मेळघाटातील आदिवासी जीवन

 विवेक मराठी  28-Mar-2018

 

***ओमप्रकाश ढोरे***

 मेळघाट डोंगररांगा या निसर्गाने नटलेल्या आणि जीवविविधतेने समृध्द आहेत. या मेळघाट परिसराच्या कुशीत राहणारा जनजाती समाज हा खऱ्या अर्थाने निसर्गाचा पूजक, निसर्गाचा रक्षक आहे. वर्षानुवर्षे स्वत:च्या परंपरा, संस्कृती जपणाऱ्या या समाजाचे आणि निसर्गाचे परस्परावलंबित्व लक्षात घेतल्याशिवाय या परिसराचा विकास शक्य नाही. एकूणच भौगोलिकदृष्टया, सामाजिकदृष्टया या परिसराचा वेध घेणारा हा लेख.

मेळघाट हा मध्य भारताच्या दक्षिण सातपुडा पर्वतरांगांमध्ये वसलेला भाग आहे. ह्या पर्वतरांगांना 'गाविलगड पर्वत' असेही संबोधतात. हा भाग अमरावती जिल्ह्याच्या उत्तरेकडे असून मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र सीमेवर असून चिखलदरा आणि धारणी या दोन तालुक्यांतील हा डोंगराळ भाग 'मेळघाट' नावाने ओळखला जातो. घाटांचा मेळ असल्यामुळेदेखील याला मेळघाट असे म्हटले जाते. वैराट हे सर्वोच्च शिखर समुद्रसपाटीपासून 1178मीटर उंच आहे. मेळघाटातून खंडू, खापर, सिपना, गाडगा आणि डोलार ह्या पाच नद्या वाहतात आणि पुढे तापी नदीला मिळतात. मेळघाट हे महाराष्ट्र राज्याचे जीवविविधतेचे भांडार आहे. निसर्गाने काही नोंदी गुणासह एक खडबडीत भौगोलिक परिस्थितीच्या स्वरूपात देऊ केली आहे. मेळघाट हा परिसर 1974मध्ये व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित केला. एकूण सुमारे 1677 चौ.कि.मी. क्षेत्रातील 361.28 चौ.कि.मी. जागा 'गुगामल राष्ट्रीय उद्यान' क्षेत्राकरिता आणि 688.28 चौ.कि.मी. क्षेत्र रिझर्व्ह मेळघाट वाघ अभयारण्य म्हणून राज्य सरकारद्वारे 1994मध्ये पुन्हा सूचित करण्यात आला. तसे गुगामल राष्ट्रीय उद्यान 1987मध्ये अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आले.

जीवविविधतेने संपन्न असलेल्या मेळघाटचा पूर्व वनप्रदेश म्हणजे चिखलदरा होय. हे ठिकाण समुद्रसपाटीपासून 3664 फूट उंचीवर आहे. कॅप्टन रॉबिन्सन या इंग्रज अधिकाऱ्याने सन 1823मध्ये या गावाचा शोध लावला. हे थंड हवेचे ठिकाण असून विदर्भाचे महाबळेश्वर म्हणून ओळखले जाते. उंच अशा दऱ्याखोऱ्यांतून भटकताना येथील हिरवी गर्द वनराई मनाला मोहून टाकते. निसर्गाची विविध रूपे पर्यटकांना भूल पाडतात. मोरपिसासारखी सिल्व्हर ओकची झाडे आपले लक्ष वेधून घेतात. याशिवाय ऐतिहासिक प्राचीन महाभारताचा वारसा सांगणारे 'भीमकुंड', आवाजाचे पाच प्रतिध्वनी ऐकू येणारा 'पंचबोल', देवी पॉइंट, मोझरी पॉइंट, आठशे-नऊशे वर्षांचा इतिहास सांगणारा उपेक्षित किल्ला गाविलगड ही सर्व ठिकाणे येथील वैशिष्टये म्हणता येतील.

