सकस साहित्याचा खुराक आवश्यक

 विवेक मराठी  14-Jun-2018

**माधवी भट***

गेल्या दशकाचा विचार केला, तर आपण तंत्रस्नेही अधिक झालो आहोत. माहितीचा स्फोट आणि त्यात स्वत:ला रोजच्या वेगात जुळवून घेताना होणारी आपली दमछाक यात वाचनातलं निवांतपण हरवलं आहे का? याचा विचार मनात आला. यावर काही म्हणतील की ज्याला वाचायचं आहे तो वाचतोच. प्रश्न तो नाही. 1990च्या नंतर जन्माला आलेल्या किती टक्के मुलांमध्ये सकस वाचनाची आवड दिसून येते? हा महत्त्वाचा विचार आहे. सर्व प्रकारच्या आधुनिक सुविधा उपलब्ध असलेल्या मुलांना एका टिचकीसरशी जागतिक सिनेमा, खेळ, गाणी, वस्त्रप्रावरणं, अलंकार, माहिती आणि पुस्तकं सर्व पाहता येतं. किती मुलांचा कल पुस्तकांकडे आहे?

आमच्या नात्यातील दोघे जण यंदा दहावीला आणि बारावीला आहेत. पैकी बारावीचा निकाल लागला. आमच्या आईची कधीपासून भुणभुण सुरू होती की त्या दोघांसाठी काहीतरी आणून ठेव, म्हणजे निकाल लागल्यावर हाती द्यायला बरं. आईच्या मते काहीतरी म्हणजे अर्थातच पुस्तक.. आपण कितीही नव्या काळात जगत असू, तरी आपली आई कायम तिच्या काळातच जगत असते. तिच्यालेखी आपण जसे लहान असतो, त्याचप्रमाणे जगातल्या इतरही गोष्टी तशाच कायमच असतात आणि मग त्या धारणांना धक्का बसला की ती ''हो? बापरे...'' असं एक टिपिकल आईसुलभ संदिग्ध उत्तर देते. या पुस्तक भानगडीत मला आईची बाजू समजत तर होतीच, तशीच आवडलीही होती. अगदी आत्ताआत्तापर्यंत परीक्षांचे निकाल, बारक्या बारक्या स्पर्धांचं यश, वाढदिवस आणि मुंज अशा वेळी भिक्षावळीत घालायलासुध्दा मुलांना पुस्तक द्यायची पध्दत होती. ती आत्ताआत्ताच अचानक बदलून गेम्स आणि सीडीज देण्यापर्यंत कशी बदलली, ते कळलं नाही. किती वेगात बदल झाला. लक्षात आला नाही असं नाही, मात्र तो आत्ताचा विचार करेपर्यंत इतका स्पष्ट झाला नव्हता. काळाच्या वेगाचं आणि एकुणातच नेहमीच्या सोपस्कारांच्या बदललेल्या पोताचं गणित नजरेत भरलं नाही. 'परिवर्तन हा सृष्टीचा नियम आहे' हे वाक्य 'मनुष्य हा समाजशील प्राणी आहे' किंवा 'भारत हा विकसनशील देश आहे' या चालीवर पाठ केलं होतंच अभ्यासात, पण ते परिवर्तन इतक्या चोरपावलांनी आपल्या जगण्यात येतं आणि रुळत जातं, ते लक्षात येत नाही!

घरात तीन पिढया राहतात असं एक ढोबळमानाने गृहीत धरू या. त्यात मधली पिढी नेहमीच समन्वयक म्हणून काम करत असते. बरेचदा गोंधळलेलीही असते. माझ्या आधीच्या पिढीच्या मनात त्यांच्या धारणा असतात, पुढच्या पिढीजवळ त्यांचा वेगवान वर्तमान असतो आणि या दोहोंना एकमेकांशी जोडून देताना मधल्या मध्ये मी कधी इकडे तर कधी तिकडे अशी रमीतल्या जोकरसारखी जाऊन थांबते.

