इस्रायलमधील सांस्कृतिक गुंता

 विवेक मराठी  11-Jun-2018

जगाच्या कानाकोपऱ्यातून आपल्या धर्मभूमीत स्थलांतरित झालेल्या ज्यूंनी त्या त्या देशांतील सांस्कृतिक संचितही सोबत आणले. त्याचबरोबर इस्रायलची स्वत:ची अशी वेगळी संस्कृती आहेच. हे सर्व स्थलांतरित वेगवेगळया आर्थिक, सामाजिक स्तरातील आहेत. त्याचाही परिणाम येथील लोकजीवनावर दिसून येतो. या सर्व परिस्थितीमुळे येथे एक प्रकारचा सांस्कृतिक गुंता तयार झाला आहे. 

एक ज्यू राष्ट्र म्हणून ज्या वेळी इस्रायलची निर्मिती झाली आणि जगभरातून विविध संस्कृतींमध्ये राहिलेले, विविध भाषा बोलणारे ज्यू लोक या छोटया प्रदेशात एकत्र राहणार असे जेव्हा लक्षात आले, तेव्हा या सगळयांना एकत्र, एक देश म्हणून बांधून ठेवण्यासाठी ज्यूंची भाषा हिबू्र, इस्रायली लष्करामध्ये काम करणे आणि ज्यू संस्कृतीचा प्रखर अभिमान या तीन गोष्टींचा उपयोग केला गेला. हिब्रू भाषेचे पुनरुज्जीवन करून ती शिकणे अनिवार्य केले. इस्रायलमध्ये शालेय शिक्षण झाल्यावर प्रत्येक मुलाला तीन वर्षे आणि मुलीला दोन वर्षे इस्रायली लष्करामध्ये काम करणे अनिवार्य आहे. कट्टर धार्मिक ज्यू, दिव्यांग, वेडसर, लग्न झालेल्या मुली अशांना यातून सूट मिळते. या कारणांव्यतिरिक्त जर कोणी लष्करात काम करण्यास नकार दिला, तर तुरुंगवासापासून ते सरकारी सवलतींपासून वंचित राहणे अशा प्रकारच्या शिक्षा मिळतात. तिसरी गोष्ट म्हणजे ज्यू संस्कृतीचा अभिमान. ज्यू कालगणनाच वापरणे, त्याप्रमाणेच सुट्टया देणे, खाण्यापिण्यात कोशरची काटेकोरपणे अंमलबजावणी करणे, ज्यूंचेच सण साजरे करणे, ज्यूंच्या तोरामध्ये सांगितल्याप्रमाणे वेषभूषेस प्राधान्य, कट्टरपणे शब्बातचे पालन करणे अशा अनेक बाबींमधून हा अभिमान दिसून येतो. शब्बात म्हणजे आठवडयातील सातवा दिवस. विश्रांतीचा दिवस म्हणून ज्यू लोक हा दिवस पाळतात. ज्यूंच्या 'शब्बात'वरूनच सर्व जगभर आठवडयाच्या सुट्टीची संकल्पना आलेली असावी असे वाटते.

माझ्या सहकाऱ्यांमधील काहींचा जन्म इस्रायलमधला, तर काही दुसऱ्या देशात जन्मलेले आणि नंतर इस्रायलमध्ये स्थायिक झालेले. हॉलोकास्टमधून स्वत:ला वाचवून प्राचीन ज्यू भूमीमध्ये आश्रय घेतलेल्या आणि इस्रायलची निर्मिती झाल्यावर इथे स्थलांतरित झालेल्या पोलंड, रोमानिया यांसारख्या गरीब युरोपीय देशांतून नेसत्या वस्त्रानिशी आलेल्या ज्यूंची संख्या लक्षणीय होती. मुसलमान लोकांनी आरंभलेल्या कत्तलींमुळे इराक, इराण, तुर्कस्तान, कुवैत, सीरिया, जॉर्डन यांसारख्या अरब देशांतून एका रात्रीत आहे त्या स्थितीत पळ काढलेल्या ज्यूंची संख्या प्रचंड आहे. रशियाचे विभाजन झाल्यावर रशियातील ज्यूंना ऍंटी-सीमेटिझमला (ज्यू-विरोधाला) सामोरे जावे लागले. त्यामुळे युक्रेन, अझरबझान यासारख्या गरीब देशांतून हजारो ज्यूंनी पलायन करून इस्रायलमध्ये आश्रय घेतला. आफ्रिकेतील वाढत्या मुस्लीम प्रभावाचा परिपाक म्हणजे टयूनिशिया, इथियोपिया, लेबनान यांसारख्या देशांतील आफ्रिकन ज्यू लोकांनी इस्रायलमध्ये स्थलांतर केले.

