नंदुरबारची जनकल्याण रक्तपेढी सेवा कार्याची तपपूर्ती

 विवेक मराठी  28-Mar-2018

 

***विवेक गिरिधारी****

आपण कितीही सवलत दिली, तरी सर्वांना पूर्णपणे मोफत देणे ही केवळ अशक्यच गोष्ट असते व पूर्णपणे अव्यवहार्य असते. मात्र रक्तपिशवीसाठी शुल्क दिले पाहिजे, हे लोकांना हळूहळू पटू लागले आहे. मोठया शहरांमधील रक्तपेढयांमध्ये अशा अनुभवांना क्वचितच सामोरे जावे लागत असते. पण नंदुरबारसारख्या भागात मात्र आर्थिक मागासलेपणाबरोबरच मानसिक पातळीवरचे मागासलेपणही असते, हे ध्यानात घेतले पाहिजे.

 कुपोषण आणि बालमृत्यू अशीच उर्वरित महाराष्ट्राला ओळख असलेल्या नंदुरबार जिल्ह्यात एक तपापूर्वी जिल्ह्यातील पहिली रक्तपेढी सर्व प्रकारच्या अडी-अडचणींवर मात करत उभी राहिली. तिच्या निर्धारपूर्वक चालू असलेल्या वाटचालीचा परिचय आपण आवर्जून करून घ्यायलाच हवा.

रक्तपेढीची सुरुवात

पुण्यातील जनकल्याण समितीने 1985च्या सुमारास दुष्काळ निवारण कार्यात नंदुरबार परिसरात बरेच मोठे काम केले. त्या वेळी तेथील डॉ. सुधीर देसाई यांचा जनकल्याण समितीशी प्रथम संपर्क आला व पुढेही कायम राहिला. त्याच वर्षी डॉ. देसाई पुण्यातील वैद्यकीय पदव्युत्तर शिक्षण संपवून नंदुरबारमध्ये परतले होते. डॉ. देसाई हे अगदी काही शाखारचनेपासून संघाशी पूर्वपरिचित वगैरे नव्हते. रमेशभाई शहा या तत्कालीन संघ प्रचारकांशी त्यांचा अगदी अल्पकाळ अनौपचारिकरित्या संपर्क आला होता. पुढे नंदुरबारमध्ये जिल्ह्यातील पहिली रक्तपेढी चालू करण्याचा जनकल्याण समितीचा प्रयत्न 2001पासून चालू झाला. निधी संकलनही चालू झाले होते. अर्थात यात डॉ. देसाई यांचाच पुढाकार अधिक होता. त्या वेळेस डॉ. अनंतराव कुलकर्णी हे जनकल्याण समितीचे काम बघत होते. डॉ. देसाई यांच्या प्रयत्नाला त्यांचे प्रोत्साहन होते. त्या वेळी भैयाजी जोशी इथे जिल्हा प्रचारक होते. त्यांनीही रक्तपेढीची कल्पना उचलून धरली होती. कारण एकही रक्तपेढी नसलेल्या नंदुरबार जिल्ह्यात तातडीने रक्तपेढी चालू होण्याची निकड मोठी होती.
डॉ. देसाई यांचे वैद्यकीय शिक्षण एम.डी. (पॅथॉलॉजी) व एम.डी. (सर्जरी) असे झालेले होते. डॉ. देसाई यांचे आजोबा हे नंदुरबारमधील पहिले डॉक्टर होते. ते त्या काळी कलकत्त्यातून एल.सी.पी.एस. शिकून आले होते. त्यांच्या पावलावर पाऊल टाकून डॉ. देसाई हे नंदुरबारमधील पहिले द्विपदव्युत्तर पदवी घेतलेले डॉक्टर होते. रक्तपेढी चालू केल्यास त्या माध्यमातून आपल्या शिक्षणाचा समाजाला चांगला उपयोग होऊ शकतो, ही त्यांची त्यामागची भावना होती. अर्थांत डॉ. देसाई सर्जन असल्यामुळे त्यांचे स्वतंत्र असे 'विवेकानंद हॉस्पिटल' चालू होतेच. बरीच धावपळ करून अखेरीस 2005मध्ये गुढीपाडव्याला नंदुरबारमधील जनकल्याण रक्तपेढीस सुरुवात झाली. डॉ. अशोकराव कुकडे यांच्या उपस्थितीत रक्तपेढीचे उद्धाटन झाले. मुंबईमधील मोठे व्यावसायिक व मूळचे नंदुरबारचे असणारे डॉ. सन्मुखभाई शहा यांच्या हस्ते उद्धाटन झाले. त्यांनी त्या काळी रक्तपेढीस पाच लाख रुपयांची देणगी दिली होती. विद्यमान सरसंघचालक आदरणीय मोहनजी भागवत यांनीही त्यांच्या दशकभरापूर्वी धावत्या दौऱ्यात या रक्तपेढीला आवर्जून भेट दिलेली आहे.

