अरुणाचलमध्ये पहिली संघपताका फडकवणारे शंतनू रघुनाथ शेंडे

 विवेक मराठी  15-May-2018

***सुरेश साठे***

50 वर्षांपूर्वी आपल्या ईशान्येकडील राज्यांमध्ये जाणे अतिशय धोक्याचे होते. आसाम वगळता अन्य छोटया राज्यांमध्ये नुकतेच संघकार्य सुरू झाले होते. शंतनू  रघुनाथ शेंडे हे त्या पहिल्या फळीतील कार्यकर्ते होते. त्यांचे वयाच्या 83व्या वर्षी नुकतेच निधन झाले. त्यांच्याविषयी...

1970च्या दशकात स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त मुंबईतील कार्यक्रमाच्या वेळी हशूजी अडवाणी यांच्या चेंबूर येथील शिक्षण संस्थेत शंतनू  शेंडे यांनी एकनाथजी रानडे यांची भेट घेतली. विवेकानंद केंद्रात पूर्णवेळ काम करण्याची इच्छा व्यक्त केली. एकनाथजींनी त्याचे स्वागत करत, तत्काळ अरुणाचल येथे त्यांच्यासमवेत जाण्याचा कार्यक्रम निश्चित केला. देशातील संघ शिक्षा वर्ग संपल्यावर एकनाथजींनी 8 दिवस वेळ काढून आसाम, मेघालय, अरुणाचलचा प्रवास केला. समवेत शंतनू  शेंडे होते. तीन वर्षांपूवी विद्यार्थी परिषदेच्या सील प्रकल्पांतर्गत त्यांनी या भागात प्रवास केला होता. अरुणाचल येथे प्रारंभी पासिघाट आणि ऍलाँग येथे ते गेले. तेव्हा शर्माजी या भागाचे डेप्यु. कमिशनर होते. ते उत्तर प्रदेशातील होते. त्याचा संघाशी थोडाफार संबंध आला होता. एकनाथजींना ते ओळखत होते. त्यांनी या भागात विवेकानंद केंद्र सुरू करण्यासाठी मदत करण्याचे मान्य केले. शंतनू  त्यांच्याकडे पासिघाटला काही दिवस राहिले आणि ऍलाँग येथे मार्गस्थ झाले.

अ.भा. विद्यार्थी परिषदेचे मुंबईत कार्यालय प्रमुख म्हणून कार्य करणारा प्रामाणिक कार्यकर्ता आता भारताच्या ईशान्य राज्यांतील एका भागात जाण्यास तयार झाला. तेव्हा या भागाला 'नेफा' (नॉर्थ ईस्ट फ्राँटियर एरिया) म्हणून संबोधले जायचे. या अतिशय दुर्गम, डोंगराळ, दाट जंगलाच्या व विषम हवामानाच्या भागात बोली भाषा, राहणी, अतिशय विरळ वस्तीतील वनवासी कुटुंबीयांचा निवास हे सर्व काही नवीन होते. शंतनू  यांचे बालपण व शिक्षण कल्याणला झाले. लहान असल्यापासून संघात जाणे झाले. अगदी गटनायकापासून ते गणशिक्षकापर्यंत पडेल ते काम त्यांनी केले. कुशाग्र बुध्दीच्या शंतनूंनी मुंबईत रुईया, सिध्दार्थ महाविद्यालयांतून अर्थशास्त्र व पॉलिटिक्स या विषयांमध्ये दुहेरी एम.ए. केले होते, तेही रेल्वेतली नोकरी सांभाळून.

