"चला पर्यावरण वाचवूया..."

 विवेक मराठी  02-Jun-2018

"बिट द प्लॅस्टिक  पोल्युशन " असं घोषवाक्य घेऊन साजरा होणारा यावर्षीचा जागतिक पर्यावरणदिन जवळ आलाय. सत्तरच्या दशकात जगभर जनतेने जनतेसाठी सुरु केलेली जनतेची चळवळ वीस वर्षांनी १९९२साली पृथ्वी परिषद बनून स्थिरावली. १९६८ पूर्वी जैविक वैविध्यता म्हणजेच बायोडायव्हर्सिटी  हा शब्द फार वापरला जायचा नाही. जैविक वैविध्यता हा शब्द सर्वप्रथम अमेरिकन वन्यजीव शास्त्रज्ञ आणि निसर्ग अभ्यासक रेमंड दासमान यांनी वापरला आणि जगाला निसर्गाच्या अद्धभुत जाळ्यात प्रत्येकाचं एकमेंकांशी सरपटणारं, धावणारं उडणारं आणि रुजणारं घट्ट नातं विणलेलं असतं याची जाणीव करून दिली गेली. जैविक वैविध्यतेच्या या वैविध्यपुर्ण विणीने निसर्ग विविध स्तरांवर समृद्ध झालेला असतो. झाडं, पानं, फ़ुलं , फ़ळं, पक्षी, प्राणी, किटक, जीवजंतूंसोबत आपण हवा पाणी आणि जमिनीशी आश्चर्यकारकरित्या जोडले गेलो आहोत. हे जीवो जीवस्य जीवनम सांगणारं अद्दभूत सृष्टीभांडार या पर्यावरणीय चळवळीमुळे सर्वसामान्य माणसांना दरवर्षी अधोरेखित करून सांगितलं जातं . वसुंधरादिन असो की जागतिक पर्यावरणदिन असो, अशा चळवळींद्वारे  दैनंदिन जीवनात पर्यावरणाला ग्रासणाऱ्या समस्यांबद्दल आंतरराष्ट्रीय स्तरावर वाचा फोडली जाऊन त्या समस्येचे निराकरण करण्यासाठी प्रयत्न केले जातात. यातील बहुतांश समस्या मानव निर्मित असून हवा पाणी आणि जमीन यावर प्रभाव करणाऱ्या आहेत . पर्यावरणदिनाच्या गेल्या त्रेचाळीस वर्षांच्या इतिहासात  मानवाच्या प्रगतीमुळे पृथ्वीला निर्माण झालेल्या पर्यावरणीय समस्या निसर्गाच्या जाळ्यासारख्याच एकमेकांमध्ये गुंतलेल्या आहेत हे सातत्याने नोंदवलं गेलय. या समस्यांवर शोधलेले उपाय अयोग्य पद्धतीने राबवले जातात आणि त्यातूनच नवीन समस्या समोर ठाकतात  हेही गेल्या काही वर्षात जाणवायला लागलय. मुळात एखादी समस्या निर्माण झालीय आणि तिचं निराकारण शास्त्रीय पद्धतीने  करणं गरजेचं आहे हे समजेपर्यंत त्या समस्येने उग्र रूप धारण केलेलं असतं .  दुर्दैवाने आज बहुतांश ठिकाणी हेच सुरु असून पर्यावरणाच्या प्रत्येक घटकाला याचा फटका बसतोय.  ७०च्या दशकात सुरु झालेल्या यांत्रिकीकरणाचा फटका निसर्गातल्या अनेक घटकांना बसायला सुरुवात झाली होती.  कुठे रसायनांची तर कुठे तेलाची गळती होऊन स्थानिक परिसरावर दूरगामी दुष्परिणाम होत होते. कुठे पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई निर्माण होत होती तर कुठे जमिनीची बेसुमार धूप होऊन परिसर आपलं मूळ रूप सोडायला लागला होता. जगाला   मोठे ओले आणि कोरडे दुष्काळही पचवायला लागले होते. दररोज नष्ट होणारी जंगलं आणि नामशेष  होणारी त्यातली जीवसृष्टी यांचा चढता आलेख छाती दडपवून टाकणारा होता. अमेरिकेतल्या विस्कॉन्सिन राज्यात स्थानिक सिनेटर गेलॉर्ड नेल्सन या घडामोडींमुळे  अस्वस्थ झाले.  