पूर्वांचलातील संघ सेवा कार्ये - विजयाची पार्श्वभूमी

 विवेक मराठी  09-Mar-2018

***तुषार जुवेकर***

संघकार्य करताना अनेक कार्यकर्त्यांची हत्या झाली, कार्यकर्त्यांना धमकाविण्यात आले, गावबंदी करण्यात आली. पण तरीही कशालाही न जुमानता राष्ट्राच्या सेवेसाठी कार्यकर्ते आपले कार्य अविरतपणे करीत राहिले. संघाने 50 वर्षांत नि:स्वार्थी प्रेमाच्या बळावर पूर्वांचलाला मुख्य प्रवाहात आणण्याचे कार्य केले. स्वत: कष्ट सोसून, त्यांची भाषा शिकून, त्यांच्या घरात राहून, त्यांच्या बरोबर जेवून, त्यांच्या कुटुंबाशी सौहार्दाचे नाते प्रस्थापित करून संघाने हे कार्य केले व आपण एकाच मातेचे पुत्र आहोत ही भावना त्यांना मनात जागृत केली. आणि म्हणूनच त्यांच्यामध्ये जो आत्मविश्वास व मनोधैर्य आले आहे, त्याचे संपूर्ण श्रेय संघ सेवा कार्याला देणे योग्य ठरेल.

3 मार्चला ईशान्येकडील 3 राज्यांच्या निवडणुकीचा निकाल लागला आणि येथे भाजपाला मिळालेल्या अभूतपूर्व यशामुळे देशभरात सगळीक़डे आनंदोत्सव सुरू आहे. इतिहासात प्रथमच पूर्वांचलाच्या निवडणुकांचे निकाल सर्व प्रसारमाध्यमांमध्ये झळकत आहेत. या यशाचे जनक शोधण्यासाठी आपल्याला 50-60 वर्षे भूतकाळात जाऊन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सेवा कार्यांचा आढावा घेणे क्रमप्राप्त ठरते.

1946 साली दादाराव परमार्थ, 1949 साली रामसिंगजी आणि 1950 साली मधुजी लिमये अशा कार्यकर्त्यांनी ईशान्येकडील राज्यात संघाचे प्रचारक म्हणून संघकामास सुरुवात केली आणि त्यानंतर प्रचारकांचा ओघ अविरतपणे चालूच राहिला. 1950 ते 1975 हा काळ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्याची ओळख, कार्यकर्त्यांची मानसिकता तयार होणे, सेवा कार्यासाठी आयुष्यातील काही अथवा पूर्ण काळ देण्यासाठीची मनाची तयारी आणि संघाची वैचारिक बैठक पक्की करणे यासाठीचा महत्त्वपूर्ण टप्पा होता.

पू. श्रीगुरुजींच्या दूरदृष्टीतून समाजाच्या प्रत्येक जीवनक्षेत्रात राष्ट्रविचारी काम उभे राहावे, ह्या दृष्टीकोनातून अ.भा.वि.प., वनवासी कल्याण आश्रम, विश्व हिंदू परिषद इ. संघटनांची बांधणी सुरू होती. 1975 साली देशावर लादलेल्या अणीबाणीत पूर्वांचलातील अनेक संघकार्यकर्ते तुरुंगात गेले. या तुरुंगवासात केल्या गेलेल्या चिंतनातून व चर्चांमधून देशकार्याच्या उभारणीचे पुढील मार्ग ठरू लागले. 1977नंतर सर्व संघकार्यकर्त्यांनी, 'झोकून देऊन करून बघू आणि चुकेल तेथे सुधारणा करू' अशा तत्त्वावर अनुभव घेत घेत अनेक प्रकल्पांना सुरुवात केली.

