मुखवटयांमागील चेहरे ओळखायला शिका

 विवेक मराठी  28-Jun-2018

 

प्रामाणिकपणा आणि सरळमार्गाने चालण्याची वृत्ती यामुळे मला आयुष्यात नक्कीच फायदा झालाय, पण बऱ्याचदा नुकसानही सहन करावे लागले आहे. त्याचे कारण म्हणजे मी त्या प्रसंगांत मुखवटयांमागचे खरे चेहरे ओळखू शकलो नाही. व्यावसायिकाने धंद्यामध्ये सावध असावे लागते आणि गाठीला पैसा असेल तर बेरकीही राहावे लागते, हे शहाणपण मी जरा उशिराच शिकलो. 'पुढच्यास ठेच, मागचा शहाणा' या म्हणीनुसार माझ्या चुकांमधून इतरांनी बोध घ्यावा, यास्तव या लेखाचे प्रयोजन.

 मला वयाच्या सोळाव्या वर्षापासूनच दुबईला नोकरीसाठी जाण्याचे वेध लागले होते आणि त्यासाठी कामाचा अनुभव गरजेचा असल्याने मी 'कमवा आणि शिका' तत्त्वानुसार माझा दिवसाचा वेळ सत्कारणी लावण्याचे ठरवले. अंधेरीच्या एका फिनेल उत्पादक कंपनीला घरोघरी जाऊन आपले उत्पादन विकणारे युवक विक्रेते हवे होते. ती जाहिरात वाचनात येताच मी लगेच अर्ज केला आणि माझी निवडही झाली. मी इयत्ता अकरावी व बारावी दादर येथील महाविद्यालयात शिकत होतो. कॉलेजचे तास संपल्यानंतर फिनेल विकण्यासाठी मी भांडूप, मुलुंड व अगदी कल्याणपर्यंत लोकलने जायचो आणि फिनेलच्या बाटल्यांची जड पिशवी सांभाळत ओळखीच्या व अनोळखी लोकांच्या दारात उभा राहायचो. या दोन वर्षांच्या काळात मला ग्राहकांचे विविध नमुने बघायला मिळाले. लोकांना दारावर येणारे आगंतुक विक्रेते पसंत नसल्याने काही जण तोंडावर दरवाजा आपटत मला हाकलून देत, पण बरेचसे दयाळू आणि विचारीही असत. मी कॉलेजला शिकतोय सांगितल्यावर ते बऱ्याच गोष्टी न बोलता उमजून जात. पण याच काळात आयुष्यातील पहिल्या लबाड माणसाचा चेहरा मला पाहायला मिळाला. स्वार्थासाठी माणसे मुखवटा कसा परिधान करतात हे समजले.

एका गृहस्थांनी पहिल्या भेटीत माझी सहानुभूतीने चौकशी केली. तरुण पिढी आणि कष्टाचे महत्त्व, यावर मला उपदेश केला. नंतर माझ्याकडून फिनेलची बाटली खरेदी करून त्वरित पैसेही चुकते केले आणि ''दर महिन्याला नियमित येत जा'' असे जाताना आवर्जून सांगितले. मला आनंद वाटला. पुढच्या महिन्यात मी त्यांच्याकडे गेलो, तेव्हा त्यांनी फिनेलची बाटली ठेवून घेतली आणि पैसे नंतरच्या फेरीत घेऊन जाण्यास सांगितले. तिसऱ्या महिन्यात मी गेलो तेव्हा उतरलेल्या चेहऱ्याने ते म्हणाले, ''मुलाऽ तुला मदत करण्याची खूप इच्छा होती, पण मीच आर्थिक अडचणीत सापडलोय. मला फिनेल नको.'' ते ऐकल्यावर मलाही वाईट वाटले. माझे वडील नोकरीअभावी सहा महिने घरी बसून होते, त्या काळात आमच्या कुटुंबाची झालेली आर्थिक कोंडी डोळयापुढे उभी राहिली. मी त्या गृहस्थांना म्हणालो, ''काकाऽ, हरकत नाही. मी दर महिन्याला फिनेल देत जाईन. तुम्ही सवडीने पैसे द्या.'' त्याप्रमाणे मी पुढचे चार महिने त्यांच्याकडे फिनेल पोहोचवत राहिलो. हळूहळू माझ्या मनात शंका येऊ  लागली. फिनेलच्या बाटलीची त्या वेळी किंमत होती दहा रुपये. सहा महिन्यांच्या काळात या गृहस्थांना 50 रुपयांतील काहीही बाकी द्यावीशी वाटली नाही, हे आश्चर्यच होते. मी घरी जाताच त्यांचा चेहरा उदास होई. मलाही फार बोलता येत नसे. पण दुसरीकडे या सहानुभूतीच्या गुंत्यामध्ये माझे नुकसान हळूहळू वाढत चालले होते.