त्यांनी सामान्य जनतेच्या मदतीने  पर्यावरण चळवळ उभी करायचं ठरवलं. १९७० साली  २२ एप्रिल या दिवशी भविष्यातले नागरिक, अर्थात हजारो विद्यार्थी एकत्र येऊन जनतेच्या पर्यावरण चळवळीची सुरुवात करतील असं ठरलं.  या निर्णयाचं स्वागत करत, उतरले आणि जनतेने सुरु केलेल्या पर्यावरणरक्षण चळवळीची सुरुवात झाली. १९७०साली सुरु झालेली ही चळवळ थोड्याच काळात अनेक देशांमध्ये पसरून कोटयावधी  लोकं  यात सहभागी होऊन पर्यावरणाच्या विविध प्रश्नाना मोठ्या प्रमाणात तोंड फुटलं. या घडामोडींचा उत्तम परिणाम म्हणजे लगेचच १९७२साली संयुक्त राष्ट्रसंघाच्या स्टॉकहोम येथे ५ जून रोजी झालेल्या सर्वसामान्य बैठकीत जगभर सुरु असलेल्या मानवी संवाद , एकीकरण आणि पर्यावरण याबद्दल चर्चा झाली. जगासमोरच्या पर्यावरणीय समस्या, त्यांवर एकत्रितपणे शोधायचे उपाय, करायची कृती यासाठी युनायटेड नेशन्स इन्व्हायर्मेंट प्रोग्रॅम, अर्थात युनेपची निर्मिती झाली. ५ जूनच्या या मीटिंगमध्ये जागतिक पर्यावरण दिवस साजरा करायचा निर्णय घेतल्याने याच तारखेला लगेचच १९७४ साली "Only One  Earth" या घोषवाक्यासह पहिला जागतिक पर्यावरण दिवस साजरा केला गेला. हा झाला इतिहास !

 निसर्गात माणूस तसा समुहप्रिय प्राणी समजला जातो. असा समूह्प्रिय  माणूस  एकत्र आला की वेगेवेगळे विचार, कल्पनांचा सामूहिक अविष्कार साजरा करत असतो. एखाद्या संकल्पनेला रुजवायच असेल तर ते उत्सवाच्या स्वरूपात मांडलं तर जास्तीतजास्त संख्येने मानवी समूह एकत्र येतो हा सार्वजनिक निरीक्षण अनुभव पर्यावरणदिनासाठी वापरला गेला आणि तो कमालीचा यशस्वी ठरला. या पर्यावरण उत्सवाद्वारे निसर्गातल्या प्रत्येक घटकांविषयी जागृती करायला सुरुवात झाली. पाणी, हवा , मृदा , वनसंपत्ती आणि त्यांपासून मिळणारी ऊर्जा या घटकांचा विचार आणि त्यांचे संधारण कसे करता येईल यांसाठी जगभर विचारमंथन सुरु झालं. यातूनच वेगवेगळे कृतीगट स्थापन झाले. Think globally , act  locally , अर्थात जगाचा विचार करत स्थानिक पर्यावरणासाठी काम करणं  ही काळाची गरज बनली. जगभर झालेल्या विचारमंथनातून अनेक उत्तम उपाय पर्यावरण रक्षणासाठी सुचवले गेले. मात्र हे उपाय अमलात आणताना बहुतांश ठिकाणी लोकांची पर्यावरण निरक्षरता स्थानिक पर्यावरणाला त्रासदायक ठरायला लागली. भारतासारख्या