नागांचा आपुलकीचा पाहुणचार

 विवेक मराठी  10-Jul-2018

 

 

 नागालँडची खासियत म्हणजे इथे कधी आळस येत नाही. हिरव्या डोंगराकडून आकाशाच्या निळया-काळया छटांमधून आणि घराघराबाहेर दिसण्याऱ्या मोहक रंगांच्या फुलांकडून जणू कार्यमग् राहा असा संदेश सतत मिळत असतो. प्रत्येक घरातला नीटनेटकापणा, स्वच्छता. अद्वितीय कल्पकता, दुपारचा वेळ झोप न काढता अतिक्लिष्ट असं हातमागाचं विणकाम करण्याचा महिलांचा उत्साह, मनापासून केलेला पाहुणचार आणि चेहऱ्यावर सदैव फुललेलं निरागस हास्य... सारं किती लोभसवाण

नागालँडच्या उंच शिखरावर उभं राहून ''मी अमोल पवार बोलतोय'' हा खणखणीत आवाज ऐकताना हृदय अभिमानाने भरून आलं. पश्चिमेच्या कऱ्हाडचा हा तरुण देशाच्या सुरक्षेसाठी ईशान्येच्या सीमेवर सज्ज होता. अमोल पवार आणि भालेराव असे दोघे आम्हाला आसाम रायफल्समधील दुर्गा मंदिरात भेटायला आले.

जवानांना भेटण्याचा हा दुर्मीळ योग. आम्ही आमची ओळख करून दिली. महाराष्ट्रातून इतक्या लांब कोण बरं आलं असेल, हे आश्चर्याचे भाव अजूनही त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होते. मग अस्सल मराठीतून आमच्या गप्पा सुरू झाल्या. आपल्या कुटुंबातलंच कोणी भेटल्याचा आनंद झाला होता आम्हाला. कॅम्पमध्ये साजरा होणारा गणपती उत्सव, होळी यांनी ही परंपरा तिथेदेखील जपली होती.

 मग आम्ही तुएन्सांगमधील हेलिपॅड पहायला गेलो. उंच डोगरांच्या कुशीत संथपणे खेळणारा वारा इथे मात्र थोडा अवखळ मुलासारखा सैरावैरा धावत असतो. सर्वत्र हिरवाईने नटलेले डोंगर, एका बाजूला पायऱ्यापायऱ्यांवर वसलेलं तुएत्सांग शहर, तर कुठे लगबगीने पळणारे ढगांचे थवे... एक वेगळीच अनुभूती, या सुंदर चित्रातील एक छोटा बिंदू होण्याची...

आमच्याकडील चिवडा, कडबोळी त्या दोघांना भेट देऊन आम्ही त्यांचा निरोप घेतला. खूप समाधानाने आम्ही तिथून परतलो. देशाचे जवान हेच खरे हिरे आहेत. त्यांची भेट झाली अन् एक नवी ऊर्जा तनामनात संचारली. काम कठीण आहे खरं, पण प्रयत्न करत राहायचे. मातीला मातीची ओढ लागेलच कधीतरी. मनामनात आपुलकीचा बंध नक्की निर्माण होईल. हवं ते सहवास, संवाद, आणि सातत्य...

आम्ही तिघी सतत चर्चा करायचो. काय करता येईल.. आणि त्यातून काही गोष्टी प्रकर्षाने जाणवू लागल्या. पूर्वांचल, तिथलं काम हा हृदयाला भिडणारा विषय आहे. मतभेद, पक्षभेदाच्या भिंती इथे सहज गळून पडतात. हा विषय जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवायला पाहिजे. तिथला समाज, सुरक्षितता याबद्दल असणारे गैरसमज दूर करायले हवेत आणि प्रत्येकाने या कामात यथाशक्ती योगदान देण्याचं आवाहन करायला पाहिजे. साऱ्या चर्चेचं सार हेच होतं.

हे संघाचं युग आहे. एकटयाने काही साध्य होणार नाही. हाताला हाताची जोड मिळाली आणि बुध्दीला शुध्द हेतू मिळाला, तर अशक्य काहीच नाही. प्रत्येक व्यक्तीच्या हृदयात आपल्या देशासाठी, भारतमातेसाठी काही तरी करण्याची इच्छा असतेच. अशा समस्त लोकांनी एकत्र येऊन नियोजनाचे काम केलं, तर... खूप काही मनात येत राहिलं. कल्पनांच्या हिंदोळयावर झुलणारं मन नव्या वाटांनी रोमांचित झालं. अशातच कधीतरी डोळा लागला.