त्यातल्या त्यात भारतातून आलेले ज्यू (बेने इस्रायली, कोची इस्रायली आणि बगदादी ज्यू) वेगळया पार्श्वभूमीचे होते. भारतात त्यांना काहीही त्रास सहन करावा लागलेला नव्हता. उलट हे लोक भारतात स्थानिक हिंदू, मुसलमान लोकांमध्ये मिसळून गेलेले होते. पण इतर ठिकाणच्या ज्यू लोकांवरील अत्याचाराच्या बातम्या ऐकून, तसेच आपल्या धर्मभूमीत परत जावे अशा मानसिकतेतून भारतातील बेने इस्रायली आणि कोची ज्यू लोकांनी फार मोठया प्रमाणात इस्रायलमध्ये स्थलांतर केले. भारत, युक्रेन, अझरबझान, इथियोपिया यांसारख्या गरीब देशांतून आलेल्या ज्यूंना युरोप, अमेरिका, कॅनडा येथून आलेल्या ज्यूंच्या तुलनेत खूपच संघर्ष करावा लागला. रशियात डॉक्टर म्हणून काम करत असलेल्यांना इस्रायलमध्ये येऊन हॉस्पिटलच्या सफाईची नोकरी मिळणे, भारतातील जहाज बांधणीच्या कामावर मेकॅनिक म्हणून काम करणाऱ्यांना झाडे लावण्याचे मजुरीचे काम करावे लागणे अशा प्रकारे त्यांचे शोषणही केले गेले. नवीन इस्रायल उभारणीसाठी या लोकांचा वापर करून घेतला गेला. असेही ऐकायला मिळाले की इथियोपियन ज्यू नकोत म्हणून सुरुवातीला इमिग्रेशन कँपमध्ये राहणाऱ्या आफ्रिकेतील बाळंत झालेल्या ज्यू स्त्रियांची मुले जिवंत असतानाच जमिनीत गाडून टाकली गेली किंवा काहींना ताबडतोब अमेरिकेत दत्तक देण्यात आले आणि त्या मातांना तुमचे मूल मृत जन्माला आले असे सांगण्यात आले. या सगळया गुंतावळयात जर्मनीतून, फ्रान्समधून, अमेरिकेतून, कॅनडामधून आलेल्या ज्यूंचा वरचश्मा राहिला. कारण हे लोक जास्त शिकलेलेसुध्दा होते. इतर ज्यूंना आपापले बस्तान बसवायला हिब्रू भाषा शिकून आपला शैक्षणिक तसेच आर्थिक स्तर उंचावण्यासाठी पुष्कळ संघर्ष करावा लागला.

या सगळयात कम्युनिस्ट विचारांवर आधारित किबुत्स या कम्युनिटी लिव्हिंग पध्दतीने हातभार लावला. नवीन आलेल्या सर्व लोकांना सगळयात आधी किबुत्समध्ये पाठविले जायचे. काही जणांनी किबुत्समध्ये जाणे पसंत केले नाही. पण जे लोक किबुत्स पध्दतीमधून बाहेर पडले, त्यांना हिब्रू भाषा चांगली यायला लागली. तसेच त्यांना आपला आर्थिक, सामाजिक स्तर उंचावायला मदत मिळाली. जे काही कारणाने किबुत्समध्ये गेले नाहीत, त्यांना हिब्रू भाषा शिकण्यात अडचणी आल्या. तसेच त्यांचा शैक्षणिक, आर्थिक व सामाजिक स्तर थोडा कमीच राहिला, असे म्हणायला वाव आहे. इस्रायलमध्ये अशा विविध देशांमधून आलेल्या ज्यूंचे समूहच्या समूह विविध भागांत एकत्र राहतात. यांची देवळे (सिनेगॉग्ज)ही वेगवेगळी आहेत. सुरुवातीला हे सगळे आपापली संस्कृती सांभाळून आपापल्या समूहातच राहणे पसंत करत. पण शिक्षण, किबुत्स, लष्कर या सगळयामुळे यांच्यातील आंतरक्रिया वाढली आहे.