खंडप्राय देशात पर्यावरण निरक्षरता हा अतिशय स्थायीभाव असल्याचं वारंवार नजरेस पडायला लागल्यावर 'भीक नको कुत्रा आवर'च्या धर्तीवर, 'पर्यावरण ऱ्हास परवडला पण हे उपाय नको' असं म्हणायची वेळ आली आहे. आधी पर्यावरणाचा आणि जैव साखळीचा ऱ्हास करायचा आणि मग त्यावर उपाय शोधून तो अयोग्य पद्धतीने अमलात आणायचा  प्रकार गेल्या काही वर्षात आपल्याकडे होताना दिसतोय  आपल्या देशात क्रिकेट, राजकारण आणि पर्यावरण याबद्दल अधिकारवाणीने बोलायला कुठलीही पात्रता लागत नाही . कुणीही उठतो आणि हिरीरीने या विषयांवर आपली मतं  मांडतो. यामुळेच पर्यावरण निरक्षरता हा आपल्या देशाला लाभलेला मोठा शाप आहे हे सतत जाणवत राहात. वर्षानुवर्षे काही समीकरणं आपल्या डोक्यात पक्की बसलेली असतात. जसं की पाऊस पडल्यावर कांदा भजी आणि मक्याचं कणीस, जोडीला वाफाळलेला चहा हवाच. कुठलाही उत्सव साजरा करायचा म्हंटल की वाद्यांचा ढणढणाट , नाचगाणी हवीच. याच धर्तीवर पर्यावरणदिन किंवा निसर्गाचा कुठलाही दिवस साजरा करायचा असला की बाय डिफॉल्ट वृक्षारोपण करणे , पाणी   कागद  ,पर्यावरण वाचवण्याबद्दल  चित्र काढून, निबंध लिहून स्पर्धा घेणं असे प्रकार आपल्याकडे केले जातात. वर्षानुवर्षे ही आहे आपली पर्यावरणदिन साजरा करायची संकल्पना.    

 गेल्या काही वर्षात ऊर्जा संधारण, जल संधारण, मृदा संधारण हे शब्द चलनी  नाणी बनली असताना परिसर संधारण याबद्दल कुणी बोलताना दिसत नाही हे आपलं दुर्दैवच आहे. शाळेच्या भूगोल विषयात आपण पर्यावरण हा शब्द वारंवार वापरलेला असतो. या शब्दाची मोठी गम्मत असते. या शब्दात हवा, पाणी, जंगलं , पर्वत , समुद्र नद्या सगळं सगळं समाविष्ट झालेलं असतं . अभ्यासात मार्कांचं दडपण घेत हा विषय शिकला जातो आणि या विषयात सामावलेले सगळे घटक निव्वळ पुस्तकी बनून जातात.  खरं तर शाळेच्या भूगोलात पाऊस कसा पडतो याचं  शिकवलं जाणारं ते जलचक्र , पर्वतांची निर्मिती , त्यातून उगम पावणाऱ्या नद्या , त्या जिथून वाहतात तो प्रदेश, तिथल्या जमिनीचा कस, त्या नदीमुळे होणारी जमिनीची धूप, तिच्या काठावर वसलेली संस्कृती आणि तिने बनवलेली जंगलं अभ्यासाला असायचं. आपल्या अस्तित्वापाशी जोडले गेलेले हे विषय तेव्हा रुक्ष वाटून  टाळले जायचे. पर्यावरणासारखा सुरेख विषय वर्गात बसून शिकला की असा कंटाळवाणा वाटतो आणि तिथेच आपली पर्यावरण निरक्षरता जन्माला येते. माध्यमिक शिक्षणातच  वेगवेगळ्या खंडांची निर्मिती होत असताना बनलेले घडीचे पर्वत , ज्वालामुखीचे उद्रेक होऊन लाव्हा थंड होत असताना बनलेले कठीण पर्वत अभ्यासाला होते. मग आठवत की  पृथ्वीवरच्या २९% जमिनीपैकी २५% जमीन पर्वतांनी व्यापली आहे. ते वेगवेगळे खंड , त्यातली निसर्ग संपदा वगैरे सगळं आठवतच आणि परिसरात दिसणाऱ्या साध्या गोष्टींत दडलेलं आपलं पर्यावरणाचं अज्ञानही जाणवायला सुरुवात होते.   