ईशान्यभूमीचा संस्कृती रंग

 विवेक मराठी  09-Jun-2018

 

***अतुल जोग***

 वनवासी  कल्याण आश्रमाचे ईशान्य भारतात काम करत असताना लेखकाला तेथील संस्कृतीचे दर्शन घडवणारे विविध अनुभव आले. तेथील काही निवडक अनुभव.

अमर्याद शक्ती - आत्मविश्वास

वनवासी कल्याण आश्रमाच्या वतीने तेजपूर शहरात वनवासींच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. तेजपूर एक ऐतिहासिक आणि सांस्कृतिक शहर आहे व त्याचे पौराणिक नाव शोणितपूर आहे. आसामी भाषेत, शोणित म्हणजेच रक्त, याला 'तेज' म्हटले जाते. म्हणूनच हे गाव पुढे तेजपूर नावानेच ओळखले गेले. महाभारत काळात इथे बलिपुत्र बाणासुराचे राज्य होते. बाणासुराची कन्या उषा हिने आपल्या वडिलांना न सांगता कृष्णाचा नातू अनिरुध्द याच्याशी गंधर्व विवाह केला. हे कळल्यावर बाणासुराने दोघांनाही अग्निगडमध्ये बंदिवासात ठेवले. बाणासुरापासून आपल्या नातवाची सुटका करण्यासाठी श्रीकृष्ण द्वारकेहून येथे आला. बाणासुराशी त्याचे मोठे युध्द झाले. आपण युध्दात कमी पडत आहोत हे जाणून बाणासुराने आपले आराध्य भगवान महादेवाचा धावा केला. आपल्या भक्ताचा मान राखण्यासाठी महादेवाने श्रीकृष्णाशी युध्द केले. यालाच हरी-हर युध्द असे म्हणतात. या कथेचे वर्णन श्रीमद्भागवत पुराणात आहे.

तर आपण तेजपूर शहरातील वनवासींच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांबद्दल बोलत होतो. आसाममधील विविध जिल्ह्यांमधून आलेल्या खेळाडूंनी या स्पर्धेत भाग घेतला. हे खेळाडू ग्रामीण भागातील आहेत. स्पर्धकांना प्रशिक्षण मिळालेले नव्हते, तरीही त्यांचा उत्साह ओसंडून वाहत होता. या स्पर्धेत मॅरेथॉनदेखील आयोजित करण्यात आली होती. मुलींची मॅरेथॉन 14 कि.मी.ची असते. शर्यतीच्या एक दिवस आधी, खेळाडूंचे परीक्षण केले जाते. डॉक्टरांनी सर्व खेळाडूंना तपासले आणि प्रियंका नावाच्या एका बोडो मुलीला मॅरेथॉन शर्यतीसाठी आरोग्याच्या आधारावर अपात्र ठरविले. प्रियंका रडायला लागली, धावण्यासाठी वारंवार आग्रह धरू लागली. डॉक्टर वारंवार तिला समजावण्याचा प्रयत्न करीत होते. पण ती ऐकायलाच तयार नव्हती. ती सारखे एकाच वाक्य म्हणत होती - मला फक्त एक संधी द्या. ती हट्टच धरून बसली. शेवटी डॉक्टरांनी चिडून म्हटले की तू जर शर्यतीत धावलीस तर मरशील. प्रियंकाही लगेच म्हणाली, नाही मरणार.

अखेरीस असे ठरविण्यात आले की प्रियंकाला धावण्याची संधी दिली जाईल, परंतु तिला स्पर्धक क्रमांक देण्यात येणार नाही. म्हणजेच ती स्पर्धेचा भाग होणार नाही. ते तिने मान्य केले.

दुसऱ्या दिवशी सकाळी खेळाडू तयार झाले आणि मैदानावर पोहोचले. सर्व उत्साहात होते. मुलींची 14 कि.मी. स्पर्धा सुरू झाली. प्रियंका सगळयांबरोबर धावू लागली. रुग्णवाहिकाही मागे मागे जात होती. जर एखाद्याला काही त्रास झाला तर रुग्णवाहिकेने त्याला मध्ये उचलण्याची व्यवस्था होती. आयोजकांना वाटले की प्रियंकाला वैद्यकीय मदतीची आवश्यकता आहे. सर्व काही उत्साहात चालू होते. हळूहळू पाच किलोमीटर, दहा किलोमीटर पार झाले. रस्त्यावरचे लोकही उत्साह वाढीविण्यासाठी उभे होते. पाहता पाहता 14 कि.मी.ची शर्यतीची शेवटची रेष जवळ येऊ लागली. तेथे टाईमकीपर आणि रेफरी उभे होते. आणि एक मुलगी वेगाने पुढे पुढे जात शेवटी शर्यत जिंकली. पाहिले, तर ती प्रियंका होती. तिने आयोजकांना तिथे जाऊन विचारले, आणखी धावायचे आहे काय? तिचा आत्मविश्वास पाहून सगळेच चकित झाले.

