एक अविस्मरणीय अभिवादन 

 विवेक मराठी  07-Apr-2018

30 व 31 मार्च रोजी रायगडावर शिवपुण्यतिथी अभिवादन कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचा योग आला. ज्याची महती ऐकताना ऊर अभिमानाने भरून येतो, समाजाच्या सर्व स्तरांतील लोक ज्या व्यक्तीचे पुण्यस्मरण करण्यासाठी रायगडावर एकत्र येतात, अशी ही छत्रपती शिवाजी महाराज नावाची शक्ती आहे याचा अनुभव रायगडाच्या भेटीप्रसंगी पावलोपावली आला. मुघलांच्या जाचाला कंटाळलेला, स्वत:च्या अस्तित्वाच्या शोधात असलेला मराठी मुलुख छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतंत्र केला. रायगड किल्ला हा स्वराज्याची दुसरी राजधानी बनला. स्वराज्यातले अनेक चढउतार, चांगले-वाईट प्रसंग या किल्ल्याने पाहिले. हिंदवी स्वराज्याची स्थापना करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आपला देह ठेवला तोही याच किल्ल्यावर. 338 वर्षांपूर्वी हनुमान जयंतीला त्यांचे निधन झाले. या दिवशी, गेली 125 वर्षे छत्रपती शिवाजी महाराजांचे पुण्यस्मरण करण्यासाठी हजारो शिवभक्त गडावर एकत्र येऊन  अभिवादनाचा कार्यक्रम करत आहेत.

कार्यक्रमांची रेलचेल

श्री शिवाजी रायगड समिती स्मारक मंडळ, पुणे व स्थानिक उत्सव समिती, महाड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या शिवपुण्यतिथी अभिवादन सोहळयाला जवळपास 40 हजार शिवभक्तांची उपस्थिती होती. रायगडावर दि. 30 मार्च व 31 मार्च या दोन्ही दिवसांत भरगच्च कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. 30 तारखेला दुपारपासून लोक गडावर जमायला सुरुवात झाली. संध्याकाळी 'तीर्थ शिवराय' हे संगीतमय शिवचरित्राचे सादरीकरण झाले. त्यानंतर बालकलाकारांच्या चमूने सामूहिक तबला वादन करून महाराजांना मानवंदना दिली. पोवाडा, शाहिरी कवनांतून शिवपराक्रमाची उजळणी होत होती. भोजनोत्तर सत्रात पुरस्कारार्थींचे अनुभव ऐकण्याची संधी उपस्थितांना मिळाली. ज्येष्ठ इतिहास संशोधक व संस्थेचे कार्यवाह पांडुरंग बलकवडे आणि दुर्गअभ्यासक प्र.के. घाणेकर यांनी त्यांच्याशी संवाद साधला. त्यानंतर लोकमान्य बँड या निवृत्त सैन्याधिकाऱ्यांच्या बँडने वीरगीतांचे वादन केले. याच वेळात जगदीश्वर मंदिर प्रांगणात कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते.

दि. 31 रोजी पहाटे जगदीश्वर मंदिरातील हनुमानाच्या मूर्तीची व त्यानंतर जगदीश्वराची पूजा करण्यात आली. त्यानंतर  सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या समाधीचेही पूजन करण्यात आले. या वेळी निघालेल्या पालखी सोहळयात पारंपरिक वेशभूषेतले अनेक शिवभक्त सहभागी झाले होते. विशेष म्हणजे पुण्यातून घोडयांचे एक दल गड चढून रायगडावर आले होते. पाच किल्ल्यांवरील पाणी या पथकाद्वारे गडावर आणण्यात आले होते. समाधी पूजनानंतर होळीच्या माळावर या घोडयांचे संचलन झाले. मुख्य कार्यक्रमानंतर निघालेल्या पालखीपुढे रायगड पोलिसांनी बंदुकीच्या 21 फैरी झाडून महाराजांना मानवंदना दिली.