हे खंड बनत असताना तिथले प्राणी, झाडं तिथल्या स्थानिक पर्यावरणात अगदी सहजतेने मिळून मिसळून गेलेले असतात. त्यांची आणि तिथल्या पर्यावरणाची एक अदभूत साखळी बनलेली असते. ही साखळी बनवायला, सुरळीत होण्यामागे  निसर्गाची हजारो वर्षांची निर्मिती तपस्या असते. या साखळीतील एखादी गोष्ट त्याच ठिकाणी का असावी या गोष्टीमागे निसर्गाची  हजारो वर्षांची उत्क्रान्ती आणि आपापसातलं सहचर्य व्यवस्थित रुजलेलं असतं . अचानक मनात आलं म्हणून किंवा नफ्यातोट्याचं कुठलही मानवी गणित निसर्गाने त्यात केलेलं नसत. प्रत्येक जीवाचं , झाडाचं ,  मातीचं , पाण्याचं स्थानिक निसर्गजाळ्यात एक अबाधित स्थान असतं . त्या स्थानाला दुसरा कुठलाही पर्याय निसर्गाने योजलेला नसतो. एखाद्या परिसरात एखादं झाड , त्याची फळं ,फुलं खाऊन जगणारे जीव, त्याचा आश्रय घेणारे पशु पक्षी, त्याची पानं पडून तिथल्या जमिनीवर बनणार खत , त्या झाडाने धरून ठेवलेली माती असं समृद्ध चक्र सुरु ठेवणारी लाखो झाडं असणारं  जंगल बनायला हजारो वर्षांचा काळ निसर्गाने खर्ची घातलेला असतो.   वरवर  हे सगळं अतिशय सोप्प वाटतं पण निसर्गनिर्मित जंगलांसारखी जंगल आपण बनवू शकत नाही हेच खरं .    

  

निसर्गाच्या ह्या साध्या साखळीबद्दल केलेलं हे लिखाण वाचताना कुणाला अतिशय बाळबोध वाटू शकतं. गम्मत अशी आहे की, ह्या बाळबोध विचाराकडे कायम कानाडोळा केल्याने आपल्याकडून अनेक  घोडचुका होत आहेत.निसर्गासाठी काहीतरी करायचं म्हणजे झाडं लावायची, निसर्गात गेल्यावर फळांच्या बिया फेकायच्या असली समीकरणं  प्रत्येकाच्या डोक्यात अगदी फिट बसलेली असतात .ही झाडं  लावताना किंवा घरात खाऊन साठवलेल्या फळबिया निसर्गात कुठेतरी फेकताना आपण तिथल्या स्थानिक निसर्ग जाळ्याचा विचारच केलेला नसतो. कोणत्याही ठिकाणी पाऊस, मातीचे प्रकार, जमिनीचे चढ उतार, पाण्याची उपलब्धता, इत्यादि गोष्टींवर तिथली नैसर्गिक संपदा अवलंबून असते. कुठलं झाड कुठे योग्य किंवा अयोग्य हे या गोष्टींवरून ठरत असतं .  