संधिसाधूंचे उपोषण

 विवेक मराठी  10-Apr-2018


 

समस्त काँग्रेसजनांनी घोषित केलेले भारताचे भावी पंतप्रधान राहुल गांधी यांनी सोमवारी राजघाटावर किंचित उपोषण केले. किंचित याच्यासाठी, की ते ठरलेल्या वेळेपेक्षा सुमारे दोन तास  उशिरा पोहोचले आणि ते येईपर्यंत भुकेने व्याकूळ झालेले अर्ध्याहून अधिक सहकारी परतीच्या वाटेला लागले. दिल्लीच्या राजघाटावर या उपोषण कार्यक्रमाचे आयोजक असणारे अजय माकन आणि त्यांचे दोन सहकारी उपोषणापूर्वी छोले-भटोरे खाऊन आल्याचे स्पष्ट झाले आणि त्याच्यावर सोशल मीडियात खूपच चर्चा झाली. राहुल गांधीही असेच कुठेतरी गेले असावेत, त्यामुळे त्यांना उपोषणस्थळी पोहोचण्यास दोन तास उशीर झाला असावा. तर सांगायचा मुद्दा हा आहे की देशभर दलितांवर होत असलेल्या अन्याय-अत्याचाराविरुध्द सरकारला जाब विचारण्यासाठी हे उपोषण करण्यात येत आहे, असे सांगितले जात होते. उपोषणस्थळी दोन तास उशिरा पोहोचणारे राहुल गांधी मागच्या आठवडयात नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर टीका करताना म्हणाले होते, ''नरेंद्र मोदी जातीयवादी असून ते दलितांना आणि आदिवासींना चिरडून टाकण्यासाठीच काम करतात. त्यांच्या हृदयात दलितांसाठी अजिबात जागा नाही.'' आपल्या हृदयात असलेला दलितांविषयीचा कळवळा व्यक्त करण्यासाठी त्यांनी राजघाटावर उपोषण करण्याचे योजले आणि नियोजित वेळेपेक्षा दोन तास उशिरा पोहोचून पुन्हा भाजपा व नरेंद्र मोदी यांच्याविरुध्द आपली भूमिका मांडताना ते म्हणाले, ''दलितांना, आदिवासींना आणि अल्पसंख्याकांना चिरडणे आणि देशात दुही माजवणे हीच भाजपाची विचारसरणी आहे. या विचारसरणीमुळे देशातील वातावरण गढूळ झाले आहे. भाजपा दलितविरोधी आहे आणि 2019च्या लोकसभा निवडणुकीत आम्ही त्यांना हरवणारच.'' राहुल गांधींच्या उपस्थितीत राजघाटावर झालेल्या या तथाकथित उपोषणात 1984 साली दिल्लीत शिखांचे हत्याकांड करणारे सज्जनकुमार आणि जगदीश टायटलर हे दोघेही उपस्थित होते, हे विशेष म्हणावे लागेल.   