सकाळी 4 वाजताच सूर्यदर्शन झालं. सर्व आवरून मी समोर राहणाऱ्या नारोच्या घरी गेले. इथे घराचा प्रवेश स्वयंपाकघरातूनच होतो आणि घराची दारं सदैव उघडी. कडया, कुलपं लावण्याची गरज या लोकांना वाटत नाही. मी घराचा दरवाजा वाजवला, तर नारोचे 60 वर्षांचे वडील बाहेर आले. प्रथमच भेट झाली असूनही हसऱ्या चेहऱ्याने माझं स्वागत झालं. नारोची चौकशी झाली. थोडया गप्पा झाल्या अन् माझ लक्ष त्याच्या घराच्या टेबलावर स्थिरावलं. माझं कुतूहल लक्षात येऊन ते म्हणाले, ''ही माझी संपत्ती आहे.'' त्यानंतर त्यंानी मला आश्चर्यकारक सत्य सांगितलं. कोणत्याही प्रशिक्षणाशिवाय उत्कृष्ट कॅलिग्राफी करायचे. स्वत:चे असे 8 फॉन्ट त्यांनी तयार केले होते. शुभ्र कागद, काळी शाई आणि पार्करचं कॅलिग्राफी पेन ही ज्याची संपत्ती आहे, असा एक कलाकार एम. इम्तिचुबा चांग गेली 45 वर्षं तुएन्सांगसारख्या एका कोपऱ्यात आपली कला जोपासतो आहे, अक्षरांशी मैत्री करून त्यांना मनाजोगतं वळवतो आहे. कलाकाराला हवी असते ती त्याच्या कलेला मिळालेली दाद. या कलाकराला आपण फोन करून त्यांचं अभिनंदन केलं, तर तेही एक देशकार्यच आहे.

नागालँडची खासियत म्हणजे इथे कधी आळस येत नाही. हिरव्या डोंगराकडून आकाशाच्या निळया-काळया छटांमधून आणि घराघराबाहेर दिसण्याऱ्या मोहक रंगांच्या फुलांकडून जणू 'कार्यमग् राहा' असा संदेश सतत मिळत असतो. प्रत्येक घरातला नीटनेटकापणा, स्वच्छता. अद्वितीय कल्पकता, दुपारचा वेळ झोप न काढता अतिक्लिष्ट असं हातमागाचं विणकाम करण्याचा महिलांचा उत्साह, मनापासून केलेला पाहुणचार आणि चेहऱ्यावर सदैव फुललेलं निरागस हास्य... सारं किती लोभसवाणं.

आज आम्हाला चाबा गव्हर्नमेंट स्कूलमध्ये जायचं होतं. गर्व्हर्नमेंट टीचर्सना प्रशिक्षणाचा हा प्रयोग होता. तीन दिवस सतत पाठपुरावा करून दिवस पक्का झाला. मुख्याध्यापक उत्सुक वाटत नव्हते, पण तोची सरांच्या आदेशाने 15 शिक्षक ट्रेनिंग रूममध्ये आले. असा प्रयोग त्यांच्यासाठी नवीनच होता. सगळे शांत, थोडे बुजलेल्या चेहऱ्याने बसले होते. सईताईचं कंटेन्ट अप्रतिम होतं. अभ्यासाची आवड कशी लावावी, संकल्पना कशा समजावून द्याव्या यावर तिने छान ऍक्टिव्हिटीज घेतल्या. काही जण थोडं बोलू लागले, पण बऱ्याच जणांच्या चेहऱ्यावर 'हे काय?' असे भाव होते. पुन्हा दुसऱ्या दिवशी जायचं ठरवून आम्ही वसतिगृहात परतलो. क्राफ्ट क्लास झाला.

इतक्यात हाँकिन आल्याचं कळलं, म्हणून मी कार्यालयात गेले. सहज गप्पा मारता मारता करियर गाइडन्सची कल्पना समोर आली आणि त्याने ती उचलून धरली. सेक्टरमधल्या 9पासूनच्या सर्व मुलामुलींना एकत्र करण्याची जबाबदारी त्याने घेतली. कम्युनिटी हॉल मिळवला. लगेच आम्ही तिघी त्या कार्यक्रमाच्या तयारीला लागलो. नियोजनात नसलेला कार्यक्रम आम्ही घेणार याचा खूप आनंद झाला होता.

या आनंदाच्या शाली अंगावर ओढून दुसऱ्या दिवशी चाबा शाळेत गेलो. 'आज ट्रेनिंगला कोणी नाही येऊ शकत.' असं सांगून मुख्याध्यापकांनी आम्हाला लगेच मोकळं केलं. 'सरकारी शाळांच्या शिक्षकांना नवं काही शिकायला वेळ नाही' हे सत्य स्वीकारून गारठल्या मनाने बाहेर पडलो.