मेळघाटच्या घनदाट जंगलात चिलादरी, पातुल्डा आणि गुगमाळ यासारखी दुर्गम ठिकाणेदेखील आहेत. मेळघाटमध्ये 'सिपना' (सागवान) नदी महत्त्वाची आहे. या जंगलात रानडुक्कर, वानरे, अस्वले, चितळ, नीलगाय, चौशिंगे, भुईअस्वले, रानमांजरे, कृष्णमृग, उडत्या खारी, तरस, कोल्हे, लांडगे, ससे, मोर, भूरबगडा, करकोचे, बलाक, बदके, रानकोंबडया, वाघ, तसेच सर्पगरुड, ससाणे, घार, पोपट, सुगरण, पारवे, बुलबुल, सुतार, मैना असे रानपक्षी बघायला मिळतात.

मेळघाटात राहणाऱ्या जमातींना आदिवासी असे संबोधतात. यात गोंड, कोरकू व गवळी ह्या प्रमुख जमाती होत. प्रत्येक जमाती आपली संस्कृती टिकवून ठेवण्यात सक्षम आहेत आणि आजही ते त्याचे पालन करतात. त्यांना निसर्गधर्म पाळणारे खरे हिंदू म्हणता येतील. आपण धर्माच्या पोकळ बाताच करतो. आपली धर्माबाबतची संकल्पना आपण संकुचित करून ठेवली. आपल्याला आपला धर्म विचारला तर कोणी म्हणेल माझा हिंदू धर्म, माझा बौध्द धर्म, माझा जैन, माझा इस्लाम, माझा पारशी असे सांगू. पण खऱ्या धर्माचे मूळ आदिवासी बांधवांना कळले. संस्कृतात एक वचन आहे - 'धारस्य इति धर्मा' - अर्थात आपण जे जे धारण करतो, तो आपला धर्म. (शेजारधर्म, मानवधर्म, शिक्षक धर्म) आदिवासी बांधव 'निसर्गधर्म' पाळतात, म्हणून ते निसर्गपूजक आहेत. जंगल त्यांचे जीवन आहे, म्हणून आधीपासून ते जंगलात वास करतात. मुठवादेव (कोरकूंचा देव), खेडा देव (ग्रामदेवता), बल्ला (लहान डोंगर) ही त्यांची दैवते, त्यांची संस्कृती, सण, उत्सव, परंपरा या देशाचा प्राचीन इतिहास जिवंत ठेवून आहेत. परंतु आज आदिवासी समाजाकडे बघण्याचा दृष्टीकोन बदललेला आहे. आपण त्यांना अशिक्षित, अडाणी समजतो. परंतु आपणच खरे सुशिक्षित अडाणी ठरतो. आपण बघतो, नववर्षाचा जल्लोश करताना 31 डिसेंबरला मद्यधुंद अवस्थेत, नाचगाण्याने, मांस खाऊन नवीन वर्षाचे स्वागत होताना दिसते. उलट आदिवासी समाजबांधव परंपरेनुसार विधिवत पूजा करून नवीन वर्षाचे स्वागत करतात. कामाच्या निमित्ताने बाहेरगावी गेलेला आदिवासी बांधव 'देवपळस' फुलल्यावर गावात परततो आणि आपली कामे करतो.

दिवाळी हा आदिवासी बांधवांचा अत्यंत महत्त्वाचा सण आहे. ही दिवाळी बघण्यासारखी असून निसर्ग आणि प्राणी पूजक असते. लक्ष्मीपूजनापासून दिवाळीची सुरुवात होते आणि पुढील दहा दिवस हा सण साजरा होतो. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी गाई-म्हशींना जंगलातील नदीवर नेऊन आंघोळ घातली जाते. त्यानंतर नदीवर कुलदैवताची पूजा केली जाते. घरी परतल्यावर सायंकाळी गोठयात शिरण्याआधी गाईच्या पायावर पाणी घालून यथासांग पूजा केली जाते. दुसऱ्या दिवशी बलीप्रतिपदेला दुभत्या जनावरांची विशेष पूजा केली जाते. त्यांना गोडधोड खाऊ घातले जाते. हा दिवस गवळी समाजाचा सर्वात महत्त्वाचा दिवस मानला जातो. या दिवशी घरातील सर्व सदस्य नवीन कपडे परिधान करतात. अंगावर घोंगडी घेऊन गाई-म्हशींची पूजा करतात. गाई-म्हशीला दुधाने आंघोळ घालतात. घरातील सर्व जण गुराख्याच्या पाया पडतात. गुराख्याला नवीन कपडे देतात. त्यानंतर गाई-म्हशीचे पाय धरले जातात व त्यांचेदेखील आशीर्वाद घेतात. आज आधुनिक जगाच्या काळातदेखील गावकरी ही परंपरा तितक्याच निष्ठेने जपत आहेत. या परंपरा त्यांच्या जगण्याचा भाग झाला आहे.