माझ्या पिढीची सुट्टीची संकल्पना खूप साधी होती. शेवटचा पेपर झाला की रेल्वेने आजी-आजोबांच्या गावाला जायचं. तिथे आजीने, मामीने घातलेल्या नव्या लोणच्याच्या करकरीत फोडी हातात घेऊन किंवा चोखून खायचा आंबा हाती घेऊन जिन्याच्या पायरीवर किंवा अंथरूण-पांघरूण ठेवतात त्या घडवंचीवर बसून आरामात पुस्तक वाचायचं. दुपारी टरबूज खायचं, संध्याकाळी आजोबांबरोबर उसाचा रस प्यायला रसवंतीत जायचं, रात्री गच्चीत अंथरूण घालून गोष्टी गप्पा करत निजायचं. याहून निराळी मजा असते हे माहीत नव्हतं. तेव्हाही महागडे खेळ नव्हते असं नाही, पण ते कधी घेऊन दिले नाहीत. राजमलाई हे सर्वात मोठं चॉकलेट होतं आणि सातूचं पीठ हा सर्वात आवडता पदार्थ होता, तेव्हाची ही गोष्ट आहे.

वाळवणाची राखण करत बसल्यावर बक्षीस म्हणून उडदाच्या पापडाची एक लाटी जास्तीची खायला मिळणार... तो पुरस्कार! वाचनाचा संस्कार मनावर झाला तो याच काळात. चतुर्मासात कोणकोणत्या सणांच्या कहाण्या ऐकायच्या.... पिठोरी अमावस्येची, श्रावणी सोमवाराची, पोळयाची, नागपंचमीची आणि पौषातल्या रविवारी वाचायची ती आदित्य राणूबाईची. कहाण्यांची लय, छोटी छोटी नादमय वाक्यं आणि त्यातल्या अद्भुताचं रम्य दर्शन यांनी कितीतरी काळ कल्पनासृष्टी व्यापली होती. ही सवय तेवढयापुरती न राहता वाढत गेली. पुस्तकं आवडू लागली की त्या विश्वाच्या बाहेर तुम्ही पडत नाही. उलट अधिकाधिक खोल निबिड अरण्यात शिरू पाहता.

आजच्या काळाशी हे जुळवून बघते, तेव्हा म्हणावं तसं दृश्य का दिसत नाही याचा विचार करते. गेल्या दशकाचा विचार केला, तर आपण तंत्रस्नेही अधिक झालो आहोत. माहितीचा स्फोट आणि त्यात स्वत:ला रोजच्या वेगात जुळवून घेताना होणारी आपली दमछाक यात वाचनातलं निवांतपण हरवलं आहे का? याचा विचार मनात आला.

यावर काही म्हणतील की ज्याला वाचायचं आहे तो वाचतोच. प्रश्न तो नाही. 1990च्या नंतर जन्माला आलेल्या किती टक्के मुलांमध्ये सकस वाचनाची आवड दिसून येते? हा महत्त्वाचा विचार आहे. सर्व प्रकारच्या आधुनिक सुविधा उपलब्ध असलेल्या मुलांना एका टिचकीसरशी जागतिक सिनेमा, खेळ, गाणी, वस्त्रप्रावरणं, अलंकार, माहिती आणि पुस्तकं सर्व पाहता येतं. किती मुलांचा कल पुस्तकांकडे आहे? त्यातही किती टक्के मुलं केवळ सामान्य ज्ञान (ही एक नवीनच डोकेदुखी झाली आहे ...बाकी कशाहीबद्दल तुमचं 'नॉलेज' अगदीच 'जनरल' असलं तरी चालेल, मात्र मुलांचं 'जनरल नॉलेज' हा घरातला मोठा प्रश्न आहे आणि त्यासाठीही रक्त आटवणारे आईबाप आहेत.) आणि ऍक्शन थ्रिलर्स यांना पसंती देतात, याचा विचार करायला हवा आहे.

आजकाल शाळा-कॉलेजांमधून मुलाना प्रोजेक्ट करायचे असतील तर गूगल, विकिपीडियावरून प्रिंट आउट काढून तीच माहिती लिहून काढणं हा एक सर्वमान्य मार्ग झाला आहे. शिवाय 'अवघड सोपे झाले हो' म्हणत सगळं हातात देणाऱ्या गुरुकिल्ल्या मुलांसाठी उपलब्ध आहेत. 'शाळेचा पहिला दिवस'पासून 'पावसाळयाचा पहिला दिवस' ते 'जागतिक अशांततेला जबाबदार कोण?'पर्यंत सर्वच विषयांवर निबंध उपलब्ध आहेत. अपेक्षित प्रश्नसंच आहेत, वाक्प्रचारांचा वाक्यात उपयोग आयता आहे. सगळं देणारे गाईड आहेत. मुख्य म्हणजे कधीकधी तर हेही लक्षात येतं की, पाठयपुस्तक बाजारात यायच्या आत गाईड येतं. किंवा गाईड आणि पुस्तक एकत्रच उपलब्ध होतात. आठवीपर्यंत शासनातर्फे पाठयपुस्तकं दिली जातात. त्यानंतर मुलं पुस्तकापेक्षा गाईड घेणं पसंत करतात. त्या न वापरणारा आणि मुलांना वापरू न देणारा शिक्षक आजकाल पालकांनाही नकोसा झाला आहे, ही त्यात आणखी धक्कादायक बाब आहे.