महादान

अंगामी जमातीतील लोक नागालँडची राजधानी कोहिमाजवळ राहतात. अंगामी लोक त्यांच्या पारंपरिक पुराणमतवादी धर्माचे अनुयायी आहेत, ज्याला ते क्रना असे म्हणतात. हे लोक उकेपेनेफू नावाच्या सर्वशक्तिमान देवाची उपासना करतात. भारतीय कॅलेंडरप्रमाणे, चैत्र, वैशाख ... याच पध्दतीने 12 महिने असतात, त्यांच्या भाषेत गणनातील वेगवेगळी नावे देखील आहेत. भारतीय कॅलेंडरमध्ये ज्याप्रमाणे, चैत्र, वैशाख ... असे 12 महिने आहेत, याच पध्दतीने त्यांच्या भाषेत वेगळया नावांनी कालगणना केली जाते. त्यांचा सगळयात मोठा उत्सव म्हणजे सेक्रनी, जो कापणीनंतर उकेपेनेफूला कृतज्ञता दर्शविण्यासाठी साजरा केला जातो. या लोकांचा धर्म, संस्कृती आणि परंपरा यांचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी एक संघटना आहे - जाफू फिकी क्रना केसेको केहो.

अंगामी लोकांच्या मदतीने कोहिमापासून 22 कि.मी. अंतरावर विश्वेमा गावात 1997मध्ये जाफू फिकी क्रना शाळा सुरू करण्यात आली. मला तेथे काम करण्याची संधी मिळाली होती. आज तेथे प्राथमिक शाळा चालू आहे.

शाळेच्या इमारतीसाठी गावातल्या लोकांनी जागा देणगी म्हणून दिली होती. गावातले लोकांच्या व इतर काही लोकांच्या मदतीने इमारतीचे काम चालू झाले. डोंगरांच्या मध्ये, महामार्गाजवळ ही इमारत आकार घेत होती. संध्याकाळची वेळ होती. एक ओळखीचा वयस्कर माणूस मला भेटायला आला. तो रस्त्याचे काम करणारा मजूर होता. तो खडी तयार करण्याच्या मशीनवर काम करत होता. तो म्हातारा मजूर झारखंडचा होता. तो मला म्हणाला, ''मी नेहमी तुम्हाला इथे पाहतो. तुम्ही सगळे मिळून गावासाठी शाळेची इमारत बनवत आहात. आणि हे सर्व काम तुम्ही समाजाच्याच मदतीने करीत आहात. म्हणून मला वाटले मीही काही तरी करावे.'' मग त्याने मला पुढे विचारले की मी या इमारतीच्या बांधकामासाठी काही मदत करू शकतो का?

 आम्हा कार्यकर्त्यांना वाटले की हा मजूर आपल्याला काय मदत करू शकणार आहे? याच्याकडे आहेच काय? तरी उत्सुकतेमुळे मी त्याला विचारले, ''बाबा, तुम्ही कसली मदत करणार?''

तो म्हणाला, ''मी क्रशर मशीनवर काम करतो. गेल्या दोन महिन्यांत मी एक ट्रक खडी तुमच्या शाळेसाठी म्हणून गोळा करून ठेवली आहे. तीच मला द्यायची आहे. आपण घ्याल का?''

त्यावर आमच्यातला एक कार्यकर्ता म्हणाला, ''ही खडी तुमची तर नाहीये. ती तर तुमच्या कंपनीची आहे. तुम्ही चोरी करून ही खडी गोळा केली आहे काय?''