देशात आज सामाजिक वास्तव गंभीर स्वरूपाचे झाले आहे. जातीय तेढ वाढवण्यासाठी विविध प्रकारे प्रयत्न होत आहेत. गेले काही दिवस दलित समाजाला केंद्रस्थानी ठेवून विविध विषय हाताळले जात आहेत. कधी अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याबाबतचा गैरसमज निर्माण करून, तर कधी मोदींनी आरक्षण बंद केले अशी अफवा पसरवून दलित समाजाच्या भावना चेतवल्या जात आहेत. 2 एप्रिल रोजी झालेल्या भारत बंदच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी आधी टि्वटरवरून आणि नंतर जाहीर भाषणातून अफवा पसरवायचा प्रयत्न केला होता. राहुल गांधी म्हणाले होते की ''दलितांचे कायदे या सरकारने रद्द केले आहेत.'' तर राहुल गांधी यांचे हे अशा प्रकारचे दलितप्रेम आहे आणि त्याला सत्ताभिलाषेची किनार आहे. जो जो विषय सत्तेचा सोपान चढण्यासाठी सोईचा होईल, तो तो विषय राहुल गांधींचा आस्थेचा होतो. मनमोहन सिंह पंतप्रधान असताना महाराष्ट्रातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या घरी जाऊन सहानुभूती मिळवण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता. त्याचप्रमाणे एका दलित कुटुंबाकडे त्यांनी भोजन केले होते. गुजरात निवडणुकीत जानवे घालून ते कट्टर हिंदू झाले, तर कर्नाटकात ते लिंगायत मठाचे उंबरठे झिजवत आहेत. एकूण काय, तर राहुल गांधी यांचे राजघाटावरचे उपोषण हे वरील सर्व घटनांपैकीच एक असून त्यामागे केवळ मतपेढीची काळजी आणि 2019 साली देशाचा पंतप्रधान होण्याचे स्वप्न आहे, हे वेगळे सांगायला नको. राहुल गांधी आपल्या उपोषणातून समाजाला हूल देऊ पाहत आहेत. दलितांवरील अन्याय-अत्याचाराचे समर्थन न करताही प्रश्न उपस्थित होतो की शिखांच्या कत्तलीबद्दल त्यांचे मत काय आहे? पश्चिम बंगालमध्ये हिंदूंची दुरवस्था चालू आहे, अन्याय-अत्याचारामुळे त्यांच्यावर परागंदा होण्याची वेळ आली आहे, त्याबद्दल कधी राहुल गांधींनी शब्द उच्चारलेला नाही. केरळात आजवर हजारो स्वयंसेवकांच्या हत्या झाल्या, पण त्यावर राहुल गांधी काही बोलत नाही. कारण उघड आहे - राहुल गांधी केवळ आणि केवळ मतपेढीसाठी लांगूलचालन करतात. त्यांचे राजघाटावरचे भरल्या पोटाचे तथाकथ्ाित उपोषण हाही त्यातीलच एक भाग आहे.

कधीकाळी देशभरातील दलित समाजाला आपल्या बाजूने वळवण्यात काँग्रेसला यश आले होते. पण आज तशी स्थिती नाही. आज जी आपली हीन-दीन स्थिती आहे, ती काही मागच्या चार वर्षांतील मोदी सरकारमुळे नाही, तर त्याची मुळे गेल्या पन्नास वर्षांतील काँग्रेसच्या लांगूलचालनाच्या धोरणात आहेत, हे दलित समाजाच्या लक्षात आले आहे. मोदी किंवा भाजपा दलित-आदिवासीविरोधी असते, तर राखीव मतदारसंघातून भाजपाचे प्रतिनिधी मोठया प्रमाणात का निवडून येत असतात? या प्रश्नाचा राहुल गांधी यांनी कधी विचार केला आहे का? केवळ त्या त्या जातीच्या नेत्यांना हाताशी धरून संपूर्ण समाजाला आपल्या वेठीस धरण्याचे दिवस आता संपले आहेत. राजकारण, समाजकारण अशा क्षेत्रांत दलित समाजाची जाणीवजागृती मोठया प्रमाणात झाली आहे. जागृतीचा उपयोग आपल्या क्षुद्र स्वार्थसाठी करणारेही या देशात आहेत. राहुल गांधीही त्याच संधिसाधूंपैकी एक आहेत. त्यामुळे राजघाटावर राहुल गांधींनी केलेल्या उपोषणाला 'संधिसाधूंचे उपोषण' म्हटले, तर वावगे ठरणार नाही.

महात्मा गंाधींच्या समाधीस्थळी, म्हणजेच राजघाटावर उपोषण करताना नीतिमत्ता या शब्दाला खूप महत्त्व प्राप्त होत असते. मग ती वैयक्तिक आचरणाची असो की वैचारिक असो. या दोन्हीही बाबतीत राहुल गांधी आणि त्यांच्या पक्ष अनेक दशकांपूर्वीच नापास झाला आहे. ज्यांनी शिखांच्या हत्याकांडाचे समर्थन केले, तो पक्ष आणि त्याचे नेतृत्व आज दलितांवरील अन्याय-अत्याचाराबाबत जाब विचारतात याच्यासारख्या दुसरा विरोधाभास नाही. पण सत्तेचे डोहाळे लागलेल्या राहुल गांधींना पाळण्यात बसवून राजघाटावरून हिंदोळे देण्यास ज्यांना आनंद वाटतो, त्यांना हा विरोधाभास कळणार कसा?