नंदुरबारसारख्या ठिकाणी एम.डी. (पॅथॉलॉजी) झालेली अन्य व्यक्ती मिळणे दुरापास्त असल्यामुळे त्यांना स्वत:लाच सुरुवातीच्या काळात रक्त संक्रमण अधिकारी म्हणून काम करावे लागेल, याची कल्पना होती. त्यामुळे त्यांनी स्वत:च्या हॉस्पिटलचे काम सांभाळून हे काम करता यावे, म्हणून हॉस्पिटलच्या दुसऱ्या मजल्यावर बांधकाम करून नाममात्र दराने रक्तपेढीला जागा भाडयाने दिली. प्रत्यक्षात हॉस्पिटलचे व रक्तपेढीचे काम सांभाळताना त्यांची तारांबळ होत असे. प्रशिक्षित मनुष्यबळाची कमतरता ही रक्तपेढीची एक दुसरी मोठी अडचण होती. केवळ प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध होत नसल्याने, दीड वर्ष पुरेसे काम नसतानाही डी.एम.एल.टी. झालेल्या एका व्यक्तीस पगार देऊन ठेवावे लगले. कारण ही व्यक्ती दुसरीकडे गेली, तर आपल्याला नंदुरबारसारख्या ठिकाणी इतकेसुध्दा शिकलेली दुसरी व्यक्ती मिळणार नाही म्हणून. सुरुवातीच्या वर्षांमध्ये महाविद्यालयीन विद्यार्थ्यांतर्फे प्रत्येकी 10 रुपये अशा प्रकारे रक्तपेढीसाठी निधी संकलन करण्यात आले. लग्नाच्या आहेराची पावती रक्तपेढीच्या नावे करूनही वेळप्रसंगी देणगी स्वीकारण्यात आली. त्यामागे पैशापेक्षाही माहिती होणे हा प्रमुख उद्देश होता.

रक्तसंकलनातील मोठया अडचणी

नंदुरबार हा 67 टक्के आदिवासी लोकसंख्या असलेला जिल्हा आहे. अक्कलकुआ व धडगाव हे तर पूर्णत: आदिवासी तालुके आहेत. त्यातील 35 टक्के आदिवासी हे सिकलसेल प्रभावित (कॅरिअर) आहेत. त्यांचे हिमोग्लोबिन कमी होईल या कारणाने त्यांचे रक्त घेता येत नाही. दुसरीकडे रक्तदानाविषयी जागृती कमी अन गैरसमजच जास्त! रक्तपेढी रक्त घेते व वर पैसेही घेते हे स्थानिक लोकांना मान्य नव्हते. रक्त साठवणीसाठी व त्याच्या शास्त्रशुध्द आवश्यक तपासण्या करण्यासाठी मोठा खर्च येत असतो, हे त्यांच्या गावीही नसायचे. सुरुवातीच्या काळात रक्तदानाविषयी विशेष जागृती नसल्यामुळे रक्तदान न करता फक्त रक्त घेऊन जाण्याकडे रुग्णांच्या नातेवाइकांचा अधिक कल असायचा. अर्थात आजही या समजुतीमध्ये फार मोठा बदल घडून आला आहे अशी काही परिस्थिती नाही. आपण कितीही सवलत दिली, तरी सर्वांना पूर्णपणे मोफत देणे ही केवळ अशक्यच गोष्ट असते व पूर्णपणे अव्यवहार्य असते. मात्र रक्तपिशवीसाठी शुल्क दिले पाहिजे, हे लोकांना हळूहळू पटू लागले आहे. मोठया शहरांमधील रक्तपेढयांमध्ये अशा अनुभवांना क्वचितच सामोरे जावे लागत असते. पण नंदुरबारसारख्या भागात मात्र आर्थिक मागासलेपणाबरोबरच मानसिक पातळीवरचे मागासलेपणही असते, हे ध्यानात घेतले पाहिजे.