मी त्या वेळी दोन वर्षे परिषदेचा मुंबईचा सचिव होतो, त्यामुळे शंतनू सह काम करण्याची संधी मिळाली. तेव्हा शंतनू ने मुंंबईतील धकाधकीच्या अगदी व्यग्र जीवनाला विराम देऊन अरुणाचलच्या पहाडी-जंगल प्रदेशात जाणे हे केवढे मोठे धाडस होते. या ईशान्येकडील राज्यांमध्ये (तेव्हा हे सर्व प्रदेश आसाम राज्याला जोडलेले होते) मणिपूर (तेथे भास्कर कुलकर्णी- ठाण्याचे स्वयंसेवक), तसेच खासी जयंती हिल्स (आताच्या मेघालय) भागात नागपूरहून गेलेले 2-3 कार्यकर्ते प्रचारक होते. या व्यतिरिक्त अन्यत्र आसाम सोडून संघाचे कार्यकर्ते, प्रचारक नव्हते. अरुणाचलला राज्याबाहेरून परिवाराचे काम करण्यासाठी पहिली व्यक्ती गेली ती शंतनू च्या रूपाने, असे म्हणावे लागेल. ऍलाँग येथे विवेकानंद केंद्राचे काम सुरू करून विद्यार्थी वसतिगृह सुरू केले. तसेच संस्कारवर्गांचा प्रारंभ करून तेथील पालकांना एकत्रित करण्याचे महत्त्वाचे, अतिअवघड असे कार्य शंतनू ने हाती घेतले. हिंदी भाषा होती, पण अगदी मोजक्याच माणसांना समजत असे. त्यामुळे भाषेचीही अडचण असायची. अशा वातावरणात ते तब्बल 8 वर्षे राहिले. या कालावधीत सुमारे 400 विद्यार्थी त्यांच्या वसतिगृहातून शिकून बाहेर पडले. आज त्यातील काही जण शासकीय पदावर आहेत, तर काही अन्य क्षेत्रांत पुढाकार घेऊन काम करीत आहेत. त्यात भाजपाचे 6 आमदारही होते.

1980मध्ये भाऊराव देवरस यांनी कानपूर येथे विद्याभारती अंतर्गत सरस्वती शिशु मंदिराचे व्यवस्थापक म्हणून शंतनूंची नियुक्ती केली. त्या वेळी उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेशचा काही भाग यामध्ये संघपरिवाराने चालविलेल्या 400च्या वर शाळा व 60 महाविद्यालये होती. या सर्वांचा समन्वय व एकूण व्यवस्थापन करण्याच्या दृष्टीने रज्जूभैय्याजी यांच्या मार्गदर्शनाने (या वेळी ते उत्तर प्रदेशचे प्रांत प्रचारक होते) शंतनू ने कार्य सुरू केले. पुढे 12 वषर्े हे काम सांभाळल्यानंतर दिल्लीतील परिवाराच्या शैक्षणिक क्षेत्राशी संबंधित असलेल्या सरस्वती विद्या निकेतनच्या मध्यवर्ती कार्यालयात विद्याभारतीच्या संपूर्ण कामाच्या सुसूत्रीकरणाचे दायित्व त्यांच्यावर आले. कार्यवाह म्हणूनही काही वर्षे त्यांनी काम पाहिले. नानाजी देशमुख यांच्या दीनदयाळ शोध संस्थानासाठी दिल्लीत राहून चित्रकूट प्रकल्पाच्या शैक्षणिक उपक्रमांच्या व्यवस्थापनाचे काम पाहिले.

अत्यंत साधी राहणी असलेल्या, मृदू स्वभावाच्या शंतनू  यांचा 22 एप्रिल 2018 रोजी हृदयविकाराने मृत्यू झाला. विस्ताराची - विशेषतः ईशान्येकडील राज्यांच्या जडणघडणीत अतिशय महत्त्वाची जबाबदारी समर्थपणे पार पाडणारे शंतनू  रघुनाथ शेंडे हे सर्वार्थाने एक आदर्श व्यक्तिमत्त्व आपल्यातून कायमचे गेल्याची, त्यांना श्रध्दांजली वाहताना श्रीपाद उर्फ आबासाहेब पटवारी यांनी व्यक्त केलेली भावना प्रातिनिधिक होती.    

9822823653