त्यावर म्हातारा म्हणाला, ''नाही, नाही. मी कंपनीच्या साहेबांना विचारलं आहे. तसे ही मिक्स खडी खाली राहते, ती आम्ही विकतोच. ते पैसे आम्हालाच मिळतात. पण मी ही विकली नाही. तुम्हाला कामाला येईल म्हणून मुद्दाम सांभाळून ठेवली. आमच्या साहेबांनासुध्दा ही कल्पना पटली. म्हणाले, चांगलं केलंत. साहेबांनीही सांगितलं आहे, खडी पोहोचविण्यासाठी गाडीची व्यवस्था करतील म्हणून. आपण स्वीकाराल ना माझी ही छोटीशी मदत?''

मला अश्रू अनावर झाले आणि त्या फाटक्या कपडयातल्या श्रीमंत माणसाकडे कौतुकाने पाहत राहिलो. दोन्ही हात जोडून त्याचे आभार मानत राहिलो.

आंधळा कोण?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे द्वितीय सरसंघचालक पूजनीय गोळवलकर गुरुजी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त अनेक ठिकाणी संमेलने भरविली गेली होती. मणिपूरच्या सेनापती जिल्ह्याच्या इरांग गावात प्रखंड संमेलन ठरले होते. संमेलन स्थळ मुख्य रस्त्यापासून 4-5 कि.मी. अंतरावर होते. रस्ता कच्चा होता. आचके खात गाडीतून खाली उतरलो आणि जवळजवळ अर्धा तास पायी चालत संमेलन स्थळापर्यंत पोहोचलो. सोबतच्या कार्यकर्त्याने सांगितले की जेवणानंतर कार्यक्रमाला सुरुवात होईल. हात-पाय धुऊन जेवणासाठी गेलो. सोबत इतर कार्यकर्तेही होते. पहिले तर माझे जुने स्नेही बद्रीनारायणजी खातिवडा, ज्यांना 'बद्री गुरुजी' नावाने ओळखले जाते, तेही होते. गुरुजी अंध होते. त्यांना नमस्कार केला. सगळयांबरोबर स्नेहभोजन झाले.

जेवणानंतर अंगणात गप्पा रंगल्या. विविध विषयांवर चर्चा सुरू झाली. गुरुजींनी विचारले, ''तुम्ही तर देशभरात हिंडता. तुम्ही ऐकलेच असेल की नागपुरात काही दिवसांपूर्वीच काही नवबौध्द धर्मांतरण करून मुसलमान झाले. ते का मुसलमान झाले? आपल्याला काय केलं पाहिजे?''

मी म्हटले, ''तुम्हाला कोणी सांगितले?''

ते म्हणाले, ''ही बातमी तर एका मित्राने मला जागरण मासिकातून वाचून दाखवली होती. मी नेहमी ते मासिक वाचत असतो.''

मी संकोचून म्हणालो, ''मला ठाऊक नव्हते. माझ्या वाचण्यात ही बातमी नाही आली.''

तेव्हा मी विचार करू लागलो. ज्यांना आपण दृष्टिहीन म्हणतो, ते मणिपूरसारख्या उत्तर पूर्वांचलच्या कोपऱ्यातून असूनदेखील, त्यांना देश आणि जगाची बातमी कळते. आणि केवळ बातमी वाचून थांबत नाहीत, तर त्याची काळजी करतात व त्यासाठी आपण काय करू शकतो, याचे चिंतनदेखील करतात.

....आणि आपल्याला देवाने सगळी इंद्रिये व्यवस्थित दिली असूनसुध्दा आपल्याला अशी माहिती नाही. बातमी माहीत असूनसुध्दा चिंतन करत नाही. तेव्हा माझ्या मनात प्रश्न आला की खरा अंध कोण? डोळे असून ज्यांना दिसत नाही ते, की डोळे नसताना ही सगळे पाहू शकतात ते?

बद्री गुरुजींचे वय सत्तर वर्षांचे असूनसुध्दा ते इरांगचा हा त्रासदायक प्रवास करून, पायी चालत, या हिंदू संमेलनापर्यंत पोहोचले होते. ते आजही गावोगावी फिरून नेपाळी समाज - जो संख्येने कमी आणि चारी बाजूंनी ख्रिस्ती, नागा व कुकी समाजाने वेढलेला आहे - त्यांच्यासाठी काम करत आहेत. अहिंसक, धर्मभीरू नेपाळी समाज आजही उपेक्षा, वंचना, भय, लोभ यामध्ये वावरतो आहे. त्यांना धर्मांतरित करण्याचा प्रयत्न ख्रिस्ती मिशनरी सतत करत असतात. तरीही बद्री गुरुजींसारखे धर्मरक्षक गावोगावी फिरून धर्माचे रक्षण करतात. रामायण, भागवताचे सप्ताह बसवतात. लोकांमध्ये धर्माबद्दल आस्था आणि देवाबद्दल श्रध्दा निर्माण करतात. आणि हेच आयुष्याचे ध्येय मानून आजीवन तेच कार्य करत राहतात.

