संघभूमीतील प्रणबदांचा संवाद

 विवेक मराठी  08-Jun-2018

 **मंजूषा कोळमकर**

माजी राष्ट्रपती डॉ. प्रणब मुखर्जी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नागपुरातील तृतीय संघशिक्षा वर्गाच्या समारोप कार्यक्रमात जाणे, तेथील व्यासपीठावरून संबोधन करणे ही बाब खरे तर संघाच्या दृष्टीने एक सहज-स्वाभाविक घटना. पण माध्यमांनी ती घटना वादळी चर्चेची करून टाकली. ते स्वाभाविकही होते. प्रणबदांसारखी, काँग्रेसी वातावरणात रुळलेली, ते संस्कार अभिमानाने मिरवणारी आणि देशाच्या सर्वोच्च घटनात्मक पदावर आरूढ झालेली व्यक्ती संघाच्या व्यासपीठावर येणे याला प्रचंड बातमीमूल्य आहेच. त्यामुळे या भेटीपूर्वीच प्रणबदांच्या नागपूर भेटीची उलटसुलट चर्चा झाली. त्यांनी ही भेट टाळावी, यासाठी त्यांच्या जुन्या राजकीय सहकाऱ्यांनी पत्रोपत्री केली. तरीही प्रणबदा ठाम राहिले. ते नागपुरात आले, संघात वावरलेही आणि कार्यक्रमात बोललेही.

आता चर्चा सुरू झाली ती प्रणबदा काय बोलले यावर... खरे तर मला यात प्रणबदांच्या मुलीने - शर्मिष्ठाने केलेले ट्वीट नोंदवावेसे वाटते. शर्मिष्ठा काँग्रेसची नेता आहे. ती वडिलांना अधिक जाणते, असे समजायला हरकत नाही. तरीही वडिलांच्या संघभेटीवर तिने हे ट्वीट केले... पक्षाच्या बंधनामुळे तसे तिने केले असावे. पण ते ट्वीट, त्यातील शब्दरचना मात्र महत्त्वाची आहे आणि त्याच्याच पृष्ठभूमीवरच प्रणबदांच्या भाषणाची चिकित्सा व्हायला हवी. शर्मिष्ठा ट्वीटमध्ये म्हणते - 'तुम्ही (म्हणजे प्रणबदांनी) तिथल्या भाषणात काय बोललात हे नंतर विसरले जाईल. पण तेथील तुमचे फोटो मात्र कायम असतील...' तिचे हे विधान शंभर टक्के सत्य आहे. पण मी फोटो या शब्दांचा अर्थ या साऱ्या कार्यक्रमातील प्रणबदांचे चित्र, यांची देहबोली, त्यांचे वावरणे कसे होते असा घेणार आहे. त्या साऱ्यांचा विचार त्यांच्या भाषणाबरोबरच घेण्याची गरज आहे. कारण शब्दांचा अन्वयार्थ वेगवेगळा काढता येतो. प्रणबदांच्या भाषणांच्या ज्या बातम्या आल्या, त्यात ते वेगवेगळे अर्थ दिसतही आहे. पण या कार्यक्रमातील त्यांची देहबोली व त्यांच्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया याचाही एक निश्चित अर्थ आहे आणि त्याचाही विचार त्यांच्या शब्दांबरोबरच करण्याची गरज आहे.

प्रणबदा संघसंस्थापक डॉ. हेडगेवार यांच्या निवासस्थानी गेले. तेथील स्मारक पाहिले. त्यांनंतर तेथील अभिप्राय वहीत त्यांनी त्यांचे मतही लिहिले. हे मत अधिक महत्त्वाचे आहे. काँग्रेसने व अन्य पुरोगाम्यांनी ज्या संघाला अस्पृश्य म्हणून आजवर दूर लोटले, त्या संघाच्या निर्मात्याबाबत प्रणबदांनी वहीत नोंद केली - डॉ. हेडगेवार हे देशाचे महान पुत्र होते. त्यांना माझे वंदन... खरे तर प्रणबदांचे हे एकच वाक्य साऱ्या संघविरोधकांना व संघद्वेष्टयांना दिलेली सणसणीत चपराक आहे. बोललेल्या शब्दांपेक्षा लिहिलेल्या शब्दांचे महत्त्व काय असते, हे न समजण्याइतके प्रणबदा दुधखुळे नाहीत. त्यामुळे त्यांनी हा अभिप्राय विचारपूर्वकच लिहिला असेल. प्रतिक्रिया लिहिल्यानंतर उण्यापुऱ्या एक-दोन तासात प्रणबदांनी केलेल्या भाषणातील शब्दांचा अर्थ त्यांच्या प्रतिक्रियेमागील भावनांच्या आधारेच अधिक योग्यपणे काढता येईल. प्रणबदा रेशीमबागेतील स्मृतिमंदिरातील डॉ. हेडगेवार व गोळवलकर गुरुजी यांच्या समाधीस्थळी जातील काय, यावरही चर्चा झाली. खरे तर ती चर्चा गैरलागू होती. प्रणबदा तेथेही गेले आणि संघपरिसरात अतिशय मोकळेपणाने वावरले. कोणत्याही प्रकारचे अवघडलेपण त्यांच्या एकूणच देहबोलीत दिसले नाही, हे अधिक महत्त्वाचे आहे. त्यांनी आपल्या भाषणात एकदाही संघ शब्द उच्चारला नाही, त्यांनी प्रणाम केला नाही, या बाबी त्यामुळेच नगण्य ठरतात.

