लोकसहभागातून जलसंधारण -म्हाडाचा पाडा

 विवेक मराठी  23-Jun-2018

 

जलसंधारणाच्या क्षेत्रात मैलाचा दगडच ठरावा असे काम जव्हार तालुक्यात कऱ्हे गावाच्या म्हाडाचा पाडा या लहानशा आदिवासी वस्तीत झाले आहे. या कामासाठी केशवसृष्टी ग्रामविकास संस्थेने मोलाचा हातभार लावला. जलसंधारणाच्या कामासाठी त्यांनी जलतज्ज्ञ म्हणून डॉ. उमेश मुंडल्ये यांना सहभागी करून घेतलं. एकेकाळी तहानलेल्या या पाडयात लोकसहभागातून जलसंधारणाच्या कामामुळे जो बदल घडून आला आहे, त्यामुळे इतर गावांपुढे आदर्श निर्माण झाला आहे. या उपक्रमाच्या यशाची माहिती देणारा लेख.

 'तिसरं महायुध्द झालं तर ते नक्की पाण्यावरूनच होईल' असं विधान पर्यावरणविषयक कार्यक्रमांमध्ये हल्ली नियमित वापरलं जातं. दिवसेंदिवस पेयजलाची जाणवणारी कमतरता ह्या विधानाला पुष्टी देत आहे हे नक्की. शेतीप्रधान अशी ओळख असलेल्या आपल्या खंडप्राय देशात एकीकडे सुजलाम सुफलाम प्रांत आणि दुसरीकडे दुष्काळ असं चित्र नजरेस पडतंय. दर वर्षी साधारण दिवाळी झाली की पाणवठे आक्रसायला सुरुवात होते. शहरांमध्ये जाणवत नसलं, तरी गाव-खेडयांमध्ये हे आक्रसणारे पाणवठे जाणवायला लागतात. उन्हाळयाच्या तोंडावर बहुतांश उघडे पाणवठे आटून जातात आणि मग सुरू होतं टँकर राज. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईसारख्या महानगराजवळच असलेली अनेक आदिवासी गावं, पाडे, वस्त्या दर वर्षी ह्या कोरडया चित्राचा हिस्सा असतात. गावातला, वस्तीजवळचा पाणीसाठा अपुरा पडायला लागला, संपला की स्थानिकांची पाण्यासाठी मैलोनमैल तंगडतोड सुरू होते. या तंगडतोडीबरोबरच पाण्याची अर्थकारणं आणि राजकारणं रंगायला लागून आरोप-प्रत्यारोपाच्या नियमित फैरी झाडल्या जातात. मीडिया टीआरपी वाढवण्यासाठी स्थानिकांच्या दुःखाची 'पानी कम, रिप्ले ज्यादा' दाखवत राहतं. समाजमन जरासं विचलित होतं, पाऊस पडतो आणि हे सगळं विसरलं जातं. वर्षानुवर्षं हेच सुरू असून ह्यात कुठलाही आशादायी बदल होताना दिसत नाहीये. शासकीय पातळीवर हे कोरडं चित्र बदलण्यासाठी अतिशय बाळबोध आणि अनेकदा चुकीच्या पध्दतीने जलसंधारणाची काम केली जातात. अगदी सहज सांगायचं तर बहुतांश शासकीय कामांमध्ये इच्छाशक्तीच्या जोडीला योग्य नियोजनाचा आणि स्थानिक पातळीवर कार्यरत असलेल्या शिस्तबध्द कार्यकर्त्यांचा अभाव असल्याने बहुतांश उपक्रम अल्पावधीतच फसत असल्याचं चित्र हमखास बघायला मिळतं. अशा निराशाजनक पार्श्वभूमीवर, भर उन्हाळयात, एखाद्या आदिवासी पाडयावर लोकसहभागातून अतिशय शिस्तबध्द आणि शास्त्रीय पध्दतीने जलसंधारणाचे काम हाती घेतलं जातं आणि शासनाच्या सहभागाखेरीज पूर्णत्वाला नेलं जातं, हे कौतुकास्पद आहेच, तसंच जलसंधारणाच्या क्षेत्रात जणू मैलाचा दगडच ठरावा.

