दीक्षा शुभ आणि पवित्रतेचे संकेत

 विवेक मराठी  14-May-2018

 ***धमेंद्र पाण्डेय***

प्रसिध्द सेवाभावी संस्था 'समस्त महाजन'चे व्यवस्थापक गिरिशभाई शाह यांचे पुतणे 24 वर्षीय 'मोक्षेस' यांनी अलीकडेच जैन मुनीची दीक्षा घेतली. सनदी लेखापाल (सी.ए.) ते जैन मुनी होण्यापर्यंतच्या प्रवासासंदर्भात मोक्षेस यांच्याशी झालेला संवाद

आपल्या कौटुंबिक पार्श्वभूमीबद्दल - कुटुंबातल्या वातावरणाबद्दल काय सांगाल?

धर्माचे आणि सेवेचे संस्कार आमच्यावर कुटुंबातूनच झाले. भुकेल्याला अन्नदान करणे, कुणाला रित्या हाती न पाठविणे ही शिकवण होती. कुणाला व्यवसाय करण्याची इच्छा असेल तर त्याला प्रशिक्षित करून आर्थिक मदत करून स्वतःच्या पायावर उभे राहण्यास सक्षम केल्याची अनेक उदाहरणे लहानपणापासून पाहिली आहेत. कुटुंबातले वातावरण धार्मिक आहे. अनेक धर्मगुरूंच्या सान्निध्यात आम्ही राहिलो आहोत, त्यामुळे एक प्रकारची प्रेरणा आणि ऊर्जा प्राप्त होते. परंतु आमच्या कुटुंबातल्या कोणी आजवर दीक्षा घेतली नव्हती.

जैन मुनी बनण्याची प्रेरणा आपल्याला कशी मिळाली?

सी.ए. होईपर्यंत मला दीक्षा घेण्याबाबत मनाची पूर्ण तयारी होत नव्हती. दीक्षा घेणे हे एक पवित्र कार्य आहे हे मला कळत होते. कारण असे जीवन जगताना अगदी मुंगीसारख्या जिवाचाही विचार केला जातो.  सी.ए. झाल्यानंतर दीक्षा घेण्याचा विचार प्रबळ झाला. मी काही काळ व्यवसायातही लक्ष घातले. मात्र गेल्या सहा महिन्यांपासून पूर्णपणे अध्यात्माच्या मार्गावरून वाटचाल सुरू आहे.

जैन मुनी बनण्याआधीची प्रक्रिया काय असते?

आमच्या धर्मात 47 दिवसांचे एक व्रत असते. कोणीही सर्वसामान्य त्या व्रताचे पालन करू शकतो. या काळात जैन साधूंप्रमाणे राहावे लागते. याला 'उपधान' असे म्हणतात. या काळात आंघोळ करायची नाही, गाडीचा वापर करायचा नाही, मोबाइल वापरायचा नसतो. गृहस्थाश्रमी आयुष्यात फक्त एकदाच अशी साधना करू शकतो. ही 47 दिवसांची साधना केल्यानंतर मी अशा प्रकारचे आयुष्य जगू शकतो, हा विश्वास निर्माण झाला.

 प्रत्यक्ष दीक्षा घेण्याआधीच्या सहा महिन्यांच्या प्रशिक्षणात कशा प्रकारची दिनचर्या असते?

 आपण ज्या सांसारिक जाळयात गुरफटलो आहोत, त्यातून मुक्त होण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न या काळात केला जातो.  ध्यानधारणेत जास्तीत जास्त वेळ घालविणे, पूर्णपणे आध्यात्मिक गोष्टी शिकणे, गुरूंची सेवा करणे असा दिनक्रम असतो. या काळात गुरू जे सांगतात ते जास्तीत जास्त आत्मसात करणे, उच्च स्वरात न बोलणे, समोरच्याचे म्हणणे पूर्ण ऐकणे, आपला अहंकार कमी करणे अशा गोष्टींची जास्तीत जास्त सवय अंगी बाणवायची असते.

कोणत्या जैन मुनींचा आपल्यावर प्रभाव आहे?

माझे गुरू प्रेमविजय महाराज यांचा सर्वात जास्त प्रभाव आहे. त्यांच्यामुळे मी दीक्षा घेण्यास प्रवृत्त झालो. त्यांनी वयाच्या 19व्या वर्षी दीक्षा घेतली. दीक्षा घेऊन आता त्यांना 18 वर्षे झाली आहेत. गेली तीन वर्षे मी त्यांच्या संपर्कात आहे. त्यांच्यासोबत राहिलो तर माझ्यातील सर्व दोषांचा, अहंकाराचा नाश होईल आणि माझ्या आध्यात्मिक प्रगतीचा मार्ग सुकर होईल. त्यांच्याबरोबर राहण्याची इच्छा मी प्रकट केली.

जैन मुनींमध्ये 'निर्ग्रंथ' शब्दप्रयोग असतो, त्याचा अर्थ काय आहे?

'नि' म्हणजे 'नाही' आणि 'ग्रंथि' म्हणजे 'गाठ' होय. कोणत्याही प्रकारच्या बंधनात अडकून राहायचे नाही. घराचे बंधन, नावाचे बंधन, कुटुंबाचे बंधन याचा अर्थ गृहस्थाश्रमातील बंधनातून मुक्त होणे होय. बंधनातून मुक्त व्यक्ती म्हणजे निर्ग्रंथी होय.

जैन मुनी झाल्यावर कुटुंबाशी कशा प्रकारचा संबंध राहतो?

या संबंधांवर अर्थातच मर्यादा येतात. अन्नदानासाठी जसे आपण अन्य घरी जातो, तसेच आपल्या घरीही जाऊ शकतो, परंतु घरात बसून जेवू शकत नाही. दीक्षाग्रहणानंतर कोणत्याही महिलेला - आपल्या आईलादेखील स्पर्श करू शकत नाही. एकंदर कुटुंबापासूनच अलिप्त राहावे लागते.

या प्रवासामुळे मानसिक बदल झाला आहे का?

या प्रवासाने मला आत्मिक शांतीची जाणीव झाली. आज मी कुठल्याही परिस्थितीचा स्वीकार करू शकतो. परिस्थिती कुठलीही असो, त्या वेळेस मनाचे संतुलन राखणे हा मानवधर्म आहे. कुठल्याही परिस्थितीकडे आपण कोणत्या नजरेने बघतो यावर सर्व काही अवलंबून असते.

आपण भविष्यात समाजासाठी कुठल्या प्रकारचे कार्य करू इच्छिता?

मला शैक्षणिक क्षेत्रात योगदान देण्याची इच्छा आहे. आपल्या विद्यमान शिक्षणपध्दतीत कुठेही आत्मिक उन्नती करणाऱ्या आध्यात्मिक विषयाचा अंतर्भाव नाही. केवळ पुस्तकी शिक्षणापेक्षा माणसाच्या जीवनाचा दर्जा सुधारणारे शिक्षण देणारी शिक्षणपध्दती विकसित करण्याचा विचार आहे.    

9067313820