प्रणबदांचे भाषण व संघाचे बौध्दिक यात मला फारसा फरक वाटला नाही. त्यांच्या काही मुद्दयांबाबत वेगळा अर्थ निघू शकतो. पण त्यांचे एकूण भाषण हे संघाच्या विचारांच्या विरोधात जाणारे नव्हते, हे मात्र ठामपणे म्हणता येईल. खरे तर प्रणबदांचे भाषण हे भाषणापेक्षाही एक शोधनिबंध अधिक आहे. त्यात उध्दरणे आहेत, संदर्भ आहेत. स्पष्टच सांगायचे झाल्यास प्रणबदांचे भाषण हे अमूल्य माहितीचा, ज्ञानाचा ठेवाही आहे. राष्ट्र, राष्ट्रीयता व देशभक्ती या तीन मुद्दयांवर त्यांचे सारे भाषण गुंफले होते व त्यांच्या विचारांचे मूलभूत बीज होते - हे राष्ट्र हजारो वर्षांपासूनचे आहे. संघाचीही भूमिका हीच आहे. भारत हे राष्ट्र होते, या भूमिकेलाच डाव्या विचारवंतांचा नकार आहे. भारत हा देश 1947मध्ये अस्तित्वात आला. त्याअगोदर तो वेगवेगळया तुकडयांत विभागलेल्या राज्यांचा समूह आहे, ही विचारधारा गेल्या काही दशकांत डाव्या विचारवंतांनी देशात पेरली. त्याला प्रणबदांनी त्यांच्या भाषणात स्पष्ट शब्दात काटशह दिला. राष्ट्र या संकल्पनेची जी व्याख्या युरोपीय विचारवंतांकडून आली, त्याच्या हजारो वषें अगोदरपासून भारत हे राष्ट्र होते आणि त्याची राष्ट्रीयता वसुधैव कुटुंबकमच्या निकषावर आधारित होती. संघ तरी आजवर दुसरे काय सांगत आला? भारतीय संस्कृती ही हजारो वर्षांपासूनची आहे, तीच त्याची ओळख आहे असेच संघही सांगतोच आहे.

प्रणबदांनी त्यांच्या भाषणात इतिहासाचा मागोवा घेतला. आक्रमणांचा व त्यानंतर झालेल्या बदलांचा आढावा घेतला. वेगवेगळया संस्कृती भारतात आल्या, काही आक्रमकांच्या रूपाने आल्या, तर काही सहज आल्या; पण त्या साऱ्या इथल्या विचारात, संस्कृतीत एकरूप झाल्या, असे प्रणबदा म्हणाले. या शब्दांचा नेमका अर्थ लक्षात घेतला पाहिजे. राष्ट्र व राष्ट्रीयता ही संकल्पना केवळ एक धर्म, एक भाषा, एकच विचार यावर ठरवणे चूक आहे आणि त्यामुळे आपली राष्ट्रीय ओळख संपू शकते, असे प्रणबदा भाषणात म्हणाले, हे खरे आहे. पण या एका वाक्यावरून 'प्रणबदांनी संघाचे कान टोचले' असा अर्थ काढणे चूक आहे. याच वाक्यानंतर लगेच प्रणबदांनी माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या 'द हिंदू वे ऑॅफ लाईफ' या पुस्तकातल्या अवतरणाचा आधार घेतला आहे. ते अवतरण आहे - We remain a distinct cultural unit with a common history, common literature and common civilization. या अवतरणाचा अर्थ स्पष्ट आहे. राष्ट्र या संकल्पनेची व्याख्या धर्म, भाषा, विचार याच्याशी संबंधित नाही, मात्र तो एक इतिहास, एक साहित्य व एक समाजसंस्कृती याच्याशी तर नक्कीच आहे. संघही तर गेल्या आठ दशकांपासून हेच सांगत आला. या राष्ट्राची समाजसंस्कृती एक आहे, याचा इतिहास एक आहे. प्राचीन साहित्यही समान आहे. दुसऱ्या आक्रमकांनी आणलेली समाजसंस्कृती, इतिहास, साहित्य वेगळेपणाने वावरणे इथे शक्य नाही. प्रणबदांच्या शब्दांनुसार जे इथल्या मातीत, संस्कृतीत एकरूप झाले आहेत, त्यांना संघाचा विरोधही नाहीत. पण आपले वेगळेपण कायम ठेवणारे या राष्ट्र संकल्पनेत बसत नाही, हेच प्रणबदांना सर्वपल्लींच्या अवतरणातून अधोरेखित करायचे आहे, हे लक्षात घेतलेले पाहिजे. प्रणबदांनी पुढे एका ठिकाणी केलेले वक्तव्यही याच अनुषंगाने सयुक्तिक आहे. ते म्हणतात - Secularism and inclusion are a matter of faith for us. It is our composite culture  which make us into one nation. यातला composite हा शब्द महत्त्वाचा आहे. त्यात विविधता एकत्र असण्याचा भाव आहे. म्हणजेच वैविध्य एकरूप करणे होय. हा विचारही तर संघाचाच आहे ना...