गृहसंपर्क मात्र सुरूच होता. सईताई, सानिकाताई माझ्याबरोबर घराघरात यायच्या. तिथली माणसं, घरं, त्यांची संस्कृती आणि सर्वात उठून दिसणारी मनाची प्रसन्नता यावर एक स्वतंत्र लेखच होईल. हे सारं त्यांना अनुभवता आलं. आपण नागालँडबद्दल जे ऐकतो, त्यापेक्षा खूप आगळंवेगळं, सकारात्मक, प्रेरणादायी पाहायला मिळतं, शिकायला मिळतं याची या प्रवासात सतत जाणीव होत राहते.

आमचा करियर गाइडन्सचा कार्यक्रम धो धो पावसातदेखील छान पार पडला. 15 मुलं-मुली उपस्थित होते. सारे खूश होते. सहा दिवसांचा छोटेखानी दौरा होता हा... दरम्यान नायवांगच्या मदतीने राज्यपाल माननीय पद्मनाभजी आचार्य यांच्याशी 2 मेला रात्री भेट ठरली आणि तीन दिवस आधी आम्ही सुमोची तिकिटं बुक केली. रात्री बातमी आली की आसामने वाहनांना पेट्रोल-डिझेल पुरवठा थांबवल्याने दळणवळण बेमुदत ठप्प होणार. आमचं 5 मेचं विमानाचं तिकिट होतं. पुन्हा एकदा अनिश्चिततेचं धुकं... पूर्वांचलात अशा गोष्टींना आपण तयार राहावं लागतं. सगळी गणितं इथे सरळसोट सुटतीलच असं नाही.

मग तुएन्सांग ते कोहिमा पोहोचण्यासाठी पर्याय शोधायला सुरुवात केली. नायवांगही विचार करत होता, पण तो विश्वासाने सांगायचा, ''तुम्ही काळजी नका करू. तुम्हाला इथे आणणार मी. काहीतरी मार्ग निघेल.'' इतका प्रखर विश्वास त्यात असायचा की अशा अडचणीदेखील सुखद वाटाव्यात. चौथी-पाचवीत शिकणारा छोटासा नायवांग आज आमची काळजी आईच्या मायेने वाहत होता. शेवटी नायवांगच्या मदतीने लियांगनी यांच्या गाडीत बसून आम्ही सुखाने कोहिमात पोहोचलो.

आम्ही 2 मेला संध्याकाळी कोहिमात पोहोचलो. कोहिमा हे राजधानीचं शहर. दाटीवाटीने वसलेलं. शहरात शिरलो आणि एका लांब वाहनाच्या प्रवाहाचा भाग झालो. एका रांगेत सगळया गाडया. कर्णकर्कश हॉर्न इथे ऐकायला येत नाहीत की पुढे जाण्याच्या घाईने कुणी ओव्हरटेक करत नाही. डोंगराळ भागातले अरुंद रस्ते, त्यामुळे ट्रॅफिक जाम होतं. पण नागा लोकांची कमालीची शिस्त आणि संयम हे आपण शिकावं असंच आहे.

नायवांगने एका केरळी लॉजमध्ये आमची निवासाची व्यवस्था केली होती. आमची सगळी व्यवस्था चोखपणे पाहिली त्याने. अगदी आनंदाने, आपुलकीने. थोडं फे्रश झालो आणि नायवांग डॉक्टर लोझोहोंना घेऊन आला. जनजाती विकास जमातीचे सेक्रेटरी. त्या दोघांनी दुसऱ्या दिवशीचा कार्यक्रम निश्चित केला.

आम्ही दुसऱ्या दिवशी लोझोहोंच्या गाडीने नायवांगसह विशीमाला निघालो आणि योगायोगाने आमची गाडी चालवत होता माजी विद्यार्थी विझोदी. छान गप्पागोष्टी करत विशिमात पोहोचलो. भक्कम दोन मजली इमारत पाहिली आणि मन 2001मध्ये जाऊन पोहोचलं. ही अतुलजींची शाळा... 150 मुलांनी गजबजलेली. स्थानिक लोकांच्या पाठिंब्याने उभी असलेली. अतुलजींचा परिचय झाला तो इथेच. आपल्या रत्नागिरीतील एका व्यक्तीने देशाच्या दुसऱ्या टोकाला उभं केलेल्या वैभवाचा अद्भुत नमुना. आज 17 वर्षांनी पुन्हा या शाळेत आले. मुकुंदराव पणशीकर, किशोरपंत बापट यांची आठवण आली. कारण त्या दोघांसहच तर मी इथे आले होते. त्यांच्या आठवणीने या कामाशी असलेल्या बांधिलकीची, या भागाशी असलेल्या नात्याची लख्ख जाणीव झाली.