तुमच्या-आमच्या मुलाने वाचली चार पुस्तकं आणि मिळवली माहिती, तर हरकत काय आहे? असा प्रश्न जेव्हा मी एक पालक म्हणून आणि त्याचबरोबर एक शिक्षक म्हणून विचारते, तेव्हा मला उत्तर मिळतं, ''हरकत नाही, पण तेवढा वेळ हवा ना? निवांतपण कुठेय?'' यावर मात्र माझ्याजवळ उत्तर नाही. कारण आपली मुलं ज्ञानार्थी नसून परीक्षार्थी आहेत हे सत्य आहे. नवीन धडा किंवा कविता सुरू करायची असल्यावर विज्ञान, वाणिज्य शाखेची मुलं विचारतात, ''किती मार्कांसाठी येणार आहे? वेटेज काय?'' त्यावर काय बोलावं सुचत नाही. तीन मार्कांसाठी बोरकरांची कविता येऊ शकेल असं सांगायचं? तर ती म्हणतील, ''असू देत. आय.एम.पी. (IMP) सांगा फक्त..'' कारण ते अधिक आवश्यक आहे. स्कोअरिंग काय आहे ते बोला. आणि म्हणूनच दहावीनंतर मुलं आवश्यक मराठी हा विषय सोडून संगणकशास्त्र, माहिती तंत्रज्ञान हे विषय निवडतात, कारण त्यात दोनशे गुण आहेत. सोबत जीवशास्त्र आणि मराठी या दोन विषयांना सुट्टी. शिवाय शंभर माक्र्स प्रात्यक्षिकांवर... अहो, बारावीत टक्केवारी वाढते ना!

गेल्या वीस वर्षांत शिक्षणातली प्रगती पाहिली, तर आपण फक्त ट्रेंड सेट केले आहेत. आधी विज्ञान शाखा - डॉक्टर्स किंवा इंजीनिअर्स यांच्यासाठी. नंतर वाणिज्य शाखा - त्यात सीए किंवा एम.बी.ए.साठी आणि आता कला शाखा सनदी सेवेसाठी.

यात सर्वच शिक्षणशाखांमध्ये शिकणारा 98% विद्यार्थिवर्ग हा फक्त यंत्रासारखा मार्कांच्या शर्यतीत धावतो. त्याची गुणपत्रिका उत्तम आहे, मात्र त्याला वाचनाचा गंध नाही.

महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे यांनी या वर्षी वाङ्मय पुरस्कारांसाठी वर्षभरात प्रकाशित झालेल्या उत्तम पुस्तकांची नावं साहित्य प्रकारानुसार वाचकांकडून मागवली होती. त्याचा निष्कर्ष असा आहे की ललित साहित्य किंवा कविता, कादंबरी यांच्या वाचनापेक्षा माहितीपर पुस्तकांचं वाचन जास्त होतं. अर्थात हे सर्वेक्षण गेल्या वर्षभरातल्या पुस्तकांसाठी होतं. त्यामुळे हे सरसकट आजवरच्या लेखनासाठी म्हणता येणार नाही हे खरं असलं, तरी त्यातही फार स्पृहणीय चित्र असेल असं वाटत नाही.

म.सा.प.च्या मिलिंद जोशी यांनी पुढे हेदेखील सांगितलं की, ते एका नावाजलेल्या शाळेत पालकांशी आणि मुलांशी संवाद साधायला गेले असता त्यांच्या लक्षात आलं की शंभरापैकी सहा ते सात पालकांना आणि उपस्थित मुलांपैकी फक्त दोघांना पु.ल. देशपांडे हे नाव माहीत होतं. महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्त्व म्हणून आपण ज्यांचा गौरव करतो, ते नावदेखील मुलांना सोडा, पण पालकांच्याही कानांवर नसणं हे वाईट आहे. याचा विचार करत असताना मनात आलं - सध्या लोकप्रिय असलेल्या फेसबुक, टि्वटर, इन्स्टाग्रा, ब्लॉग इत्यादींमुळे वाचनावर तर परिणाम झाला नाही ना?