हा मैलाचा दगड ठेवला गेलाय जव्हार तालुक्यातल्या कऱ्हे गावाच्या म्हाडाचा पाडा या लहानशा आदिवासी वस्तीत. महानगराला पाणीपुरवठा करणारं सूर्या उर्फ धामणी धरण असलेल्या जलसंपन्न भागात, धरणापासून अवघ्या तीन किलोमीटर्सच्या परिघात नांदणाऱ्या म्हाडाच्या पाडयात नजरेसमोर अफाट जलाशय पसरलाय, पण पाण्याचा थेंबही घेता येत नाही अशी वाईट परिस्थती वर्षानुवर्षं होती. गावातल्या माजी सरपंचांच्या माहितीनुसार पूर्वी एवढी वाईट परिस्थिती होती की पाण्याची काहीच सोय नाही, यावर एक उपाय म्हणून लोकांनी रस्त्याच्या मोरीच्या (culvart) कामात काढून टाकलेला एक मोठा पाईप ढकलत गावाजवळच्या ओढयात आणून उभा केला आणि त्यात मिळणारं पाणी काही दिवस तरी वापरायला सुरुवात केली होती. असेच जेमतेम दिवस काढत असताना पुढे कधीतरी गावात एक विहीर बनवली गेली आणि पाडयाला पाणी मिळायला लागलं. गावात विहीर झाली खरी, त्याचबरोबर वाढत्या लोकसंख्येच्या जोडीने, गावात सुमारे चारशे मुलांना सामावणारी आश्रमशाळा उभी झाली आणि हळूहळू पुन्हा एकदा गाव तहानलेलं राहायला लागलं. गावाच्या आणि आश्रमशाळेच्या पाण्याच्या गरजा भागवण्यासाठी सुमारे दहा वर्षांपूर्वी शासनाच्या जलस्वराज्य योजनेत गावात आणखी एक विहीर खोदली गेली. जलस्वराज्य योजनेअंतर्गत बनवलेल्या या विहिरीमुळे, मुलांच्या भवितव्यासाठी गावकऱ्यांनी आपली जुनी नांदती विहीर मालकी हक्क सोडून आश्रमशाळेला देऊन टाकली. गावाचं दुर्दैव म्हणू या, वर्षाच्या आतच काही कारणांनी ही नवीन विहीर कोसळली आणि गावाचा हक्काचा पाण्याचा एकमेव स्रोतच बंद झाला. गावाने मालकी हक्क सोडलेल्या शाळेच्या विहिरीवर गावाला पाणी भरायला मिळायचं, पण उन्हाळयाच्या सुरुवातीस पाणी कमी व्हायचं, तेव्हा शाळाचालक गावकऱ्यांना पाणी भरायला मज्जाव करायचे आणि मग पुढचे दोन-अडीच महिने गावातल्या बायका आणि मुली पाण्यासाठी वणवण फिरायला लागायच्या.

आज राज्याच्या बहुतांश भागात उन्हाळा सुरू झाला की ही सार्वत्रिक परवड सुरू झालेली दिसते. शासकीय मदत मिळेल आणि दुष्काळ निवारण होईल, अशा भाबडया समजुतीवर अनेक दशकं काढल्यावर आलेल्या असंतोष आणि नैराश्यावर मात करण्यासाठी अशा गावांमध्ये जलसंधारणाचं भरीव काम होणं गरजेचं असतं. हे भरीव काम करायचं कुणी? हा शिवधनुष्यरूपी प्रश्न कायम असतोच.  म्हाडाचा पाडा आणि परिसरात ग्रामविकास क्षेत्रात सातत्याने काम करणाऱ्या केशवसृष्टी ग्रामविकास संस्थेने हे शिवधनुष्य पेलायचं ठरवलं आणि गावासाठी जलसंधारणाच्या कामात मदत करायचा निर्णय घेतला.

केशवसृष्टी ग्रामविकास संस्था आपल्या सातत्य आणि अभ्यासपूर्ण कामासाठी ओळखली जाणारी संस्था असल्याने जलसंधारणाच्या कामासाठी त्यांनी जलतज्ज्ञ म्हणून डॉ. उमेश मुंडल्ये यांना सहभागी करून घेतलं. जलसंधारण करताना ज्या गावासाठी काम करायचं, त्या गावाचा पूर्ण अभ्यास करून, सर्वेक्षण करून, लोकांशी बोलून आणि त्यांची गरज समजून घेऊन, गावाचं पाण्याचं बजेट मांडून मग योग्य उपाय निवडून काम करायचं अशी शास्त्रीय पध्दत अंमलात आणणारे डॉक्टर मुंडल्ये साईट स्पेसिफिक सोल्युशन्स - अर्थात स्थलानुरूप जलसंधारण पध्दतीवर भर देतात.

