मेहनत और हुनर कभी खाली नहीं जाती...

 विवेक मराठी  13-Jun-2018

कष्ट (मेहनत) आणि अंगातील कौशल्य (हुनर) या दोन गोष्टी जीवनात कधीही वाया जात नाहीत. यातही गंमत अशी आहे की कौशल्य हे कष्टानेच साध्य होते. दिग्गज गायकाचा षड्जही श्रोत्यांवर मोहिनी घालतो. चित्रकाराच्या किंवा शिल्पकाराच्या कलाकृतीने रसिक थक्क होतात किंवा अष्टपैलू खेळाडूच्या कौशल्याने प्रेक्षकांचे भान हरपते. यामागे त्यांनी केलेली अथक  मेहनत आणि त्या कलेत संपादन केलेले कौशल्यच कारणीभूत असते. उद्योग-व्यवसायाबाबतही ते तितकेच सत्य आहे.

दुबईतील आमच्या दुकानाच्या जवळच पिठाची एक गिरणी होती. ही गिरणी एका बांगला देशी गृहस्थांच्या मालकीची होती. त्यांना मी 'मुल्लाचाचा' म्हणून हाक मारत असे. हे मुल्लाचाचा गंभीर प्रकृतीचे आणि कामसू वृत्तीचे होते. ते सतत कामात गढलेले असत. माझ्या बाबांच्या आणि या चाचांच्या स्वभावात मितभाषीपणा, हातातल्या कामधंद्याबाबत एकाग्रता हे गुण समान असल्याने दोघांची मैत्री व्हायला वेळ लागला नाही. आमची त्यांच्या पीठगिरणीत थोडीशी भागीदारीही होती. म्हणजे दुकानात विक्रीसाठी लागणारी तयार पिठे व मसाले आम्ही चाचांच्या गिरणीतून दळून घेत असू आणि दुसरीकडे त्यांच्याकडूनच धान्यांची व मसाल्यांच्या पदार्थांची घाऊक खरेदीही करत असू. मुल्लाचाचा गिरणी चालवण्याबरोबरच दुबईतील घाऊक धान्य व्यापारातही सक्रिय होते. हा व्यापार खाडीपलीकडच्या देरा दुबई या भागात चालायचा. चाचा दिवसातील सकाळचा वेळ त्यांच्या देरा दुबईतील दुकानात, तर दुपारनंतरचा वेळ पीठ गिरणीत घालवत. बघावे तेव्हा ते कामात व्यग्र असत.

आम्हाला दुकान सुरू केल्याच्या पहिल्याच वर्षी जबरदस्त नुकसान झाल्याने पैसे वाचवण्यासाठी मी व बाबा त्या काळात अत्यंत काटकसरीने राहत होतो. आम्ही रोज भात, पातळ भाजी व बेकरीत विकत मिळणाऱ्या ब्रेडसारख्या रोटया (खुबूस) हे तीनच पदार्थ खायचो. बाबा दुकान सांभाळायचे व मी पडेल ते काम करायचो. नोकर ठेवण्याची ऐपत नसल्याने झाडलोट, लादी साफ करणे, मालाची पोती वाहून नेणे ही कामे मीच करत असे. अगदी सायकल घेण्याचीही स्थिती नसल्याने मी खरेदीसाठी अथवा वसुलीसाठी दुबईच्या विविध भागांत पायपीट करुन जात होतो. दुकानातील धान्याची पोती मुल्लाचाचांच्या गिरणीत दळणासाठी घेऊन जाण्याचे आणि तयार पीठ घेऊन येण्याचे काम माझ्याकडे असे. माझी ही मेहनत मुल्लाचाचा शांतपणे बघत असत. त्यांना मनातून कौतुक वाटत असे, पण ते त्यांनी कधी बोलून दाखवले नाही. त्यांनीच मला चक्की चालवायला आणि दळण दळायला शिकवले. त्याचा फायदा असा झाला की उत्तम दर्जाचे धान्य आणि पिठाचा दर्जा यांची पारख करण्याचे माझे ज्ञान वाढीस लागले. मी आमची दळणे दळून झाल्यावर त्यांच्या ग्राहकांचीही दळणे दळून ठेवू लागलो.