वरून निर्बळ व अंध दिसणाऱ्या बद्री गुरुजींच्या आंतरिक शक्तीचा अंदाज आपण लावू शकू? निःस्वार्थी प्रेम, अखंड नामस्मरण, प्रचंड ईश्वरनिष्ठा, आठही प्रहर जागृत बुध्दी, समाजाबद्दल कमालीची आत्मीयता आणि धर्माबद्दल अनन्य श्रध्दा व समर्पण हीच ज्यांची पुंजी आहे, असे बद्री गुरुजी सर्वांसाठीच प्रेरणास्रोत आहेत.

हिंदी केवळ राष्ट्रभाषा नाही, संस्कृती आहे

बहुधा 1995ची गोष्ट असावी. मी कल्याण आश्रमचे तत्कालीन क्षेत्र संघटन मंत्री वसंतराव भट आणि नागालँडचे एक प्रमुख कार्यकर्ता जगदंबा मल्ल यांच्यासोबत दुपारच्या वेळी एका कुटुंबाला भेटायला गेलो. घर म्हणावे तर केवळ दोन बांबू वापरून तयार केलेली एक झोपडी आणि त्याच्याजवळ तशीच आणखी एक झोपडी होती. आत गेल्यावर, प्रसन्न चेहऱ्याच्या एका माणसाने आमचे स्वागत केले. ओळख झाल्यावर कळले त्याचे नाव पियोंग तेम्जन जमीर आहे. तो आओ नागा समाजातील होता. पण व्यवस्थित हिंदी बोलत होता. थोडया वेळाने त्याची पत्नी व मुलगी रुपाचीला बाहेर आल्या. त्या दोघीही चांगले हिंदी बोलत होत्या. हे माझ्यासाठी आश्चर्य होते. कारण मी पहिल्यांदाच एका नागा कुटुंबाला इतकी छान राष्ट्रभाषा येत असलेली पाहत होतो.

नंतर ओळख वाढल्यावर आणखी माहिती मिळाली. गुरुजी हिंदी शिकणाऱ्या नागा समाजाच्या पहिल्या पिढीतील व्यक्ती होते. शाळेत असताना सुरुवातीला हिंदी शिकणे फार अवघड गेले. कारण हिंदीचा आओ भाषेशी दूरदूरपर्यंत काही संबंध नव्हता. एका प्रकारे हिंदी त्यांच्यासाठी परकीय भाषाच होती. पण शिकता शिकता आवड निर्माण झाली. नंतर राष्ट्रभाषा प्रचार समिती वर्धाच्या एका स्थानिक संस्थेकडून हिंदीचे शिक्षण पूर्ण केले. तेव्हापासून त्यांनी हिंदी शिकविण्याचे व्रतच घेतले. कारण ज्या राज्य नागालँडची राजभाषा इंग्लिश होती, शिक्षणाचे एकमात्र माध्यम इंग्लिश होते, अशा नागालँडमध्ये हिंदी शिकविण्याचे व्रत घेणे हे दुस्साहसच म्हणावे लागेल. एवढेच नाही, तर अनेक स्थानिक लोकांनी उपेक्षा केली, टिंगल केली, तर काहींनी त्यांना मूर्खात काढले. अनेकांनी तर केवळ यासाठी विरोध केला की नागा विद्यार्थी जर हिंदी शिकले, तर ते हिंदू होतील. पण त्यांनी सांगितले की मी स्वत: ख्रिस्ती आहे. पण त्यांचे मत आहे की हिंदी जगातल्या समृध्द भाषांपैकी एक आहे. ती शिकून घेणे प्रत्येक नागा बंधूची आवश्यकता आहे.