साहित्य वाचन कमी होतंय का? असा प्रश्न जेव्हा ज्येष्ठ लेखिका, कवयित्री डॉ. अरुणा ढेरे यांना विचारला, तेव्हा त्यांनी दिलेलं उत्तर विचार करायला लावणारं आहे. त्या म्हणतात, ''माणसांच्या आयुष्यातलं स्वास्थ्यच सध्या हरवलेलं आहे. साहित्याचा विचार केला तर असं दिसतं की कथा-कादंबरीचे वाचक कमी झाले आहेत, ललित साहित्य वाचणारा वर्ग कमी झाला आहे. कल्पनारम्य, स्वप्निल काही वाचायला माणसाच्या हाती तसा निवांतपणाच उरलेला नाही. त्यामुळे या प्रकारच्या वाचनातलं सुख अनुभवण्याची मन:स्थितीही राहिली नाही. खूप ताण वाढले आहेत, प्रश्न वाढले आहेत आणि त्याचबरोबर दुसरीकडे माहितीचा जो स्फोट होतो आहे, त्याच्याशी जुळवून घ्यायला माहितीपर लेखन अधिक आवडू लागलं आहे. जग जवळ आल्यामुळे प्रवासवर्णनं, तिथला निसर्ग, माणसं, त्यांचे स्वभाव, वैशिष्टय हे वाचायाचीही फार गरज उरली नाही, कारण आता ते स्वत:च अनुभवता येऊ  लागलं आहे. त्यामुळे या जगण्याच्या रेटयात माणसाने स्वप्न पाहण्याची ताकदही गमावली आहे असं मला वाटतं. त्यामुळे कल्पना, स्वप्न काहीही उरलं नाही. वास्तवाने माणसाला फार घेरलं आहे. त्या वास्तवातले तणाव विसरण्यासाठी त्याला आता अफूच्या गोळीसारखं लेखन आता नको आहे. एकतर त्याच्या आयुष्याचं प्रतिबिंब उमटेल असं लेखन त्याला हवं आहे किंवा मग त्या अडचणींवर मात करण्याचा उपाय सांगणारं लेखन त्याला पाहिजे आहे. म्हणून मग आजकाल 'यशस्वी व्हायचे शंभर उपाय' यासारखं लेखन अधिक आवडू लागलं आहे. माणसाला आता आदर्शवादही नको झाला आहे. माध्यमांच्या प्रभावामुळे संवादाच्या शक्यता वाढल्या आणि लेखनाविषयीचा संकोचही नाहीसा झाला. उलट त्यातून उत्तम लेखन करू शकणारी, व्यक्त करू शकणारी नवी मंडळी माध्यमाने दिली आहेत. तो एक फायदाच म्हणायला हवा.'' 


ज्येष्ठ लेखिका, कवयित्री डॉ. अरुणा ढेरे

  फेसबुकवर अनेक जण लिहू लागले आहेत. ते वाचन करणारेदेखील अनेक आहेत. विविध विषयांवर अतिशय मोकळेपणे आपली मतं हिरिरीने मांडणारी मंडळी समाज माध्यमांवर उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणे आवडते कवी, गीतकार, लेखकदेखील आहेत. त्यांच्याशी संपर्क सोपा झाला आहे. मात्र सोळा ते पंचवीस हा वयोगट इथेही कॉपी-पेस्टचा सोपा पर्याय वापरताना दिसतो. फॉरवर्ड करणं हा नवा शब्दप्रयोग झपाटयाने लोकप्रिय होऊ  लागला आहे. जो मजकूर उपलब्ध आहे, तो फक्त इथून तिथे पाठवायचा. कारण इथेही सगळं आयतं मिळू लागलं आहे.

उत्तम लेखनासाठी जसा जीवनानुभव आवश्यक आहे, त्याकडे बघायची दृष्टी गरजेची आहे, त्याचप्रमाणे पूर्वसुरींचं आणि सांप्रतच्या काळात सुरू असलेलं लेखन वाचणं हीसुध्दा जबाबदारी आहे याचं भान किती जणांना आहे? लहानपणी चांदोबा नावाचं मासिक यायचं. त्यात दाक्षिणात्य चेहरे आणि पोषाख असलेली सुंदर चित्रं असायची. विक्रम-वेताळाची कथा असायची. ती कथा वाचताना पात्र, घटना यांची कल्पना करणं, ते दृश्य डोळयांसमोर आणणं, तीच कथा नंतर आपल्या भावांना किंवा मित्रांना सांगणं यात वाचन, कल्पनाविस्तार, निवेदन, कथन या सर्वच कौशल्यांचा आपोआप विकास व्हायचा. ते सोडाच, आज किती घरात 'अति तिथे माती', 'शहाण्याला शब्दांचा मार', 'आधीच उल्हास..' यासारख्या किंवा नेहमी कानांवर येणाऱ्या इतर म्हणी आणि वाक्प्रचार सहजच वापरले जातात? तर खेदाने नाही म्हणावं लागेल.

