बाबासाहेबांची जयंती अशी साजरी केली, तर...

 विवेक मराठी  12-Apr-2018

गावगाडयात सेवा व्यवसाय हे दलितांनी आणि इतर मागासवर्गीयांनी हजारो वर्षे बिनबोभाट निमूटपणे अन्याय सहन करत सांभाळले. छोटी-मोठी उद्योजकता प्राणपणाने जपली. त्यासाठी कुठलीही प्रतिष्ठा, पैसा, मानमरातब त्यांना मिळाला नाही. आता स्वातंत्र्योत्तर कालखंडात या गोष्टी मिळायची शक्यता निर्माण झाली असताना आपण दलितांना यापासून जाणीवपूर्वक का दूर ठेवतो? संपूर्ण देशात नुकत्याच झालेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त या प्रश्नाचा वेध घेणारा लेख. 

बा.भ. बोरकरांची एक मोठी सुंदर कविता आहे, ज्यात त्यांनी निळया रंगाच्या विविध छटांचे वर्णन केले आहे -

मोरपिसाच्या डोळयाचा एक मखमाली निळा

इंद्रनिळांतला एक गोड राजबिंडा निळा

विसावल्या सागराचा एक ओलसर निळा

आभाळाच्या घुमटाचा एक गोलसर निळा

असे नानागुणी निळे किती सांगू त्यांचे लळे?

ज्यांच्यामुळे नित्य नवे गडे तुझे माझे डोळे

निळया रंगाच्या अशा विविध सुंदर छटा असताना आपण त्याचा एकच राजकीय अर्थ काढतो, हा निळया रंगावर अन्यायच नाही का? याच पध्दतीने बाबासाहेबांच्या एकाच पैलूवर चर्चा होत राहते, हा त्यांच्यावरही अन्याय नाही का? बाबासाहेब केवळ दलितांचेच नेते होते असे ठसविल्याने आपण त्यांचे कर्तृत्व संकुचित करत चाललो आहोत, हे कसे लक्षात येत नाही? बरे, ज्या दलितांसाठी बाबासाहेबांनी लढा उभारला, त्या दलितांच्या इतर काही पैलूंकडे दुर्लक्ष करून त्यांच्यावरही अन्याय केला जातो. सामाजिक-राजकीय लढे देत असताना हा दलित समाज कलांच्या आणि कारागिरीच्या बाबतीत एकेकाळी अग्रेसर होता, हे विस्मरणात जाते.

जुन्या काळी बोलीभाषेत एक म्हण होती - 'कुणब्या घरी दाणं, बामणाघरी लिवणं आणि म्हारा-मांगाघरी गाणं पिकलंच पाहिजे.' यातील दलितांकडे असलेला कलेचा जो पैलू आहे, त्याकडे स्वातंत्र्योत्तर काळात अक्षम्य दुर्लक्ष केले गेले. तसेच छोटे-मोठे उद्योग करणे, चांभारकीचा व्यवसाय करणे, शिंदीच्या फोकांपासून फडे बनविणे, शेतीसाठी लागणारी अवजारे तयार करणे असे कितीतरी उद्योग दलितांनी वर्षानुवर्षे केले. बांधकामातही गवंडीकाम करण्यात दलित समाज पुढे असायचा. कित्येक गावात सुईणीचे काम पूर्वाश्रमीचे महार किंवा मांग स्त्रिया मोठया कुशलतेने करायच्या. (नामदेव च. कांबळे यांच्या साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त 'राघववेळ' कादंबरीची नायिका वालंबी ही सुईणच दाखविली आहे.) मग ही कारागिरी आणखी वाढावी, त्यातील आधुनिक तंत्र दलितांच्या हाती यावे, त्यांना त्यातील कुशलता प्राप्त व्हावी यासाठी आपण काय केले?

