इंटरस्टेशिअल लंग डिसीज (भाग २)

 विवेक मराठी  13-Apr-2018

मी सुरुवातीच्या लेखात सांगितल्याप्रमाणे, ‘आयुर्वेदात सगळ्या असाध्य आजारांवर औषध असतं’ हा गैरसमज आधी आपण मनातून काढून टाकू या. दुसरी गोष्ट म्हणजे एखादा आजार साध्य आहे की असाध्य, याचे आयुर्वेदशास्त्राचे स्वतःचे काही निकष असतात. काही वेळा इतर वैद्यकशास्त्राने असाध्य म्हणून घोषित केलेले काही आजार आयुर्वेदाच्या निकषांवर कष्टसाध्य असू शकतात किंवा शस्त्रकर्म साध्य ठरवलेले आजार औषधाने साध्य असू शकतात. (अटी लागू.)

    Interstitial lung diseaseचा विचार केला, तर त्यात फुप्फुसामध्ये झालेले बदल अपरिवर्तनीय असतात. परंतु हा बदल होण्याचा वेग कमी करता येऊ शकतो, रुग्णाला कमी प्राणवायूवर जगायला शिकवता येऊ शकतं आणि आहे त्या फुप्फुसाकडून चांगलं काम करून घेता येऊ शकतं. थोडक्यात काय, तर आयुर्वेदाच्या औषधांनी आणि उपक्रमांनी रुग्णाच्या आरोग्याची प्रत थोडी सुधारता येते आणि आजाराच्या प्रगतीचा वेग कमी करता येतो.

    मुळात असे आजार होऊ नये यासाठीच जास्त काळजी घेतली जायला हवी.