प्रणबदांनी भाषणाच्या अखेरच्या टप्प्यात वाढत्या हिंसाचारावर बोट ठेवले. अलीकडच्या काळात हिंसाचार वाढला, संघ परिवाराने तो वाढवला, असे त्यांच्या भाषणात कोठेही म्हटलेले नाही. तरीही ती वक्तव्ये संघाला उद्देशून आहेत, असाही अर्थ काढला गेला. पण ती वक्तव्ये एका अनुभवी प्रशासकाने व्यक्त केलेली सल आहे. जेव्हा जेव्हा एखाद्या बालकावर, महिलेवर अत्याचार होतो, त्या प्रत्येक वेळी भारताचा आत्मा जखमी होतो. संतापाचे तीव्र प्रकटीकरण समाजरचनेला छिन्नविच्छिन्न करते. प्रत्येक दिवशी आपण आपल्याभोवती हिंसाचार वाढताना पाहतो. असा शाब्दिक व अशाब्दिक हिंसाचार आपण टाळला पाहिजे. प्रणबदांच्या या वक्तव्यांमध्ये कुठेही टीका नाही. उलट या वाक्यानंतर प्रणबदांनी एक विधान केले, ते अधिक महत्त्वाचे आहे. विशेष म्हणजे ते त्यांच्या लिखित भाषणात नाही. ते त्यांनी उत्स्फूर्तपणे केले व ते समोर बसलेल्या संघशिक्षा वर्गातील स्वयंसेवकांना उद्देशून केले. ते म्हणाले की, ''तुम्ही सर्व तरुण आहात... शिस्तबध्द आहात आणि म्हणून तुम्ही हे (शाब्दिक व अशाब्दिक हिंसाचार टाळणे) करावे...'' हे प्रणबदांनी संघ स्वयंसेवकांना दिलेले प्रमाणपत्र म्हणू नये का?

प्रणबदांच्या या संघभेटीबाबत भेटीच्या अगोदरच खूप वादळ उठले. प्रणबदांनी तेथे जाऊ नये इथपासून ते त्यांनी तेथे काय बोलावे इथपर्यंतचे सल्ले त्यांना दिले गेले. हे सल्ले देणारे त्यांच्या जवळचेच अधिक होते. पण असे सल्ले देऊन आपण माजी राष्ट्रपती राहिलेल्या एका अनुभवसंपन्न व ज्ञानसंपन्न व्यक्तिमत्त्वाचा अनादर करीत आहोत, ही बाबही अनेकांच्या लक्षात आले नाही. या वादळावर प्रणबदा काही मतप्रदर्शन करतील अशीही काहींची अपेक्षा होती. प्रणबदा त्यावर काहीच बोलले नाही. पण प्रणबदांनी आपल्या भाषणात व्यक्त केलेली संवादाची भावना या चर्चांना दिलेले अप्रत्यक्ष उत्तर मानलेच पाहिजे. ते म्हणाले - ''वेगळा मतप्रवाह मान्य केला पाहिजे. त्यावर आपण वाद घालू शकतो, त्याच्याशी तुम्ही सहमत असू शकता किंवा नसूही शकता... पण ते व्यक्त करण्यावर तुम्ही बंदी आणू शकत नाही.'' वेगवेगळया विचारांच्या हितसंघर्षात समन्वय साधण्यासाठी व त्यातून एक चांगले सार काढण्यासाठी संवाद आवश्यक असतोच, असे प्रणबदांनी ठाम शब्दात स्पष्ट केले. संघाच्या व्यासपीठावर जाणे हे एक प्रकारचे पाप आहे, असे मानणाऱ्यांना ही चपराक आहे. त्यामुळे प्रणबदा भाषणात जे बोलले, तसेच ते जे बोलले नाहीत तेही अधिक महत्त्वाचे आहे. त्या आधारावर सांगायचे झाल्यास संघविचार हा अस्पृश्य नाही, त्याच्याशी संवाद व समन्वय दोन्हीही साधला पाहिजे, असा संदेश प्रणबदांनी त्यांच्या या संघभेटीतून दिला, असे ठामपणे म्हणावे लागेल.

8975754483