स्वरगंगेच्या काठावर अरुणास्त

 विवेक मराठी  15-May-2018

 ***मिलिंद रथकंठीवार***  

 गीत - मग ते प्रणयगीत असो, विरहगीत असो  भावगीत असो, किंवा एखादी तात्त्वि सात्त्वि रचना असो.. अरुण दातेंचा हळुवार स्वर कवीच्या शब्दांना अर्थसामर्थ्य प्रदान करतो आणि ती शब्दरचना एका आगळयावेगळया उंचीवर
जाते, काळजाला भिडते, मनाचा ठाव घेणारी ठरते. अरुण दातेंच्या गायकीचा प्रवास खूप मोठा नसला, तरीही दर्जेदार असाच होता.

 भूतलावरचा एक स्वर्गीय स्वर नुकताच स्वरगंगेच्या काठावर निमाला, स्वर्गस्थ झाला. भूलोकातील रसिकांना रिझवून इंद्रनगरीत रुजू झाला. अरुण दाते... नुकताच 4 मे रोजी त्यांचा 83वा वाढदिवस साजरा झाला आणि 8 मेला त्यांचे हे महाप्रयाण रसिकांना चटका देऊन जाणारे ठरले.

प्रसन्नचित्त आणि सभ्य असे व्यक्तिमत्त्व लाभलेल्या अरुणचे खरे नाव अरविंद होते. जवळचे सर्व मित्र, नातेवाईक त्यांना प्रेमाने अरू म्हणत. इंदोरस्थित कलारसिक रामूभय्या दातेंचे ते सुपुत्र. गजल गायन त्यांना विशेष आवडत असे. कुमार गंधर्वांनी त्यांच्या गुणगुणण्यातील स्वरकौशल्य हेरले आणि बेहद्द खूश होऊन बेहजाद लखनवीची 'सर्ब सजदा कैफियत है, सोज है और साज है' ही गझल, गायकीच्या विशिष्ट तंत्रासह अन मर्मासह त्यांना शिकविली. ते तंत्र सहज आत्मसात करत अरुण दाते यांनी खऱ्या अर्थाने गायकीच्या विस्तीर्ण दालनात पदार्पण केले. वडिलांनी तत्कालीन शास्त्रीय गायक, गझल गायक के. महावीर यांच्याकडे पुढील शिक्षण घेण्यास सांगितले.

पु.ल. देशपांडे ह्यांनी अरुण दाते यांच्या गायकीवर पसंतीची मोहोर उठविलेली होती. संगीतकार श्रीनिवास खळे यांनी एक भावगीत गाऊन घेण्यासाठी दोन-तीनदा संपर्क केला. परंतु, हिंदी भाषिक संस्कार झालेले असल्याने मराठी शब्दोच्चाराला आपण योग्य तो न्याय देऊ  शकू का? अशा संभ्रमात अरुण दाते होते. त्या समजाला छेद देत श्रीनिवास खळे यांनी 'शुक्रतारा मंद वारा' हे अजरामर गीत त्यांच्याकडून गाऊन घेतले आणि पुढे एक इतिहास घडला. हे मराठीतील पहिले युगल भावगीत ठरले. गायकीच्या क्षेत्रात एक नवीन तारा उदयास आला.

वस्तुत: टेक्स्टाइल इंजीनियरिंगची पदवी संपादन करून नोकरी करणाऱ्या अरुण दातेंचा गायनाच्या क्षेत्रात प्रवेश थोडा उशिराच झाला, परंतु अल्पावधीतच त्यांच्या मृदुल स्वरांनी रसिकांची कर्णेंद्रिये तृप्त केली.

'शुक्रतारा मंद वारा' ह्या गीतात, 'तू अशी जवळी रहा' गाताना एक संवेदनशील प्रणयोत्सुक तरुण त्यांनी रसिकांपुढे पेश केला. 'संधिकाली या अशा, धुंदल्या दिशा दिशा' ह्या प्रणयगीतात, लतादीदींसमवेत गात, प्रणयप्रधान प्रियकराच्या भावना समूर्त केल्या.  'स्वरगंगेच्या काठावरती वचन दिले तू मला..' ह्या गीतात प्रेयसीला  गतजन्मीच्या ऋणानुबंधाचे स्मरण करून देणारा एक आर्त स्वर अनुभवायला मिळाला. 'डोळयात सांजवेळी, आणू नकोस पाणी..' या गीतात प्रियकराची एक असफल आर्त भावना व्यक्त केली. 'जपून चाल, पोरी जपून चाल' किंवा 'दिवस तुझे हे फुलायचे' ह्या गीतात मिश्कील भाव, निरागस भाव रसिकांना जाणवतो. 'थांब गडे जराशी..' ही ओळ गाताना प्रियकराची विनंती, आर्जवे सर्वार्थाने जाणवतात.

'भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी..' हे विरह शोकगीत रसिकांना एका वेगळयाच दुनियेत घेऊन जाते. त्यांचा आर्त, विरह स्वर रसिकांना गुणगुणण्यास भाग पाडतो.

'भेट तुझी माझी स्मरते' ह्या गीतात त्या प्रियकराची ती भेट.. मिटल्या डोळयांपुढे उभी राहते. 'स्वरगंगेच्या काठावरती' ऐकताना 'वचन दिले तू मला..' ह्या ओळीत 'मला' हा शब्दोच्चार रसिकांच्या मनाचा ठाव घेतो. 'अखेरचे येतील माझ्या हेच शब्द ओठी' ह्या गीतात अक्षरश: अपराधी भाव, कबुली भाव, प्रांजळपणा एकवटलेला आढळतो. 'दिल्या घेतल्या वचनांची शपथ तुला आहे..' ह्या गीतातून प्रेयसीला घेतलेल्या आणाभाकांचे स्मरण करून देणारा ठाशीव स्वर जाणवतो.

