आहे उत्तम, तरीही...

 विवेक मराठी  12-May-2018

न्यूडिटी - नग्नता हा विषय आपल्याकडे खुल्या आणि निरोगी चर्चेचा नाही. नग्नतेला चिकटून अश्लीलता येते, असा सर्वसामान्यांच्या मनात वर्षानुवर्षं पक्का असलेला (गैर)समज. असा जोखमीचा विषय चित्रपटासाठी निवडणं आणि तो करताना नग्नतेमागचं अभिजात सौंदर्य नजाकतीने उलगडून दाखवणं, हे अतिशय अवघड असलेलं काम दिग्दर्शक रवी जाधव यांनी केलं आहे. त्याबद्दल त्यांचं मन:पूर्वक अभिनंदन!

न्यूड मॉडेलिंग... मुलाच्या शिक्षणासाठी आईने पैसे कमावण्याची शोधलेली ही एक अनोखी वाट. जी फारशी मळलेली तर नाहीच, पण अशा कामाविषयी समाजात असलेल्या अज्ञानामुळे ती दुर्लक्षितही आहे. कला महाविद्यालयातील फाईन आर्ट्सच्या विद्यार्थ्यांना न्यूड पेंटिंग हा अभ्यासविषय असतो. त्यासाठी आवश्यक असतं ते न्यूड मॉडेल, स्त्रीचं आणि पुरुषाचंही. या विषयाचे प्रात्यक्षिक वर्ग भरतात एका बंद खोलीत, जिथे विद्यार्थी, शिक्षक आणि मॉडेल व्यतिरिक्त अन्य कोणालाही प्रवेश नसतो. त्या खोलीतला प्रत्येक जण समोर बसलेल्या मॉडेलला, त्या बंद खोलीच्या आत तसंच बाहेरच्या जगातही, अतिशय सन्मानाने वागवणारा आणि अभ्यासविषय या भावनेने बघणारा असतो. सर्वांची नजर निरोगी, दृष्टीकोन स्वच्छ.

अशा या जगात आक्काचा हात धरून आलेली यमुना. पुरेसा प्रयत्न करूनही पैसे कमवायचा अन्य कोणताही मार्ग उपलब्ध न झालेली यमुना. केवळ लेकाच्या चांगल्या भविष्यासाठी नाइलाजाने न्यूड मॉडेल व्हायला तयार झालेली यमुना.

चित्रपटाचा मध्यंतरापर्यंतचा भाग आई म्हणून यमुनाचा संघर्ष प्रभावीपणे उभा करत असतानाच, नग्नतेबद्दलची आपल्या मनाला वर्षानुवर्षं घट्ट चिकटून असलेली कोळिष्टकं स्वच्छ करणारा आहे. या संदर्भातल्या कधीही विचारात न घेतलेल्या दृष्टीकोनाकडे अंगुलिनिर्देश करणारा आहे, जो या विषयासंदर्भातली आपल्या मनाची बंद कवाडं किलकिली करण्याचं काम करतो.

असा एका विशिष्ट दिशेने चाललेला, विलक्षण परिणाम करणारा चित्रपट, मध्यंतरानंतर अनपेक्षित वळण घेतो. हे वळण धक्कादायक होतं. निदान मला तरी धक्का देऊन गेलं. दिग्दर्शकाचं अभिव्यक्तिस्वातंत्र्य मान्य करूनही, मध्यंतरानंतर काही काळासाठी आलेलं ज्येष्ठ चित्रकाराचं पात्र या चित्रपटाची दिशाच बदलतं. त्या पात्राची छाया चित्रपटविषयावर शेवटपर्यंत राहते. हे पात्र ज्या जगविख्यात भारतीय चित्रकारावर बेतलेलं आहे, त्यांच्या ज्या न्यूड पेंटिंगवरून वादळ झालं त्या चित्रातल्या नग्नतेला काही वेगळा अर्थ होता. त्या वेळीही आक्षेप घेतला गेला होता तो त्याच कारणामुळे. या देशातल्या बहुसंख्यांच्या - हिंदूंच्या श्रध्दास्थानाला नग्नरूपात दाखवल्यामुळे. निषेध नोंदवला गेला होता तोही त्याबद्दलच. आश्चर्याची बाब म्हणजे, निषेधाच्या या कारणाबद्दल अवाक्षरही न काढता त्यांच्या न्यूड पेंटिंग्जवरून उसळलेला जनक्षोभ केवळ चित्रपटात दाखवला गेला आहे. सोयीस्करपणे वास्तवाशी जवळीक आणि हवी तेव्हा त्याच्याशी फारकत घेणं हे रवी जाधव यांच्यासारख्या दिग्दर्शकाकडून अपेक्षित नाही.

