न्यायव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह कशासाठी?

 विवेक मराठी  14-May-2018

राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांची नुकतीच तुरुंगातून जामिनावर सुटका झाली. न्यायालयात अजूनही त्याच्यावर दाखल करण्यात आलेला खटला प्रलंबित आहे. त्यामुळे छगन भुजबळ हे केवळ उपचाराच्या कारणासाठी तुरुंगातून बाहेर आले आहेत. न्यायालयाने त्यांना निर्दोष म्हणून मुक्त केलेले नाही. त्याचप्रमाणे त्यांच्यावर दाखल केलेल्या खटल्यासंदर्भातही काही भाष्य केलेले नाही. दिल्लीतील महाराष्ट्र सदन घोटाळा, वांद्रे येथील महाराष्ट्र एज्युकेशन साोसायटीतील 176 कोटींचा घोटाळा व अन्य काही प्रकरणात छगन भुजबळ यांना आरोपी करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गेले सव्वीस महिने ते तुरुंगात होते. छगन भुजबळ यांनी आपल्या पन्नास वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस असा प्रवास केलाआहे. मधल्या काळात ओबीसी समाजाचा नेता म्हणूनही त्यांनी स्वतःला प्रसिध्दीच्या झोतात ठेवले होते. या माध्यमातून स्वत:ची पक्षापेक्षा स्वतंत्र ओळख निर्माण केली. समता परिषदेच्या माध्यमातून राजकीय पक्षाला समांतर असे सामाजिक संघटन उभे करण्यात ते यशस्वी झाले आणि त्यातून त्यांनी आपला राजकीय दबाव गट तयार केला. असे हे 'बहुआयामी' छगन भुजबळ नुकतेच जामिनावर मुक्त झाल्यानंतर, प्रसारमाध्यमांवर आणि सोशल मीडियावर ज्या प्रकारच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या, त्या पाहता आपला महाराष्ट्रही उत्तरेतील राज्याच्या मार्गाने चालला आहे का, असा प्रश्न निर्माण झाला.

छगन भुजबळ यांना जामीन मिळू शकतो असे ज्या दिवशी न्यायालयाने स्पष्ट केले, त्याच दिवशी राज्याच्या विविध भागांतील भुजबळ समर्थकांनी त्यांच्या सुटकेच्या शक्यतेवर फटाके फोडून आनंद व्यक्त केला. अनेक शहरांत मिरवणुका काढल्या गेल्या. तुरुंगातून बाहेर आलेल्या छगन भुजबळ यांना 'ओबीसी योध्दा' या पुरस्काराने गौरवण्याची घोषणा झाली. जणू काही छगन भुजबळ यांच्यावरील खटल्याचा निकाल लागला असून न्यायालयाने त्यांना निर्दोष म्हणून मुक्त केले आहे, अशा थाटात सर्वत्र आनंदोत्सव चालू होता. छगन भुजबळांचे जे समर्थक आहेत, किंवा जे छगन भुजबळांमुळे उपकृत झालेले आहेत, त्यांनी असे वागणे एक वेळ समजून घेता येईल. पण गेली दोन वर्षे मौन पाळणारेही एकदम पोपटासारखे बोलू लागले याचे आश्चर्य वाटले.

