हिमनगाची टोके

 विवेक मराठी  08-Jun-2018

काही दिवसांपूर्वी पुणे पोलिसांनी मुंबई, नागपूर आणि दिल्ली येथून सुधीर ढवळे, रोना विल्सन, सुरेंद्र गडलिंग, महेश राऊत आणि शोमा सेन या पाच जणांना अटक केली. या पाचही जणांचा माओवादाशी थेट संपर्क असून 31 डिसेंबर 2017 रोजी पुण्यात झालेल्या एल्गार परिषदेच्या आयोजनात या पाचही जणांचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहभाग आहे. सुधीर ढवळे तर एल्गार परिषदेचा प्रमुख आयोजक आहे. या एल्गार परिषदेच्या पार्श्वभूमीवर कोरेगाव भीमा येथे 1 जानेवारी2018 रोजी हिंसाचार झाला आणि त्याचे पडसाद 3 जानेवारीच्या महाराष्ट्र बंद दरम्यान जाणवले. नक्षलवादी चळवळ आणि एल्गार परिषद यांचे लागेबांधे आणि वापरला गेलेला पैसा याबाबतचे सबळ पुरावे हाती आल्यावर पोलिसांनी ही कारवाई केली. त्यासाठी एप्रिल महिन्यात अनेक ठिकाणी घरझडत्या घेण्यात आल्या होत्या. या तपासात नक्षलवादी चळवळीच्या माध्यमातून एल्गार परिषदेला अर्थपुरवठा करण्यात आला असून अटक करण्यात आलेल्या सर्वाचे नक्षलवाद्यांशी अत्यंत घनिष्ठ संबंध असल्याचे पोलिसांनी पत्रकार परिषदेत सांगितले आहे. समाजात अराजक निर्माण करून आपली विचारधारा प्रस्थापित करत सत्ता काबीज करायची, हा नक्षलवाद्यांचा डाव आहे. गेली अनेक वर्षे दुर्गम भागातील वंचित उपेक्षित बांधवांना वेठीस धरून ते आपला कार्यभाग साध्य करत होते. शासनाने जंगलपट्टयातील नक्षलवाद मोडून काढण्यास सुरुवात केली आहे. नुकत्याच झालेल्या कारवाईत चाळीस नक्षलवादी मारले गेले आहेत. त्याचबरोबर स्थानिक जनताही आता त्यांच्याविरुध्द बोलू लागली आहे. पण या घटनेच्याही खूप आधीपासून नक्षलवाद्यांनी शहरी भागात आपली पाळेमुळे प्रयत्नपूर्वक रुजवली आहेत आणि त्याची प्रचिती याआधी अनेक वेळा आली होती. या पाच जणांच्या अटकेनंतर तर शहरी नक्षलवाद यावर शिक्कामोर्तबच झाले आहे.