पूर्वांचलमध्ये शिक्षणाच्या असुविधा, शिक्षकांची उणीव यासारख्या समस्या लक्षात घेऊन पायाभूत शिक्षणाची गरज लक्षात आली व विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून वसतिगृहे सुरू करण्यात आली. 1972 साली हाफलाँग येथे पहिले वसतिगृह सुरू करण्यात आले. हे पूर्वांचलमधील पहिले व देशातील दुसरे वसतिगृह होते. या वसतिगृहातील विद्यार्थ्यांची संख्या होती दोन! आज या वसतिगृहातील विद्यार्थ्यांची संख्या 50पर्यंत पोहोचली आहे. येथे मुलींचे एक छात्रालयदेखील आज उभे राहिले आहे. कल्याण आश्रम, सेवाभारती, विश्व हिंदू परिषद या संस्थांची मिळून सध्या 100हून अधिक वसतिगृहे पूर्वांचलमध्ये विद्यार्थ्यांना घडविण्याच्या कामात प्रगतिपथावर आहेत.

कालांतराने 1979मध्ये 'विद्याभारती' या राष्ट्रविचार व राष्ट्रीय शिक्षण देणाऱ्या व रुजविणाऱ्या संस्थेने या भागात पहिली शाळा सुरू केली. संपूर्ण पूर्वांचलामध्ये आज विद्याभारतीच्या 500हून अधिक शाळा आहेत, ज्यात 2 लाखाहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. 2016मध्ये विद्याभारतीच्या एका शाळेतून 10वीच्या परीक्षेत एक मुस्लीम विद्यार्थी संपूर्ण आसाम प्रांतातून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाला. संघाचे कार्य कोणा एका जातिधर्मासाठी नसून मानवतेचे व धर्मनिरपेक्ष आहे, याचीच ही पावती नव्हे का? ज्या ठिकाणी विद्यार्थी शाळेपर्यंत पोहोचू शकत नाहीत, तेथे एकल विद्यालय सुरू करून गावोगावी शिक्षणाची दिंडी पोहोचविण्याची व्यवस्था संघाकडून केली गेली आहे. 1979पासून लाखो विद्यार्थी आज राष्ट्रभक्तीने प्रेरित होऊन आपणही भारताचाच एक अविभाज्य घटक आहोत या भावनेने देशाशी एकरूप झाले आहेत. अशा वेळी वेगळेपणाची भावना त्यांच्या मनात येऊच शकत नाही.

चारित्र्यवान व शीलवान विद्यार्थीच उद्याचे राष्ट्र घडवू शकतो, या विचाराने सुरू झालेल्या अ.भा.वि.प.ने पूर्वांचलातील विद्यार्थ्यांना उर्वरित भारताशी जोडण्याकरिता ‘Student Experience of Inter state living’ अर्थात 'आंतरराज्य छात्र जीवन दर्शन' ही यात्रा 1966 साली सुरू केली. यातून पूर्वांचलमधील विद्यार्थी उर्वरित भारतामध्ये प्रवासाला पाठवून त्यांची राहण्याची व्यवस्था हॉटेलमध्ये न करता घराघरांमध्ये करून आपणही या भारताचे घटक आहोत अशी भावना त्यांच्या मनामध्ये निर्माण केली. आजपर्यंत 50 वर्षांत या विद्यार्थ्यांनी भारत एकच आहे हा संदेश पोहोचविण्यास मदत केली. 'बालमनावरील संस्कार हेच आयुष्यभर टिकतात' या विचाराने ज्या ठिकाणी संघशाखा चालविण्यात अडचण आहे, तेथे संस्कार केंद्रे चालू करून स्वधर्म, राष्ट्रभक्ती, शरीरस्वास्थ्य याचे संस्कार मुलांवर करण्यास सुरुवात केली.

उत्तम शिक्षण मिळावे व भारताशी जोडले जावे, या हेतूने कै. भैयाजी काणे यांनी ईशान्य सीमेवरील उखरूल जिल्ह्यातून विद्यार्थ्यांना महाराष्ट्रातील सांगली येथे 1973 साली शिक्षणासाठी पाठविले. आज देशभरात सुरू झालेल्या पूर्वांचलाच्या वसतिगृहात 25,000 विद्यार्थी शिक्षण घेऊन परत पूर्वांचलात जाऊन उर्वरित भारतीयांसारखेच देशभक्तिमय जीवन जगत आहेत. संघपरिवाराच्या कार्याचे हे खूप मोठे यश म्हटले पाहिजे.