 

सरसंघचालकांची प्रेरक उपस्थिती

लोकमान्य टिळकांच्या प्रेरणेतून पुण्यात श्री शिवाजी रायगड स्मारक समितीची स्थापना करण्यात आली. दर वर्षी श्री शिवाजी रायगड समिती स्मारक मंडळ, पुणे व स्थानिक उत्सव समिती, महाड यांच्या संयुक्त विद्यमाने शिवपुण्यतिथी अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. या वर्षी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत हे कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या वेळी सरसंघचालकांनी उपस्थितांशी संवाद साधला. या कार्यक्रमात आयोजक संस्थांच्या वतीने अनेक मान्यवरांना श्री शिवपुण्यस्मृती रायगड पुरस्काराने गौरवण्यात आले.

हिंदवी स्वराज्यातील सरदारांच्या एका घराण्यातील वारसांचा दर वर्षी गौरव करण्यात येतो. या वर्षी कान्होजी जेधे यांच्या कुटुंबीयांना गौरवण्यात आले. तसेच निवृत्त सैन्यअधिकाऱ्यांचाही गौरव करण्यात आला. मेजर जनरल (नि.) मनोज ओक यांना हा मान मिळाला. ऑॅपरेशन विजय अर्थात कारगिलच्या युध्दाच्या वेळी 'तुर्तुक' या संवेदनशील ठिकाणी पाकिस्तानने मांडलेल्या चौक्या उद्ध्वस्त करून या देशाला देण्याचे काम मेजर ओक यांनी केले होते. संस्थेद्वारे शिवचरित्र अभ्यासकांना विशेष पुरस्काराने गौरवण्यात येते. कै. प्रमोद मांडे हे ज्येष्ठ गडकिल्ले अभ्यासक आणि लेखक. मांडे यांना मरणोत्तर पुरस्काराने गौरवण्यात आले. शिवरायांचा देदीप्यमान इतिहास विविध माध्यमांतून मांडणाऱ्या, पंढरपूर येथील शिवभक्त प्रतिष्ठान संस्थेला शिवपुण्यस्मृती पुरस्काराने गौरवण्यात आले.

संस्थेतर्फे दर वर्षी गडारोहण स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. यंदाही बाल-कुमार-युवा गट अशा स्त्रियांच्या व पुरुषांच्या स्पर्धा घेण्यात आल्या. बाल गटातील प्रथम क्रमांक प्राप्त करणाऱ्या मुलाने 18 मिनिटांत गड सर केला.(सर्वसामान्य माणसाला उतरायलादेखील दीड-दोन तास लागतात.)

सोयीसुविधांचे नियोजन

महाड, पाचाड, हिरकणी गाव अशा जवळपासच्या गावांसह पुणे, मुंबई, सांगली, सोलापूर, अहमदनगर, कोकणातून चिपळूण, देवरूख, रत्नागिरी अशा अनेक शहरांतून हजारो शिवभक्त या कार्यक्रमाला आले होते. श्री शिवाजी रायगड समिती स्मारक मंडळ, पुणे व स्थानिक उत्सव समिती, महाड या दोन्ही संस्थांच्या वतीने कार्यक्रमासाठी आलेल्या शिवभक्तांसाठी सोयीसुविधांचे व्यवस्थित नियोजन करण्यात आले होते. शासनाच्या वतीने वीजपुरवठा, पाणीपुरवठा अशा सोयी पुरवण्यात आल्या होत्या. रायगड पोलिसांकडून सुरक्षेच्या दृष्टीने विशेष फौज पुरवण्यात आली होती.

होळीच्या माळावर जेवणासाठी स्वतंत्र मंडप घालण्यात आले होते. मुख्य कार्यक्रमाच्या ठिकाणी, राजसदरेवर घातलेल्या मंडपात निवासाला आलेल्या लोकांची सोय करण्यात आली होती. अर्थात लोकांचा ओघ बघता ही सोय पुरेशी ठरणार नव्हती. त्यामुळे अनेक लोकांनी गडावर अन्यत्र, मोकळया आकाशाखाली आसरा घेतला होता. त्यांना अंथरुणे देण्यात आली होती. स्त्रियांसाठी व पुरुषांसाठी स्वतंत्रपणे एकूण 160 तात्पुरती स्वच्छतागृहे रायगड परिसरात उभारण्यात आली होती.