मुंबईतल्या जे.जे. कला महाविद्यालयातील न्यूड पेंटिंगच्या अभ्यासाला शतकाची परंपरा आहे. ज्याअर्थी इतकी प्रदीर्घ परंपरा आहे, त्याअर्थी सर्वसामान्यांनी याबाबत कधी प्रखर वा दहशत निर्माण करणारा विरोध केला नसणार, असं गृहीत धरायला वाव आहे. त्याचबरोबर ही गोष्टही खरी की या विषयाबाबत जसा गैरसमज आहे तसा संकोचही आहे, त्यामुळे न्यूड मॉडेल मिळणं ही कोणत्याही काळात सहजसोपी बाब नव्हती आणि कदाचित यापुढेही नसेल. (न्यूड पेंटिंगकडे बघायचा दृष्टीकोन या चित्रपटाने बदलू शकतो, नजर निरोगी होऊ शकते, पण म्हणून लगेच न्यूड मॉडेल होण्यासाठी खूप जण तयार होतील अशा भ्रमात राहायचं कारण नाही.) तरीही, या कामासाठी मूठभर का होईना, माणसं कायमच मिळत होती. मात्र अशा मॉडेल्समुळे विद्यार्थी शिकत गेले आणि न्यूड पेंटिंगची परंपरा जे.जे.मध्ये निर्माण होऊ शकली.

मॉडेल्सची संख्या कमी असण्यामागचं आणखी एक कारण म्हणजे, चित्रकाराच्या शिक्षणप्रक्रियेत अशा पेंटिंगला काय स्थान असतं, याची समाजातल्या अनेकांना कल्पनाच नसते, हेही आहे. भारतीय कलाविचारांमध्ये नग्नतेबद्दलचा सोवळेपणा कधी दिसत नाही. आपलं प्राचीन वाङ्मय, प्राचीन शिल्पं-चित्रंही याची साक्ष आहेत. अगदी अलीकडच्या काळात चिन्ह या कलाविषयक वार्षिकांकाने प्रकाशित केलेला, नग्ता या विचाराला वाहिलेला अंक हेदेखील त्याचंच उदाहरण म्हणता येईल. अतिशय संयतपणे आणि अभिरुचिसंपन्न भाषेत केलेली या संवेदनशील विषयाची मांडणी हे या अंकाचं वैशिष्टय होतं. त्या अंकाविरोधातही समाज खवळून उठल्याचं ऐकिवात नाही. असं असलं, तरी नग्नता आणि नग्न चित्र हे सर्वसामान्यांमधील मोकळया संवादाचे विषय कधी नव्हते, हेदेखील एक वास्तवच आहे. संवादाची ती बंद वाट उघडण्याचं मोलाचं काम या चित्रपटाने नक्कीच केलं आहे, ते निश्चितच कौतुकास्पद आहे.

सांगण्याचा मुद्दा हा की, हा विषय उघडपणे बोलण्याचा नसला तरी अशा मॉडेलच्या वा पेंटिंगच्या विरोधात त्याआधी कधी सर्वसामान्यांकडून विरोध झाला नव्हता. म्हणूनच ही गोष्ट सूर्यप्रकाशाइतकी स्वच्छ आहे की, त्या जगप्रसिध्द भारतीय कलाकाराच्या न्यूड पेंटिंगला विरोध झाला, तो त्यांनी बहुसंख्याकांच्या श्रध्दास्थानाला चित्रविषय तर बनवलंच, शिवाय त्याची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत विक्री करण्याचं औध्दत्यही दाखवलं म्हणूनच. नेमका 'हा' मुद्दाच चित्रपटात सोयीस्करपणे टाळला आहे. किंवा अभिव्यक्तिस्वातंत्र्याच्या नावाखाली दिग्दर्शकाने घेतलेलं ते स्वातंत्र्य आहे, असं म्हणता येईल. जे असेल ते... सुजाण आणि सजग प्रेक्षकाला मात्र यामुळे गोंधळायला होतं.

मध्यंतरापर्यंत नग्नता या संकल्पनेची कलावंताच्या नजरेतून केलेली अतिशय कौतुकास्पद सभ्य हाताळणी आणि नंतर त्या कलाकाराची वादग्रस्त ठरलेली न्यूड पेंटिंग्ज, हे दोन्ही विषय स्वतंत्र आहेत. मात्र त्यातल्या भेदाची सीमारेषा सूक्ष्म आहे. सर्वसामान्यांच्या चटकन लक्षात येण्याजोगी नाही. त्याचा फायदा घेत हे दोन्ही विषय एकमेकांमध्ये बेमालूमपणे मिसळायचा प्रयत्न दिग्दर्शकाने केला आहे. ही गोष्ट सजग प्रेक्षकांना बरोबर समजते.

