कृतिनिष्ठ स्वयंसेवकाचा अस्त

 विवेक मराठी  11-Jun-2018

ज्येष्ठ स्वयंसेवक व अकोला नगराचे माजी नगर संघचालक डॉ. अरुणराव तारे यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या जीवनप्रवासाचा आणि कार्याचा वेध घेणारा हा लेख.

डॉ. अरुणराव तारे यांचे नागपूरच्या राहत्या घरी निधन झाले. एका कर्मठ स्वयंसेवकाचा अरुणास्त झाला. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. अकोल्याचा आपला मुक्काम हलवून ते नागपूरला स्थायिक झाले होते. जवळजवळ 20-22 वर्षे ते अकोला नगराचे नगर संघचालक होते. सन 1988-89ला डॉ. हेडगेवार जन्मशताब्दीपासून ते अकोल्याच्या संघकामात सक्रिय झाले. उत्कृष्ट बॅडमिंटनपटू असलेले अरुणराव निष्णात दंतचिकित्सक होते. रोटरी-लायन्ससह विविध संस्थांशी त्याचा घनिष्ठ संबंध होता. आपल्या स्वभावाला संघानुकूल बनवून तो प्रत्यक्ष आपल्या कृतीत सहज उतरवण्याची किमया त्यांच्यात होती. वक्तशीरपणा, शिस्तप्रियता, करारी स्वभाव, स्वच्छताप्रिय व समर्पित भाव ही त्यांची स्वभाववैशिष्टये होती. अकोल्याच्या 'लक्ष्मणस्मृती' या संघकार्यालयाचा चेहरामोहरा बदलण्यामध्ये त्यांची मोठी भूमिका होती. त्यांच्या आग्रहामुळेच अकोला संघकार्यालयाचे नूतनीकरण झाले.

नवनवीन कल्पना व आगळेवेगळे प्रयोग करण्याचे धाडस त्यांच्यापाशी होते. संघामध्ये असलेल्या नितांतसुंदर गीतांचा साग्रसंगीत कार्यक्रम करण्याची कल्पना त्यांनी मांडली. ती प्रत्यक्षात घडवून आणली. सन 2001मध्ये अकोल्यामध्ये 'जाणता राजा'चा प्रयोग घडवून आणण्यामध्ये त्यांनी मोठी कामगिरी बजावली. या संबंधातूनच श्रीमान बाबासाहेब पुरंदरे 'जाणता राजा' प्रयोगाचे सर्व आठही दिवस उपस्थित होते.

नागपूरच्या बाहेर प्रथमच अकोल्यात डॉ. हेडगेवार रक्तपेढीची उभारणी ही त्यांच्या परिश्रमाची फलश्रुती. ना नफा-ना तोटा या तत्त्वावर एखादा सामाजिक प्रकल्प उभा करणे ही सोपी गोष्ट नव्हे. या रक्तपेढीसाठी समर्पित बंधूंचा चमू तयार करून त्यांना या कामी लावले. आज रक्तपेढीचा विस्तार झाला आहे, वातानुकूलित व्यवस्थायुक्त बससुध्दा उपलब्ध आहे. यामागे डॉ. अरुणराव तारे यांचे परिश्रम दडले आहेत. सर्व सोयींनी युक्त असे हॉस्पिटल अकोल्यात असावे हे त्यांचे स्वप्न होते.

नियमित दैनंदिन प्रभात शाखा व त्यानंतर काही ठिकाणी संपर्क ही त्यांची दैनंदिनी जवळजवळ अखेरपर्यंत सुरू होती. स्वच्छ व पूर्ण गणवेश यासाठी ते आग्रही असत. एकत्रीकरणांमध्ये ते गणवेश निरीक्षण करत व ज्यांचे अपूर्ण असत त्यांचा ते पाठपुरावा करून पूर्ण करून घेत.

प्रत्येक स्वयंसेवकाकडे/कार्यकर्त्याकडे त्यांचे वैयक्तिक  लक्ष असायचे. अनेक स्वयंसेवकांना स्वत:च्या पायावर उभे करण्यामध्ये त्यांनी मोलाची भूमिका बजावली. जिथे कोणाची चूक वाटेल तेथे रागवायला ते मागे-पुढे पाहत नसत. तत्त्वांशी त्यांनी कधी तडजोड केली नाही. अन्य क्षेत्रातील कार्यकर्त्यांना संघनाळेशी जोडून ठेवण्याचे त्यांचे कसब अफलातून होते.

अकोला नगर हे सर्वार्थाने पुणे-मुंबईच्या मागे राहू नये ही त्यांची भावना होती. यासाठी त्यांनी अनेक नावीन्यपूर्ण उपक्रम आयोजित केले. कला क्षेत्रातील काही जणांना सोबत घेऊन त्यांनी 'पंचम' नावाची संस्था स्थापन केली. या संस्थेद्वारे दर्जेदार नाटके, कौटुंबिक संगीत मैफली व इतर अनेक सांस्कृतिक कार्यक्रम अकोलेकरांना अनुभवता आले, याचे श्रेय डॉ. अरुणराव तारे यांचेच. बॅडमिंटनचे, फुटबॉलचे राष्ट्रीय स्तरावरील सामने त्यांनी घडवून आणले. अकोल्याच्या म्हैसपूरजवळ दिवंगत काकाजी खंडेलवाल या अकोल्यातील पूर्व संघचालकांच्या प्रेरणेतून सुरू झालेल्या आदर्श संस्कार मंडळाच्या गोरक्षण प्रकल्पाला डॉ. अरुणराव यांनी भव्य स्वरूप दिले.

'बोले तैसा चाले' ही समर्थांची उक्ती डॉ. अरुणराव यांच्याकडे बघितली की पावलोपावली जाणवते. मराठीचा आग्रह असल्याने त्यांची स्वत:चीही स्वाक्षरी मराठीतच आहे. संख्यात्मकता आणि गुणात्मकता यांचा अचूक मेळ साधण्याकडे त्यांचा कल होता. संघकामाकरिता त्यांनी अविरत प्रवास केला. प्रत्येक शाखेत, प्रत्येक स्वयंसेवकाशी त्यांचा संपर्क होता.

कार्यकर्त्यांच्या जडणघडणमध्ये त्यांना विशेष रुची होती.  प्रत्येकाने एखादे विशेष कला-कौशल्य जोपासावे हे ते प्रत्येकाला आवर्जून सांगत. आपल्या कार्यपध्दतीतील भावार्थ न बदलता आधुनिकतेची जोड देणारा कृतिनिष्ठ, संघकामासाठी तळमळ असणारा कर्मठ पण सर्वांना प्रिय व जवळचा वाटणारा पालक आज नागपूरच्या संघभूमीत अनंतयात्रेला निघाला. त्यांना भावांजली वाहताना मन आणि पाय दोन्हीही जड झाले.

निशिकांत देशपांडे

9850342404

 सा. विवेकच्या फेसबुक पेजवर लेख पोस्ट करण्यास सुरवात करत आहोत. सा. विवेकच्या सर्व वाचकांना विनंती आहे की, त्यांनी खालील पेज क्लिक करून 
https://www.facebook.com/VivekSaptahik/
मग like करावे म्हणजे त्यांना विविध लेख वाचण्यास मिळतील.
https://www.facebook.com/VivekSaptahik/