'पियूची वही'

 विवेक मराठी  14-May-2018

शाळा सुरू झाल्या दिवशी सुट्टीत काय काय केले ते बाई एकेका मुलीला विचारू लागल्या. पत्ते खेळल्याचे, सिनेमे बघितल्याचे मुली सांगू सांगल्या. पियू रोज दैनंदिनी लिहीत होती. ती वही तिने बाईंपुढे ठेवली. बाईंनी तिची वही चाळली आणि छानसे हसत, तिच्या लिहिण्याचे कौतुक करत म्हणाल्या,''हे चांगलं आहे. तू असं कर. तू हे मोठया कागदावर लिहून काढ. आपण यातलं थोडं थोडं रोज काचपेटीत लावू.''

पुस्तकाचे नाव : पियूची वही

लेखक : डॉ. संगीता बर्वे

प्रकाशन : ज्योत्स्ना प्रकाशन

मूल्य : 80 रुपये

पृष्ठसंख्या : 102

 'पियूची वही' म्हणजे पियूने आपल्या वहीत आपले अनुभव लिहिले आहेत. पियू जसजशी वाढत जाते, तसतसे वहीतले अनुभव अधिक बोलके होत जातात.

तिच्या वयाच्या वाढीशी हे अनुभव लगटले आहेत. त्यामुळे ते तिच्या वयाच्या वाढीचे साक्षी होत राहतात. पियूचे वय आणि हे अनुभव वेगळे काढता येत नाहीत.

दुपारचा सुट्टीचा वेळ पत्ते, कॅरम खेळून, सारखा टी.व्ही. पाहून कंटाळवाणा होत जातो. मग दुपारच्या वेळी कंटाळा येऊन एकटेच बसायचे, यातून काहीतरी वेगळे पियू शोधू बघते. अशा वेळी नुकतीच परीक्षेसाठी घेतलेली नवी कोरी रंगपेटी तिच्या हाती लागते. घरातल्या भल्यामोठया बेसिनला लागून एक छोटीशी खिडकी आहे. तिच्याकडे बघता बघता पियूच्या लक्षात येते की खिडकी खूप खराब झाली आहे. खिडकीच्या गजांच्या रंगाचे टवके उडाले आहेत. त्यावर चिमण्यांनी घाण केली आहे.

पियूच्या मनात येते, ही खिडकी आपण पुसून स्वच्छ करावी. नंतर तिच्या गजांना रंग द्यावा.

तिच्या बाबांनी पियूला गजाला देतात तो ऑइलपेंट घेऊन दिला. ब्रश घेऊन दिला.

बाबांनी दिलेले रंगाचे साहित्य बघून पियू हरखून गेली. तिने रंगवलेले खिडकीचे गज सुंदर दिसू लागले. पियूच्या आईबाबांनी तिच्या रंगकामाची वाहवा केली. पियूला अधिकच उत्साह आला. तिने अंजूमावशीच्या बागेतून मनीप्लँटची सुंदर वेल एका लहानशा कुंडीतून आणून खिडकीत ठेवली. मनीप्लँटची हिरवीगार चकचकणारी सुंदर वेल खिडकीतून आत येऊन डुलू लागली, ते पाहून पियूला आणखी काय काय नवीन करावेसे वाटू लागले. मग त्या सुट्टीत पियू दैनंदिनी लिहू लागली.

शाळा सुरू झाल्या दिवशी सुट्टीत काय काय केले ते बाई एकेका मुलीला विचारू लागल्या. पत्ते खेळल्याचे, सिनेमे बघितल्याचे मुली सांगू सांगल्या. पियू रोज दैनंदिनी लिहीत होती. ती वही तिने बाईंपुढे ठेवली. बाईंनी तिची वही चाळली आणि छानसे हसत, तिच्या लिहिण्याचे कौतुक करत म्हणाल्या,

''हे चांगलं आहे. तू असं कर. तू हे मोठया कागदावर लिहून काढ. आपण यातलं थोडं थोडं रोज काचपेटीत लावू.''

इतके काही चांगले होईल असे पियूला वाटलेच नव्हते.

आख्खी शाळा पियूने लिहिलेली रोजनिशी वाचू लागली. तिचे शिक्षकही वाचू लागले. मग काय, आपल्या हुशारीचे वारे कानात शिरलेल्या पियूच्या वर्गातील मुली आपणहून पियूला भाव देऊ लागल्या. पियू शाळेची 'हिरो'च होऊन गेली.

सुप्रसिध्द कवयित्री, लेखिका डॉ. संगीता बर्वे यांनी हे सुंदर पुस्तक लिहिले आहे. त्यांनी मुलांसाठी खूप काही छान छान लिहिले आहे. 'पियूची वही' वाचून आपणही अशी दैनंदिनी लिहावी असे तुम्हाला वाटेल आणि या पुस्तकात काढलेली रेखाटनेही तुम्हाला जीव लावतील.

आपल्या भोवती पसरलेले जग हळूहळू ओळखीचे करून घेणाऱ्या पियूची ही दैनंदिनी विलक्षण आनंददायी आहे.

पहिल्या पानापासून शेवटच्या पानापर्यंत ओढ लावणारे मराठीतील हे दुर्मीळ लेखन सर्वांनी आवर्जून वाचावे असे आहे.

श्रीनिवास कुलकर्णी 

9890918438