जुन्या कार्यकर्त्यांचा विचार व्हावा

 विवेक मराठी  15-May-2018

 

 ***ऍड. पद्माकर आसरकर***

सा. विवेकच्या 8 एप्रिल 2018 या अंकात प्रकाशित झालेल्या 'व्यक्ती वाईट, पण पक्ष चांगला' या ऍड. रोहित सर्वज्ञ यांच्या लेखामध्ये त्या विषयावर व्यक्त होण्याचे आवाहन केले होते. त्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून आलेला हा लेख.

'व्यक्ती वाईट, पण पक्ष चांगला' या विषयाला साद घालत असताना, 6 एप्रिल 1980च्या भाजपाच्या स्थापना दिनानिमित्त महारॅलीसंबधी ज्या सभा घेण्यात आल्या, त्यात 'भाजपाची स्थापना का झाली?' हा विषय कोणीच मांडला नाही. किंवा जो मांडला तो अधुरा. असे सांगण्याचे कारण की, मांडणारे जे खासदार, आमदार होते, ते सर्व 2000 सालानंतर भाजपामध्ये आलेले होते व ऐकणारेसुध्दा सर्व नवीन होते. या लोकांना माहीत नव्हते की भाजपा या पक्षाची विचारधारा आहे, जी अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवानी, मुरली मनोहर जोशी, वसंतराव भागवत, रामभाऊ म्हाळगी या सर्व मान्यवरांनी जोपासली आहे. कधीही तत्त्वांशी तडजोड केली नाही. सध्या मंत्र व तंत्र यात तफावत आहे. त्यामुळे जुन्या लोकांना काळजी वाटत आहे. त्यांना वाटते की नवीन लोकांना आपण पचवू शकू किंवा नाही. जुने लोक निष्ठावान आहेत. त्यांच्यासमोर अनेक आदर्श आहेत. नवीन लोकांना वाटते की, राजकारण हा एक धंदा आहे व त्यातून फक्त पैसेच मिळवावयाचे असतात. आणि राजकारणात असे लोक लवकरच एकत्रित येतात व राजकारणाचा ताबा घेतात व पुढे जाऊन पैशाच्या जोरावर पक्षाचा ताबा घेतात. आपल्या मार्गातील एक एक काटा बाजूला करत थेट वरपर्यंत जाऊन पोहोचतात.

आपणासमोर काँग्रेसचे उदाहरण आहे. (थोडा वेळ पक्ष बाजूला ठेवून) त्यात सुरुवातीला सर्व ध्येयनिष्ठ, त्यागी लोक होते. परंतु पुढे जाऊन श्रीमंत व भ्रष्ट लोकांनी त्या पक्षाचा ताबा घेतला. पक्षाला आपल्या म्हणण्याप्रमाणे नाचविले. त्यामुळे काँग्रेसची आज ही स्थिती आहे. लोकांचा त्या पक्षावरील विश्वास पार उडाला आहे. पुढाऱ्यांचा व कार्यकर्त्यांचा एकमेकावर विश्वास राहिला नाही. पक्षात पैसा मिळत नाही, तर पक्षाचे काम तरी का करावयाचे? असा विचार कार्यकर्ते करू लागले आहेत.

इतिहासाचा आम्ही विचार केला नाही, तर तोच इतिहास पुन्हा घडू शकतो याची चिंता जुन्या पिढीला आहे. भाजपा जगातील सर्व लोकांचे आशास्थान आहे आणि भाजपावरील विश्वास उडाला तर परिस्थिती हाताबाहेर जाईल. भाजपाला आज जे यश मिळाले आहे, त्याला एकमेव कारण म्हणजे भाजपाचे वरिष्ठ व तळागाळाचे कार्यकर्ते यांच्यावर लोकांचा असलेला प्रचंड विश्वास.

 'व्यक्ती वाईट, पण पक्ष चांगला' याचे जे विश्लेषण आपण केले, ते कार्यकर्त्यांना व लोकांना समजावून सांगण्यासाठी मार्गदर्शक आहे. परंतु त्यातून काही निष्पन्न निघेल असे वाटत नाही. तो एक 'प्रयोग' न ठरावा.

प्रल्हादजी अभ्यंकर यांनी हा विचार मांडल्याचे सांगण्यात आले. त्यांना मीही मानतो. पण तेव्हा सत्ता हातात नव्हती. आता लोक स्वार्थी झाले आहेत. सुशिक्षित व श्रीमंत लोक अधिक भ्रष्टाचारी झाले आहेत. म्हणूनच आज प्रल्हादजी असते तर काय म्हणाले असते?

या लेखात 'वाल्याचा वाल्मिकी' होईल असे म्हटले. पण आता जुन्या पिढीला भीती आहे की, 'वाल्मिकीच वाल्या' न बनून जावो.

पूर्वी कार्यकर्ता व नेता यांच्यात हातभरच अंतर होते. त्यामुळे असे विषय कधीच समोर आले नाहीत. पण आज नेता व कार्यकर्ता यांच्यात जमीनअस्मानचे अंतर आहे. निष्ठावान कार्यकर्त्याला नेते लोक भेटतही नाही. जुन्या लोकांची कामे होत नाहीत. पण पैशाच्या भरवशावर नवीन कार्यकर्ता ते काम करून आणतो. त्यामुळे जुन्या कार्यकर्त्याचे समाजातील स्थानही कमी होत आहे. जुन्या कार्यकर्त्याला हे दुःख आहे. त्याचा विचार व्हावा.

9834034283