जगाना देश है अपना

 विवेक मराठी  16-Jun-2018

महाराष्ट्रातील कोकण, पश्चिम महाराष्ट्र, देवगिरी आणि विदर्भ या चारही प्रांतातील संघ शिक्षा वर्ग पूर्वनियोजित वेळापत्रकाप्रमाणे यशस्वीरीत्या पार पडले. संख्यात्मक आणि गुणात्मकदृष्टया चारही वर्ग यशस्वी ठरले. त्याचबरोबर क्षेत्राचा द्वितीय वर्ष संघ शिक्षा वर्ग बडोदा येते संपन्न झाला. या सर्वच वर्गासंबंधींचा वृत्तान्त

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यपध्दतीत प्रशिक्षण वर्गांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. संघकार्याच्या सातत्याचे, नित्यत्वाचे यातच गमक आहे. साधारणपणे पहाटे साडेचार ते रात्री सव्वादहा या कालावधीत संघस्थानावरचे एकात्मता स्तोत्र-मंत्र, शाखा, प्रार्थना, सकाळ-संध्याकाळचे दंड-नियुध्दादी शारीरिक कार्यक्रम, सूर्यनमस्कार, योग, खेळ, सेवासाधना आणि वर्गस्थानातील चर्चा, स्वाध्याय, संवादसत्रे, बौध्दिक वर्ग, शिक्षणार्थी सहभागाचे कार्यक्रम अशा संघाच्या सामूहिक संस्काराच्या दोन धारा, त्याचे प्रभावी संचालन/नियोजन करणारे शिक्षक आणि त्यासाठी लागणारी सर्व व्यवस्था आत्मीयतेने उभी करणारा-चालविणारा, कशालाही कधीही नाही न म्हणणारा व्यवस्थेतील कार्यकर्त्यांचा समूह हे आणि असेच चित्र देशभर सर्वत्र वर्षानुवर्षे दिसून येते.

प्रतिवर्षी योजना आणि परिश्रम यांच्या आधाराने संघकार्याची वृध्दी होते आहे आणि त्याचे प्रतिबिंबच या संघ शिक्षा वर्गातील स्वयंसेवकांच्या वाढत्या संख्येतून प्रत्ययास येताना दिसते. या वर्षीही देशभर अशा वर्गांचे आयोजन केले गेले. आपल्या महाराष्ट्र राज्यातील संघाच्या कोकण, पश्चिम महाराष्ट्र, देवगिरी आणि विदर्भ या संघाच्या चारही प्रांतांत संघ शिक्षा वर्ग संपन्न झाले. 

या वर्षी कोकण प्रांताचा प्रथम वर्षाचा वर्ग दि. 12 मे ते 2 जून या कालावधीत गोवा विभागात - म्हणजेच गोवा राज्यात खांडेपार, फोंडा येथील मातोश्री इंदिराबाई खांडेपारकर प्रशालेत आयोजित करण्यात आला होता. या वर्गात उमेश कुलकर्णी (कल्याण जिल्हा संघचालक) यांनी सर्वाधिकारी, तर सुनील पाटील (कुलाबा जिल्हा कार्यवाह) यांनी कार्यवाह म्हणून काम पाहिले. कोकण प्रांतातील मुंबई महानगरासह अन्य सर्व जिल्ह्यांतून 238 शिक्षणार्थी वर्गात सहभागी झाले होते. वर्गात प्रारंभीच अखिल भारतीय प्रचार प्रमुख अरुणकुमारजींचा तीन दिवस प्रवास झाला आणि सर्व शिक्षणार्थींना त्यांच्या बौध्दिक वर्गाबरोबरच सहवास आणि अन्य बैठका, अनौपचारिक गप्पागोष्टी यांचा लाभ मिळाला.

