समाजऋण फेडण्याचा आदर्श

 विवेक मराठी  09-Jun-2018

राष्ट्रासाठी जीवन समर्पित करणारे अनेक स्वयंसेवक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने तयार केलेआहेत आणि त्यातील अनेक जण समाजासमोर आदर्श निर्माण करतात. मनमाड येथील ज्येष्ठ स्वयंसेवक विनायक कुलकर्णी यांनी आपली राहती वास्तू राष्ट्रकार्यासाठी संघाला अर्पण करून अशाच प्रकारचा आदर्श निर्माण केला आहे.

अन्न, वस्त्र व निवारा या माणसाच्या तीन मूलभूत गरजा आहेत. पण आज निवारा म्हणजे घर विकत घेणे किंवा बांधणे हा सामान्य माणसासाठी सगळयात मोठा संघर्ष ठरत आहे. पुणे, मुंबई, नाशिक, मनमाड यांसारख्या शहरी भागात तर घरांच्या किमती मध्यमवर्गीयांच्या आवाक्याबाहेर गेल्या आहेत. घराच्या वाटणीवरून भावाभावांमध्ये, रक्ताच्या नात्यांमध्ये कलह, वादविवाद, कोर्ट-कचेऱ्या, खून, मारामाऱ्या असे प्रकार समाजात सर्वत्र दिसून येतात. अशा विषम परिस्थितीत मनमाड येथील विनायक पुरुषोत्तम कुलकर्णी उर्फ बाळासाहेब कुलकर्णी नावाचा नोकरदार स्वयंसेवक, एक अवलिया राष्ट्रीय स्वयंसेवक संघास चक्क घराचे दान करतो, ही बाब साधी नव्हे.

मनमाड हे दुष्काळाचे गाव म्हणून प्रसिध्द असणारे गाव दातृत्वाच्या प्रकाशात न्हाऊन निघाले. याआधी मोहनराव सोमण यांनी आपला बंगला संघकार्यासाठी दान केला होता. आपल्या संस्कारित मूल्यांना जपत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने तन-मन-धन अर्पण करणारे आणि देव-देश-धर्मासाठी सर्वस्व समर्पित करणारे अगणित स्वयंसेवक निर्माण केले व आजही ते काम सुरू आहे. हीच परंपरा कायम राखत मनमाड शहरामध्ये 1957पासून ते 2013पर्यंत अखंडितपणे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्य करणारे ज्येष्ठ स्वयंसेवक विनायक कुलकर्णी यांनी वयाच्या 85व्या वर्षी त्यांची राहती वास्तू संघकार्यासाठी दान केली. या निमित्ताने मनमाड स्वयंसेवक संघातर्फे विनायक कुलकर्णी यांचा कृतज्ञता सोहळा नुकताच संपन्न झाला. या कार्यक्रमास विनायक कुलकर्णी यांच्या पत्नी नीलिमा कुलकर्णी, कन्या नलिनी, स्वाती, जावई अतुल तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मालेगाव जिल्हा संघसंचालक  नानाजी आहेर, मनमाड येथील दानशूर उद्योगपती व प्रगती अर्बन बँकेचेसंस्थापक पन्नालाल शिंगी, धर्म जागरण समितीचे पश्चिम प्रांत सदस्य प्रदीप बाच्छाव, मालेगाव जिल्हा रा.स्व. संघ जिल्हा कार्यवाहक सुनील चव्हाण आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

स्वाती मुळे यांच्या स्वागत गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रमोद मुळे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. रमाकांत मंत्री यांनी मान्यवरांचा परिचय करून दिला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे मान्यवरांच्या हस्ते विनायक कुलकर्णी यांचा व त्यांच्या परिवाराचा सन्मान करण्यात आला. या वेळी नाशिक जिल्हा भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष नितीन पांडे, ज्येष्ठ कवी प्रदीप गुजराथी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रकाश गाडगीळ, राष्ट्र सेविका समितीच्या शोभना केळकर, प्राची गाडगीळ, वनवासी कल्याण आश्रमाचे देविदास चांदवडकर, जळगाव येथील दीपक घाणेकर, जिल्हा कार्यवाह सुनील चव्हाण, प्रदीप बच्छाव, कामगार नेते राजू पवार, ज्येष्ठ नागरिक संघाचे नरेश कांबळे, पत्रकार संघाचे नरेशभाई गुजराथी, शांतीलाल पारिक बाबूजी आदी मान्यवरांनी विनायक कुलकर्णीयांच्याबद्दल गौरवोद्गार काढले. येवल्याचे ज्येष्ठ स्वयंसेवक रवींद्र भावसार यांनी उत्कृष्ट पद्य सादर केले.

विनायक कुलकर्णी यांनी या सन्मानाला उत्तर देताना सांगितले, ''या वास्तूचा मालक मी कधीच नव्हतो. मी विश्वस्त म्हणून या वास्तूत राहिलो. या वास्तूच्या परिसराला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक परमपूजनीय डॉ. हेडगेवार यांचा पदस्पर्श झाला आहे. त्यामुळे ही वास्तू संघाचीच आहे. ती मूळ मालकाला सुपुर्द केली आहे.''

तसेच या वास्तूमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नूतन कार्यालय उभारणीकरिता त्यांनी 5000 रुपयांचा निधी देऊन सर्वांना सुखद धक्का दिला.

कुलकर्णी यांनी जिल्हा बौध्दिक प्रमुख, विश्व हिंदू परिषदेचे प्रखंड प्रमुख, जनकल्याण समिती संचालित स्व. नानाराव ढोबळे रुग्णसेवा केंद्राचे प्रमुख व्यवस्थापक अशा विविध जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या आहेत. आपल्या प्रखर व अभ्यासपूर्ण वक्तव्याने ते नेहमीच परिचित राहिले आहेत.

कुलकर्णी यांनी दान केलेल्या या वास्तूची बाजारभावानुसार पंधरा लाख रुपये इतकी किंमत आहे. दानधर्म ही हिंदू संस्कृती आहे. ती जोपासून दातृत्वाचे हात किती बळकट असतात व समाजऋण कसे फेडायचे, याचा आदर्श विनायक कुलकर्णी यांनी आजच्या पिढीला दिला.

प्रदीपभाई गुजराथी

9422270490