पर्यावरणस्नेही सी.एन.जी. इंधन

 विवेक मराठी  28-Mar-2018

सी.एन.जी. हे इतर इंधनांपेक्षा तुलनेने सुरक्षित आहे. कारण नैसर्गिक वायू हवेपेक्षा कमी वजनाचा असतो, तसेच त्याचे विघटनदेखील जलद गतीने होत असते. त्यामुळे यापासून विपरीत परिणाम होण्याच्या शक्यता इतर इंधनापेक्षा कमी असतात.

गेल्या वीस वर्षांची आपली जीवनपध्दती आणि आत्ताची पध्दती यात जमीन-अस्मानाचे अंतर आहे असे म्हटले जाते. मात्र आता या जमीन आणि अस्मानच्या मध्ये साचला जाणारा धूर दिवसेंदिवस वाढत चालला आहे. दिवसेंदिवस वाढत जाणारे प्रदूषण त्याला कारणीभूत आहे. त्याचबरोबर काळाबरोबर मानवाच्या गरजांचे स्वरूपदेखील बदलत जात असल्यामुळे हा बदल होताना दिसतो. आजच्या वीस वर्षांपूर्वी प्रत्येक घरात दुचाकी अथवा इतर वाहने नसत. लोक सार्वजनिक वाहतुकीचा मोठया प्रमाणात वापर करताना दिसत. मात्र आजची परिस्थिती अत्यंत किचकट झाली असून आज प्रत्येक घरात किमान एक आणि सरासरी दोन वाहने नक्कीच असतात. त्यामुळे लागणाऱ्या इंधनाची मागणीदेखील वाढली आहे आणि त्याचा परिणाम म्हणून होणाऱ्या प्रदूषणात मोठया प्रमाणात भर पडलेली आहे.

अशा पध्दतीने आणि याच गतीने आपण जीवन जगत राहिलो, तर येणाऱ्या वीस वर्षांनी प्रदूषणाची स्थिती काय असेल? याची कल्पनादेखील करवत नाही. या विपरीत परिणामाचे उदाहरण म्हणून आपण दिल्लीत होणाऱ्या धुराक्यांच्या परिणामाकडे बघितले पाहिजे. वाढलेल्या वाहनसंख्येमुळे प्रदूषणात वाढ झाली आणि परिणामत: ऐन थंडीच्या काळात तेथे धुरके साचून वातावरण विषारी बनले आहे. दिल्लीकरांच्या वैयक्तिक आयुष्यात त्याचे अनेक विपरीत पडसाद उमटू लागले आहेत. ही परिस्थिती देशातील किंवा जगातील इतर शहरांमध्ये होऊ  द्यायची नाही असे जेव्हा लक्ष्य डोळयांसमोर उभे राहते, तेव्हा सी.एन.जी. इंधनाचे महत्त्व विशद करावेच लागते.

सी.एन.जी. तंत्रज्ञान

कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस अर्थात सी.एन.जी. यात मिथेन नावाचा वायू दाब देऊन साठवला जातो. अत्यंत मोठया दाबाखाली मिथेन सिलेंडरमध्ये भरून याचा वापर इंधन म्हणून करण्यात येतो. पेट्रोल, डिझेलला पर्याय म्हणून हे इंधन वापरले जाते. सी.एन.जी. हे इतर इंधनांपेक्षा तुलनेने सुरक्षित आहे. कारण नैसर्गिक वायू हवेपेक्षा कमी वजनाचा असतो, तसेच त्याचे विघटनदेखील जलद गतीने होत असते. त्यामुळे यापासून विपरीत परिणाम होण्याच्या शक्यता इतर इंधनापेक्षा कमी असतात.

याचे आणखी एक वैशिष्टय म्हणजे मिथेन वायू कॉम्प्रेस होत असताना 1 टक्क्यापेक्षा कमी जागा व्यापतो, त्यामुळे छोटया बंद पात्रात अधिकाधिक इंधन सामावण्याची क्षमता असते. हे इंधन वाहनात वापरता यावे, म्हणून त्यासाठी वाहनांचे वेगळे इंजीन तयार केले जाते. काही इंजीन हे सी.एन.जी. आणि गॅसोलाईन प्रणाली या दोन्हीसाठी वापरली जातात, तर काही सी.एन.जी. आणि डिझेल/पेट्रोल यांच्या उपयोगासाठी तयार केलेली असतात.

सद्यःस्थितीत जगात एकूण वाहनांच्या तुलनेत सी.एन.जी. वाहनांचा वापर 30 टक्के एवढा आहे. अत्यंत कमी कालावधीत हा आकडा गाठण्याचे कारण म्हणजे या तंत्रज्ञानात तयार झालेल्या इंजीनची किफायतशीर किंमत. सी.एन.जी. इंजीनची वाहने पेट्रोल आणि डिझेल इंजीनपेक्षा कमी दरात बाजारपेठेत उपलब्ध आहेत, त्याचबरोबर हे इंधनदेखील कमी दरात मुबलक प्रमाणात उपलब्ध होते.

सी.एन.जी. वापरणारे देश

2011च्या आकडेवारीनुसार जगात 1 कोटी 48 लाख सी.एन.जी. वाहने आहेत. यात सर्वाधिक वापर करणारा देश म्हणजे इराण होय. इराणमध्ये 26.8 लाख एवढी वाहने सी.एन.जी.वर चालवली जातात. त्यापाठोपाठ पाकिस्तानचा क्रमांक लागतो. पाकिस्तानमध्ये 28.5 लाख वाहने सी.एन.जी.वर चालवली जातात. याच ओळीत अर्जेंटिना (20.7 लाख), ब्राझिल (17 लाख) आणि भारत (11 लाख) येथे एवढी वाहने सी.एन.जी.वर चालवली जातात.

देशपातळीवर विचार करायचा झाल्यास भारतात दिल्लीत सर्वाधिक सी.एन.जी. वाहने वापरली जातात. 2016पासून तेथे दुचाकीतदेखील सी.एन.जी. किट बसवण्यात आली आहेत. त्यानंतर अहमदाबादचा क्रमांक लागतो. अहमदाबाद येथील सार्वजनिक वाहतुकीत मोठया प्रमाणात सी.एन.जी.चा वापर करण्यात आला आहे. त्याचबरोबर अनेक चारचाकी सी.एन.जी. इंजीन असलेल्या आहेत. त्यानंतर अनुक्रमे मुंबई, पुणे, कोलकाता, लखनऊ, कानपूर या शहरांचा समावेश होतो.

& 9579559645