एका आईच्या जगावेगळया कष्टांची कहाणी सांगत आणि नग्नतेविषयी समाजमनावरची पक्की असलेली गैरसमजाची जळमटं स्वच्छ करत चाललेला हा चित्रपट मध्यंतरानंतर वेगळा सूर लावतो आणि तिथे गडबड होते. नग्नता हा एकच विषय आणि त्याचे दोन भिन्न आयाम, त्यांचं दिग्दर्शकाला वाटलं तसं एकमेकांवर केलेलं कलम (त्या वेळच्या वस्तुस्थितीकडे कानाडोळा करून,) मला तरी justifiable वाटलं नाही.

या दोन विषयांवर दोन स्वतंत्र चित्रपट होऊ शकतात. तसं न करता, अशी विचित्र सरमिसळ करून या मुद्दयावरून भारतीय सामाजिक मानसिकतेवर कोरडे ओढण्याचा हा प्रकार दु:खदायक आहे. हा जगप्रसिध्द कलाकार कोण हे सर्वांना समजतं. त्याच्या सर्व वैशिष्टयांसह (उदाहरणार्थ - त्याचं मुस्लीम नाव, मर्सिडीज गाडी, अनवाणी पाय, बोलण्यात पंढरपूरचा आलेला संदर्भ, पेंटिंग करताना त्याने नायिकेला घ्यायला लावलेली तीच वादग्रस्त पोज इ.) त्याला सादर करताना, चित्रपटातल्या त्या व्यक्तिरेखेला त्याचं नाव देण्याचं मात्र टाळतो. या गंमतीशीर लपवाछपवीमागचं कारण काही लक्षात येत नाही.

कलावंताच्या अभिव्यक्तिस्वातंत्र्याची कड घेताना आपण समाजाच्या समजशक्तीबाबत अविश्वास तर व्यक्त करत नाही ना, असा प्रश्न दिग्दर्शकाला पडला नसेल का? पडला नसल्यास तो का पडला नसेल? की ही लबाडी सहज खपून जाईल या भ्रमात तो राहिला असेल?

आणखी एक आक्षेप आहे तो, चित्रपटाचा शेवटाविषयी. जिथे चित्रपट संपतो, त्या आधीचे दोन प्रसंग असे आहेत की जेव्हा तो संपला आहे असं वाटतं. पहिला प्रसंग म्हणजे, नव्याने येऊ  लागलेल्या तरुण न्यूड मॉडेलला यमुना कानामागे तीट लावते तो प्रसंग. अतिशय उत्कट आणि आपल्या कामाविषयी तिच्या मनात असलेली प्रेमादराची भावना व्यक्त करणारा हा प्रसंग. या कमालीच्या तरल, भावुक क्षणी चित्रपट संपला असता तर तो एका वेगळया उंचीवर पोहोचला असता. पण तसं होत नाही. चित्रपट पुढे सुरूच राहतो. दुसरा प्रसंग आहे तो, जेव्हा यमुना मुलाच्या बाबतीत आलेल्या अपयशामुळे पूर्णपणे हताश होऊन स्वत:चं आयुष्य संपवते तो. इथेही चित्रपट संपला असता तरी एका जगावेगळया आईची असफल धडपड असा विचार नोंदवत प्रेक्षकांनी एग्झिट घेतली असती. या दोन्हीपैकी एका प्रसंगावर चित्रपटाचा शेवट झाला असता, तर तो अधिक अर्थपूर्ण वाटला असता असं मनात आलं.