शहरी नक्षलवादाच्या माध्यमातून उपेक्षित, वंचित समाजातील युवा पिढीचे माथे भडकवून समाजस्वास्थ्य बिघडवायचे आणि समाजाला - पर्यायाने देशाला अराजकाकडे न्यायचे, ही नक्षलवाद्यांची रणनीती आहे. एल्गार परिषद आणि त्या निमित्ताने प्रकाशित झालेले साहित्य, सोशल मीडियावर प्रकाशित झालेला मजकूर पाहिला की त्याची साक्ष पटते. ज्या पाच जणांना अटक झाली, त्यांचा तपास करताना काही अन्य मंडळींची नावे संशयाच्या भोवऱ्यात आली. त्यामध्ये प्रकाश आंबेडकर हे एक नाव असून गेले काही वर्षे प्रकाश आंबेडकर सातत्याने नक्षल चळवळीचे समर्थन करत आहेत. पुण्यात झालेल्या एल्गार परिषदेत ते सहभागी होते. दिल्लीमध्ये तपास करताना तपास यंत्रणेला प्रकाश आंबेडकरांचे व काँग्रेसच्या काही व्यक्तींचे नक्षलवाद्यांशी असणारे संबंध लक्षात आले आणि याबाबत प्रसारमाध्यमांनी प्रश्न विचारताच प्रकाश आंबेडकर यांनी आपला नक्षली रंग दाखवला आणि दूरचित्रवाणीच्या सूत्रसंचालकाला धमकी दिली. वंचित, उपेक्षित समाजाला नक्षलवाद्यांच्या दावणीला बांधण्याचे काम प्रकाश आंबेडकर करत आहेत, हे या निमित्ताने समाजासमोर आले आहे. एका बाजूला महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा वारसा माझ्याकडेच आहे असे भासवायचे आणि दुसऱ्या बाजूला बाबासाहेबांवर श्रध्दा असणाऱ्या समूहाच्या डोळयात धूळफेक करून, भावनेचे राजकारण करून त्यांना नक्षलवाद्यांच्या दावणीला बांधायचे काम ते करत आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी माओवादाचा विरोध केला आहे आणि आपल्या अनुयायांना त्यांच्यापासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे. बाबासाहेबांचे वारस असणारे प्रकाश आंबेडकर मात्र नक्षलवाद्यांशी हातमिळवणी करून बाबासाहेबांच्या विचाराला हरताळ फासत आहेत. रक्तरंजित कारवाया करून आणि युवकांची माथी भडकवून प्रकाश आंबेडकर देशात अराजक निर्माण करू पाहत आहेत. आगामी सहा महिन्यांत आमचे सरकार असेल, तेव्हा तुम्हाला पाहून घेऊ असे जेव्हा प्रकाश आंबेडकर म्हणतात, तेव्हा त्यांचे वक्तव्य गंभीरपणे तपासून पाहणे आवश्यक आहे. कदाचित आगामी काळात देशात घडणाऱ्या खळबळजनक घटनांची प्रकाश आंबेडकर यांना माहिती असण्याची शक्यता नाकारता येत नाही. तपास यंत्रणा त्यावरही लक्ष केंद्रित करतील.

शहरी नक्षलवादी गटातील काही म्होरक्यांना आता अटक झाली आहे. त्यामुळे समाजाला लागलेली ही कीड संपेल अशा भ्रमात कुणीच राहू नये. कारण ही पाच-सहा टाळकी म्हणजे हिमनगांची टोके आहेत. अजूनही प्रकाशात न आलेले, तपास यंत्रणेच्या कक्षेत न आलेले असंख्य शहरी नक्षलवादी आपल्या आसपास वावरत असतील. त्यांच्या मुसक्या कधी आवळल्या जाणार? हा प्रश्न आहे. स्वतःला दीनदुबळयांचे तारणहार आणि नव्या जगाचे स्वप्न दाखवणारे हे लोक समाजात भावनिक आणि सामाजिक समस्यांच्या आधाराने आपली दुकानदारी चालवत असतात. व्यवस्था परिवर्तनाच्या गोंडस नावाखाली सरकारविरुध्द असंतोष निर्माण करत अराजकाची परिस्थिती निर्माण करू पाहणाऱ्या या शहरी नक्षलवाद्यांची पाळेमुळे खणून काढली पाहिजे. पुणे पोलिसांनी या कामाला सुरुवात केली असली, तरी त्याच्या शेवट सहजसाध्य नाही. त्यासाठी शासनाला कठोर भूमिका घ्यावी लागणार आहे.

शहरी नक्षलवाद काय किंवा दुर्गम भागातील नक्षलवाद काय, फोफावतो कशामुळे? केवळ सहानुभूती आणि भावनिक आवाहनामुळे समाज नक्षलवाद्यांना जवळ करत नाही, तर व्यवस्थेतील त्रुटी, सातत्याने नाकारणारी, उपेक्षा करणारी मानसिकता आणि न्याय प्रक्रियेतील दिरंगाई या गोष्टींचे भांडवल करत नक्षलवादी आपली पकड मजबूत करत आहेत. तेव्हा नक्षलवादाचा बिमोड करतानाच व्यवस्था सुधार करण्याची, गती वाढवण्याची गरज आहे. आहे रे आणि नाही रे यांच्यातील दरी ही नक्षलवाद्यांसाठीची संजीवनी आहे. जोपर्यंत ही दरी संपत नाही, किमान त्यातील अंतर कमी होत नाही, तोपर्यंत नक्षलवाद जिवंत राहणार आणि असे चार-दोन म्होरके पकडले जाणार, हाच परिपाठ चालू राहील. म्हणून नक्षल चळवळीच्या केवळ फांद्या कापण्यापेक्षा तिची मुळे उखडून टाकली पाहिजेत.