नंदुरबारमध्ये कारखानदारी अथवा औद्योगिक भाग नसल्यामुळे कंपनीत एका जागी रक्तदान शिबिरात मोठया संख्येने रक्त संकलित होण्याची शक्यता नाही. अन्य संघटित उद्योग नसल्यामुळे रक्तदान शिबिरे घेण्यावर मर्यादा असते. त्यामुळे वेळप्रसंगी रक्तपेढी बंद करून फक्त रक्त साठवण केंद्र (स्टोरेज युनिट) चालविण्याचा विचारही डॉ. देसाई यांच्या मनात येऊन गेला. 2016च्या आसपास शासनाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला, तो म्हणजे रक्तपेढयांमध्ये रक्तपिशव्यांची आपापसात संक्रमण करण्यास दिलेली परवानगी. त्यामुळे ज्या ठिकाणी मोठया प्रमाणात रक्त संकलन होते, अशा नाशिक व औरंगाबाद येथील जनकल्याण रक्तपेढीतील साखळीतील पेढयांकडून आता रक्तपिशव्या नंदुरबारला आणणे शक्य झाले आहे. त्यामुळे आता रक्त नाही म्हणून रुग्ण रक्तपेढीतून परत माघारी जाण्याची शक्यता पूर्णपणे मावळल्यात जमा आहे. असे असले, तरी रक्तपेढीचे सध्या पंधराशेच्या आसपास असलेले रक्तपिशव्यांचे वार्षिक संकलन वाढण्याची निश्चितच गरज आहे.

खरे तर नंदुरबार शहरापासून अनेक खेडी अगदी जवळच्या अंतरावर आहेत. तेथे उत्साहाने रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यासाठी स्थानिक गावपातळीवरील कार्यकर्त्यांनी, स्वयंसेवकांनी पुढाकार घेतला पाहिजे. तेथे अगदी किमान वीस पिशव्या रक्तसंकलन झाले, तरी रक्तदान शिबिर यशस्वी झाले असे म्हणता येईल. महिन्यातून अशा किमान शंभर रक्तपिशव्यांचे तरी संकलन व्हायला हवे. फक्त वेळप्रसंगी रुग्णांसाठी रक्त घेऊन जाणाऱ्या खेडयातील मंडळींपर्यंत रक्तदानाचा संस्कार पोहोचविण्याची सध्या गरज आहे. यासाठी निकड आहे ती एका उत्साही प्रवर्तकाची, जो अशा स्थानिक आयोजकांना प्रोत्साहित करू शकेल व पाठपुरावा करून प्रत्यक्ष रक्तदान शिबिरे खेडयात आणू शकेल.

महानगरपालिकेतून आरोग्य अधिकारी म्हणून सेवानिवृत्त झालेले डॉ. अर्जुन लालचंदाणी हे सध्या रक्तपेढीचे रक्त संक्रमण अधिकारी असून ते मोठया उत्साहाने नंदुरबारमध्ये रक्तदानासाठी प्रचार करत असतात. इतकेच नव्हे, तर ते नेत्रदान व अवयवदान यासाठीही मोठया हिरिरीने प्रचार करत असतात. त्यांचा दांडगा उत्साह पाहून नंदुरबार महानगरपालिकेने सध्या स्वच्छता अभियानाचे 'ब्रँड ऍम्बॅसॅडर' म्हणून त्यांची नियुक्ती केलेली आहे. रक्तपेढीच्या वाटचालीत अगदी सुरुवातीपासून डॉ. देसाई यांच्या बरोबरीने पुढाकार घेणारे योगेश पारीख हे आता रक्तपेढीचे खजिनदार म्हणून जबाबदारी पार पाडत आहेत. कीर्तिकुमार वाणी हे सध्या सचिव आहेत. ललितभाई पाठक हेही एक आधारस्तंभ आहेत.

