'मोठयां'च्या जगातले तणाव

 विवेक मराठी  23-Jun-2018

महाराष्ट्राच्या आध्यात्मिक क्षेत्रात गेल्या काही वर्षांत विशेष महत्त्व प्राप्त झालेले भय्यूजी महाराज यांनी 12 जून रोजी आत्महत्या केली. 'माझ्या मृत्यूला कोणीही जबाबदार नाही' असे स्पष्ट करत, पुढे तणावातून आत्महत्या करत असल्याचा उल्लेख त्यांनी सुसाईड नोटमध्ये केला आहे. दुसऱ्यांना धीर देणाऱ्या, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात सहभागी होऊन समुपदेशकाची भूमिका बजावणाऱ्या भय्यूजी महाराजांनाच तणावाने ग्रासले होते. त्यातून त्यांना बाहेर का पडता आले नाही याची गांभीर्याने दखल घ्यायला हवी. कोणालाही, वयाच्या कोणत्याही टप्प्यावर तणाव येऊ शकतो आणि तो स्वत:चा जीव घेऊ  शकतो. मग ती यशस्वी व्यक्ती असो वा महापुरुष, शेतकरी असो वा सुशिक्षित बेकार तरुण, कलाकार असो वा पोलीस अधिकारी. राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक आणि दहशतवादविरोधी पथक प्रमुख हिमांशू रॉय हे अलीकडचे आणखी एक उदाहरण.

आध्यात्मिक आणि सामाजिक क्षेत्रात भय्यूजी महाराजांचे उल्लेखनीय योगदान आहे. अध्यात्म आणि शेती यांची खुबीने सांगड घालून त्यांनी शेतकऱ्यांच्या विकासासाठी मोठे प्रयत्न केले. विदर्भ- मराठवाडयातील शेतकरी वर्गाबाबत त्यांच्या मनात करुणा दिसून आली. भय्यूजी महाराजांची सासुरवाडी धाराशिवची. त्यामुळे त्यांचा जिल्ह्यावर विशेष लोभ होता. तीर्थक्षेत्र तुळजापूर व तालुक्यात त्यांनी अनेक विधायक कामे केली. मी या तालुक्यातला रहिवासी असल्याने फक्त एकदाच दुरून त्यांना पाहण्याचा योग आला.

सडपातळ शरीरयष्टी, कमालीचा देखणा चेहरा, अतिशय सभ्य, मुलायम भाषा आणि संत माणूस वाटावा..! रुबाबदार, सुसंस्कृत, विद्वान व दुसऱ्यांना सल्ला देणारी ही व्यक्ती आत्महत्या करील यावर विश्वास बसत नाही.

भय्यूजी महाराजांना असा कोणता तणाव आला होता की त्यातून ते बाहेर पडू शकत नव्हते? मनाचा असा कोणता कोंडमारा झाला होता त्यामुळे ते इतके अस्वस्थ झाले होते, तणावाच्या पिंजऱ्यात अडकले होते? आपण करतोय ते योग्य नाही हे त्यांना कळले नसेल का? याचा समाजावर, आपल्या भक्तमंडळींवर काय परिणाम होणार आहे याचे चिंतन त्यांनी केले असेल का? समाजात विशेष स्थान असलेल्या व्यक्तीच्या खासगी जीवनाबद्दल, तिच्या मनोव्यापाराबद्दल सामान्य जनतेला कुतूहल असते. त्यांना भेडसावणाऱ्या चिंता, त्यांच्या आयुष्यातील अज्ञात राहिलेली बाजू पुढे आली, तरच अपसमजाचे धुके निवळायला मदत होते.

भय्यूजी महाराजांच्या आयुष्यात काही धूसर विसंवाद आढळतात. तणावांमुळे आत्महत्या केल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यांचा हा निर्णय भक्तांचे आणि सर्वसामान्यांचे मनोबल खच्ची करणारा आहे. जोपर्यंत भय्यूजींच्या आयुष्यातील 'तणावा'चा उलगडा होत नाही, तोपर्यंत सामान्य माणसाला काही प्रश्न पडू शकतात.

