संवादाचा संदेश देणारे संघ निमंत्रण

 विवेक मराठी  01-Jun-2018

रा. स्व. संघाच्या तृतीय वर्ष संघशिक्षा वर्गाच्या समारोप कार्यक्रमात माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जीप्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार ही बातमी अनेकांना मानसिक आणि वैचारिक धक्का देणारी ठरली. सात जून रोजी नागपूर येथील संघ मुख्यालयात देशभरातून आलेल्या सातशे स्वंयसेवकांसमोर प्रणवदा आपले मनोगत व्यक्त करणार आहेत. त्यानंतर पूजनीय सरसंघचालक मोहनजी भागवत या वर्गाचा समारोप करतील. साधारण अशाच पध्दतीने नागपूरात संघशिक्षा वर्गाचा समारोप होत असतो. या समारोप सोहळयाला आधी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहिले आहेत. त्याची जंत्री या ठिकाणी देण्याची आवश्यकता नाही. पण जेव्हा प्रणवदा नागपूरला जाणार ही बातमी प्रकाशित झाली तेव्हापासूनच या विषयावर दोन्ही बाजूंनी जोरकस चर्चा चालू झाली आहे. त्यातही काँग्रेसचे लोक प्रणवदांना जो सल्ला देत आहेत तो वाचला, ऐकला की खूप मनोरंजन होत असते. या मंडळीना संघ अजूनही समजला नाही किंवा त्यांनी संघ समजून घेण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्नच केला नाही, असे म्हणायला वाव राहतो.

प्रणवदा संघाच्या कार्यक्रमाला जातात म्हटल्यावर काँग्रेसची मोठीच अडचण झाली. धरले तर चावते आणि सोडले तर पळते अशी त्या पक्षाची स्थिती झाली आहे. खरं तर प्रणवदांचा 2012 पासून काँग्रेसशी काडीचाही संबंध राहिला नाही. राष्ट्रपती पदावरून मुक्त झाल्यावर प्रणवदा सर्वसामान्य भारतीय म्हणून जीवन जगत आहेत आणि ते कोणत्याही विचारधारेच्या कार्यक्रमात जाण्यास स्वतंत्र आहेत. हे प्रणवदांनी संघाचे निमंत्रण स्वीकारून सिध्द केले आहे. कोणतीही विचारधारा किंवा संघटना अस्पृश्य न मानता ती समजून घेतली पाहिजे, अशा प्रकारचा संदेशच प्रणवदांनी संघाला अस्पृश्य मानणाऱ्या संस्था, संघटना, पक्ष आणि व्यक्तींना दिला आहे. कोणताही विचार, संघटना ही स्थितीवादी नसते तर ती नित्यनूतन बदलत असते. गाभ्याचा विषय सोडता तर त्या संघटनेत असंख्य परिवर्तने झालेली असतात. संघाचा गाभ्याचा विषय हा हिंदू समाजाचे सक्षम संघटन हा आहे, आणि पुढील काळातही तोच विषय राहिल. संघाचे विरोधक संघातील परिवर्तने समजून न घेता विरोध करत रहातात, तर संघ विरोधकांच्या टीकेला उत्तर देण्याच्या भानगडीत पडत नाही. संघ हिंदू समाजात संघटन कार्य करतो. असे असले तरी राजकीय क्षेत्रातील काँग्रेस पक्षाच्या सर्वोच्च नेत्याने संघ चिरडून टाकण्याची अंहकारी घोषणा केली होती. आणि तोच दर्प आजही काँग्रेस आणि तथाकथित पुरोगाम्यांमध्ये भरून राहिल्यामुळे प्रणवदा संघाच्या व्यासपीठावर जातात म्हटल्यावर त्यांना विरोधाची उबळ येणे स्वाभाविक होते. पण अडचण अशी की ही उबळ शमवायची कशी? कारण प्रणवदांवर थेट टीका करता येत नाही आणि संघ म्हणतो आम्ही सर्वांचे स्वागत करतो. प्रणवदांना आम्ही निमंत्रण दिले, त्यांनी ते स्वीकारले. यातच काँग्रेस आणि तथाकथित पुरोगामी यांची अडचण झाली. आता ते प्रणवदांनी काय बोलावे, संघाविषयी कोणते चित्र उभे करावे याचे सल्ले देत आहेत. खरं तर प्रणवदा संघाच्या व्यासपीठावर जाणार या विषयावर चर्चा करण्यापेक्षा सात जून रोजी ते बोलतील त्यानंतर चर्चा व्हायला हवी. पण तेवढा धीर संघ विरोधक आणि प्रसारमाध्यमांना धरता आला नाही. संघावर हुकुमशाहीचा आरोप करणारेच प्रणवदांवर अप्रत्यक्षपणे दबाव आणून आपणच खरे हुकुमशहा आहोत हे दाखवून देत होते. मात्र आपला विरोध व्यक्त करण्यासाठी ही मंडळी साठच्या दशकातील संघनेतृत्वाने मांडलेल्या विचाराचा विपरित अर्थ काढण्याचा पराक्रम करत आहेत. श्री गुरुजीनी जे म्हटले नाही तेही या निमित्ताने मोठया आवाजात मांडले जात आहे आणि संघाला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू आहे.

