामिळनाडूमध्ये आर्य-द्रविड संघर्षाचा वापर करून घेत आपल्या राज्याची वेगळी संस्कृती आहे, असा प्रभाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. त्यामुळे इतर राज्यांप्रमाणे या दोन्ही राज्यांतील संघर्ष हा केवळ राजकीय संघर्ष नसून त्याला राष्ट्रवादी विचाराचे वेगळे परिमाण आहे. पूर्वांचलातील विजयामुळे या दोन्ही राज्यांत आज ना उद्या परिवर्तन होऊ शकते, असा विश्वास निर्माण झाला आहे. भारताचे एकराष्ट्रीयत्व गृहीत धरून जर चिकाटीने काम केले तर यश येते, या पूर्वांचलाने दिलेल्या अनुभवाची प्रचिती या दोन राज्यांत येईल. त्रिपुरामधील बंगाली समाज हा भाजपाच्या मागे राहिला, त्याचा परिणाम प. बंगालमध्ये झाल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे पूर्वांचलातील राज्ये छोटी असली, तरी या विजयाचा अर्थ हा छोटा नाही. भारताच्या भवितव्यावर दीर्घकालीन परिणाम करण्याची त्यांची शक्ती आहे. या सर्व राज्यांतून लोकसभेच्या पंचवीस जागा आहेत. त्यातील दहा जागांवर मागील निवडणुकीत भाजपाने यश मिळवले. पुढील निवडणुकीत आणखी दहा जागांची भर पडू शकते; परंतु हे यश तेवढया दहा जागांपुरते मर्यादित नसून भारताच्या सांस्कृतिक राष्ट्रवादात आपल्या वैशिष्टयांसह सर्व जाती, भाषा यांच्यासह सर्व जनजाती समूह सामावू शकतात, असा विश्वास देणारी ती घटना असेल.

[email protected]