गीत - मग ते प्रणयगीत असो, विरहगीत असो  भावगीत असो, किंवा 'ह्या जन्मावर ह्या जगण्यावर शतदा प्रेम करावे', 'असेन मी नसेन मी' यासारखी तात्त्वि सात्त्वि रचना असो.. अरुण दातेंचा हळुवार स्वर कवीच्या शब्दांना अर्थसामर्थ्य प्रदान करतो आणि ती शब्दरचना एका आगळयावेगळया उंचीवर जाते, काळजाला भिडते, मनाचा ठाव घेणारी ठरते. अरुण दातेंचा हा गायकीचा प्रवास खूप मोठा नसला, तरीही दर्जेदार असाच होता. त्यांनी सर्वसाधारणपणे 120 रचना सादर केल्या आहेत, त्यापैकी साधारणपणे 20 ते 25 ह्या गझल स्वरूपातील रचना होत्या. मंगेश पाडगावकर, यशवंत देव आणि श्रीनिवास खळे काकांच्या सर्वाधिक रचना सादर करण्याचा त्यांना मान जातो. मराठी भावगीतांच्या प्रवासाच्या दरम्यान त्यांनी साकिया नावाचा गझलांचा एक अल्बमदेखील प्रसारित केला होता. 'शुक्रतारा' या शीर्षकाअंतर्गत देश-विदेशात त्यांनी सुमारे 2600हून अधिक कार्यक्रम सादर करून एक अनोखा विक्रमच केला.

देखणे प्रभावी उमदे व्यक्तिमत्त्व लाभलेल्या अरुण दातेंचा साहित्यविषयक अभ्यासदेखील वाखाणण्याजोगा असाच होता. जीवनातील चढउतार, यशापयश, कौटुंबिक समस्या ह्या सर्वांचा ऊहापोह त्यांनी 'शतदा प्रेम करावे' या त्यांच्या आत्मचरित्रात केला. या आत्मचरित्राला पु.ल. देशपांडेंची प्रस्तावना लाभली. याच चरित्राची सुधारित आवृत्ती, 'शुक्रतारा' नावाने पुन:प्रकाशित झाली. एक लेखक म्हणून प्रकटताना त्याचे साहित्यिक पैलू, शब्दसंपदा, प्रांजळपणा, व्यक्त होण्याची सहजता वाचकाला संमोहित आणि अचंबित करते आणि त्यांच्या उंच व्यक्तिमत्त्वाला अधिक मौलिक उंची प्रदान करते.

त्यांच्या या असामान्य सांगीतिक योगदानाबद्दल त्यांना अमेरिकेतील तुसां सिटीतर्फे मानद नागरिकत्व मिळाले. महाराष्ट्र पत्रकार संघाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार, पहिला गजानन वाटवे पुरस्कार प्रदान करण्यात आलेला होता. पहिला महेंद्र कपूर पुरस्कार प्रदान होताना 'मराठीतील महेंद्र कपूर' असेच त्यांच्या गायकीचे वर्णन करण्यात आले.

शरद क्रीडा आणि सांस्कृतिक प्रतिष्ठानतर्फे मानाचा अन मोलाचा राम कदम कला गौरव पुरस्कार पुणे येथे प्रदान होत असताना त्यांची भेट घेण्याचा दुर्मीळ योग मला आला. मला भावलेल्या अशा या आगळयावेगळया गायकाच्या मी रेखाटलेल्या रेखाचित्रावर त्यांना भेटून त्यांची स्वाक्षरी मिळवावी या हेतूने बालगंधर्व रंगमंदिरात मी त्याचे चिरंजीव अतुल दाते आणि मानसकन्या सुप्रिया वाईकर यांच्यामार्फत गेलो. एवढया उंचीची व्यक्ती किती जमिनीवर असू शकते याचाच प्रत्यय मला क्षणातच आला. त्यांना जेव्हा मी माझी 'त्या फुलांच्या गंधकोषी' ही कादंबरी अभिप्रायार्थ दिली, तेव्हा त्यांनी बघताक्षणी शीर्षक आवडल्याचे सांगितले आणि विषय जाणून घेण्याची उत्सुकता दर्शविली. थोडक्यात आशय सांगताच त्यांनी तो आवडल्याचे दर्शविले. खरे तर त्यांची प्रकृती बरी नव्हती. त्यांना बोलताना त्रास होत होता. पण तरीही त्यांचे संवेदनशील मन जागृत होते. मी रेखाटलेले त्यांचे रेखाचित्र मी त्यांना दाखविले. त्यांच्या डोळयात अश्रू तरळले. ''तुम्ही काय काय करता?'' असे मिश्कीलपणे विचारले आणि ''हा माझा आणखी एक गौरव आहे''  असे म्हणत थरथरत्या हाताने शेकडो चाहत्यांच्या साक्षीने त्यांनी स्वाक्षरी केली. त्या चित्रावरची त्यांची स्वाक्षरी माझ्या हृदयावर अमीट अंकित झालेली होती. आज त्यांच्या त्या स्वाक्षरीने पुनित झालेल्या रेखाचित्राद्वारे अरुण दाते जणू मला जीवनाचा मथितार्थ सांगताहेत..

असेन मी नसेन मी, तरी असेल गीत हे

फुलाफुलातून येथल्या उद्या हसेल गीत हे..

आज या लेखाद्वारे अरुण दाते या व्यक्तिमत्त्वाला, त्याच्यातील गायकीला, त्याच्यातील लेखकाला, श्रध्दांजली अर्पण करताना एक आदरभाव दाटून येत आहे.

& 9850438575

[email protected]