चढत्या तापत्या उन्हाळयात दोन-तीन वेळा पावसाच्या सरींनी वातावरण सुखद केले. नेटके नियोजन करणाऱ्या व्यवस्था विभागाला, तसेच शाळेच्या उत्तम, विस्तीर्ण संघस्थानाला त्याचे श्रेय द्यायला हवे. अतिशय सूक्ष्म, पण कुठेही पाणी साचू न देणारा उतार असल्याने शिक्षार्थ्यांचे एकही संघस्थान चुकले नाही आणि त्यामुळे सर्व अभ्यासक्रम सहज पूर्ण झाला. वर्गात बौध्दिक वर्गासाठी आणि विविध सत्रांसाठी प्रांत आणि क्षेत्र कार्यकर्त्यांचाही प्रवास झाला. वर्गाच्या प्रकट समारोपात समरसता गतिविधीचे अखिल भारतीय सहसंयोजक रवींद्रजी किरकोळे यांच्या मार्गदर्शनाचा लाभ मिळाला.

 

पश्चिम महाराष्ट्र प्रांताचा वर्ग इचलकरंजी येथील गोविंदराव प्रशाला आणि कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रशस्त संकुलात झाला. वर्गाचे सर्वाधिकारी कोल्हापूरचे शहर संघचालक डॉ. सूर्यकिरण वाघ, तर कार्यवाह पुणे जिल्हा सहकार्यवाह चंदूभाऊ पाठक होते. वर्गात अ.भा. शारीरिक शिक्षण प्रमुख सुनीलराव कुलकर्णी यांच्या प्रवासात बौध्दिक वर्ग, जिज्ञासा समाधान, अनौपचारिक बैठका, संवाद असे विविधांगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. बौध्दिक वर्गासाठी आणि अन्य सत्रांसाठी प्रांत आणि क्षेत्र कार्यकर्त्यांचेही प्रवास झाले. पाऊस आणि वादळामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीला सर्व कार्यकर्त्यांनी तोंड दिले. वर्गाच्या प्रारंभीच आलेल्या या अस्मानी आपत्तीची आलेल्या शिक्षणार्थी बंधूंना कमीत कमी झळ लागावी, यासाठी मोठया धैर्याने तोंड देत व्यवस्था विभागाने सर्व व्यवस्था तीनेक दिवसांत पूर्ववत सिध्द केल्या. अस्मानी आपत्ती आणि तिचे त्वरेने केलेले निवारण ही घटना त्या परिसरातील समाजात कुतूहलाचा आणि कौतुकाचा विषय नसती झाली, तरच नवल.

या वर्गात 3 शेतकरी,  52 स्वतंत्र व्यावसायिक, 27 नोकरी करणारे असे 82 व्यावसायिक तरुण आणि 17 पदव्युत्तर, 5 तंत्रशिक्षण घेणारे, 62 उच्च महाविद्यालयीन, 73 कनिष्ठ महाविद्यालयीन, तर 53 शालान्त परीक्षा दिलेले असे 209 विद्यार्थी तरुण अशा एकूण 291 तरुणांनी प्रथम वर्षाचे प्रशिक्षण घेतले.

श्रीगोंदा येथील एका शिक्षणार्थी स्वयंसेवकाचा या वर्गातील सहभाग हा खरे तर एका प्रेरक कथेचा विषय होऊ  शकतो.

पश्चिम महाराष्ट्र प्रांताची वर्गपूर्व तयारीसाठीची बैठक आणि शिक्षक वर्ग पुण्याजवळ वानवडीला एका सेवा प्रकल्प केंद्रस्थानी झाला. दिव्यांगांच्या कौशल्य विकासासाठी कार्यरत या केंद्रात असलेल्या या मूळ श्रीगोंदा येथील खांद्यापासून एक हात गमावलेल्या स्वयंसेवकाने तो वर्ग पाहून औत्सुक्याने आणि आग्रहाने शिक्षकांकडे, ''मी हा वर्ग करू शकतो का?'' अशी विचारणा केली. शिक्षकांनी त्याच्याशी बोलणे केले, अन्यथा शारीरिक क्षमता पाहिली आणि अनुमती दिली. इथेच हा प्रेरक घटनाक्रम थांबत नाही, तर या स्वयंसेवकाने एकही संघस्थान न चुकवता दंडासह सर्व शारीरिक अभ्यासक्रम झटून पूर्ण केला. तोही इतक्या सहजतेने की वर्गातील त्याचे अस्तित्व सर्वांमध्ये असे मिसळून गेले की हेतुत: लक्षपूर्वक त्याची वेगळी दखल घ्यावी लागली.