केवळ भय्यूजी महाराज तणावाचे बळी ठरले नाहीत, तर समाजात अशा अनेक व्यक्ती आहेत, ज्यांचे आयुष्य विचित्र तणावाच्या पिंजऱ्यात बंद झाले आहे. भयापोटी आणि भीतीपोटी ते मोकळेपणाने बोलू शकत नाहीत. दुसरी गोष्ट अशी की सध्याच्या धकाधकीच्या जीवनात मनातले सांगायला आपली हक्काची माणसेही उरली नाहीत. माणूस कितीही उच्च स्थानावर गेला तरी जेव्हा तो तणावाखाली वावरतो, तेव्हा आपल्या मनातील दुःख,वेदना आणि सल दुसऱ्या व्यक्तीशी शेअर करावीशी वाटते. ते ऐकण्यासाठी वेळ देणारा एखादा जवळचा मित्र असला पाहिजे.

आजच्या काळात माणूस किती तणावाखाली वावरतोय याचे उदाहरण म्हणून मला दोन गोष्टी सांगाव्याशा वाटतात. त्यातून मलाही खूप शिकायला मिळाले. काही वर्षांपूर्वीची घटना आहे. एका शेतकरी कुटुंबाने आपल्या मुलाला मोठया कष्टाने एम.ए., बी.एड.पर्यंत शिकवले. हा तरुण हुशार होता. एकेक वर्ग शिकत पुढे जात होता. पोराला शिकवण्यासाठी घेतलेल्या कष्टाचे चीज झाले म्हणून आईवडील खूश झाले होते. चांगले गुण मिळवून आता आपण मास्तर होऊ आणि आईवडिलांच्या कष्टाचे पांग फेडू असे त्या तरुणाला वाटत होते. वर्तमानपत्रात 'शिक्षक पाहिजेत'च्या जाहिराती वाचून मुलाखतीसाठी जायचा. काही वर्षे सरली तरीही त्याच्या नोकरीचा पत्ता नव्हता. जिकडे-तिकडे पैशाची मागणी होत होती. जसजसे मुलाचे वय वाढू लागले, तसतशी आईबापांना चिंता वाटू लागली. अगोदर नोकरी आणि नंतर छोकरी म्हणून हट्टाला पेटलेल्या तरुणाचे लग्नाचे वय निघून चालले होते. पोराच्या परीक्षेसाठी, मुलाखतीसाठी पैसे देता देता आईवडिलांचा जीवही मेटाकुटीला आला. पोराच्या वयाच्या तरुणांची लग्ने होऊन त्यांच्या घरात गोकुळ नांदू लागले. या तरुणाच्या आईवडिलांचा जीव मात्र टांगणीला लागला होता. त्यांनी कसेबसे मुलाचे हात पिवळे केले. पण आपला मुलगा नैराश्याच्या पिंजऱ्यात अडकला आहे याची जाणीव त्या अभागी, अशिक्षित मातापित्यांना झाली नाही. पुढे आईवडील थकल्याने त्यांच्याने काम होईना. तेव्हा 'त्या' तरुणाची पत्नी दुसऱ्याच्या शेतात मजुरीने काम करू लागली. पोटाला चिमटा देत पै-पै गोळा करून पतीला देऊ लागली. या पैशातून तो तरुण मुलाखतीसाठी परगावी जाऊ  लागला. ती अभागी स्त्री हसतखेळत आपला संसार उभा राहावा म्हणून काबाडकष्ट करीत होती. मात्र, नियतीने वेगळेच लिहिले गेले होते. त्या तरुणाची चिडचिड वाढू लागली, नोकरीची अपेक्षा सतत मनात ठेवत गेल्याने तो नैराश्याच्या गर्दीत सापडला. हळूहळू तो घरात न सांगता पायी मुलाखतीसाठी जाऊ लागला. त्याच्या अंगावरचे मळलेले कपडे आणि हातातील प्लास्टिक बॅग पाहून अनेक जण त्याला वेडा म्हणू लागले. त्याच्या मनःस्थितीत वारंवार बदल दिसून येऊ  लागला. नैराश्य, हतबलता, एकाकीपणाच्या भावनेने त्याच्या मनात घर केले. त्याच्या मनातल्या भावना पत्नीला कळत नव्हत्या. आपल्या मनातील दु:ख तो इतरांशी शेअर करत नव्हता. मनातल्या मनात कुढत राहत होता. शेवटी त्या घुसमटीचे रूपांतर नैराश्यात होऊन त्याने स्वत:ला जाळून घेतले. अंगावर शहारे आणणारी घटना माझ्या गावापासून अवघ्या आठ दहा किलोमीटरवरची आहे.