 

पूर्वांचलातील काही भागातील गरिबी, दुर्गम भाग, विषम हवामान यामुळे उद्भवणाऱ्या वैद्यकीय समस्या आणि लोकांचे आजार व हे आजार दूर करण्यासाठी शासकीय वैद्यकीय सेवा नेहमीच कमी पडत असे. म्हणूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने वैद्यकीय क्षेत्रातील कार्य सुरू केले. आज 8 हजाराहून अधिक 'आरोग्यमित्र' होमिओपॅथी, स्वास्थ्य जागरण प्रशिक्षण यांच्या माध्यमातून पूर्वांचलमध्ये सरकार समांतर आरोग्य योजना गावागावामध्ये राबवीत आहेत.

2005पासून दर वर्षी 'धन्वंतरी सेवा यात्रा' या माध्यमातून देशभरातील 150हून अधिक डॉक्टर्स आपला 10 दिवसांचा वेळ देऊन 200 आरोग्य शिबिरांचे आयोजन करीत आहेत. यामध्ये 35 हजार जणांची आरोग्य तपासणी केली जाते. याव्यतिरिक्त दंत चिकित्सालयेही सुरू आहेत. लवकरच ओ.एन.जी.सी.च्या सी.एस.आर. निधीतून डॉ. हेडगेवार रुग्णालय, औरंगाबाद यांच्या सहकार्याने आसाममधील शिवसागर या 'अहोम' राज्यांच्या पुरातन राजधानीत 300 खाटांचे 'स्वर्गदेव सुखाफा चिकित्सालय' सुरू होत आहे, त्याशिवाय योग प्रशिक्षण कार्यक्रमाद्वारे योग शिक्षक वर्ग, योग शिबिरे असे 100हून अधिक उपक्रम चालवले जातात. आजमितीस 1500 गावांतून 1000हून अधिक योगशिक्षक कार्यरत असून ते योगाचा प्रचार-प्रसार व रुग्णसेवा करीत आहेत.

युवकांच्या हाताला जर काम असेल तर ते कुमार्गाला जात नाहीत, हा विचार समोर ठेवून संघपरिवाराने रोजगार निर्मितीसाठी कार्य सुरू केले. पूर्वांचल निसर्गसंपन्न, खनिजसंपन्न असूनही दुर्लक्षित असल्याने तेथे औद्योगिक विकास न झाल्यामुळे उद्योगांची वानवा होती. समृध्द जीवनासाठी निदान नियमित रोजगार उपलब्ध व्हावा, म्हणून संघकार्यकर्त्यांनी प्रयत्न केले. आज संपूर्ण आसामात शिलाई प्रशिक्षण केंद्र, बांबू प्रशिक्षण केंद्र असे रोजगाराशी संबंधित प्रकल्प सुरू आहेत.

पूर्वांचलाला भेडसावणाऱ्या समस्यांमध्ये ख्रिश्चनांकडून केले जाणारे धर्मांतरण व त्यातून निर्माण होणारा फुटीरतावाद, बांगला देशी मुस्लिमांची घुसखोरी या प्रमुख समस्या आहेत. त्या विषयातही संघकार्यकर्त्यांनी आरंभापासूनच कार्य करण्यास सुरुवात केली. 'जनजाति धर्मसंस्कृती सुरक्षा मंच', श्रध्दा जागरण, चहामळे (चाय बागन) मजुरांसाठी त्यांच्या वस्त्यावर सत्संग, हरिकथा कार्यक्रम ह्या माध्यमातून समाजप्रबोधन सुरू केले. संपूर्ण पूर्वांचलात 160 नोंदणीकृत जनजाती असून त्यापैकी 128 जनजातींमध्ये संघाचे काम सुरू आहे.

पूर्वांचल पाच आंतरराष्ट्रीय सीमांशी जोडला गेला आहे. महाभारतात भीष्माने उल्लेख केल्याप्रमाणे देशाच्या सीमा आईच्या वस्त्राप्रमाणे असतात, ह्यास स्मरून सीमांत चेतना मंचाच्या माध्यमातून शेकडो कार्यकर्ते सीमेवरील देशविघातक कृत्ये व तस्करी रोखण्यासाठी जागरूकतेने कार्य करीत आहेत.