पासष्ट, एकोणसत्तर, छप्पन्न, सेहेचाळीस हे शब्द ऐकून मुलं भूत पाहिल्यागत चेहरा करतात. त्यांना ते सिक्स्टी फाइव्ह, फिफ्टी सिक्स असं सांगायचं आणि वरून 'त्याला मराठी अजिबात जमत नाही' असं स्वत:च हसत सांगायचं, यात भूषण काय आहे?

 

 

इंग्लिश भाषा ही जगाची भाषा आहे. त्यामुळे पुढच्या प्रगतीसाठी ही भाषा आत्मसात करणं अगदी आवश्यक आहे. पण इंग्लिशमधलंही किती उत्तम साहित्य मुलांनी वाचलं आहे किंवा ती वाचतात? ती संख्या तरी समाधानकारक आहे का? भाषा - मग ती कोणतीही असो, त्यातलं सकस साहित्य मुलांनी वाचायला हवं, हा आग्रह वाढावा. त्यामुळे आज आपल्याला खूप आवश्यक झालेल्या अनेक भावनांची गरज सुलभ होईल. तिचा दुष्काळ दिसणार नाही. एकेकटी मुलं हिंस्र, स्वार्थी, स्वकेंद्रित होत आहेत त्यांना शेअरिंगसाठी आभासी जगाचा आणि आयत्या शब्दांचा नव्हे, तर स्वत:च्या भावनांचा आणि शब्दांचा आधार घेता यायला हवा. त्यासाठी हे आवश्यक आहे.

मुलांचा वाचनाकडे ओढा वाढावा यासाठी आधी घरातून आणि त्यानंतर पाठयपुस्तकातून प्रयत्न व्हावेत. मुलाचा कल ओळखून त्याला त्या पध्दतीचं, आवडीचं पुस्तक उपलब्ध करून देता यायला हवं. अगदी ई-बुक दिलंत तरी चालेल.

आता असं दृश्य आहे की सकाळी घाईत आवरून बाहेर पडल्यावर थकून घरी आल्यावर जरा मन रमवायला टीव्हीपासून बातम्या, वृत्तपत्रं, सिनेमा गाणी, अगदी ध्यानधारणासुध्दा मोबाइलवर उपलब्ध आहे. त्यातून ताण खरंच कमी होतो की वाढतो याचा विचारही आपण करायचा आहे. आपणच त्यांना देखणी स्वप्नं द्यायला हवी आहेत.

नाहीतर या माहितीच्या ज्ञानाच्या स्फोटात, काळाच्या वेगाने धावताना माणसाच्या हातून सगळं सुटून निसटून जाईल आणि तो पूर्ण एकटा होईल. (ही एकटेपणाची सुरुवात झाली आहेच.) कमाल देसाई यांची एक सुंदर कथा होती - 'माणसाची गोष्ट'! कधीकधी वाटतं, पृथ्वीवरून प्रेम, माया, स्वप्नं, बंध यासारखं सगळं उत्तम सावकाश नष्ट करून फक्त रूक्षपणा पसरवला म्हणून त्याच्यावर खटला भरला जाईल आणि त्याला पृथ्वीवरून निघून जावं लागलं, तर? याचा विचार कधी येतो का माणसाच्या मनात? काही कळत नाही!

पण काहीतरी मनात सलत राहतं! सगळं उपलब्ध आहे, हाताशी आहे तरीही काहीतरी निसटून जातंय, या विचाराने उदास वाटत राहतं हे नक्की! पण ती उदासीनता झटकून आपणच प्रयत्न करत राहायला हवेत. आपलं जगणं समृध्द करणाऱ्या, त्याकडे वेगळया कोनातून पाहायला शिकवणाऱ्या, आयुष्य सुंदर आहे हे सांगणाऱ्या सकस आणि समृध्द ग्रंथ परंपरेकडे, साहित्याकडे मुलांचा ओढा वाढेल अशा कृती व्हायला हव्यात. ते प्राणवायूइतकंच आवश्यक आहे हे नक्की!

[email protected]

9822324151