देवगिरी प्रांताचा प्रथम वर्षाचा वर्ग हिंगोली येथे आयोजित करण्यात आला होता. या वर्गात 164 शिक्षणार्थी सहभागी झाले होते. या वर्गाचे सर्वाधिकारी म्हणून संभाजीनगर ग्रामीण जिल्हा संघचालक बाळासाहेब चव्हाण यांनी काम पाहिले, तर वर्गकार्यवाह म्हणून किनवट जिल्हा कार्यवाह कमलाकर दिकतवार यांनी जबाबदारी पार पाडली. या वर्गात रवीजी किरकोळे व अशोक बेरी या अखिल भारतीय आधिकाऱ्यांचा प्रवास झाला. वर्गाच्या प्रकट समरोपात कदायु विकास प्रकल्पाचे सहसचिव डॉ. रामदास भांडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. प्रांत सहकार्यवाह विलास दहिभाते यांनी या वर्गाचा समारोप केला.

विदर्भ प्रांताचा प्रथम वर्षाचा वर्ग यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस येथील ईश्वर देशमुख सैनिकी शाळेच्या विस्तीर्ण संकुलात झाला. यवतमाळ हा जिल्हा तसा विदर्भ प्रांतातील सीमावर्ती जिल्हा. त्यातच दिग्रस हे रेल्वेच्या नकाशावर नसलेले स्थान. वर्गस्थानाला नजीकचे रेल्वे स्थानक अकोला हे जवळपास शंभर कि.मी. दूर असलेले गाव असले तरी सर्व जिल्ह्यांतून वर्गासाठी 311 शिक्षणार्थी आले होते. त्याशिवाय वर्गस्थान, निवास, संघस्थान हे सर्व घटकही संघ शिक्षा वर्गाची परिणामकारकता वाढविणारेच होते. शांत, व्यापक परिसर, विस्तीर्ण संघस्थान, मोकळा, दगदगीपासून, आवाजांपासून दूर असलेला परिसर मनाला प्रसन्नता व ताजेपणा देणारा होता. मा. चंद्रशेखरजी राठी हे मा. सर्वाधिकारी होते, तर मा. श्रीधरराव कोहरे या वर्गाचे कार्यवाह होते. अ.भा. व्यवस्था प्रमुख मा. मंगेशजी भेंडे यांनी वर्गाला भेट दिली. अ.भा. कार्यकारिणी सदस्य मा. सुहासराव हिरेमठ यांचा प्रवास या वर्गासाठी झाला. त्यांचा बौध्दिक वर्ग आणि जिज्ञासा समाधान, विविध गटांच्या बैठका असे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. त्याशिवाय बौध्दिक वर्गासाठी आणि अन्य सत्रांसाठी या वर्गात प्रांत आणि क्षेत्र कार्यकर्त्यांचेही प्रवास झाले. या प्रांतात बंजारा समाजाची खूप मोठी संख्या आहे. या समाजाचे आध्यात्मिक गुरू पूजनीय राठोडजी महाराज यांनी या वर्गाला भेट देऊन संघाच्या समरसतेच्या वाढत्या कार्याची माहिती घेत शुभकामना दिल्या. या वर्गात बंजारा समाजातील परंपरा आणि संस्कृतीचे दर्शन घडविणारा एक कार्यक्रमही शिक्षणार्थी स्वयंसेवकांनी सादर केला.

या वर्षी आपल्या पश्चिम क्षेत्राचा द्वितीय वर्षाचा सामान्य वर्ग वडोदरा येथे झाला. तिथे महाराष्ट्रातील चार प्रांतांतून 288, तर गुजराथ प्रांतातून 118 शिक्षणार्थी सहभागी झाले होते. कोटा येथे झालेल्या विशेष द्वितीय वर्गातही महाराष्ट्रातील चारही प्रांतांतून 40-65 वर्षे या वयोगटातील शिक्षणार्थी सहभागी झाले होते.