दुसरी घटना माझ्या वर्गमित्राशी संबंधित आहे. घरची परिस्थिती चांगली असूनही तो नेहमी तणावाखाली राहायचा. इतरांपेक्षा आपल्याला चांगले गुण मिळवण्याचा ताण त्याच्यावर सतत असायचा. शेवटी त्यालाही नैराश्याने ग्रासले. एके दिवशी द्राक्षबागांसाठी वापरण्यात येणारे विषारी औषध प्राशन करून आपला जीव संपवण्याचा प्रयत्न केला. पालकांच्या प्रसंगावधानाने त्यांच्यावर वेळेत उपचार झाले. सुदैवाने तो वाचला. त्याला समुपदेशकाकडून मार्गदर्शन मिळाले. त्यामुळे तो नैराश्यातून बाहेर पडू शकला. आता तो शासकीय नोकरीत कार्यरत आहे. आनंदी जीवन जगत आहे.

समाजात अशी पुष्कळ उदाहरणे मिळतात. राज्यात शेतकऱ्यांच्या होणाऱ्या आत्महत्येचा प्रश्न जितका जटिल बनत चालला आहे, तितकेच शहरी भागातील आत्महत्यांचे प्रमाण वाढत चालले आहे. गेल्या महिन्यातच हिमांशू रॉय यांच्या आत्महत्येच्या बातमीने सगळीकडे एकच खळबळ उडवून दिली होती. भारतामधील आत्महत्या करणाऱ्यांचा आकडा बघितला तर आपला विश्वासही बसणार नाही. आपल्या देशात आज प्रत्येक तासाला साधारण 15 लोक आत्महत्या करतात. या सर्व आत्महत्या करण्यामागे एकच महत्त्वाचे कारण असते, ते म्हणजे मानसिक ताण-तणाव.

भारतातल्या काही शहरात हे प्रमाण अक्षरश: हादरवून सोडणारे आहे. आज देशातील 13 टक्के तरुणाई - म्हणजे जवळपास 8 कोटी तरुण-तरुणी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे मानसिकदृष्टया अस्वस्थ आहे. जगभरात होणाऱ्या आत्महत्यांपैकी 10 टक्के आत्महत्या एकटया भारतात होतात. त्यात तरुणांचा भरणा मोठा आहे. धक्कादायक बाब म्हणजे आत्महत्या करणाऱ्यांमध्ये 15 ते 24 वयोगटातील तरुणांची संख्या अधिक आहे. (स्रोत - इंटरनेट.)

खरे तर, आत्महत्या हा सर्व समस्यांवरचा उपाय नव्हे. जीवनात येणाऱ्या संकटांचा मुकाबला स्वत: व कुटुंबासमवेत करणे हे निरोगी, विवेकी मनाचे लक्षण आहे. समाजाने वा या विषयात काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांनी आत्महत्या रोखण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. नैराश्याने ग्रासलेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांनी त्याच्याशी संवाद वाढवला पाहिजे. समुपदेशकाची मदत घेतली पाहिजे. आत्महत्येचा अतिरेकी मार्ग पत्करून काहीही निष्पन्न होत नाही, याचे भान त्यांना आणून दिले पाहिजे.

नैराश्य, ताणतणाव यामुळे वाढत जाणाऱ्या आत्महत्या पाहून चिंता वाटू लागली आहे. कारण जागतिक आरोग्य संघटनेच्या अंदाजानुसार सन 2020पर्यंत नैराश्याचा आजार उग्र स्वरूप धारण करेल. सध्याचे भयावह चित्र पाहता वरील अंदाज वास्तवात तर येणार नाही ना, अशी अस्वस्थ करणारी शंका उत्पन्न होते.

ताणतणाव, आर्थिक कारण, परीक्षा, नोकरी यामुळे वैफल्यग्रस्त होऊन आत्महत्या करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. माणूस कितीही मोठा असला तरी त्याच्या मनातील नकारात्मक विचारांपुढे तो हतबल ठरतोय. यावर एक उपाय म्हणून 'या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे' हे मंगेश पाडगावकरांचे गीत प्रत्येकाने दिवसातून एकदा तरी गुणगुणायला हवे.