या गृहस्थांच्या दीनवाण्या मुखवटयामागचा खरा चेहरा माझ्या त्या वेळेस लक्षात आला, जेव्हा मी सहाव्या फेरीत ठरलेल्या तारखेच्या एक दिवस आधीच त्यांच्या घरी गेलो. ते गृहस्थ घरात नव्हते, तर त्यांची पत्नी होती. मी त्या काकूंना माझी अडचण सांगितली. त्या काही बोलल्या नाहीत. स्वयंपाकघरात जाऊन त्यांनी 50 रुपये आणून मला दिले आणि सूचक बोलल्या, ''मुलाऽ, तू भोळा आहेस. यापुढे येऊ  नकोस.'' मोजक्या शब्दांत त्या माउलीने मला खूप काही सांगितले होते.

नंतरही समोरच्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवण्याची माझी सवय सहजासहजी गेली नाही. माझ्या बाबांनी दुकानांची जबाबदारी माझ्या हाती सोपवून निवृत्तीसाठी भारतात जाण्याचा निर्णय घेतला, तेव्हा एक मोलाचा उपदेश केला होता. ते म्हणाले, ''दादाऽ, बरेच लोक बापुडवाणा चेहरा घेऊन आपल्यासमोर उभे राहतात आणि करुणास्पद चित्र उभे करतात, पण त्यात मुखवटा कोणता आणि खरा चेहरा कोणता हे आपल्याला उमगले पाहिजे.'' बाबांनी असे सांगितले त्यालाही कारण होते. त्यांना सुरुवातीला दुकानाचा हिशेब नीट लिहिण्याची माहिती नसल्याने ते काम त्यांनी एका गरजू माणसाकडे सोपवले होते. तो ते काम घरबसल्या करणार होता. शारीरिक, आर्थिक आणि घरगुती अडचणींचा पाढा वाचून त्या माणसाने कामाचा पूर्ण मोबदला आधीच मागितला. बाबांनी सहानुभूतीने त्याला निम्मे पैसे ऍडव्हान्स दिले. पण नंतर वर्ष लोटले तरी त्या माणसाने काम पुरे केले नाही. अनेकदा स्मरण देऊनही त्याच्या अडचणी संपण्याची चिन्हे दिसेनात. पैशाची आठवण करून दिली, तेव्हा औषधोपचारात ते पैसे खर्च झाल्याचे त्याने सांगितले. बाबांनी नंतर कानाला खडा लावला. ते पुन्हा परोपकार करण्याच्या भानगडीत पडले नाहीत. भागीदारीच्या व्यवहारातही ते असेच विश्वासघातामुळे पोळले होते.