बाबासाहेबांच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंतीनंतर आता तरी आपण हा विचार करणार आहोत की नाही? का बाबासाहेबांची जयंती म्हणजे केवळ वस्तीच्या जवळपासचा 2 कि.मी.चा परिसर निळया झेंडयांनी सजवून टाकणे, कमानी उभारणे, निळया दिव्यांची आरास करणे, प्रत्यक्ष जयंतीच्या दिवशी डीजे लावून जंगी मिरवणूक काढणे, शहराशहरातील, गावागावातील बाबासाहेबांच्या पुतळयाजवळ प्रचंड जत्रा भरविणे, लाखो रुपयांच्या सुपाऱ्या देऊन ऑॅर्केस्ट्रा आणणे इतकाच अर्थ आहे काय?

किमान हजार वर्षांचा इतिहास आहे की दलितांनी कलेची जोपासना केली. ज्या काळात कलेची उपेक्षा केली जायची, त्या काळात ही कला प्राणपणाने जपली. आता कलेला आणि कलाकारांना बरे दिवस आले आहेत, प्रतिष्ठा मिळत आहे, पैसाही मिळत आहे आणि या काळात मात्र कलेच्या प्रांतात दलितेतरच घुसून पुढे जात असलेले दिसतात. हे काय गौडबंगाल आहे?

बाबासाहेबांच्या नावाने एक तरी भव्य असा संगीत महोत्सव/लोककला महोत्सव भरवून आदरांजली वाहणे का कुणाला सुचत नाही? तमाशा ही केवळ उपहास करण्याची कला आहे का? ओडिशाच्या मंदिरातून केले जाणारे नृत्य आता 'ओडिसी' नृत्य म्हणून विश्वविख्यात बनले आहे ते केवळ गेल्या 100 वर्षांत. एका पद्मविभूषण केलुचरण महापात्रा नावाच्या गुरूने अखंड मेहनतीने या नृत्यप्रकाराला शास्त्रीय बैठक प्राप्त करून दिली आणि मान्यता मिळवून दिली. दक्षिणेतील मंदिरांमध्ये देवदासी करत असलेल्या नृत्याला 'भरतनाटयम' म्हणून गेल्या शंभर वर्षांत मान्यता मिळाली. मग महाराष्ट्रातल्या लावणीला एक शास्त्रीय नृत्य म्हणून मान्यता मिळविण्यासाठी का नाही एखाद्या दलित कलाकाराला आपले आयुष्य वेचावेसे वाटले? उद्या जर एक शास्त्रीय नृत्य म्हणून लावणीला मान्यता मिळाली, तर तो काय बाबासाहेबांचा अपमान ठरणार आहे?

पद्मश्री मिलिंद कांबळे यांनी दलितांमधील उद्योजकतेचे गुण हेरून दलित उद्योजक संघटनेची स्थापना केली. ही बाबासाहेबांना आदरांजली नाही का? कलेइतकीच विविध क्षेत्रांतील कारागिरी दलितांच्या रक्तात आहे. मग तिचा विकास करण्याची योजना का नाही आखली जात?

गावगाडयात सेवा व्यवसाय हे दलितांनी आणि इतर मागासवर्गीयांनी हजारो वर्षे बिनबोभाट निमूटपणे अन्याय सहन करत सांभाळले. छोटी-मोठी उद्योजकता प्राणपणाने जपली. त्यासाठी कुठलीही प्रतिष्ठा, पैसा, मानमरातब त्यांना मिळाला नाही. आता स्वातंत्र्योत्तर कालखंडात या गोष्टी मिळायची शक्यता निर्माण झाली असताना आपण दलितांना यापासून जाणीवपूर्वक का दूर ठेवतो?

सरसकट सर्व दलितांना आरक्षण आणि सरकारी नोकऱ्यांचे, सरकारी योजनांचे गाजर दाखवून भुलविले जात आहे. पण याबरोबरच ज्या काही मोजक्या का असेना, दलित तरुणांची कलेत काही करायची इच्छा आहे, त्यांच्या गुणसूत्रांत कलेचे गुण आहेत त्यांना त्यासाठी प्रोत्साहन मिळावे, प्रशिक्षण मिळावे यासाठी काही पोषक वातावरण आपण तयार करतो का?