उत्सव सोहळयांच्या ठिकाणी प्लास्टिकचा सर्वाधिक उपयोग केला जातो, हे आपल्या कायम निदर्शनास येते. रायगड किल्ल्यावरील याबाबतचा अनुभव सकारात्मक होता. प्लास्टिकचा अतिशय कमी वापर केला गेला. जेवणासाठी कागदी प्लेट्सचा वापर करण्यात आला. पॅकबंद बाटल्या-ग्लासांऐवजी पिण्याच्या पाण्याची पिंपे ठेवण्यात आली होती. जागोजागी मोठया कचरापेटया ठेवण्यात आल्या होत्या. कार्यक्रमाच्या दोन दिवसांचे उत्तम जलनियोजन करण्यात आले होते. लोकांनीही पाण्याचा अपव्यय न करण्याचे आवाहन वेळोवेळी केले जात होते.

कार्यक्रमाला स्वतंत्र बसेस तसेच गाडया करून येणाऱ्यांची संख्या लक्षात घेऊन गडाच्या पायथ्याशी विशेष वाहनतळ तयार करण्यात आले होते. तसेच रज्जूरथाची - अर्थात रोप-वेची वेळ वाढवण्यात आली होती. शिवपुण्यतिथीसाठी लांबून आलेले लोक, अतिमहत्त्वाचे लोक आणि अवजड सामान यांची नियोजनपूर्वक ने-आण करण्याची जबाबदारी या विभागाने पार पाडली, तेही जनभावना न दुखावता.

मला दिसलेला शिवसोहळा

आम्ही रोप वेने गडावर जायचे ठरले. रोप वे स्टेशनवर पोहोचलो आणि तिथपासूनच लोकांच्या शिवप्रेमाची झलक पाहायला मिळत होती. संघाचे कार्यकर्ते, निरनिराळया संघटनांचे लोक उत्स्फूर्तपणे मोठमोठया आवाजात शिवरायांची स्तुतिपर गीते गात होते. ती गाणी ऐकताना लोकांच्या मनात शिवाजीराजांबद्दल किती अभिमान आहे, याची जाणीव होत होती. गडावर पाऊल ठेवताक्षणी दिसला तो उंच आकाशात फडकणारा भगवा. राजसदरेवर, शिवरायांच्या पायथ्याशी बसून शाहीर उन्मुक्तपणे शिवस्तुती गात होते. आम्ही पोहोचलो, तेव्हा नुकतेच बालचमूचे तबला सादरीकरण झाले होते. त्यांचे गुरुजी ध्वजाच्या पायथ्याशी बसून फेटाधारी शिष्यांना शिवाजी महाराजांच्या गोष्टी सांगत असावेत. एकेक प्रसंग ऐकल्यानंतर अभिमानाने फुललेला मुलांचा चेहरा चंद्रप्रकाशात अधिक उजळ दिसत होता. मुख्य कार्यक्रमाच्या दिवशी सकाळी काही दुर्गप्रेमी मुलांचे, युवांचे छोटे छोटे गट करून त्यांना गडाच्या प्रत्येक भागाची सैर घडवत होते आणि सैर घडवताना शिवचरित्रातील काही घटनांनाही उजाळा देत होते, इतिहास त्यांच्या डोळयासमोर उभे करत होते. ऐतिहासिक वेशभूषेत महाविद्यालयांतील अनेक तरुण-तरुणी पालख्यांचा, ढोल-ताशांचा आनंद घेत होते. अनेक गावकरी आपल्या राजाला मानवंदना देण्यासाठी गड चढून आले होते. कोकणातून, पुण्यातून, सांगलीतून स्वयंप्रेरणेने आलेले अनेक युवक गडावर स्वयंसेवक म्हणून राबत होते.