'घुंगरू बाजार' हा बाजार आदिवासी समाजाचा विशेष उत्सव आहे. दिवाळीनंतर येणारा पहिला आठवडी बाजार मेळघाटात 'घुंगरू बाजार' म्हणून प्रसिध्द आहे. या दिवशी आजूबाजूच्या गावातील लोक समूहाने बाजारात येतात. पारंपरिक धोतर, बंडी, मुंडासे व पायात बांधलेले घुंगरू या वेषात बाजारात येतात. ढोल, पिपाणी, बासरीच्या तालावर लयबध्द पदन्यास करीत नृत्य करतात. गावात एकमेकांच्या प्रेमात पडलेले तरुण-तरुणी या घुंगरू बाजारातून पळून जातात व लग्न करतात, तर काही तरुण याच बाजारात तरुणींना आकृष्ट करून पळवून नेतात. आजूबाजूच्या गावामधल्या विवाहोत्सुक तरुण-तरुणी नटून थटून बाजारात बागडत असतात व आपला मनपसंत जोडीदार निवडतात. पायात घुंगरू बांधून जोडीदारांना आकर्षित करण्याचा हा एक प्रकार असतो. यामध्ये कुठेच अश्लीलतेला वाव नसतो. परंतु आता तरुणाईमध्ये पारंपरिकऐवजी पँट, शर्ट, स्पोर्ट शूज, गॉगल व पानाचा तोबरा व मोटारसायकल असा बदल मोठया प्रमाणात दिसत असून मेळघाटच्या दऱ्याखोऱ्यांतून आधुनिकतेचे वारे वाहू लागल्याचे दिसून येते. बाजारात नृत्य करून मिळालेल्या बिदागीतून संध्याकाळी दारू व मांसाहारावर यथेच्छ ताव मारला जातो. मेळघाटातल्या हरिसाल, देढतलाई, चुरणी, धारणी या गावात हा घुंगरू बाजार भरतो.

जंगलातील साधनसंपत्तीवर आणि शेतीवर आदिवासींचे जीवन अवलंबून आहे. त्यांना जगणे आणि जगवणे कळते. त्यांना व्यवहार कळत नाही. व्यवहारी समाज त्याच्या भोळेपणाचा फायदा घेताना दिसतो. आदिवासींचा एक गुण वाखाणण्याजोगा आहे, तो म्हणजे ते मेहनत करतात, कष्ट करतात, परंतु लाचारी पत्करत नाही आणि कुठेही भीक मागत नाहीत. त्यांच्या जगात ते आनंदी आणि समाधानी आहेत. त्यांच्या डोळयात कुठेच हावरटपणा, ईर्षा किंवा लालसा दिसत नाही. ते तृप्त आहेत. त्या उलट आपण अतृप्तच जीवन जगतो आणि म्हणून दु:खी असतो. फळे परिपक्व झाल्याशिवाय तो तोडत नाही. काही विशिष्ट दिवशी दुधाची धार काढत नाहीत, तसेच कच्ची कैरी कधीच तोडत नाहीत. यामागे जरी श्रध्दा असली, तरी त्यामागे विज्ञानवादी दृष्टीकोनदेखील दिसून येतो. कच्चे फळ तोडणे म्हणजे ते ती एक प्रकारची 'भ्रूणहत्या' मानतात. तसेच गावात 'जात पंचायत' (आडा पटेल)मार्फत गावगाडयातील निर्माण झालेल्या समस्यांचे न्यायनिवाडे केले जातात. आजही हा समाज आपल्याच नियमांचे पालन करतो. ह्या भागात वनसंपदा भरपूर आहे. परंतु 'जांगडी' (बाहेरचे लोक) याचा फायदा घेतात. ते एक प्रकारचे शोषण करीत आहेत.