संघाच्या तृतीय संघ शिक्षा वर्गाला माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी जात आहेत. ही एक महत्त्वाची घटना याच्यासाठी आहे की या निमित्ताने संवादाचा सेतू बंधण्याचे काम पुन्हा नव्याने सुरू झाले आहे. नेहरू वगळता लालबहादूर शास्त्री, इंदिरा गांधी, नरसिंहराव या माजी  पंतप्रधानांनी वेगवेगळया माध्यमातून संघाशी संवाद ठेवला होता, पण नरसिंह रावांनंतर हा संवाद बंद झाला. सोनिया गांधी काँग्रेसच्या अध्यक्ष झाल्यापासून तर संघ हा आतंकवादी आहे अशी घोषणाच केली गेली. पक्षाध्यक्षच विरोधात असल्यामुळे बाकीच्या मंडळींची संघाशी संवाद करण्याची प्राज्ञा नव्हती. एका अर्थाने संघ आणि अन्य पक्ष, संघटना यांच्या दरम्यान संवादाबाबत कोंडी झालेली होती. पण प्रणवदांनी ती कोंडी फोडली आहे. आता भविष्यात प्रणवदांनी चोखाळलेल्या पाऊलवाटेचा महामार्ग होतो का हे पाहावे लागेल आणि त्यासाठी दोन्ही बाजूंनी सकारात्मक पावले उचलावी लागतील.

मुळात प्रणवदा संघ कार्यक्रमात येत आहेत म्हणून संघाचा संपर्क आणि संवाद या बिंदूंवर प्रकाशझोत पडत आहे. पण वास्तवात संवाद आणि संपर्क हीच संघकार्य विस्ताराची साधने आहेत. आजवर संघाची वाटचाल झाली, विस्तार झाला तो याच साधनांच्या मदतीने. संवादासाठी, संघ समजून घेण्यासाठी आणि समजलेला, पटलेला संघ  आचरणात आणण्यासाठी संघाचे दार सदैव सर्वांसाठी नेहमीच उघडे आहे. गरज आहे ती संवादाची मनीषा मनात धरून संघाच्या जवळ जाण्याची. प्रणवदांनी संघाच्या कार्यक्रमात जाण्याचे मान्य करून हाच संदेश दिला आहे आज तोच सर्वांनी लक्षात घ्यायला हवा. प्रणवदा काय बोलतील? संघस्वंयसेवक प्रणवदांच्या मांडणीवर काय प्रतिक्रिया  देतील? हे सात तारखेला कळेलच आणि त्यावर आपण चर्चाही करू. तूर्तास संघाने सर्वांना संवादासाठी आणि संघ समजून घेण्यासाठी आवाहन केले आहे याची नोंद माध्यमांनी आणि सामाजिक जीवनात काम करणाऱ्या सर्वांनीच घ्यायला हरकत नाही.