शासकीय रक्तपेढीची भर

नंदुरबारच्या सहा तालुक्यांत फक्त जनकल्याण रक्तपेढी हीच एकमेव रक्तपेढी अनेक वषें होती. आदिवासी रुग्णांची आर्थिक परिस्थती व शासकीय रुग्णालयाची गरज लक्षात घेता तेथे शासकीय रक्तपेढी चालू होणेही खूप गरजेचे होते. परंतु शासनास एम.डी. (पॅथॉलॉजी) शिकलेली व्यक्ती उपलब्ध होत नसल्यामुळे रक्तपेढी सुरू होत नव्हती. अनेकदा जाहिरात देऊनही शासनास अशी व्यक्ती उपलब्ध झाली नाही. अखेरीस डॉ. देसाई यांना करारावर शासकीय नोकरीत घेऊन 2010च्या आसपास शासकीय रक्तपेढीस सुरुवात झाली. शासकीय रक्तपेढीतून दारिद्रयरेषेखालील लोकांना पूर्णपणे मोफत रक्त दिले जात होते, हा मुख्य फायदा झाला. मे व जून महिन्यात रक्तपिशव्यांची मागणी वाढलेली असते आणि रक्त संकलन मात्र घटलेले असते. अशा वेळेस जनकल्याण रक्तपेढीस शासकीय रक्तपेढीला मदत करायची पाळी येते.

दरम्यान अलीकडे नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथे अन्य स्थानिक संस्थेतर्फे 2015मध्ये एक नवीन रक्तपेढी स्थापन झाली आहे. परंतु शहाद्याचे नंदुरबारपासूनचे अंतर लक्षात घेता त्याचा नंदुरबारमधील रक्त संकलनावर व वितरणावर विशेष परिणाम होण्यासारखा नाही. नंदुरबारमधील उत्साही कार्यकर्त्यांनी आता तर 'नंदुरबार रक्तदाता ग्रूप' सध्या तयार केला असून त्यात 1500 सदस्य आहेत. त्यात रक्ताची दररोजची उपलब्धता व गरज मांडली जाते. यात शासकीय रक्तपेढीचीही माहिती असते. नंदुरबारमध्ये एकूणच 'होल ब्लड'ची गरज मोठी आहे. त्यामुळे आधी विचारात घेतलेला रक्तविघटन केंद्र उभारण्याचा विचार जनकल्याण रक्तपेढीला सध्या तरी मागणीअभावी सोडून द्यावा लागला आहे.

रक्तपेढीचे जिकिरीचे अर्थकारण

सध्या या रक्तपेढीतर्फे वर्षाला साधारण किमान 2000 ते कमाल 2500 रक्तपिशव्यांचे वितरण केले जाते. रक्तपेढीचे आर्थिक आरोग्य उत्तम राहायचे असेल, तर मात्र वर्षाला किमान 2500 पिशव्यांचे वितरण होणे गरजेचे आहे. असे झाले, तरच ती आर्थिकदृष्टया स्वयंपूर्ण होऊ शकते. अन्यथा देणग्या मिळवून तोटा भरून काढावा लागतो, सवलतीच्या दरात रक्त देण्यावर मर्यादा येऊ  शकते. हे लक्षात घेऊन प्रत्यक्ष रक्तदानाबरोबरच रक्तपेढयांना आर्थिक मदत करण्याचे प्रमाणही वाढायला हवे. थॅलिसेमियासारख्या आजारात तर नियमित रक्त द्यावे लागते. असा रुग्ण जर आदिवासी अथवा दुर्बल आर्थिक स्तरातील असेल, तर ते त्याच्या आवाक्याबाहेरचे असते. अशा वेळेस त्यांना मोफत अथवा सवलतीच्या दरात रक्त देण्यावाचून पर्यायच नसतो. यासाठी रक्तपेढयांना आर्थिक देणग्यांची गरज भासते.