नागपूर येथील तृतीय वर्षाच्या वर्गात महाराष्ट्रातील चार प्रांतांतून 65 शिक्षणार्थी सहभागी झाले होते. विविध वृत्तवाहिन्यांनी या वर्गाचा समारोप प्रत्यक्ष दाखविल्यामुळे सर्व समाजाला पाहता आला. प्रात्यक्षिकांपासून शाखा आणि प्रमुख अतिथी मा. प्रणव मुखर्जी आणि परमपूजनीय सरसंघचालकांचे भाषणही सर्वांनी ऐकले.

प्रतिवर्षानुसार सर्व वर्ग झाले. वाढत्या संख्येने झाले. एक नवा उत्साह घेत कंठस्थ केलेले 'स्वयं अब जागकर हमको, जगाना देश है अपना' हे वर्गगीत हृदयस्थ करीत आपापल्या कार्यक्षेत्रात हे
शिक्षणार्थी तरुण कार्यरत होतील.

 

तृतीय वर्षाच्या समारोपातील प.पू. सरसंघचालक मोहनजी भागवत यांच्या पाथेयातील हे शब्द वर्गाचा उद्देश मनावर बिंबविणारे आहेत. म्हणूनच त्याचे अंशत: पुन:स्मरण....

''1925मध्ये संघ सुरू झाला. हळूहळू वाढत गेला. सगळे आघात सोसून, सगळया बाधा पार करत वाढत गेला. हळूहळू संघाने प्रतिकूलतेला स्नेहात परिवर्तित केले.

आम्हाला पुढे जायचे आहे. आम्हाला विश्राम करावयाचा नाही. त्यासाठी सातत्याने जी कार्यकर्ता निर्माणाची प्रक्रिया चालते, त्यास अनुसरून ही प्रक्रिया चालविणाऱ्या कार्यकर्त्यांचे प्रशिक्षणही दर वर्षी होते. आपला खर्च करून प्रशिक्षणार्थी येतात. सगळेच प्रशिक्षणार्थी आर्थिकदृष्टया संपन्न नाहीत. प्रांताच्या वर्गातही आणि या वर्गातही असे लोक भेटतात. शुल्क गोळा करणे, प्रवासखर्च करणे यासाठी दोन-तीन महिने कष्ट करून, पैसा गोळा करून या वर्गाचे शुल्क भरून येथे येतात. यातून त्यांना काही मिळणार नाही. हे कार्य करून यांना धन्यवाददेखील मिळत नाहीत आणि ही सवयही लावली जाते की, कोणतीही अपेक्षा करू नका! सत्कार्य करा अन् विसरून जा!

 ते जेव्हा वर्गाला येतात तेव्हा जे आजवर पुस्तकांत वाचले होते, बौध्दिकांत ऐकले होते, सभोवताली ऐकत होते, यांची प्रत्यक्ष अनुभूती येथे ते प्राप्त करतात. विविध स्वभावांचे, विभिन्न अर्थिक स्थितीतील, विभिन्न भाषा, प्रांत, जाती, उपजातींचे असंख्य अपरिचित लोक पहिल्या दिवशी येतात आणि ज्या दिवशी जाण्याची वेळ येते, तेव्हा डोळयांत अश्रू असतात. एकमेकांची भाषा एकमेकांना समजली नाही, मात्र आत्मीयता अशी झाली की वाटते - दुरावा नसावा. सगळा भारत आपला आहे, ही अनुभूती धारण करतात. मनात एक नवी ऊर्जा घेऊन डोळे आणि कान उघडे ठेवून समाजात जाताना आणि समाज पाहताना त्यांचे पुढील प्रशिक्षण होते. हे संघाचे कार्य आहे.''

 प्रमोद बापट

9821979871

 सा. विवेकच्या फेसबुक पेजवर लेख पोस्ट करण्यास सुरवात करत आहोत. सा. विवेकच्या सर्व वाचकांना विनंती आहे की, त्यांनी खालील पेज क्लिक करून
 https://www.facebook.com/VivekSaptahik/
मग like करावे म्हणजे त्यांना विविध लेख वाचण्यास मिळतील.
https://www.facebook.com/VivekSaptahik/