पुतळे तोडून विचार संपत नाहीत...

 विवेक मराठी  08-Mar-2018

प्रश्न असा आहे की अशा प्रकारे पुतळे पाडून विचार नष्ट करता येतात का? आणि असा व्यवहार आपल्या संस्कृतीला मान्य आहे का? या प्रश्नाच्या तळाशी जाऊन आपण विचार करणार आहोत का? राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या सर्वच राजकीय कार्यकर्त्यांनी या प्रश्नाचा गंभाीरपणे विचार करायला हवा. 

त्रिपुरात निवडणुका झाल्या आणि निकाल लागल्यानंतर स्थानिकांनी दोन ठिकाणी लेनिनचे पुतळे पाडले. त्रिपुरामध्ये ही घटना घडली आणि पुढील दोन दिवसांत तामिळनाडू, प.बंगाल, उत्तर प्रदेश आणि केरळ या राज्यात रामस्वामी पेरियार, श्यामाप्रसाद मुखर्जी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी यांच्या पुतळयांची विटंबना झाली. परिणामी देशभर अशांततेचे वातावरण निर्माण झाले. त्रिपुरा राज्यात गेली तीस वर्षे डाव्या विचाराची सत्ता होती. या डाव्या विचाराचा पुराणपुरुष लेनिन याचे पुतळे उभारताना आपण 'आचंद्रदिवाकरौ त्रिपुरात सत्ता गजवणार आहोत' असा कदाचित भ्रम असावा. त्यामुळे लेनिनने रशियात ज्या पध्दतीने राजवट चालवली, तोच आदर्श डोळयासमोर ठेवून त्रिपुरात डाव्या पक्षांनी काम केले होते. आपल्या विरोधी विचारांना नेस्तनाबूत करताना या मंडळींनी रक्तरंजित इतिहास लिहिला. रशियात लेनिननेही असाच व्यवहार केला होता. पण जेव्हा रशियात लेनिनचा करिश्मा संपला, तेव्हा त्याच्याच सहकाऱ्यांनी, अनुयायांनी लेनिनचे पुतळे जमीनदोस्त केले होते. कोणत्याही असहिष्णू विचारधारेचा शेवट अशाच प्रकारे होत असतो. रशियात जे घडले, तेच चीनमध्येही घडले आहे. इराकमध्येही घडले आहे. येथील जुने सत्ताधीश आणि नवे सत्ताधीश यांच्या रक्तरंजित इतिहास जगाने पाहिला आहे. या सर्वच ठिकाणी जुन्या सत्ताधीशाच्या केवळ खुणाच पुसल्या नाहीत, तर त्यांच्या समर्थकांची हत्याकांडेही घडवून आणली आहेत. लेनिनच्या विचारधारेतून अशा प्रकारचा वारसा भारतात आला आणि त्रिपुरातील सत्ताधाऱ्यांनी सातत्याने वापरल्यामुळे तो स्थनिकांना आपला वाटला. हिंसेचा आधार घेत त्रिपुरात सत्ता राखताना अनेक मार्गांनी इथली संस्कृती आणि परंपरा मोडीत काढण्यात आल्या. त्रिपुरा हा रशियाचा भाग असल्यासारखा तेथील डाव्या मंडळींचा व्यवहार होता. आतंक आणि दडपशाहीखाली त्रिपुरातील जनता दबलेली होती. मात्र सत्तांतर होताच या दबलेल्या समाजाने पुढे येत लेनिनचाच व्यवहार   अंगीकारून त्याचा पुतळा जमीनदोस्त केला आहे. लेनिनचा हा विध्वंसाचा प्रभाव त्रिपुरात दिसला आणि देशात अन्यत्रही तोच प्रभाव प्रकट होऊ लागला.

 मुळात लेनिन आणि त्यांची विचारधारा - जी, हिंसेचे समर्थन करते, आपल्या विरोधी विचाराला संपवण्यासाठी रक्तपात करते - आता जगभर शेवटची घटका मोजत आहे आणि त्याचे प्रतिबिंब आपण प्रसारमाध्यमांतून पाहत आहोत. गेल्या वीस-पंचवीस वर्षांत जगभर अनेक देशांत लेनिन आणि त्याच्या विचाराच्या वाहकांचे पुतळे पाडले गेले आहेत. जागतिकीकरणामुळे आपण्ा एका विशाल खेडयात जगतो आहोत आणि जगभरातील अशा घटनांचे आपण साक्षीदार झालो आहोत. जगभर लेनिन आणि त्याची विचारधारा का नाकारली जात आहे? या प्रश्नाचा विचार करताना असे लक्षात येते की जगाला विकासाचे वेध लागले असून विकासाच्या मार्गाने जाताना हिंसेचे आणि अराजकाचे समर्थन करणाऱ्यांना स्थान असणार नाही. जगभर याची प्रचिती येत असली तरी त्रिपुरातील जनतेने लेनिनचा पुतळा जमीनदोस्त करत असताना 'जुने गेले, त्यांची निशाणीही शिल्लक राहायला नको' हा लेनिनने ग्ािरवलेला कित्ता प्रत्यक्षात आणला आहे आणि नव्या राजवटीचे स्वागत केले आहे.