गुणवत्तापूर्ण रक्त वितरित होण्यासाठी शासकीय पातळीवर दिवसेंदिवस निकष कठोर होत चालले आहेत, ही चांगलीच गोष्ट असली तरी खर्चीक आहे. त्यासाठी रक्तपेढयांना विविध प्रकारच्या रक्त तपासण्यांसाठी लागणाऱ्या अनेक छोटया-मोठया यंत्रांची गरज वाढत चाललेली आहे. दुसरीकडे जुनी दहा-बारा वर्षांपूर्वीची यंत्रसामग्री आता कालबाह्य होत असून आता नव्या सुसज्ज यंत्रांनी त्यांची जागा घेणे निकडीचे बनले आहे. यामुळेच रक्तपेढयांना आर्थिक देणगी देण्यासाठी समाजातील दानशूर लोकांनी पुढे येण्याची नितांत गरज आहे. रोटरी, लायन्स क्लब यांनी आणि कंपन्यांच्या सीएसआर विभागांनी यात पुढाकार घेण्याची गरज आहे. पुण्यातील नातू फाउंडेशनने या रक्तपेढीला नुकतीच एक लाख रुपयांची मदत केली आहे. खरे तर अशा रक्तपेढया सक्षमतेने चालू राहणे व ठेवणे यात समाजाच अधिक स्वार्थ आहे, हे ध्यानात घ्यायला हवे!

डॉ. देसाई यांचे अतुलनीय योगदान

पुण्यातील सुप्रसिध्द बी.जे. महाविद्यालयात डॉ. देसाई यांचे वैद्यकीय शिक्षण झाले. तेथेच पदव्युत्तर शिक्षण झाल्यावर ते त्याच महाविद्यालयात प्राध्यापकी करू लागले होते. परंतु नंदुरबारच्या ओढीने त्यांनी सुखवस्तू प्राध्यापकी सोडली व ते परत गावाकडे आले. महाविद्यालयीन शिक्षण चालू असताना त्यांनी स्वामी विवेकानंदांच्या वाङ्मयाचे वाचन केले होते. त्यांच्या तरुण संवेदनशील मनावर त्याचा परिणाम झाला. भौतिक गोष्टींपेक्षा अर्थपूर्ण जगण्याची त्यांना ओढ वाटू लागली. त्यामुळेच ते कदाचित नंदुरबारमध्ये परतले व स्थिरावलेदेखील! पुण्यात अथवा मुंबईमध्ये स्थिरावण्याचा निर्णय घेणे त्यांना काहीच अवघड नव्हते - किंबहुना आर्थिकदृष्टया अतिशय लाभदायी होते, यात शंकाच नाही. नंदुरबारमध्ये स्थायिक होण्याच्या त्यांच्या निर्णयाला त्यांची पत्नी लीना यांचाही मोठा पाठिंबा व साथ होती. डॉक्टरांचे आई-वडील हे गुजराथी दसापोरवाड वैष्णव समाजातील पारंपरिक वळणाचे व संस्कारांचे पालन करणारे आहेत. सगळयांना परिचित असलेले भारताचे माजी पंतप्रधान मोरारजीभाई देसाई हे या समाजातील होते. त्यांचे वडील हे अत्यंत प्रामाणिक व सचोटीचे होते. त्यांना खोटे बोललेले अजिबात खपत नसे. या सर्व घरगुती वातावरणाचा डॉक्टरांवर नक्कीच प्रभाव पडला असावा.

डॉ. देसाई हे नंदुरबार जिल्ह्यातील जनकल्याण व शासकीय या दोन्ही रक्तपेढयांचे प्रवर्तक व आधारस्तंभ आहेत. त्यांच्यामुळे या दोन्ही रक्तपेढया सुरु होऊ  शकल्या. अन्यथा या रक्तपेढया कदाचित किमान दशकभर तरी नक्कीच लांबणीवर पडल्या असत्या. नंदुरबारच्या शिरीषकुमारने कोवळया वयात स्वातंत्र्यपूर्व काळात बलिदान दिले. त्यांच्या आदर्शाला साजेसे ठरत याच शहरातील उच्चशिक्षित डॉ. देसाई यांनी मोठया शहरात जाऊन आत्मकेंद्रित जगण्याची वाट न निवडता त्यांच्या परीने समाजकार्याची अनुकरणीय वाट धरली, असे निश्चितपणे म्हणता येईल.

9422231967