स्थलानुरूप जलसंधारण पध्दतीबद्दल माहिती देताना डॉक्टर आवर्जून सांगतात, ते म्हणजे एखाद्या गावात केले गेलेले उपाय दुसरीकडे लागू पडतातच असं नाही. आपल्याकडे पूर्वापार सरकारी पातळीवर जलसंधारणाची जी काही कामं केली गेली आहेत, त्यातील बरीचशी कामं ही 'Type module' म्हणजे एक प्रातिनिधिक योजना तयार करून तीच सगळीकडे राबवणं, या प्रकारे केली गेली आहे. मग ते भरपूर पावसाचं, चढ-उतार असलेलं, समुद्राकडे बरेचसे उतार आणि पाण्याचा प्रवाह असलेलं, पाणी धरून ठेवण्याची मातीची क्षमता कमी असलेलं कोकण असो; चांगला पाऊस, कमी उतार, पाणी धरून ठेवणारी काळी माती, कमी वेगाचे प्रवाह असलेला पश्चिम महाराष्ट्र असो; कमी पावसाचा मराठवाडा असो की मोठी सपाटी असलेला विदर्भ असो, सगळीकडे साधारण एकाच प्रकारचं काम केलं गेलंय. त्यामुळे एका ठिकाणी यश देणारी योजना इतर ठिकाणी अपयशी झाल्याचा अनुभव आला आहे. जलसंधारण करताना त्या भागातील भौगोलिक परिस्थिती, मातीचा प्रकार, पावसाचं प्रमाण, प्रवाहाचा वेग, इत्यादी बाबींचा अभ्यास करून स्थलानुरूप कामं केली तर यश नक्की मिळतं. फक्त, यासाठी सगळीकडे एकाच प्रकारे काम करून चालणार नाही, तर प्रत्येक गावाचा स्वतंत्र अभ्यास करून, गरजेप्रमाणे योजना आखून, त्या कामात स्थानिक लोकांना सहभागी करून काम करणं आवश्यक असतं. जर अशा कामांमध्ये सरसकट उपाय केले, तर फायद्याऐवजी तोटाच होण्याची भीती असते. हे सगळं पाहत असताना सहज जाणवत ते म्हणजे डॉक्टरांनी नोंदवलेलं निरीक्षण अगदी योग्य आहे. आपल्याकडे बरेच प्रकल्प पूर्ण होऊनही पाणी प्रश्न पूर्ण न सुटण्याचं सर्वात महत्त्वाचं कारणही हेच आहे. नीट अभ्यास करून, स्थलानुरूप योजना आखून काम केलं, तर त्याचा निश्चित फायदा होतो. कित्येकदा यासाठी पाऊस पडण्याचीही गरज असतेच असं नाही, हा डॉक्टरांचा अनुभव म्हाडाच्या पाडयात काम करताना उपयोगी पडला.

केशवसृष्टी ग्रामविकास संस्थेने काम करायचं नक्की केल्यावर
डॉ. उमेश मुंडल्येंनी गावात सर्वेक्षण करून मग लोकांबरोबर चर्चा केली. त्यात लोकसहभागातूनच काम करायचं ठरलं. चर्चेदरम्यान कळलं की लोकांना गावात चर खणून पाणी जिरवायचं होतं, शेततळी करायची होती, पण गावाची भौगोलिक परिस्थिती पाहता आणि गरज पाहता, लोकांना पाणी काढता येईल अशा स्रोताची गरज जास्त होती. म्हणून पहिल्यांदा एक विहीर बांधायची योग्य जागा निवडून आणि नंतर गरज पडली तर पुढच्या वर्षी बंधारा बांधायचा, अशी योजना आखली आणि विहिरीची जागाही नक्की केली. कुठल्याही सरकारी मदतीची अपेक्षा न करता, गावकऱ्यांनी सामूहिक श्रमदानातून गावात एक नवीन विहीर बांधायला सुरुवात केली. सुमारे 22 फूट व्यासाच्या आणि 30 फूट खोल विहिरीचं काम वर्षभरात पूर्ण होऊन जूनच्या सुरुवातीस सुमारे अडीच ते तीन लाख लीटर पाण्याचा कायमस्वरूपी साठा तिथे साठला आहे. सर्वसाधारणपणे, जलसंधारण केल्यावर किमान एक पावसाळा झाला की त्याचा उपयोग लक्षात येतो. मात्र म्हाडाच्या पाडयात तर पावसाळा सुरू व्हायच्या आधीच लोकांना वापरायला पाणी मिळालंय. गावातल्या जुन्या जाणत्या पिढीच्या म्हणण्यानुसार इतकं बक्कळ पाणी त्यांनी अनेक वर्षात पाहिलं नव्हतंच, आणि पुढची पन्नास वर्षही गावाला पाणी कमी पडणार नाहीये.