  • प्रतिबंधात्मक उपाय - आज आपण उठता-बसता प्रत्येक आजारावर प्रतिबंधक लस स्वीकारत चाललोय. परंतु आयुर्वेदात सांगितलेल्या सर्वसमावेश प्रतिबंधात्मक उपाययोजना आपल्याला अवघड वाटतात हे दुर्दैव आहे. त्यावाचून अन्य पर्याय नाही, हे सत्य आपण जितक्या लवकर स्वीकारू तितकं उत्तम. ज्या व्यक्ती  Interstitial lung disease  या आजाराच्या काही कारणांचं/ एका कारणाचं सेवन करत असतील  (त्या कारणाच्या संपर्कात येत असतील) त्यांनी दिवसातून दोन/तीन वेळा नाकातून तीळ/खोबरेल तेलाचं बोट फिरवावं. कुठल्याही गोष्टीची अॅलर्जी येऊन ज्यांना कफाचा त्रास होत असेल, त्यांनी आपल्या जवळच्या वैद्यांच्या देखरेखीखाली वमन आणि नस्य ही दोन शोधन कर्म, दर वसंत ऋतूत करून घ्यावी. अर्थात रुग्णाला बघितल्यावर वैद्य स्वतः योग्य तो निर्णय घेतातच. श्वासाचे कुठलेही आजार झाले तर नुसतं बरं वाटल्यावर थांबू नये. आपल्या जवळच्या वैद्यांकडून त्यावर अपुनर्भव (म्हणजे तो आजार पुन्हा होऊ नये म्हणून) आणि रसायन (म्हणजे श्वसनसंस्थेला बल देणारी) चिकित्सा अवश्य घ्यावी. यामुळे आजारात खालावलेल्या फुफ्फुसाला शक्ती मिळते. वरचेवर अॅलर्जी येऊन कफाचे आजार होत असतील, तर आपल्या जवळच्या वैद्यांकडून पथ्यापथ्य जाणून घ्यावं आणि त्याचं काटेकोर पालन करावं. विशेषतः काकडी, टोमॅटो, सॉस, अतिथंड पदार्थ, अतिगोड पदार्थ, पनीर, अति फलाहार, दही, अति द्रव पान या गोष्टी कटाक्षाने टाळाव्या. दुपारी झोपू नये.
  • सामाजिक प्रतिबंध - आपल्याकडे राजयक्ष्मा या व्याधीचं प्रमाण खूप जास्त आहे. त्याचं संक्रमण थुंकीतून होतं. जिथे तिथे थुंकायची आपल्या नागरिकांची सवय बंद व्हायला हवी. स्वच्छ भारत अभियानात याचा समावेश होतो. याशिवाय परोपकाराच्या भावनेतून जागोजागी चालू असलेले कबुतरखाने बंद व्हायला हवेत. वृक्षारोपणाच्या अंतर्गत सरकारी कोट्यातूनदेखील परदेशी रोपं दिली जातात. कित्येक हायवे, मोठमोठ्या नागरी वसाहती यांत परदेशी वृक्ष फोफावलेले दिसतात. दिसायला ते कितीही छान असले तरी श्वसनसंस्थेला घातक ठरतात. त्यांचा प्रचार थांबवायला हवा.
  • आजारावर उपाय - या रुग्णाची एकूण शारीरिक स्थिती कशी आहे आणि मुख्य म्हणजे फुप्फुसाचा किती भाग अजून चांगला आहे, यावर चिकित्सेची उपयुक्तता अवलंबून असते. आयुर्वेदाच्या दृष्टीने फुप्फुसांची उत्पत्ती रक्ताच्या फेसापासून होते. या सिद्धान्तावर आधारीत चिकित्सेची दिशा ठरवता येते. फुप्फुसांमधील जखमा भरताना प्राकृत घटक निर्माण होण्यास या सिद्धान्ताचा उपयोग होतो. श्वास या व्याधीचे चिकित्सा सिद्धान्तदेखील या आजाराच्या चिकित्सेसाठी उपयोगी पडतात. श्वसनसंस्थेचं काम वाढवणारी, उपलब्ध प्राणवायूमध्ये शरीराला काम करायला शिकवणारी, फुप्फुसांना कार्यक्षम ठेवणारी, श्वसनासाठी उपयुक्त स्नायूंना बल देणारी, कफाचा संचय कमी करणारी औषधं योजून रुग्णाच्या आरोग्याची प्रत चांगली राखता येऊ शकते. गरज असेल तेव्हा रुग्णाला झेपेल असं एखादं शोधनकर्म करून वाढलेले दोष शरीरातून बाहेर काढून टाकता येतात.
  • चिकित्सेच्या जोडीला आंशिक श्वसन (यात उदर श्वसन, उर:श्वसन आणि मन्या श्वसन असे तीन प्रकार आहेत. त्याचा सराव केल्यास ते सर्व स्नायू कार्यरत होतात.), दीर्घ श्वसन, कपालभाती, ताणाची आसनं उदा. ताडासन, पर्वतासन, अर्धकटीचक्रासन, नौकासन इ. यांचा अभ्यास उपयोगी पडतो. कपालभाती केल्यानं श्वासमार्गातील कफ बाहेर टाकला जातो, श्वसनसंस्थेतील  प्रमाण कमी होतं आणि रुग्णाला ताजंतवानं वाटतं. मात्र याचं योग्य प्रशिक्षण घेऊनच अभ्यास चालू ठेवावा.
  • या आजाराच्या व्यक्ती म्हणजे चालत्याबोलत्या वेधशाळा झालेल्या असतात. हवामान बदलत असताना त्यांची विशेष काळजी घ्यायला हवी.
  • मालिश आणि शेक यांचादेखील काही विशिष्ट अवस्थेत फायदा होतो.
  • उकळून आटवलेलं पाणी प्यायला वापरलं तर कफाची निर्मिती कमी व्हायला मदत होते.

   योग्य वेळी वैद्यांचा सल्ला आणि औषध घेऊन आपण रुग्णाचं आयुष्य सुकर करु शकतो.