जैसलमेर महोत्सवातील कार्य

 विवेक मराठी  03-Apr-2018

***विजय मराठे***

भारताला सण-उत्सवांचा देश म्हटलं तर वावगं ठरणार नाही. भारतात पूर्ण वर्षभर सण-उत्सव साजरे होत असतात/ यानिमित्ताने ग्रामीण व शहरी भागांतील लोक एकत्रित येतात. समस्त महाजन ही संस्था लोकांच्या वाईट परिस्थितीत तर धावून येतेच, त्याशिवाय लोकांच्या आनंदात सहभागी होऊन लोकांचा आनंद कसा द्विगुणित होईल, यासाठीही तत्पर असते.

राजस्थानमधील जैसलमेरला सुवर्णभूमी असे संबोधले जाते. जैसलमेरचा स्वतःचा असा इतिहास आहे. जैसलमेर हे जैन मंदिरासाठी प्रसिध्द आहे. जैसलमेर उत्सव 26 ते 28 ऑक्टोबर 2014 या काळात साजरा करण्यात आला होता. तृतीया ते पंचमी असा तीन दिवस साजरा करण्यात आलेल्या या उत्सवाबरोबरच जैन मंदिरांच्या शुध्दीकरणाच्या कामाचादेखील समावेश होता. तसेच जैसलमेर शहरात स्वच्छता मोहीमही मोठया प्रमाणात राबविण्यात आली.

सुवर्णभूमी जैसलमेरचे तत्कालीन कलेक्टर एन. एल. मीणा, आमदार छोटू सिंह भारी, जैन ट्रस्टचे अध्यक्ष महेंद्र सिंह भंसाली आणि इतर मान्यवरांनी जिनालयात झाडू मारून जैन मंदिर शुध्दीकरण मोहिमेचा शुभारंभ केला. यानिमित्ताने नागरिकांनीही फक्त जैन मंदिरच नाही, तर अन्य धार्मिक स्थळे आणि घराच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ करून एकता दर्शविली. जिल्हा कलेक्टरांनी तीर्थस्थळे आणि मंदिरे यांच्या पावित्र्याचे महत्त्व सांगितले, तर आमदार छोटू सिंह यांनी यांनी जैन मंदिरांचे आणि धार्मिक स्थळांचे शुध्दीकरण म्हणजे मानवधर्म होय, असे सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2 ऑक्टोबर 2014 रोजी स्वच्छता मोहिमेची सुरुवात केली. याच मोहिमेत सहभागी होऊन जैन मंदिर आणि पूर्ण जैसलमेर परिसर स्वच्छ करून परिसराची शोभा वाढविण्याचा प्रयत्न केला. जैसलमेर पंचतीर्थी दुर्ग येथील जैन मंदिर हे जैन धर्मीयांचे आणि यात्रेकरूंचे विशेष तीर्थस्थान आहे. जैन मंदिर शुध्दीकरण मोहिमेच्या या विशेष सेवा कार्यासाठी गुजरात आणि मुंबई येथील 'समस्त महाजन' संस्थेचे 600हून अधिक सदस्य जैसलमेर येथे पोहोचले. या सदस्यांनी केवळ जैन मंदिरापुरते सेवा कार्य सीमित न ठेवता जैसलमेर जिल्ह्यातील सर्वच मंदिरांचे शुध्दीकरण उत्साहात पार पाडले.

जैन मंदिर शुध्दीकरण मोहिमेमध्ये स्थानिक नागरिक आणि अन्य मान्यवरही सहभागी झाले होते. समस्त महाजन संस्थेचे समर्पित कार्यकर्ते, मान्यवर आणि स्थानिक नागरिक यांच्या संयुक्त श्रमदानातून ही मोहीम सुरू झाल्यानंतर वातावरणात पवित्र अनुभूती जाणवायला लागली. हे सेवा कार्य पूर्णपणे शास्त्रोक्त पध्दतीने करण्यात आले. समस्त महाजन संस्थेच्या कार्यकर्त्यांनी अमरसागर, लौद्रवा तीर्थ, ब्रह्मासर, दादावाडी, वैशाखी पोखरण, रामदेवारी, महावीर भवन, कोठारी पाडा, जगाणी पाडा आणि दासोत पाडा येथील सर्व जैन मंदिरांच्या शुध्दीकरणाचे काम केले.

जैन मंदिर शुध्दीकरण कार्यक्रमाबरोबरच समस्त महाजन संस्थेने जैसलमेर शहरात स्वच्छता मोहीम राबविली. यासाठी संस्थेने प्रत्येक वसाहतीत, प्रत्येक वस्तीत आणि घराघरांत जाऊन प्रत्येकी दहा हजार घरांमध्ये गुळाचे आणि स्वच्छता मोहिमेच्या पत्रकांचे वाटप केले. या मोहिमेसंबंधी जनजागृती निर्माण करण्याचा हा छोटासा प्रयत्न होता.

समस्त महाजन संस्थेने ही मोहीम ज्या पध्दतीने राबविली, त्याचे संपूर्ण शहरातून कौतुक झाले. अशा प्रकारची मोहीम शहरात प्रथमच राबविण्यात आली असावी. या मोहिमेदरम्यान एका पत्रकाचे वाटप करण्यात आले होते, त्या पत्रकात, 'आपण काय करू शकतो?' या शीर्षकाअंतर्गत पुढे दिलेल्या पाच गोष्टींचा समावेश करण्यात आला होता -

1) पंतप्रधान नरेंद्र मोदींद्वारा घोषित केलेल्या 'स्वच्छता अभियाना'चा सन्मान करावा.

2) भारतातील सर्व मंदिरांचे शुध्दीकरण आणि 18 अभिषेकांचे आयोजन करावे.

3) जैन मंदिरांतील संग्रहित तुटलेल्या वस्तू, फाटलेली पुस्तके, इत्यादी वस्तूंचे पुनःनूतनीकरण करावे.

4) पूर्ण तीर्थ संकुले, धर्मशाळा, ज्ञान भंडार इत्यादी नेहमी स्वच्छ ठेवावे.

5) तीर्थ संकुलातील प्रसाधनगृहे स्वच्छ ठेवावीत.

महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी, सोमवारी 27 ऑक्टोबर 2014ला अठरा अभिषेक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते, ज्याचे जैन धर्मात विशेष महत्त्व आहे. तिसऱ्या दिवशी 28 ऑक्टोबर 2014ला शहरात आनंदाच्या वातावरणात ध्वजारोहण महोत्सव पार पडला. या प्रसंगी कलेक्टरांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्यांनी गरीब, असाहाय्य आणि अनाथ लोकांची सेवा करण्याचे आवाहन केले. या समारोपाच्या सत्रात समस्त महाजन परिवारांच्या प्रमुखांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर शोभायात्रा काढून कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. या दोन दिवसीय समारोपाच्या कार्यक्रमातदेखील गुजरात आणि मुंबई येथील समस्त महाजन संस्थेतील सदस्यांनी आनंदाने सहभाग घेतला. जैसलमेरवासीयांनीदेखील संस्थेच्या सेवा कार्याचे भरभरून कौतुक केली. जैसलमेर येथील वृत्तपत्रांनीदेखील समस्त महाजन संस्थेच्या सेवा कार्यांची दखल घेतली.                             

9893436951

अनुवाद - पूनम पवार