'प्राणिमात्रांविषयी विवेकबुध्दी राखा'' - गिरीशभाई शाह

 विवेक मराठी  19-Jun-2018

आपण ज्या संस्थेचे सदस्य म्हणून नियुक्त झाला आहात, त्या संस्थेविषयी थोडक्यात माहिती द्यावी.

'भारतीय जीवजंतू कल्याण बोर्ड' हे या संस्थेचे  नाव आहे. प्रत्येक जीवाप्रति दया आणि सन्मान ठेवायला भारतीय संविधानातच सांगितले आहे. त्यानुसार संसदेत 1960मध्ये प्राणिमात्रांवरील भूतदयेसंदर्भातील कायदा करण्यात आला. त्या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी मद्रासमध्ये या संस्थेची स्थापना झाली. सर्व प्राणिमात्रांच्या जिवाचे रक्षण हा या संस्थेचा मुख्य उद्देश आहे.

जीवदया शब्दाच्या अर्थाची व्याप्ती किती आहे?

विज्ञानाच्या दृष्टीकोनातून प्रत्येक जीव समान आहे. जन्मलेला प्रत्येक जीव आपल्या पूर्ण ताकदीनिशी जगण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु मनुष्यजात अन्य जिवांवर अत्याचार करत असते. निसर्गातील प्रत्येकाविषयी मनात प्रेमभाव उत्पन्न झाला, तरच जीवदया हा हेतू साध्य होईल.

या संस्थेच्या माध्यमातून कशा प्रकारची कामे केली जातात?

हे काम दोन स्तरांवर चालते. प्रत्येक राज्यात State Animal Welfare Board कार्यरत आहे. District Society for Prevention of Cruelty to Animals (DSPCA) याद्वारे काम केले जाते. अशी ही कामाची साखळी आहे. गावातील प्रत्येक व्यक्तीला या कामात जोडून हे काम केले जाते. प्राणिमात्रांचे रक्षण हा हेतूच या कामामागे असतो.

आतापर्यंत केलेल्या कामाचा समाजावर काय सकारात्मक परिणाम झाला?

प्राण्यांच्या रक्षणासंदर्भात चर्चा, विचारविनिमय करून नीतिनियम बनविले जातात आणि भारत सरकारकडे प्रस्ताव दिला जातो. प्राणिमात्रांवर अत्याचार होऊ नयेत यासाठी दक्ष राहणे हा या बोर्डाचा मुख्य उद्देश आहे आणि तो बऱ्याच अंशी साध्यही होत आहे. उदा., अलीकडचा जलीकट्टूचा प्रश्न.

बोर्डचे सदस्य म्हणून आपल्याकडे जबाबदारी आल्यानंतर  आपण काही बदल केले आहेत का?

बोर्डचे सदस्य म्हणून 3 मार्च 2017पासून माझ्यावर जबाबदारी देण्यात आली. माझ्या जबाबदारीची पूर्ण जाणीव ठेवून मी हे काम करत आहे. यापूर्वी ऑफिस चेन्नई येथे होते, आता ते दिल्लीमध्ये आले आहे. सरकारनेसुध्दा आम्हाला याबाबत चांगले सहकार्य केले. दिल्लीमध्ये ऑफिस आल्यामुळे केंद्र सरकारशी आमचे चांगले संबंध प्रस्थापित झाले. प्राणिमात्रांच्या संदर्भातील बरेच विषय लवकर निकाली काढणे शक्य झाले. यापुढे भारताच्या प्रत्येक जिल्ह्यात animal welfare officer नियुक्त करण्याची आमची इच्छा आहे. प्रत्येक राज्याचे राज्य संपर्क अधिकारी नियुक्ती करणार आहोत. पूर्ण भारतभर प्राणिमात्रांसाठी चांगले नीतिनियम, व्यवस्था तयार करण्यासाठी आणि त्यांची चांगल्या प्रकारे अंमलबजावणी करून प्राणिमात्रांच्या कल्याणासाठी काम करणार आहोत.

पूर्वीच्या आणि आताच्या कामात काय अंतर आहे?

इथे यापूर्वीही त्याच तळमळीने कामे होत होती. आता अनेक सक्रिय सदस्य सहभागी झाल्यामुळे कामात गती निर्माण झाली आहे. प्रत्येक राज्याशी संपर्क वाढलेला आहे. प्रत्येक राज्याच्या मुख्यमंत्र्याशी याबाबत चर्चा होत आहे. प्राणिमात्रांचे रक्षण कायद्यांतर्गत व्हायला पाहिजे. अनेक क्षेत्रांतील माणसे या कामाशी जोडली गेली आहेत. तसेच बोर्डाचे चेअरमन एस.पी. गुप्ता, राकेश गुप्ता आदी सदस्यही कार्यरत आहेत.

बोर्डच्या माध्यमातून आपण भव्य संमेलनाचे आयोजन करता, त्याचे स्वरूप आणि उद्देश काय आहेत?

प्राणिमात्रांवरील अत्याचार थांबविणे आणि त्याबद्दल जागृती करणे हा जीवदया संमेलनाचा मुख्य उद्देश. या संमेलनात दिवसभर या विषयावर अभ्यासपूर्ण चर्चा केली जाते. या संमेलनामुळे व्यापक प्रमाणात प्राणिमात्रांविषयी जागृती झाली. आपलेपणाचा भाव निर्माण झाला.

विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या वाढत्या वापराचा समाजावर कसा परिणाम होतो?

विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या वाढत्या प्रभावामुळे कृषी क्षेत्रात आणि दळणवळणाच्या क्षेत्रात प्राण्यांचा वापर नामशेष होत चालला आहे. त्याचे दुष्परिणाम समाज भोगत आहे. वाढते प्रदूषण, जीवसाखळीचा ऱ्हास या गोष्टी दुष्परिणाम म्हणून पाहायला मिळत आहेत. आधुनिकतेच्या नावाने आपणच आपले नुकसान करून घेत आहोत, हे विसरलो आहोत. प्रत्येक गोष्टीत 'विवेक' महत्त्वाचा, सदसद्विवेकबुध्दी जागृत ठेवून कुठलेही काम करणे आवश्यक आहे. सा. विवेकच्या माध्यमातून मी वाचकांना निवेदन करतो की, प्राणिमात्रांविषयी प्रेम, सद्भाव राखून या कामात सहभागी व्हावे.

आपण प्राणिमात्रांविषयी आपुलकी असलेले आहात. याच विषयातील काम करण्याची संधी आपल्याला मिळाली. याबाबत आपली भावना काय आहे?

या कार्यात मी वीस वर्षे आहेच आणि भारत सरकारसाठी अधिकृतरित्या हेच काम करण्याची संधी मिळाली. यामुळे मी स्वतःला नशीबवान समजतो. हे काम माझ्या हातून चांगले व्हावे यासाठी मी संपूर्णपणे प्रयत्नशील राहीन.

अमोल पेडणेकर

9869206106