मात्र तसं न होता, काही वर्षांच्या खंडानंतर यमुनेचा मुलगा न्यूड पेंटिंगचं प्रदर्शन पाहायला येतो, आणि त्यावर अनपेक्षित अशी प्रतिक्रिया देतो त्या प्रसंगावर चित्रपटाचा शेवट होतो. शेवटावर काही भाष्य करण्यापूर्वी आणखी एक नोंद करावीशी वाटते. दोन नायिकांचं उदात्तीकरण करताना लहान्याच्या व्यक्तिरेखेवरही अन्याय झाला आहे असं वाटतं. लहान्याच्या हातात उपजत चित्रकला आहे. त्याचे दाखले चित्रपटात येतात. अगदी शालेय वयापासून त्याच्या या गुणाची नोंद घेतली गेली आहे. अभ्यासात न रमणारा लहान्या चांगला चित्रकार व्हावा अशी यमुनाची इच्छा असते. मात्र तसं होताना आपली आई न्यूड मॉडेल म्हणून काम करते हे त्याला कळू नये, असं तिला वाटतं. (आणि तिच्या बाजूने विचार केला, तर हे वाटणं खूप स्वाभाविकही आहे.) म्हणूनच यमुना त्याला औरंगाबादला पाठवते. तिथे तो काही वर्षं चित्रकलेचं शिक्षण घेतो. अशा कलेच्या विद्यार्थ्याची न्यूड पेंटिंगच्या बाबतीतली दृष्टी इतकी दूषित कशी असू शकेल? की त्याच्यावर पहिल्यापासूनच्या वाईट संगतीचा झालेला तो विपरीत परिणाम आहे, असं सुचवायचं आहे? हा लहान्या चित्रकलेचं शिक्षण अर्धवट सोडून परततो. 'या क्षेत्रात पैसा, प्रसिध्दी मिळते ते मेल्यानंतर' असंही तो आईला ऐकवतो आणि बक्कळ पैसा कमावण्यासाठी तो दुबईला जाणार असल्याचं जाहीर करतो. मात्र प्रत्यक्षात कुठेही न जाता मंत्रालयात चतुर्थ श्रेणी कामगार म्हणून कामाला लागतो, असं शेवटच्या प्रसंगात दाखवलं आहे. (लहान्याला मंत्रालयात काम करताना दाखवून त्यातूनही दिग्दर्शक काही सांगू पाहतोय का?) तो 'न्यूड पेंटिंग'च्या प्रदर्शनाचा बोर्ड वाचून आंबटशौक पूर्ण करण्यासाठी तिथे जातो, असं दृश्य आहे. (मंत्रालयाच्या जवळच आर्ट गॅलरी की जे.जे. कला महाविद्यालय, यापैकी नेमकं काय ते नीट समजलं नाही. ती वास्तू दाखवतानाही  दिग्दर्शकाने प्रत्यक्षातल्या भूगोलाशी फारकत घेतली आहे. हेदेखील अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा भाग असेल, तर हा मुद्दा रद्द समजावा.) या प्रदर्शनात मांडण्यात आलेली न्यूड पेंटिंग्ज पाहताना लहान्याची उद्दीपित झालेली कामवासना आणि त्याच्यामधली मूळ चित्रकाराची वृत्ती याचा मेळ बसत नाही. की त्याच्यातला कलाकार मेला आहे असं दिग्दर्शकाला दाखवायचं आहे? आईचं न्यूड पेंटिंग पाहिल्यावर त्याला बसलेला धक्का आणि त्यावर त्याने चित्रकाराच्या थोबाडीत लगावणं, या दृश्यावर चित्रपटाचा शेवट होतो. हा शेवट खूप बटबटीतपणे अंगावर येणारा वाटतो. वास्तविक या धक्कादायक शेवटाकडे पोहोचेपर्यंत चित्रपटगृहातल्या बहुतांश प्रेक्षकांचा नग्नतेकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलण्यात जे दिग्दर्शकाला यश आलेलं आहे, त्यावरच 'तमाचा' मारण्याचं काम हा प्रसंग करतो, असं मला वाटलं.

अलीकडेच एका जाहीर कार्यक्रमात बोलताना लेखक-दिग्दर्शक सचिन कुंडलकर यांनी, ''प्रेक्षकाला चित्रपट नावडायचा, तसंच त्यावर टीका करायचाही अधिकार आहे'' असं म्हटलं होतं. ते मनापासून बोलले असणार असं गृहीत धरून, एका महत्त्वपूर्ण विषयावरच्या चित्रपटाबद्दलचं एक प्रेक्षक म्हणून माझं मत मी पुरेशा गांभीर्याने नोंदवत आहे. याहूनही वेगळी अनेक मतं असू शकतात याचीही कल्पना आहेच.

अर्थात, याउप्परही हा चित्रपट आवर्जून बघण्याजोगा नक्कीच आहे. मुख्य म्हणजे या चित्रपटामुळे मराठी सिनेमा विषयाच्या आणि सादरीकरणाच्या बाबतीत आणि सर्वसामान्य प्रेक्षक समजुतीच्या बाबतीत, प्रगल्भतेच्या चार यत्ता पुढे गेला आहे. तसंच दोन नायिकांच्या सशक्त अभिनयासाठी, अर्थवाही आणि अकृत्रिम संवादांसाठी, अतिशय बोलक्या आणि संवेदनशील छायाचित्रणासाठी, आणि... एका अस्पर्शित विषयाच्या बाबतीतला आपला दृष्टीकोन बदलणाऱ्या, नग्नता किती सभ्यतेने सादर करता येते हे अनुभवण्यासाठी 'न्यूड' नक्कीच बघण्याजोगा आहे. मात्र हे सारं करत असताना, इतिहासातील घटना आपल्याला हव्या त्या पध्दतीने, हव्या तितक्याच दाखवण्याची गरज नव्हती असं राहून राहून मनात येत राहतं. 

9594961865