 

 

इतर सवर्णांचे सोडा, पण दलित मध्यमवर्गात अजूनही कलेच्याप्रती आस्था दिसून येत नाही. मुलाने चाळीस हजाराचे एखादे वाद्य मागितले, तर किती दलित नोकरदार प्राध्यापक अधिकारी सहज घेऊन देतील? 'डफडे वाजवून पोट भरतं का?' असे वाक्य एका मित्राच्या घरी ऐकून मी सर्द झालो. आणि हाच मित्र पोरासाठी महागडी गाडी घेऊन द्यायला सहज तयार होतो, त्याला रस नसताना जबरदस्ती विज्ञान विषयात प्रवेश देऊन क्लासेसची दोन लाख रुपये फी भरतो, पोराचा स्कोअर आला नाही तर परत त्याला प्रवेश परीक्षा देण्यासाठी भाग पाडतो, हा अट्टाहास का? ज्याला रस आहे अशा दलित तरुणांना जर संगीत शिकण्यासाठी जरासे पोषक वातावरण दिले, तर तो त्या क्षेत्रात काहीतरी भरीव करू शकेल अशी शक्यता आहे.

हीच बाब छोटया मोठया उद्योग व्यवसायांबाबत. आज महानगरांमध्ये कचऱ्याचा प्रश्न अतिशय गंभीर बनला आहे. यात काम करणाऱ्या जवळपास सगळया महिला दलितच आहेत. मग कुणी त्यांना प्रोत्साहन देऊन यातील उद्योगाच्या संधी हेरत का नाही मदत करत? या कोरडया कचऱ्याच्या व्यवसायात जे सध्या काम करत आहेत, त्यांच्या अडचणी ओळखून त्या दूर करण्यासाठी प्रयत्न करणे ही बाबासाहेबांना आदरांजली नाही का ठरणार? ही कचरा वाहतूक, या कचऱ्यावर प्रक्रिया असे कितीतरी छोटे-मोठे उद्योग उभे राहू शकतात. याचा व्यवसाय-व्यापार गतिमान होऊ शकतो.

पण असा वेगळा विचार आम्हाला करावासा वाटत नाही. हे असे मांडले तर तो दलितांचा अपमान समजला जातो. याच्या उलट सरकारी नोकरी, सरकारी योजना, सरकारी घरे, सरकारी वसतिगृह असल्या लाचार ठेवणाऱ्या योजना समोर ठेवल्या, तर सगळयांच्याच तोंडाला पाणी सुटते. आता तर सवर्णही मोर्चे काढून आम्हीच कसे मागास आहोत याचे जाहीर प्रदर्शन करत आहेत. आम्हाला मागास म्हणा असा ऊरबडवा आक्रोश केला जात आहे. या काळात जे खरेच मागास आहेत, त्यांना स्वत:च्या पायावर उभे राहणे, उद्योजकता त्यांच्या अंगात बाणविणे, कलेचे संस्कार करणे हे सगळे मूर्खपणाचेच वाटू शकेल.

पण या गोष्टींची नितांत गरज आहे. माझ्याकडे एक दलित तरुण नोकरी मागण्यासाठी आला होता. तो केवळ बारावी पास होता. त्याच्याशी थोडी चर्चा केल्यावर त्याला नृत्यामध्ये गती असलेली आढळून आली. तो कोरिओग्राफर म्हणून चांगले काम करू शकतो हे मी त्याच्या लक्षात आणून दिले. एका वर्षात अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की त्याला कोरिओग्राफीत भरपूर काम मिळाले, पैसाही मिळाला, आवडीचे काम असल्याने समाधानही मिळाले. असे कितीतरी तरुण कलेत, कारागिरीत पारंगत आहेत. पण आपण त्यांना ओळखत नाही, ही आपली शोकांतिका आहे. अशांना ओळखून त्यांना प्रोत्साहन देऊन बाबासाहेबांची जयंती साजरी करता येणार नाही का?

जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद

  9422878575