माणसाने अर्थपूर्ण जगण्याचा प्रयत्न करावा. हे जग सुंदर आहे.  स्वत:ला नैराश्याच्या पिंजऱ्यात कधीही कोंडून घेऊ  नये. गुडघ्यात मान घालून उद्वेगजनक बसण्यापेक्षा ताबडतोब आपल्या भावना प्रकट कराव्यात. त्यामुळे मन हलके होईल. त्यातून नवा मार्ग सापडेल.

 

 ''डिप्रेशनवर त्वरित उपाय होणं गरजेचं'' - डॉ. राजेंद्र बर्वे

 जी माणसं यशस्वी असतात - मग ती समाजकारणामधील असोत वा इतर क्षेत्रातील, ती कमालीची एकाकी असतात. त्यांचा तणाव हा त्यांच्या कामाच्या तणावामधून निर्माण झालेला असतो. त्यांच्या आजूबाजूचे लोक स्वत:च्या कामासाठी त्यांच्याभोवती जमलेले असतात. त्यांना त्यांचं काम करून घेण्यात स्वारस्य असतं, त्या व्यक्तीमध्ये नसतं. अशा व्यक्तींच्या जवळची माणसंदेखील त्यांच्या मोठेपणाने दिपलेली असतात. त्या सत्ताकेंद्राचा ते उपभोग घेत असतात. त्यामुळे तीही त्यांच्यापासून दूरच असतात.

कोणतीही व्यक्ती - मग ती कोणत्याही स्तरावरची असो, तिचं शरीर, मन, मेंदू हे सर्वसामान्य माणसासारखंच काम करत असतं. अशा व्यक्तींना जेव्हा अन्य कोणता शारीरिक आजार झाल्याचं कळलं की त्यात आपल्याला वेगळं काही वाटत नाही, पण त्या व्यक्तीला डिप्रेशन आल्याचं कळलं की आपल्याला आश्चर्य वाटतं. भय्यूजी महाराजांच्या डायरीतून ज्या गोष्टी समोर आल्या, त्यावरून असं जाणवतं की ते खूप तणावग्रस्त होते. त्या वेळी जर भय्यूजी महाराजांना मधुमेहाचा किंवा ब्लडप्रेशरचा त्रास होऊ शकत असेल, तर डिप्रेशनचा त्रासही होऊ शकतो, हे इतकं सरळपणे लक्षात घेतलं पाहिजे. आत्महत्या करावीशी वाटणं हे डिप्रेशनच्या अनेक लक्षणांपैकी एक आहे. उत्साह न वाटणं, कामात रस न वाटणं, अस्वस्थ वाटणं, चिडचिड होणं, झोप न लागणं किंवा जास्त लागणं, भूक कमी लागणं किंवा जास्त लागणं अशी लक्षणं दिसून येतात. तेव्हा अशा व्यक्तीने त्वरित उपचार करून घेणं गरजेचं आहे. आत्महत्येचा विचार रेंगाळत असलेली व्यक्ती त्या विचारानेदेखील घाबरून जाते. अशा वेळी त्याने कोणत्या तरी जवळच्या व्यक्तीशी त्याबद्दल मोकळेपणाने बोललं पाहिजे आणि ज्या व्यक्तीशी हा संवाद झाला असेल त्या व्यक्तीनेही वरवरची उत्तरं न देता हे डिप्रेशनचं लक्षण असल्याचं लक्षात घेऊन त्याच्यावर त्वरित उपचार व्हावेत यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.

तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशा व्यक्तीच्या मनात दोन प्रकारच्या भावना येत असतात - एक हेल्पलेसनेस (असाहाय्यता) आणि दुसरी होपलेसनेस (निराशा). आपल्याला या परिस्थितीत मदत होऊ शकते आणि यातून मार्ग निघू शकतो असा विचार जरी मनात आला, तरी अशा व्यक्तीच्या मन:स्थितीत फरक पडू शकतो.

     - डॉ. राजेंद्र बर्वे, मानसोपचार तज्ज्ञ