शिवाजी महाराज हे शककर्ते होते. ते संपूर्ण देशालाच वंदनीय आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल असलेला आदर आणि आत्मीयता याच भावनेने त्यांना वंदन करण्यासाठी, त्यांच्या पुण्यस्मृती जागवण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून हजारो लोक रायगडावर जमले होते. यापुढेही विविध कार्यक्रमांना जाण्याचे योग येतील. पण रायगडावरचा हा अनुभव मनाच्या पाटीवर कायमचा कोरला गेला आहे, हे मात्र नक्की.

 

 ''राष्ट्रोत्थानासाठी शिवाजी महाराजांचे नित्य स्मरण आवश्यक'' 

(सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्या भाषणातील काही अंश)

* शिवरायांचे स्थान हे महाराष्ट्रापुरते मर्यादित नाही. शिवाजी महाराज ही अखंड राष्ट्राकरिता फलदायी होणारी प्रेरणा. अनेक राजांना त्यांनी राज्य स्थापित करण्याची प्रेरणा दिली. बुंदेलखंडाचे राजे छत्रसाल, राजस्थानचे राजपूत हे याचे उदाहरण आहेत. हा समज धर्मप्रवण आहे, इथे धर्माचे राज्य असावे ही शिकवण त्यांनी दिली.

* इस्लामचे आक्रमण हे कोणा एका राज्यापुरते नव्हते तर संपूर्ण  जीवनशैली आपल्यावर लादणारी ती चळवळ होती. ती उलटवून लावण्याच्या प्रयत्नांत पूर्ण यशस्वी झालेले पहिले राजे शिवाजी महाराज होते. यातून प्रेरणा घेऊन अनेकांनी प्रेरणा घेतली. इस्लामी आक्रमणाच्या पतनाची सुरुवात शिवाजी महाराजांनी केली. त्या विजयाचे प्रतीक रायगड आणि त्या विजयाचे शिल्पकार असणारे शिवाजी महाराज आपल्याला नित्य स्मरणीय, अनुसरणीय आहेत.

* भारत हा आध्यात्मिक अधिष्ठानावरच मोठा होऊन तग धरू शकतो. 'हे राज्य व्हावे ही तो श्रींची इच्छा' या एका वाक्यातून लोकांना हे आध्यात्मक अधिष्ठान दिले. पशू, मनुष्य आणि पर्यावरण या तिन्हीचे उद्ध्वस्तीकरण झालेले असताना, जनता निराश झालेली असताना सोन्याचा नांगराने जमीन नांगरली. मैत्री करून लोकांचा आत्मविश्वास जागवला.

* शिवाजी महाराजांनी अनेक गोष्टी केल्या. लोकांचा स्वाभिमान जागवला, राज्यभाषा कोश तयार केला, भारतीय भाषांमध्ये व्यवहार करायला सुरुवात केली. स्वराज्याचे आरमार उभारले. देश-काल-परिस्थितीसापेक्ष निर्णय घेतले. आपल्यासाठी ते सर्वार्थाने आदर्श आहेत.

* शिवाजी महाराज जागतिक प्रेरणेचे केंद्र आहेत. शिवाजी महाराजांच्या प्रशासकीय नीतीचे, युध्दनीतीचे, आरमारी रचनेचे जगभरात अध्ययन केले जाते. शिवाजी महाराज आणि किल्ले रायगड हे स्फूर्तिकेंद्र आहे.

* समाज सरकाराश्रित नाही. देशकल्याणाची, समाजकल्याणाची, धर्मकल्याणाची, देशाला पुढे नेणारी गोष्ट समाज स्वयंपूर्णतेने करू शकतो. मागील दोन-तीन वर्षांत राज्याने दुष्काळावर केलेली मात हे याचे उदाहरण आहे. फक्त मनात स्वावलंबनाचा उद्यम जागृत झाला पाहिजे. त्यासाठी शिवाजी महाराजांच्या व्यक्तिगत आयुष्याचे अनुकरण आवश्यक.

आज देशावर कुप्रवृत्तीचे आक्रमण होत आहे. आज पुन्हा एकदा हिंदु धर्माचा, हिंदू प्रवृत्तीचा, हिंदू विचारांचा देश उभा करण्याचे आपल्यापुढे आव्हान आहे.

 9920450065

(विश्व संवाद केंद्र लेख विभाग)