माझे डोळे उघडणारे दोन धडे मलाही मिळाले. त्यातील एक दुर्दैवाने माझ्या एका मित्राकडून, तर दुसरा हाताखाली ठेवलेल्या कर्मचाऱ्याकडून मिळाला. यातील मित्राला पाच लाख रुपये देऊन फसल्याचा किस्सा मी मागेच वर्णन केला आहे. कामावर ठेवलेल्या कर्मचाऱ्यांपैकी प्रत्येक जणच विश्वास ठेवण्यास पात्र असतोच असे नाही. एकदा अचानक मला माझ्या एका कर्मचाऱ्याचा फोन आला. तो अत्यंत काकुळतीने बोलत होता. पोलिसांनी आपल्याला पकडले असून आपण निरपराध असल्याचे तो पुन्हा पुन्हा सांगत होता. मी त्याच्याकडून काय प्रकार आहे ते विचारून घेतले. त्याने क्रेडिट कार्डवर खरेदी केली होती आणि नंतर त्याचे पैसे खात्यात भरायला तो विसरून गेला होता. वेळेवर वसुली न झाल्याने कंपनीने अखेर पोलिसांमध्ये तक्रार दिली होती. माझ्यापुढे पेच निर्माण झाला. एक तर तो आमच्या कंपनीच्या व्हिसावर आला होता आणि त्याच्या निष्काळजी वागण्याने आमचे नाव खराब होत होते. मी त्याला दंड भरून सोडवून आणले आणि क्रेडिट कार्डची बाकीही चुकती केली. मी त्याला खूप सुनावले. परदेशात राहताना आपण बेफिकीर राहून चालत नाही, हे परोपरीने पटवून दिले. तो सगळे निमूटपणे ऐकून घेत होता. मलाही वाटले, की त्याच्या शांतपणावरून त्याला चुकीची जाणीव झाली असणार. पण आश्चर्य म्हणजे त्यानंतर तीन महिन्यांनी पुन्हा एकदा असाच प्रकार घडला. या खेपेस त्याने दुसऱ्या शहरात जाऊन खरेदी केली होती. मला ते कळताच मी संतापलो. माझ्या लक्षात आले, की हा माणूस वाटतो तितका निरागस नाही. याच्या भोळया चेहऱ्यामागे एका पांढरपेशा लबाड गुन्हेगाराचा चेहरा लपला आहे. मी हा प्रकार कायमचा संपवण्याचा निश्चय केला. पुन्हा एकदा दंड आणि थकबाकी भरून मी त्याला सोडवले आणि तत्काळ नोकरीवरून काढून त्याची रवानगी भारतात केली. जाताना तो मला भेटायलाही आला नाही किंवा त्याने माफीही मागितली नाही. त्याने मुंबईतही असेच प्रकार केल्याचे नंतर कानावर आले. माणसाला दृष्कृत्यांची आणि लबाडीची चटक लागली की तो विवेकबुध्दीलाही धुडकावून लावतो. माणूस वाचण्यात माझीही चूक झालीच होती. मुखवटयामागचा खरा चेहरा ओळखण्यात मी साफ अपयशी ठरलो होतो. बाबांचे इशाऱ्याचे शब्द माझ्या कानात गुंजत होते.

या दोन प्रसंगांनंतर मात्र मीही कानाला खडा लावला. शहानिशा न करता बापुडवाण्या चेहऱ्यांवर विश्वास ठेवून आर्थिक मदत करणे सोडून दिले. सामाजिक संस्थांनाही दानरूपात आर्थिक मदत करताना आम्ही त्यांचा पूर्वेतिहास नीट तपासून बघतो.

एक छान सुभाषित आहे.

वित्तं देहि गुणान्वितेषु मतिमन्नान्यत्र देहि क्वचित्।

प्राप्तं वारिनिधेर्जलं घनमुखे माधुर्ययुक्तं सदा॥

(अर्थ - हे बुध्दिमान माणसा, पैसा दान करायचा असेल तर गुणी लोकांनाच दे. गरज नसलेल्याला देऊ  नकोस. समुद्राचे खारट पाणी जसे मेघ घेतो आणि पावसाच्या रूपात गरजूंपर्यंत मधुर चवीने पोहोचवतो.)

मित्रांनोऽ, म्हणूनच मदत करताना आपण अपात्री दान तर करत नाही आहोत ना, हे ओळखण्याचे शहाणपण आपल्या अंगी असले पाहिजे.

*** 

(या लेखांवर वाचकांच्या प्रतिसादाचे स्वागत असून ते आपल्या प्रतिक्रिया, सूचना, विचारणा [email protected] या ईमेल पत्त्यावर पाठवू शकतात.)