 

म्हाडाच्या पाडयात जलसंधारणाचं काम पूर्णत्वाला नेण्यासाठी निधीची आवश्यकता होती. निरपेक्षपणे होणाऱ्या या कामावर विश्वास ठेवून एस्सेल प्रोपॅक प्रा.लि. या कंपनीने मदत म्हणून पुरेसा निधी उपलब्ध करून दिला. समाजपरिवर्तनासाठी विधायक कामं करणाऱ्या संस्था जलसंधारणाच्या कामात सहभागी होणं ही काळाची गरज आहे. अशा वेळी समाजोपयोगी कामात अग्रेसर असलेल्या केशवसृष्टी ग्रामविकास संस्थेच्या कार्यकर्त्यांनी हे काम पूर्णत्वास नेण्यास ऑॅयकॉस वॉटर मॅनेजमेंट प्रा.लि. या कंपनीला सहकार्य केलं आणि हा मैलाचा दगड रचला गेलाय.

कुठलाही बडेजाव न करता नुकत्याच झालेल्या एका आटोपशीर कार्यक्रमात एस्सेल प्रोपॅक कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक अशोक गोयल यांच्या हस्ते या विहिरीचं लोकार्पण करण्यात आलं. केशवसृष्टी ग्रामविकास संस्थेच्या बिमल केडिया यांनी अरविंद मार्डीकर, रवींद्र माने, संतोष गायकवाड यांच्या टीमवर टाकलेला विश्वास, डॉ. उमेश मुंडल्येंसारखे जलसंपन्न समाजाची निर्मिती करू पाहणारे ध्येयवेडे तज्ज्ञ आणि या सगळयावर विश्वास ठेवून श्रमदानातून स्वत:चा जलसाठा निर्माण करणारे म्हाडाच्या पाडयातले गावकरी आज दुष्काळावर चर्चासत्र झोडणाऱ्या, लोकसहभाग नाही, निधी नाही म्हणून नकारात्मक सूर काढणाऱ्या लोकांसमोर भरीव उदाहरण बनले आहे.

म्हाडाच्या पाडयात पूर्वीपासून अत्यल्प पाण्यात उत्तम प्रतीच्या मोगऱ्याची लागवड केली जात होती. आता मुबलक पाण्यामुळे मोगरा लागवडीचं क्षेत्र दुप्पट होणार असून, भाजीपाला आणि फळबाग लागवड क्षेत्र वाढणार आहेच. इतरत्र खालावलेल्या जलसाठयांवर खडखडाट होत असतानाच या विहिरीमुळे गावाची पिण्याच्या पाण्याची गरज तर भागणार आहेच, तसंच किमान दोन पिकं 50 हेक्टरपेक्षा अधिक जमिनीवर घेण्याचं नियोजन चालू आहे. सद्यःस्थितीच्या जलसाठा निरीक्षणावरून अंदाज करता येतोय की या विहिरीतून किमान साडेसात कोटी लीटर पाणी वर्षभरात उपलब्ध होईल. स्थलानुरूप काम केलं, योग्य तज्ज्ञांचा सल्ला घेतला आणि लोकसहभाग मिळाला, तर केशवसृष्टीसारख्या शिस्तबध्द संस्थांनी केलेल्या कामाला नक्की यश मिळतं, याचं हे एक उत्तम उदाहरण आहे. गाव परिपूर्ण होण्यासाठी जलसंपन्नतेची जोड अत्यावश्यक असतेच. बाकी गावांनी म्हाडाच्या पाडयावरून स्वत:ची वाटचाल ठरवली पाहिजे. कुणाच्या खिजगणतीतही नसलेल्या म्हाडाच्या पाडयाची उन्हाळी फरफट थांबणाऱ्या केशवसृष्टी ग्रामविकास संस्थेच्या प्रयत्नांना नमन. म्हाडाचा पाडा राज्यासाठी दीपस्तंभ ठरो.  [email protected]