या सगळया सांस्कृतिक खिचडीतून नवीन पिढीत एक वेगळी 'इस्रायली संस्कृती' आता तयार झालेली आहे. नवीन इस्रायली पिढीमध्ये मिश्र लग्नेच अधिक आहेत. म्हणजे माझ्या सहकाऱ्यांच्या मुलांमध्ये 4-6 देशांच्या संस्कृतींची पार्श्वभूमी आहे. यामुळे यांच्या खाण्यापिण्याच्या पध्दतीदेखील खूपच मिश्र आहेत. हे सगळे आता इस्रायली म्हणूनच पुढे जात आहेत. या नवीन मिश्र संस्कृतीमध्ये अतिकर्मठ ज्यू येत नाहीत. अतिकर्मठ ज्यू लोकांची सिनेगॉग्ज वेगळीच आहेत. अतिकर्मठ ज्यूंमध्ये वयाच्या 17-18 वर्षीच मुला-मुलींची लग्ने होतात. एकूणच ज्यू लोकांना शिक्षण अनिवार्य असल्याने यांच्यामध्ये शिक्षणाचे प्रमाण लक्षणीय आहे.

सिनेगॉग्जमध्ये पुरुषांसाठी खाली आणि स्त्रियांसाठी वरच्या गॅलरीत अशा प्रकारे जागांची स्वतंत्र विभागणी असते. काही कर्मठ ज्यू लोकांत स्त्रियांनी बाहेरच्या खोलीत येऊन पुरुषांबरोबर बसणे किंवा त्यांच्याशी बोलणे हेदेखील चालत नाही. सेक्युलर ज्यू हे इतर पाश्चात्त्य लोकांप्रमाणेच राहतात. पण प्रत्येकाला किमान तीन मुले असतातच. ज्यूंची लोकसंख्या वाढविणे हे यामागील मुख्य कारण आहे. इतर वेळी कुटुंबातील सदस्य विखरून कोणत्याही शहरात राहत असले, तरी 'शब्बात डिनर' म्हणजेच शुक्रवार रात्रीचे जेवण हे इस्रायली ज्यू कुटुंब एकत्र येऊनच घेते. एक समाज किंवा कम्युनिटी म्हणून एकत्र राहण्याकडे त्यांचा कल दिसतो. एक कुटुंबवत्सलता त्यांच्यामध्ये आढळून येते.

अरब लोकांविषयी थोडे लिहिल्याशिवाय इस्रायलमधील सांस्कृतिक गुंता पूर्णच होणार नाही. अरब आणि ज्यू यांचे पारंपरिक हाडवैर असले, तरी इस्राएलमध्ये राहणाऱ्या अरब लोकांची संख्या पुष्कळ आहे. हैफा सोडले तर इतर ठिकाणी अरब आणि ज्यू यांचे राहण्याचे भाग वेगवेगळे आहेत. अरब भाग तुलनेने खूप मागासलेले, तर ज्यू भाग एकदम आधुनिक आहेत. पण इस्रायलमध्ये अरबी भाषा आणि हिब्रू या दोन्ही अधिकृत भाषा आहेत. शाळादेखील या दोन्ही भाषांमध्ये असतात. अरब लोकांना लष्करामध्ये काम करणे अनिवार्य नाही, पण जवळजवळ कोणताही अरब इस्रायली लष्करामध्ये काम करत नाही. अरब लोकांमध्ये अरब मुस्लीम आणि अरब ख्रिश्चन असे दोन प्रकार आहेत. अरब ख्रिश्चन त्यातल्या त्यात आर्थिकदृष्टया सधन आणि उच्च सामाजिक तसेच शैक्षणिक स्तर असणारे आहेत. अरब मुसलमान लोकांचा आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक स्तरही अत्यंत कमी असतो. 50% अरब लोक बेरोजगार आहेत. अरब मुस्लीम सामाजिक व्यवस्थेत स्त्रियांना खूपच खालचा दर्जा आहे. त्यामुळे स्त्रियांमध्ये शिक्षणाचे प्रमाण अत्यल्प आणि होणाऱ्या मुलांचे प्रमाण प्रचंड आहे. पुरुषांना शिक्षणाची मुभा असली, तरी आर्थिक परीस्थिती कमी असल्याने, तसेच मोठे कुटुंब असल्याने शालेय शिक्षण झाल्यावर या लोकांना अर्थार्जनास सुरुवात करावी लागते. अरब-ज्यू दुहीमुळे अधिकाधिक अरब मुख्य प्रवाहात नाहीत. यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी इस्रायली शासनाने पुष्कळ प्रयत्न चालविले आहेत.

इस्रायलसारख्या अत्यंत लहान देशासाठी इतकी सांस्कृतिक विविधतादेखील अस्थिरता आणण्यामागचे कारण असू शकते. आधुनिक काळाच्या रेटयात सगळयाच परंपरा, संस्कृती धुऊन निघत आहेत. पण ज्यूंनी आधुनिकतेतही आपली अशी एक इस्रायली संस्कृती निर्माण करून जतन केलेली आहे.

[email protected]

 डॉ. अपर्णा लळिंगकर

9742045785