या मुल्लाचाचांमुळेच मला पहिला नफाही अनुभवायला मिळाला. मी एक दिवस खरेदीसाठी देरा दुबईमध्ये गेलो असताना नेहमीच्या परिपाठाप्रमाणे मुल्लाचाचांच्या दुकानात डोकावलो. मला बघताच ते म्हणाले, ''जय बेटाऽ, माझ्याकडे उत्तम दर्जाच्या मिरचीच्या तिखटाची एक गोणी (बॅग) आली आहे. तुला हवीय का?'' माझ्याकडचे पैसे अन्य मालखरेदीत संपले असल्याने मी त्यांना नकार देऊ लागलो. त्यावर ते म्हणाले, ''अरे, विचार करत बसू नकोस. चांगली वस्तू मिळत असेल तर हातची सोडायची नसते. घेऊन जा आणि पैसे महिनाभराने दिलेस तरी चालेल.'' मी त्यांची आज्ञा पाळली आणि ते 40 किलोंचे पोते दुपारच्या रणरणत्या उन्हात, 47 अंश सेल्सियस तापमान असताना पाच किलोमीटर अंतर पाठीवर वाहून आणले. ते तिखट खरोखर अस्सल होते आणि पाठीवरील घामामध्ये मिसळल्याने माझ्या अंगाची प्रचंड आग आग झाली. गोणी दुकानात आणल्यावर तिखटाच्या खकाण्याची पर्वा न करता मी त्याच्या छोटया पुडया तयार केल्या. तिखटाचा दर्जा उत्तम असल्याने ते ग्राहकांना पसंत पडून हातोहात खपले आणि मला चांगला नफा झाला. मी चाचांची उधारी 15 दिवसांतच चुकती केली. त्या खेपेस मात्र मुल्लाचाचांनी माझ्या पाठीवर थोपटून सांगितले, ''जय बेटाऽ, अब तेरी कश्ती पानी में सफर करने लगी है. हमेशा याद रखना. जिंदगी में मेहनत और हुनर कभी खाली नही जाती.'' मी दुकानात परत येताच चाचांचे बोलणे बाबांना सांगितले. त्यावर बाबा म्हणाले, ''दादा, अनुभवी माणसांचे मार्गदर्शनाचे मोजकेच शब्द अर्थपूर्ण आणि मौलिक असतात. ते विसरू नकोस.''

या घटनेला जवळपास पाच वर्षे लोटली. दरम्यान आमच्या एका दुकानाची चार दुकाने झाली होती. व्यवसायाचा व्याप वाढला होता. आम्हीही धंद्यात नवशिके न राहता मुरलो होतो. खरेदी कुठून किफायती दराने करायची, याचे तंत्र आम्हाला अवगत झाले होते. दुबईतील घाऊक बाजारपेठेतून खरेदी करण्यापेक्षा आम्ही दुकानाला लागणारा सर्व माल मुंबईतील विविध बाजारपेठांतून आणखी स्वस्त दराने घेऊ लागलो. मस्जिद बंदर ही मसाल्याच्या पदार्थांची घाऊक बाजारपेठ. बाबा मला तेथे नेऊन ओळखीच्या व्यापाऱ्यांशी परिचय करून देत. बाबांच्या सहवासात राहून मीसुध्दा वस्तूंची पारख करण्यात तयार होऊ लागलो. असेच एकदा आम्ही खरेदी आटोपून परतत होतो. वाटेत बाँबे डॉकयार्ड लागले. बाबा पूर्वी हवाई दलात नोकरी करत असताना त्यांना रोज कुलाब्याला कामासाठी यावे लागत असे. तो सगळा परिसर त्यांच्या दाट परिचयाचा.