त्यांनी स्वत:ची ओळखही 'राष्ट्रभाषेचा प्रचारक' म्हणूनच करून दिली. मी त्यांना विचारले की तुम्ही हिंदी शिकविता, तर स्वत:ला हिंदीचा शिक्षक का म्हणत नाहीत? तेव्हा ते म्हणाले की हिंदी भाषेला प्रत्येक माणसापर्यंत पोहोचविणे हेच माझ्या आयुष्याचे ध्येय आहे आणि म्हणूनच मी हिंदी केवळ शिकवीत नाही, तर प्रत्येक नागा बंधूला त्याचे महत्त्व समजावून सांगतो. त्यांना हिंदी वाचण्यासाठी प्रेरित करतो. पियोंग तेम्जन जी कुर्ता-पायजमाच घालतात. ते सगळयांचे स्वागत नमस्काराने करतात. त्यांनी सुरुवातीला स्वत: झोपडीत राहून वेगवेगळया जनजातींच्या नागा विद्यार्थ्यांना हिंदी शिकविले. ते केवळ त्यांच्या वसतिगृहाचे प्रमुखच नाही झाले, तर पिता झाले. ते, त्यांच्या पत्नी, मुलगी, मुलगा सगळे गुरुजींसारखेच राष्ट्रभाषेची सेवा करीत आहेत. सगळे त्यांना गुरुजी व त्यांच्या पत्नीला गुरुमाता म्हणतात. ते दर वर्षी 14 सप्टेंबरला राष्ट्रभाषा दिन खूप मोठया प्रमाणात साजरा करतात. व्यासपीठावर मोठया अक्षरांत लिहिलेले असते - भारत जननी एक हृदय हो।

आज चार दशकांच्या त्यांच्या तपश्चर्येमुळेच एक मोठे राष्ट्रभाषा हिंदी संस्थान भारत शासनाच्या मदतीने उभे राहिले आहे. 2000 साली कोहिमाला शिक्षण सुधार या विषयावर एका चर्चेचे आयोजन केले गेले होते. त्यात अनेक शिक्षण शास्त्रज्ञ, शिक्षण क्षेत्रातले तज्ज्ञ, विद्यापीठातील विद्वान आलेले होते. ते सगळेच आपापल्या अनुभवाप्रमाणेच विषयाचे विद्वत्तापूर्ण विवेचन करत होते. पियोंग तेम्जन गुरुजीसुध्दा हजर होते. त्यांना जवळजवळ शेवटीच बोलण्याची संधी आली. त्यांनी आपल्या व्याख्यानाच्या सुरुवातीलाच म्हटले की ''मला सकाळपासून कळतच नव्हते की मी भारतात आहे, अमेरिकेत आहे का युरोपमध्ये. कारण सगळेच जन इंग्लिशमध्ये बोलत होते. पण मी भारतीय आहे, म्हणून मी हिंदीतच बोलणार. मला काळजी आहे माझ्या नागा जनजातीय भाषांची. कारण इंग्लिश माध्यमातून शिक्षण आणि नागा भाषांना असलेल्या रोमन लिपीमुळे आमच्या नागा भाषा संकटात आहेत. माझे मत आहे की जर या भाषांना देवनागरीत लिहिले जाऊ लागले, तर या भाषांचादेखील भारतच्या लोकांमध्ये प्रचार-प्रसार होईल व तेही या भाषा शिकून घेण्याचा प्रयत्न करतील. म्हणूनच माझे स्वप्न आहे की नागा जनजातीच्या भाषांना देवनागरीत लिहायला सुरुवात व्हावी.''

मला वाटले, नागा समाजामध्येसुध्दा इतका स्पष्ट विचार करणारे लोक आहेत. त्यामुळेच आज आशेचा एक किरण दिसतो आहे. आज चार दशकांच्या त्यांच्या तपश्चर्येमुळेच एक मोठे राष्ट्रभाषा हिंदी संस्थान भारत शासनाच्या मदतीने उभे राहिले आहे. शेकडो विद्यार्थी आज हिंदीचे प्राध्यापक झाले आहेत.

हिंदी केवळ एक भाषा नाही, तर संस्कृती आहे. एक विचार आहे आणि देशाला जोडणारे एक सूत्र आहे. आज नागालँडच्या मुलांना हिंदी बोलता येत आहे. तुमच्या मुलांना हिंदी येते का? का हिंग्लिश?

मराठी अनुवाद - अमोल दामले.

9903025639