पर्यावरणासाठी आपण काहीच करत नाही ह्या अपराधी भावनेवर सोप्पे  उपाय  म्हणून केलेलं केलेलं वृक्षारोपण किंवा बियांचं टाकणं  काहीच उपयोगचं  नसतं . आपण लावलेली झाडं आणि फेकलेल्या बिया वेगळ्या वातावरणातील झाडांच्या असतील तर त्यांचा स्थानिक  वनस्पती, प्राणी यांच्याशी काही संबंध असणार नाही. दुसरं महत्वाचं म्हणजे आपण बिया फेकून प्रजातीची फोफावून वाढ होऊन ती  वनस्पती प्रबळ झाली तर स्थानिक वनस्पती कमी व्हायला लागतात आणि निसर्ग चक्र बिघडू शकतं. या प्रकाराचं ढळढळीत उदाहरण म्हणजे पुणे मुंबई रेल्वेच्या ट्रॅकवर घाटात कुणीतरी गम्मत म्हणून टाकलेली कॉसमॉस ही फुलं. आज ही फुलं प्रमाणाबाहेर फोफावली असून स्थानिक तेरडा सारख्या काही वनस्पतींना तिथून विस्थापित व्हायची वेळ या कॉसमॉसने आणली आहे. अशी अनेक उदाहरण आपल्या परिसरात आपल्या नजरेसमोर असतात पण हे निसर्गजाळं  आणि त्याला निर्माण होणारे धोके लक्षात घ्यायला आपल्याकडे वेळच नसतो. आपल्याकडे वृक्षारोपण नामक आचरट प्रकाराखाली हजारो झाड लावली जातात या पलीकडे काहीच होत नाही. मुळात लहानसं  रोप लावलं जात, वृक्ष नाही. निसर्गात, हस्तक्षेप न केल्यास लहानशी रोपटी रुजून मोठे वृक्ष बनतात आणि संपन्न नैसर्गिक अधिवास निर्माण करतात. या निर्मितीसाठी अनेक वर्षांचा काळ निसर्गाने योजलेला असतो. मात्र वृक्षारोपणाचं संख्यात्मक उद्दिष्ट गाठताना जुलैसारख्या भर पावसाच्या महिन्यात कुठलंही नियोजन न करता, दरवर्षी मिळेल त्या जागी कसेही खडडे खोदून उपलब्ध असलेली देशी विदेशी  झाडं लावून कोटीच्या कोटी उड्डाणें साध्य केली जातात. मात्र, दरवर्षी , त्याच खड्ड्यात नवीन 'वृक्ष लागवड ' करता येते हे या सामूहिक  वृक्षलागवडीचं यश म्हणता येऊ शकत. अशा वेळेला निसर्गाच्या जाळ्याबद्दल आपलं अडाणीपण निसर्गाच्या मुळावर उठत असतं. हजारो मैल अंतरावर असलेल्या दुसऱ्या उपखंडातली विदेशी झाड भले प्राणवायू देत असतील पण त्या झाडांची पानं मातीत काही रसायनं सोडतात, त्याचा बाकी झाडांवरही परिणाम होतो. पक्षी आणि इतर जीव त्या झाडाशी संबंध ठेवत नाहीत कारण ती प्रजाती त्यांच्या नैसर्गिक अधिवासाशी संबंधित नसते. या परदेशी झाडांपासून अनेक आजारही उद्भवतात याची किती लोकांना जाणीवच नसते.  स्थानिक वृक्षसंपदा रुजत , फुलत असताना स्वतःच्या वाढीसोबत एक संपन्न परिसर निर्माण करत असते. जे अशा वृक्षलागवडीतून साध्य होत नाही.   कुठल्याही रोपटयाचं सशक्त झाड बनण्यासाठी पहिली दोन तीन वर्ष अतिशय महत्वाची असतात. जुलैसारख्या पावसाळी महिन्यात लावलेल्या या वृक्षांकडे नंतर लक्ष न देण्याकडे बहुतांश लोकांचा कल  असतो. रोपटं लावल्यावर त्याला योग्य प्रमाणात ऊन पाणी मिळणं  गरजेचं असतं  जे या काळात मिळत नाही. म्हणूनच संख्यात्मक वृक्षारोपण करणाऱ्या प्रत्येकाला त्यांनी लावलेल्या रोपट्याची पहिली तीन वर्षं काळजी घेणं सक्तीचंच केलं पाहिजे असं वाटायला लागलय.