प्रश्न असा आहे की अशा प्रकारे पुतळे पाडून विचार नष्ट करता येतात का? आणि असा व्यवहार आपल्या संस्कृतीला मान्य आहे का? या प्रश्नाच्या तळाशी जाऊन आपण विचार करणार आहोत का? राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या सर्वच राजकीय कार्यकर्त्यांनी या प्रश्नाचा गंभाीरपणे विचार करायला हवा. विचाराची लढाई विचाराने लढावी असा आपला संस्कार असेल, तर मग पुतळयाची विटंबना करण्यामागे कोणते वैचारिक अधिष्ठान आहे? हेही एकदा तपासून पहायला हवे. मरणाबरोबर वैर संपते अशी आपली धारणा आहे. राजा शिव छत्रपतींनी आपल्या कृतीतून तसा आदर्श घालून दिला आहे. आपण हा आदर्श विसरलो आहोत का? सत्तांतर झाल्यावर लेनिनचा पुतळा त्रिपुरात पाडला, पण प. बंगाल, उत्तर प्रदेश, तामिळनाडू आणि केरळमध्ये झालेल्या पुतळयांच्या विटंबनेमागे कोणते षड्यंत्र कार्यरत होते? केवळ राजकीय कुरघोडी आणि सामाजिक भावना दुखावण्याच्या उद्देशाने या घटना घडवून आणल्या आहेत का? की विद्यमान केंद्र शासनाला अडचणीत आणण्यासाठी हा खेळ खेळला जातो आहे? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे राजकीय नेत्यांना आणि समाजधुरीणांना तातडीने शोधावी लागणार आहेत. ही उत्तरे आपण शोधली नाहीत, तर आपण अराजकाकडे प्रवास करत राहू, हे निश्चित.

विचाराची लढाई विचाराने लढावी, त्यासाठी वैचारिक आणि सकारात्मक कृतीची आयुधे वापरावीत अशी अपेक्षा असते. ही लढाई लढण्यासाठी पुतळयांची विटंबना करण्याची गरज नाही. कारण पुतळे पाडून किंवा त्यांची विटंबना करून विचार मरत नाहीत. उलट मरू घातलेल्या विचारधारेला अशा घटनांतून खतपाणी मिळण्याची शक्यता असते आणि ती विचारधारा पुन्हा नव्याने उभी राहू शकते. त्याचप्रमाणे अशा घटना जेव्हा घडतात, तेव्हा आपण सोशल मीडियावर आपापल्या विचारधारा घेऊन जो गदारोळ करतो, त्यातून परिस्थिती केवळ अधिक चिघळतच नाही, तर समाजात मानसिक दरीही वाढत जाते. देशाच्या कोणत्या तरी कोपऱ्यात घडलेली घटना आपणच प्रत्यक्षदर्शी असल्यासारखे सर्व जण जेव्हा व्यक्त होतात, तेव्हा ते खऱ्या अर्थाने विचाराची लढाई लढतात का? असा प्रश्न निर्माण होतो.

स्मारके, पुतळे हे श्रध्दास्थान, आदर्श म्हणून उभारले जातात आणि त्याच दृष्टीने आपल्या  देशात जन्मलेल्या सर्व महापुरुषांच्या पुतळयांकडे पाहिले पाहिजे. आपल्या समाजाचे वंदनीय पुरुष म्हणून त्यांना नमन केले पाहिजे. असे करण्यात विचारधारा, पक्ष, जात अशा घटकांची आडकाठी असता कामा नये. कारण महापुरुष हे कोणत्याही एका विचारधारेचे किंवा जातीचे नसतात, तर ते राष्ट्राचे, समाजाचे असतात याचे भान लवकरात लवकर यावे, ही काळाची आणि  देशहिताची गरज आहे. कारण पुतळे पाडून विचार संपत नसतात.