आज मेळघाटची खरी ओळख लोप पावली असून 'कुपोषण' ह्या शब्दापुरती करून ठेवली. शासनदेखील आदिवासींना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी बऱ्याच योजना राबवताना दिसत आहे. परंतु त्यांना यांचा लाभ होताना दिसत नाही. बऱ्याचशा समाजसेवी संस्था, मिशनरीज यांचा शिरकाव होऊन समाजसेवेच्या नावाखाली बऱ्याचदा शोषणच होताना दिसते. मग ते आर्थिक असो की अन्य कुठले. जंगलातील चारोळी, बोरे, टेंभरे, कंदमुळे, वनौषधी, मोहाची फुले इत्यादी जिन्नस जास्तीच्या भावात घेऊन व्यापारी लोक श्रीमंत होत आहेत. आदिवासींना खरी गरज आहे ती त्यांच्यामध्ये असलेल्या वेगवेगळया कलांना वाव देऊन जगापुढे आणण्याची. उदा., बांबूपासून वेगवेगळया वस्तू बनवणे व त्याला बाजारपेठ उपलब्ध करून देणे.

मेळघाटातील लवादा या गावात सुनीलजी देशपांडे आणि निरुपमा देशपांडे यांनी 'संपूर्ण बांबू केंद्र' स्थापन करून त्यांच्यासोबत राहून आदिवासींना स्वयंपूर्ण बनविले. हे त्यांचे कार्य वाखाणण्याजोगे आहे. त्यांच्या मते 'मुळात जे ज्याचे आहे, त्याचा अधिकार त्याला मिळवून देण्यासाठी हा लढा आहे. एन.आय.टी., आय.आय.टी.मधून बाहेर पडलेल्या विद्यार्थ्याला मिळणारा मानाचा दर्जा आणि स्थान, परंपरेने बांबू कला शिकणाऱ्या आणि जपणाऱ्या आदिवासी कोरकू युवकाला का मिळू नये? मोठमोठी यंत्रसामग्री वापरून तयार झालेल्या बांबूच्या वस्तूचा स्वीकार केला म्हणजे आदिवासी संस्कृती स्वीकारली असे कुठाय? खरे तर तो बांबूवरही अन्याय ठरतो आणि आदिवासीवरही. छोटया छोटया गावांमधल्या कारागीरांना न्याय मिळायला हवा, म्हणून 'हुनर खोज' अभियान राबवून श्रमाला प्रतिष्ठा प्राप्त करून देत आहेत. लोखंडाच्या तुलनेत भविष्यात बांबू हा एकविसाव्या शतकातील मौल्यवान वस्तू ठरणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मात्र त्याचे शास्त्रीय महत्त्व, तंत्रज्ञान, त्याच्या वापराची परंपरागत भारतीय पध्दत विकसित आणि जतन करायची असेल, तर त्याचे शास्त्र तयार व्हायला हवे. केवळ बांबूच नाही, तर ग्रामीण भागातील बारा बलुतेदारांच्या कलाकुसरीचे शास्त्र, वस्तू, लिखित आणि दृक-श्राव्य पध्दतीने तयार करण्याची कल्पना 'ग्राम ज्ञान पीठ' साकारण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. स्थानिक कच्चा माल आणि स्थानिक लोकशक्ती यांच्या समन्वयातून एक उपक्रम लोकाभिमुख ठरू लागला आहे. ही जागृती मेळघाटला नक्कीच मोठया उंचीवर नेऊन ठेवेल. मेळघाटबाबत सकारात्मक दृष्टीकोन आवश्यक आहे. निसर्गाचा सन्मान करायला शिका, आदिवासींचा सन्मान करा एवढेच या ठिकाणी नमूद करावेसे वाटते.

9423427390