भुजबळांना अटक झाली, त्या वेळी त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्यांच्याकडे पाठ फिरवली होती. केवळ एवढेच नाही, तर त्यांच्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी जितेंद्र आव्हाड यांना ओबीसी नेता म्हणून जाहीर केले होते. ही गोष्ट भुजबळांना पक्षाने पर्याय शोधला असल्याची निदर्शक होती. मात्र भुजबळ तुरुंगातून बाहेर आले आणि सर्वच पोपटांना अचानक कंठ फुटला. छगन भुजबळ यांची सहानुभूती मिळवण्यासाठी आणि पुढच्या राजकीय डावपेचांसाठी असे करणे आवश्यक असले, तरी त्यातून एक गंभीर स्वरूपाचा प्रश्न उपस्थित होतो आहे, तो म्हणजे न्यायव्यवस्थेविषयी अविश्वासाचे वातावरण निर्माण करणे. न्यायालयाने भुजबळांची खालावलेली प्रकृती लक्षात घेऊन त्यांना उपचारासाठी मुक्त केले आहे. छगन भुजबळ यांनी जामीन मिळवण्यासाठी याआधी अनेक वेळा प्रयत्न केला होता आणि त्यात त्यांना प्रत्येक वेळेस अपयश आले होते. त्या वेळी त्यांच्या सहानुभूतिदारांपैकी कोणीही तोंड उघडल्याचे ऐकिवात नाही. आता न्यायालयाने उपचारासाठी मुक्त केल्यावर मात्र राष्ट्रवादीचे बोलभांड छगन भुजबळ यांच्या आडून महाराष्ट्रातील विद्यमान सरकार हे न्याय व्यवस्थेत हस्तक्षेप करत असल्याचे आरोप करत आहेत. सरकारच्या हस्तक्षेपामुळेच छगन भुजबळ यांना तुरुंगातून बाहेर यायला इतका कालावधी लागला, असा आरोप करत सरकार छगन भुजबळ यांच्याशी आकसाने व्यवहार करत आहे असे पुन्हा पुन्हा सांगण्याचा प्रयत्न चालू आहे. याचाच दुसरा अर्थ असा की ही मंडळी इथल्या न्यायव्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत.

छगन भुजबळ यांना अटक करताना आवश्यक ते सबळ पुरावे समोर ठेवून कारवाई झाली होती. प्रकरण न्यायालयासमोर आहे. अशा परिस्थितीत न्यायालय सरकारच्या दबावाखाली आहे, किंवा शासन न्यायपालिकेत हस्तक्षेप करत आहे अशा प्रकारचे आरोप करणे, व्यवस्थेवर संशय व्यक्त करणे या गोष्टींचा अर्थ काय होतो? कशासाठी हे केले जात आहे? न्यायव्यवस्थेवर अविश्वास दाखवून ही मंडळी काय साध्य करण्याचा प्रयत्न करत आहेत? असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतात. छगन भुजबळ यांच्याविरुध्द काहीच पुरावे नसते किंवा केवळ आकसाने त्यांना तुरुंगात डांबले असते, तर त्यांना सव्वीस महिने जामीन का मिळत नव्हता? याचा विचार समाजाने, विशेषत: त्यांच्या मागेपुढे करणाऱ्या समर्थकांनी करायला हवा आणि आत्ता झालेली सुटका ही केवळ उपचारांसाठी आहे, हेही लक्षात घ्यायला हवे.

छगन भुजबळ यांना अटक झाल्यापासून उपचारासाठी जामीन मिळेपर्यंतच्या काळात ज्यांनी मौन धारण केले, ते आपल्या बोलण्यातून सर्वसामान्य माणसाच्या मनात संभ्रम निर्माण करत आहेत. छगन भुजबळ यांच्या आडून राजकारण करत आहेत. तुरुंगातून मुक्त झालेले छगन भुजबळ पुढच्या काळात काय पावले उचलतील, ते काही दिवसात स्पष्ट होईलच. तुरुंगातून बाहेर आल्यावर भुजबळांनी मातोश्रीवर पेढे पाठवले. यामुळे त्यांच्या पुढच्या वाटचालीविषयी सर्वसामान्य माणसाच्या मनात कुतूहल निर्माण झाले आहे. राजकारणात काहीही होऊ शकते हे जरी खरे असले, तरी त्या माध्यमातून समाजात न्यायपालिकेविषयी संभ्रम आणि अविश्वासाचे वातावरण निर्माण होणार नाही, याचे भान भुजबळ समर्थकांनी बाळगायला हवे.