 वर मी उल्लेखलीय ती पर्यावरण साक्षरता अशा वेळी गरजेची वाटते. वड पिंपळ, करंज खैर सारखे दणकट स्थानिक वृक्ष निगुतीने जगवले तर रेन ट्री, गुलमोहोर अकेशिया, पेल्ट्रोफोरमसारख्या झटपट वाढणाऱ्या विदेशी वृक्षांचा आधार आपल्याला घ्यावा लागणार नाही. विदेशी वृक्ष झटपट वाढतात म्हणून टाऊन प्लॅनिंगमध्ये जागा देऊन केलेलं लँड स्केपिंग असो किंवा संख्यात्मक उद्दिष्ट्य गाठणारी वृक्षारोपण असो, डावललं जाणाऱ्या स्थानिक निसर्गाला सर्वोच्च स्थानी ठेवूनच हे सगळं झालं पाहिजे. निसर्गाच्या सशक्त जैविक साखळीला अशक्त करणारा माणूस नामक एक घटक आणि घातक  प्राणी आज पर्यावरणाच्या नाशासाठी कारणीभूत ठरतोय. दररोज जगभर, श्रीलंकेच्या क्षेत्रफळाएवढं जंगल नष्ट होतंय. मानवी प्रगती ही शाश्वत न राहाता भयानक वेगाने पर्यावरणाला रसातळाला नेतेय. या झाडांचा, जंगलांचा आपल्या पाणीसाठ्यांशी अर्थाअर्थी जवळचा संबंध असतोच. जंगलांना जस हिरवी फुफ्फुसं  समजलं जातं  तसच वर्षभरासाठी पाणी शोषून घेणारा स्पंजही म्हंटल पाहिजे.  हा स्पंज त्याच्या विविध थरांसकट जपणं  अत्यंत गरजेचं असतं . विकासाच्या कामांमध्ये जमिनीच्या वरच्या थराची हवी तशी उलथापालथ करून आपण मातीचे थरच्या थर नष्ट करत असतो. वाट्टेल तिथे वाट्टेल ते लावायच्या, करायच्या आपल्या अडाणी मनमानीने हॅबिटॅट लॉस चा धोका आपणच निर्माण करतोय. आपल्या जमिनीला , पाण्याला, जंगलांना , हवेला म्हणजेच संपूर्ण परिसराला आपण धोका निर्माण करतोय. हे असं का ? हा प्रश्न जोपर्यंत आपल्याला पडत नाही आणि त्याची उत्तर शोधण्याचे कष्ट आपण घेत नाही तोपर्यंत आपल्या हातून सजग कृती घडणं  अशक्यप्राय गोष्ट वाटतेय.  

 वेगवेगळे पर्यावरणदिन साजरा करून काय मिळतं ? हा प्रश्न अनेकजण विचारतात. यावर्षी "बिट द प्लॅस्टिक  पोल्युशन "संकल्पना राबवताना   मनुष्य नामक प्राण्याने जगभर प्रदूषण करून पर्यावरणाला निर्माण केलेला धोका उच्चारवात  सांगण्याची गरज आहे. आज जगाचा कुठलाही भाग प्रदूषणमुक्त नाहीये. सर्वत्र कुठल्या ना कुठल्या स्वरूपात विघटन न होणारं प्लॅस्टिक आपल्यालाच गिळंकृत करायला बघतय. समुद्रातल्या देवमाशांच्या, जंगलातल्या हरणांच्या पोटातही प्लॅस्टिक आढळतय. हे अविनाशी स्वरूपात असल्याने मर्त्य मानवालाच याचा फटका बसायला सुरुवात झालीय. हे सगळं थांबण्यासाठी  आपण डोळसपणे प्लॅस्टिकचा वापर कारण गरजेचं आहे. प्लॅस्टिकच्या पिशव्या वापरावर आलेल्या बंदीने लोकं  नाराज झाली आहेत पण भविष्यात आपल्यालाच गिळंकृत करू पहाणारा हा भस्मासूर आपणच मिळून थांबवायचा आहे.  एका प्लॅस्टिकच्या पिशवीने काय फरक पडतोय असं म्हणत वापरून टाकलेली पिशवी एकच न रहाता लाखोंच्या संख्येत साठत रहाते. म्हणूनच ह्या भीषण समस्येला थांबवायचे प्रयत्न मी माझ्या कुटुंबापासून सुरु करेन अशी खूणगाठ मनाशी बांधायला हवी.  पर्यावरणाला वाचवण्यासाठी हातभार लावायला आज केलेली टाळाटाळ आपल्या येणाऱ्या पिढयांना प्राणघातक ठरू शकते.  या उत्सवाच्या निमित्ताने पर्यावरण साक्षरता आत्यंतिक गरजेची आहे याची जाणीव होतेय हेही नसे थोडके म्हणत परिसर संधारणासाठी  जागतिक पर्यावरणदिनाच्या कृतीशील शुभेच्छा देतेय.