विभिन्न कारणांनी सुरुवातीला संघाच्या कार्यात अडचणी निर्माण झाल्या. प्रारंभी संघाबद्दल अनेक भ्रम पसरवले होते. उदा. औषधातून जादूटोणा केला जातो किंवा धर्म बदलायला भाग पाडले जाते इ. आणि त्यामुळे सुरुवातीला तेथील जनता संघाच्या कार्यकर्त्यांवर विश्वास ठेवायला तयार नव्हती. 'गांधीमारा संघ' असे म्हणून त्यांना हिणवले जाई. असंख्य कार्यकर्त्यांनी त्या काळी वेळेला उपाशी राहून मातृभूमीसाठी हालअपेष्टा सहन करून आपले सेवा कार्य चालू ठेवले. संघ माध्यमातून आपली मुले शिक्षणासाठी बाहेर पाठविली तर ते मुलांना विकतील, त्यांना शिकविण्याऐवजी हॉटेलमध्ये काम करायला लावतील, हिंदू बनवितील अशी भीती पसरविली जात असे. काही स्थानिक मातांनी मात्र विश्वास दाखवून आपल्या मुलांना बाहेर शिकण्यासाठी पाठविले. ती मुले परत आल्यावर त्यांच्यातील बदल बघून संघाच्या कामावरील त्यांचा विश्वास वाढू लागला व त्यानंतर मात्र शिक्षणासाठी मुले बाहेर पाठविण्यासाठी पालकांची रीघ लागली. आज तेथील अनेक विद्यार्थी डॉक्टर, वकील, प्राध्यापक बनून आपापल्या क्षेत्रात समाजोपयोगी कामात योगदान देत आहेत.

संघकार्य करताना अनेक कार्यकर्त्यांची हत्या झाली, कार्यकर्त्यांना धमकाविण्यात आले, गावबंदी करण्यात आली. पण तरीही कशालाही न जुमानता राष्ट्राच्या सेवेसाठी कार्यकर्ते आपले कार्य अविरतपणे करीत राहिले. ख्रिश्चन मिशनरींनीसुध्दा सेवा कार्य केले,परंतु धर्मांतरण हा उद्देश डोळयासमोर ठेवून. 250 वर्षे ते हा प्रयत्न करीत राहिले. पण संघाने 50 वर्षात नि:स्वार्थी प्रेमाच्या बळावर पूर्वांचलाला मुख्य प्रवाहात आणण्याचे कार्य केले. स्वत: कष्ट सोसून, त्यांची भाषा शिकून, त्यांच्या घरात राहून, त्यांच्या बरोबर जेवून, त्यांच्या कुटुंबाशी सौहार्दाचे नाते प्रस्थापित करून संघाने हे कार्य केले व आपण एकाच मातेचे पुत्र आहोत ही भावना त्यांना मनात जागृत केली. आणि म्हणूनच त्यांच्यामध्ये जो आत्मविश्वास व मनोधैर्य आले आहे, त्याचे संपूर्ण श्रेय संघ सेवा कार्याला देणे योग्य ठरेल. हजारो कार्यकर्त्यांचा त्याग, समर्पण, संघर्ष व त्यातून उभी राहिलेली 10,000 सेवा कार्य यांचा थोडक्यात मागोवा घेण्याचा व समाजापुढे आणण्याचा आजच्या विजयदिनी केलेला हा प्रयत्न.

 सा. विवेकच्या फेसबुक पेजवर लेख पोस्ट करण्यास सुरवात करत आहोत. सा. विवेकच्या सर्व वाचकांना विनंती आहे की, त्यांनी खालील पेज क्लिक करून 
https://www.facebook.com/VivekSaptahik/
मग like करावे म्हणजे त्यांना विविध लेख वाचण्यास मिळतील.
https://www.facebook.com/VivekSaptahik/