जैविक शेतीचा पथदर्शी

 विवेक मराठी  06-Jun-2018

***उल्का मोकासदार***

शेतीमध्ये जसे पर्यावरणीय धोके आहेत, तसे सर्वाधिक धोके हे रासायनिक खते व कीटकनाशके यांच्यापासून आहेत. रासायनिक खतांमुळे आपल्या जमिनीचा पोत कमी कमी होत चालला आहे. रासायनिक शेतीला पर्याय म्हणून करवंदे यांनी जैविक खतनिर्मितीचा प्रकल्प उभा केला. या प्रकल्पामुळे पुणे व आजूबाजूच्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळाले आहे. यातच प्रकल्पाची यशकथा दडली आहे.

हिंदीत एक म्हण आहे,

मीट्टी जो खाती है, मिट्टी वो ही उगाती है!!

म्हणजे आपण काळया आईच्या पोटात जे भरत असतो, तेच उगवत असते. गेली काही वर्षं आपण रासायनिक खतांच्या नावाखाली, फवारणीच्या नावाखाली पिकांवर, मातीत रासायनिक विष ओतत आहोत. स्वाभाविकपणे तेच आपल्याला अन्नाच्या रूपात परत मिळत आहे. वरवर दिसणारी हिरवीगार भाजी, रसरशीत फळे, धान्याचा टपोरा दाणा हा आतून किती सकस असेल हा विचार आपण करतोय का?

यामुळे मानवी शरीर, पर्यावरण, पशुधन किती विषयुक्त गोष्टींचे आगर झाले आहे हे अभ्यासून पाहिले तर भयचकित व्हायला होते. ह्या विषयुक्त घटकांना आवर घालण्याचे प्रयत्न आता कृषी क्षेत्रात चालू आहेत. सेंद्रीय खतांचा वाढता वापर हे त्याचेच उदाहरण. ही अतिशय स्वागतार्ह गोष्ट आहे.

जैविक खतनिर्मितीचे अनेक कारखाने आज उभे राहत आहेत. यापैकी एक म्हणजे डीमीटर ऍग्रोबायोव्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड. पंकज करवंदे आणि त्यांचा मुलगा प्रणव करवंदे हे या प्रकल्पाचे मालक आणि चालक. पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील पिरंगुट भागात 2014 साली हा प्रकल्प उभा राहिला. 

पंकज करवंदे यांनी मायक्रोबायोलॉजीमध्ये या विषयात एम.एस्सी.पर्यंत शिक्षण घेतले. त्यांची आई शिक्षिका आणि वडिल CWPRS मध्ये नोकरीला होते. थोडक्यात घराला शेतीची पार्श्वभूमी नव्हती. शिवाय शहरी वातावरणात ते लहानाचे मोठे झाले. मात्र मायक्रोबायोलॉजीमधल्या शिक्षणाची पार्श्वभूमी असल्याने आणि त्याच क्षेत्रातील नोकरीमुळे जैविक खत उत्पादन कंपनीशी त्यांचा संबंध आला. त्यामुळे शेतकरी आणि जैविक खत, सेंद्रिय शेती या परस्पर निगडीत गोष्टींचा अभ्यास करता आला. त्यांच्या मुलाने प्रणवनेही जीवशास्त्रामध्ये उच्च शिक्षण घेतले. नोकरी न करता स्वत:चा व्यवसाय करण्याकडे प्रणवचा कल होता. त्यामुळे दोघा पिता-पुत्रांनी ठरवून डीमीटर ऍग्रोबायो व्हेंचर्स ही कंपनी 2014 मध्ये सुरू केली. जैविक खत, कीडनाशक आणि सेंद्रीय खत निर्मितीची ही कंपनी सुरू करण्यामागचा मूळ उद्देश, शेतकऱ्यांना दर्जेदार सेंद्रीय खते वेळेवर उपलब्ध करून देणे हा होता.

सेंद्रीय शेतीचे महत्त्व, उपयुक्तता आणि त्याचा मानवी जीवनावर होणारा परिणाम याविषयी जास्त जागरुकता निर्माण झाली ती साधारण 2000 च्या आसपास. त्याआधी  सरकार सेंद्रीय शेतीच्या धोरणांवर अभ्यास करत होते. शेतकऱ्यांना सेंद्रीय शेतीसाठी उद्युक्त करीत होते. पण त्याचा जास्त प्रसार व्हायला लागला तो 2000च्या आसपास.

'जैविक शेती काय, कोणीही करू शकतं' हा भ्रमही होता. पण सरकारी प्रयत्नांनी, काही समाजसेवी संस्थांनी, काही शेतीविषयक संस्थांनी, पर्यावरणतज्ज्ञांनी, आरोग्यविषयक कार्य करणाऱ्या संस्थांनी ह्या संबंधित अनेक उपक्रम,कार्यशाळा घेऊन सेंद्रीय शेतीला प्रोत्साहन दिले आहे. अर्थात असे असले तरी  सेंद्रीय खत वापरताना शासन, शेतकरी आणि सामान्य ग्राहक ह्या तीनही पातळीवर समन्वय असणे गरजेचे आहे. रासायनिक शेतीचे आधुनिक पिढीवर होणारे दुष्परिणाम यांविषयी लोकांना माहिती होणे गरजेचे आणि महत्त्वाचे आहे. त्यासाठी आर्थिकदृष्टया ही खते किफायतशीर आणि स्वस्त तसेच मुबलक प्रमाणात उपलब्ध व्हायला हवीत. हे उद्दिष्ट डोळयासमोर ठेवून करवंदे यांच्या कंपनीची वाटचाल सुरू आहे.

