'राष्ट्र सेविका' अंकाचे लोकार्पण

 विवेक मराठी  11-Apr-2018

ठाणे : ''प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक घर हे सामाजिक समरसता ह्या अमूर्त कल्पनेचे केंद्र बनले पाहिजे. डॉ. बाबासाहेबांना घटनेमध्ये प्रतीत असणाऱ्या समतेचे मूळ समरसतेमध्ये आहे. त्यासाठी केवळ लेखन, साहित्य उपयोगी नाही, तर प्रत्यक्ष कृतीवर भर दिला पाहिजे. सामूहिक शहाणपण, सामंजस्य आणि संवेदनशीलता गरजेची आहे'' असे मार्गदर्शन साप्ताहिक विवेकच्या कार्यकारी संपादक अश्विनी मयेकर यांनी केले.

31 मार्च 2018 रोजी ठाणे येथे झालेल्या राष्ट्र सेविका समितीच्या 'राष्ट्र सेविका' अंकाच्या लोकार्पण सोहळयाच्या वेळी त्या बोलत होत्या. समितीचा अधिकारी वर्ग मंचावर उपस्थित होता. यंदाचा हा 65वा अंक असून 'सामाजिक समरसता आणि पर्यावरण' असा या अंकांचा विषय होता.  ह्या अंकामध्ये स्पर्धेतील हस्तलिखितामधील अनेक विशेष लेखांचा समावेश असतो. 100 पानी हस्तलिखितांच्या स्पर्धेचा निकाल जाहीर झाला, ज्यामध्ये साहित्याबरोबरच उत्कृष्ट मुखपृष्ठ, अंतर्गत सजावट, हस्ताक्षर आणि शुध्दलेखन यालाही पारितोषिक दिले जाते. सेविकांना परिपूर्ण बनवून प्रबोधनात्मक साहित्य निर्मिती हा या अंकनिर्मितीमागचा उद्देश आहे. ज्येष्ठ सेविकांच्या आशीर्वादाने अनेक कार्यरत सेविकांच्या उपस्थितीत हा सोहळा उत्साहात पार पडला.