बाँबे डॉकयार्डकडे माझे लक्ष वेधून बाबा म्हणाले, ''दादा, या गोदीबद्दल वाचलेली एक ऐतिहासिक कथा तुला सांगतो. मुंबई डॉकयार्डची स्थापना सन 1735मध्ये झाली. त्या वेळेस मुंबईत ईस्ट इंडिया कंपनीचे प्रशासन होते. या कंपनीचा आधीची दहा-पंधरा वर्षे मराठयांच्या आरमाराशी संघर्ष होत होता. सरखेल कान्होजी आंग्रे यांनी इंग्रजांना चांगलेच जेरीस आणले होते आणि नंतर त्यांच्या मुलांनीही तोच पराक्रमाचा वारसा सुरू ठेवला होता. कंपनीच्या नौदलाला मराठा आरमाराशी चकमकीत आपली अनेक लढाऊ जहाजे गमवावी लागल्याने त्यांना नव्या जहाजांची गरज होती. ही इंग्लिश जहाजे त्याआधी कंपनीच्या सुरतेच्या गोदीत बांधली जात असत आणि मुख्यत्वे पारशी कारागीर ते काम करत. मुंबई प्रशासनाने सुरतेला क्वीन नावाचे नवीन जहाज बांधण्याची ऑॅर्डर दिली. ते काम कसे चालले आहे यावर देखरेख करण्यासाठी डडले नावाचा आपला अधिकारी पाठवला. डडलेने कामाची पाहणी केली आणि तो खूश झाला. विशेषत: त्या कामावर फोरमन असलेल्या लवजी नसरवानजी वाडिया या पारशी तरुणाची कष्टाळू वृत्ती व कर्तबगारी डडलेच्या नजरेत भरली. तो लवजी आणि त्याच्याबरोबरच्या काही कसबी कारागिरांना आग्रहाने मुंबईत घेऊन आला. लवजीने मुंबई किनाऱ्यावर विचारपूर्वक जागा निवडली आणि जहाज बांधण्यासाठी गोदी उभारली. तेच हे बाँबे डॉकयार्ड.''

मी लक्षपूर्वक ऐकत असताना बाबा पुढे म्हणाले, ''पण मला तुला वेगळेच सांगायचे आहे. या लवजी नसरवानजीने आयुष्यभर आपल्यातील कष्ट आणि कौशल्य या दोन गुणांचा आविष्कार घडवून इंग्रजांसाठी व्यापारी व आरमारी नौका बांधल्या. आपल्या माणेकजी व बोमनजी या दोन्ही मुलांनाही जहाज बांधणीचे कसब शिकवून तयार केले. पुढे लवजीचा नातू जमशेदजी बोमनजी तर इतका सवाई निघाला की तो आपल्या कर्तबगारीने या डॉकयार्डचा जहाजबांधणी प्रमुख झाला आणि त्याने ब्रिटिश नौदलासाठी प्रथमच सर्वांत मोठी आणि तब्बल 74 तोफांनी सज्ज अशी मिंडेन ही युध्दनौका आणि पाठोपाठ सहा आणखी मोठी जहाजे बांधली. कष्ट आणि कसब या लवजीच्या अंगभूत गुणांमुळे केवळ त्याचीच नव्हे, तर त्याच्या घराण्याची मोठीच भरभराट झाली आणि त्यांच्या नावाचा ठसा इतिहासात कोरला गेला. आता तुला समजले असेल, की मुल्लाचाचांनी तुला पाच वर्षांपूर्वी केलेला उपदेश किती मौल्यवान होता ते. कष्टाळू वृत्ती आणि कल्पकता हे गुण यशासाठी कधीही हमखास उपयोगी पडतात. आपण नेहमी त्यांचा पाठपुरावा करावा.''

मित्रांनो, वडीलधाऱ्यांच्या अशा मौलिक आणि अनुभवी सल्ल्यांतून मी खूप काही शिकलो आहे. आजही मी उद्यमशील तरुणांना आवर्जून सांगतो की कष्ट, जिद्द, कल्पकता, प्रामाणिकपणा आणि ग्राहकसेवा ही पंचसूत्री कोणत्याही व्यवसायाच्या यशाचा मंत्र आहे. त्यात मी कष्टाला पहिले स्थान देतो.

समर्थ रामदासांनी दासबोधात मूर्खलक्षणे सांगताना मनुष्याच्या अंगी कोणते गुण नसतील तर तो दुर्दैवी ठरतो, हे सांगताना त्यात कष्ट आणि कौशल्य यांचा उल्लेख केलेला आहे. ते म्हणतात,

विद्या नाही, बुध्दी नाही। विवेक नाही, साक्षेप नाही।

कुशलता नाही, व्याप नाही। म्हणोन प्राणी करंटा॥

(जो शिकत नाही, बुध्दीचा वापर करत नाही, तारतम्य बाळगत नाही, साक्षेप (उद्योग) करत नाही, अंगात कौशल्य नाही किंवा कामसू नाही, तो मनुष्य दुर्दैवी (करंटा) ठरतो.)

 

(या लेखांवर वाचकांच्या प्रतिसादाचे स्वागत असून ते आपल्या प्रतिक्रिया, सूचना, विचारणा [email protected] या पत्त्यावर पाठवू शकतात.)