कंपनी ते शेतकरी यामधील दुवा असतो तो किरकोळ विक्रेता (रिटेलर) किंवा वितरक. करवंदे यांनी ही मधली फळी काढून टाकून स्वत:च शेतकऱ्यांपर्यंत पोहोचायचे ठरवले. त्यामुळे शेतकऱ्यांना रास्त दरात आणि पाहिजे तेव्हा ही खते थेट उपलब्ध होतात.

जैविक खत म्हणजे जिवंत जिवाणूंपासून खतनिर्मिती. त्यामुळे उत्तम प्रकारच्या जिवाणूंची पैदास करून त्यापासून उत्तम निर्मिती हेच करवंदे यांच्या कंपनीचे उद्दिष्ट. या उत्तम जिवाणूंची निवड करणे, त्यांची पैदास करणे, त्यांची वाढ करणे आणि त्यांची शुध्दता राखणे अशी संपूर्ण काळजी घेत तयार झालेल्या उत्तम जैविक खताचा परिणाम 100% आला नाही तरच नवल. करवंदे यांच्या कंपनीत द्रव स्वरूपाचे खत तयार करण्यावर भर असतो. ह्याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे हे द्रवरूपातले द्रावण अगदी जशास तसे वापरता येते. त्यामुळे ते पीकांवर लगेचच फवारता येत आणि प्रवाहीपण अंगचेच असल्याने त्याचे परिणामही लगेचच दिसून येतात. पावडर स्वरूपातील खत पाण्यात मिसळून मग त्याची निवळी फवारणी केली की पाहिजे तसा परिणाम होत नाही. कारण पावडरमध्ये फक्त 30% जिवाणू सोडावे लागतात. तर बाटलीबंद द्रवरूपातील खतामध्ये 100 टक्के जिवाणू सोडले जाऊ शकतात. ज्याचा फायदा पिकाला उत्तम प्रकारे मिळतो. या पध्दतीने तयार केलेल्या खतांची खात्री आणि योग्यता पडताळून पाहून केनिया सरकारने आवर्जून करवंदे यांच्या कंपनीशी करार करून तिकडे हा सेंद्रीय खत प्रकल्प उभा करण्यासाठी पाठिंबा दिला आहे. केनिया सरकार आणि डीमीटर यांचा जो प्रकल्प केनिया येथे चालू आहे, त्याचे काम प्रणव करवंदे पाहतात.

भारतात सेंद्रीय शेतीचे प्रमाण आजच्या घडीलाफक्त 10/12 % इतके असल्याची माहिती पंकज करवंदे यांनी दिली. ते पुढे म्हणाले, 'आपल्याला अजून फार मोठा टप्पा गाठायचाय. शेतकऱ्यांना सेंद्रीय शेतीसाठी प्रवृत्त करण्यासाठी आधी ग्राहकांमध्ये सेंद्रीय शेतीतून येणाऱ्या मालाचे महत्त्व बिंबवले पाहिजे. या सेंद्रीय शेतीतून निघणारी उत्पादने, त्या उत्पादनांची विक्री, त्या विक्रीचा मोबदला, यामधली दरी कमी झाली तर शाश्वत सेंद्रीय शेती जोर धरेल. जमिनीचा कस, शेतीच्या उत्पादनांचा पोत आणि क्षमता ही जैविक खतांमुळे वाढते हे लक्षात घेऊन सरकारने या क्षेत्रात कार्य करायला अजून प्रोत्साहन दिले पाहिजे. यामुळे पर्यावरणाचाही समतोल राखला जातो. ग्राहकांना उत्तम प्रकारचे अन्नधान्य मिळते आणि शेतकरी राजावर आर्थिक भार न पडता तोही चार पैसे अजून कमवू शकतो. स्पर्धात्मक वाढ झाली की गुणात्मक वाढ होते. त्यामुळे सरकारने जैविक क्षेत्रात कार्य करणाऱ्या कंपन्यांना काही कार्यक्षेत्रे जोडून दिली पाहिजेत.' 

ज्या देशातील नागरिक सशक्त, सर्वार्थाने तो देश सशक्त. देशाचा नागरिक बलशाली करण्यासाठी अर्थकारण, पर्यावरण आणि आरोग्याशी निगडित अशी सेंद्रीय शेती फार महत्त्वाची भूमिका बजावते. अशा सेंद्रीय शेतीला प्रोत्साहन देण्यासाठीच करवंदे यांचा उद्योग प्रयत्नशील आहे.

जैविक खत म्हणजे जिवंत जिवाणूंपासून खत निर्मिती. त्यामुळे उत्तम प्रकारच्या जिवाणूंची पैदास करून त्यापासून उत्तम निर्मिती हेच करवंदे यांच्या कंपनीचे उद्दिष्ट. या उत्तम जिवाणूंची निवड करणे, त्यांची पैदास करणे, त्यांची वाढ करणे आणि त्यांची शुध्दता राखणे अशी संपूर्ण काळजी घेत तयार झालेल्या उत्तम जैविक खताचा परिणाम 100% आला नाही तरच नवल. करवंदे यांच्या कंपनीत द्रव स्वरूपाचे खत तयार करण्यावर भर असतो. ह्याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे हे द्रवरूपातले द्रावण अगदी जशास तसे वापरता येते.

  पंकज करवंदे

डीमीटर ऍग्रोबायोव्हेंचर्स प्रा.लि.

भ्रमणध्वनी : 9822070318

[email protected]