शाळेतील पालक-शिक्षकांशी संवाद झाला. मुलांचं क्राफ्ट प्रशिक्षण झालं. टीचर्स ट्रेनिंग झालं. भारतीय स्त्री शक्तीचं काम तिथे रुजू लागलंय, हे पाहून उत्साह वाढला.

या शाळेतून निघालो ते हेरिटेज व्हिलेज म्हणून नागा संस्कृतीचं दर्शन घडवणाऱ्या किसामा या गावात गेलो. भौगोलिक रचनेनुसार उभारलेले मोरांग हे याचं वैशिष्टयं.... 1 ते 10 डिसेंबर इथे हॉर्नबिल फेस्टिवल साजरा होतो. साऱ्या नागालँडचं सांस्कृतिक दर्शन एकाच वेळी घ्यायचं, तर या वेळी नक्की या गावाला भेट द्यावी.

यानंतर आमची गाडी निघाली ती आशियातील सर्वाधिक हिरवं गाव असलेल्या खोनोमा गावी. एखाद्या प्रगल्भ कलाकाराने आपल्या कुंचल्यातून हिरव्या रंगाच्या अगणित छटा चितारल्या आहेत आणि त्यांना उठावदार करायला एकीकडे लाल रंग पायाकडे अन् निळा रंग डोक्याकडे शिंपडला आहे, असं वाटावं इतकं अप्रतिम निसर्गसौंदर्य, स्वच्छता, शांतता आणि या कलाकारीत चपखल बसलेलं तिथलं जनजीवन. त्या गावातून निघावंसं वाटेना. पण राजभवन आमची वाट पाहत होतं. हिरवाईचा हा अद्भुत नजारा प्रत्येक भारतीयाने एकदा तरी पाहावा, अनुभवावा असं वाटतं.

राजभवनाचा परिसर प्रशस्त आणि देखणा होता. उंच देवदारचे वृक्ष, रंगीत फुलांचे ताटवे आणि मध्ये तिरंग्यासमोर उभं असलेलं रेखीव राजभवन. आमची सर्व व्यवस्था 'फाइव्ह स्टार' होती. सरकारी पाहुणचाराचा पहिलाच अनुभव. आम्ही संध्याकाळी राज्यपाल पद्मनाभजींना भेटलो. अर्धा तास गप्पा झाल्या. रात्री सहभोजनाचं आमंत्रण मिळालं. 84 वर्षांचे पद्मनाभजी, पण उत्साह, कामाची पध्दत मात्र 24च्या तरुणासारखी. जेवताना खूप अनौपचारिक गप्पा झाल्या आणि दुसऱ्या दिवशी दिमापूरला सोडण्याची व्यवस्थादेखील झाली.

कोहिमातून बाहेर पडताना आमची गाडी चुकून ‘No Entry’मध्ये शिरली. One wayच्या विरुध्द दिशेने गाडी चालवणं म्हणजे प्रवाहाविरुध्द पोहणंच... त्यातही तो नागालँडमधला चिंचोळा One way असेल तर... आमची गाडी एका ठिकाणी येऊन फसली आणि आता सगळयांच्या शिव्या खायला मिळणार असं वाटलं. पण आम्ही पुण्या-मुंबईत नव्हतो, तर संयमी असणाऱ्या नागा लोकांच्या राजधानीत होतो. इथला अनुभव वेगळा. थोडया थोडया अंतरावर दोन-तीन लोक गाडीतून उतरत. आम्हाला थोडी मदत करत आणि 20 मिनिटांनी आमची गाडी कोंडीतून बाहेर पडली. मार्ग मोकळा झाला.

तर असा हा नागालँडचा प्रवास. केवळ 15 दिवसांनीसुध्दा खूप मोठा ठेवा दिला आम्हाला. नागालँडमध्ये 60 कि.मी. अंतरावर रेल्वेलाइन टाकली जातेय. हा एक शुभसंकेत आहे. चाँगसा, नायवांग, विझोदी, लिरोसी असे माजी विद्यार्थी आपल्यासाठी ठामपणे उभे राहतात, हे या प्रवासाने दाखवून दिलं. आंबट-गोड अनुभव गाठीला बांधून आम्ही दिमापूरच्या इंडिगोमध्ये बसलो. आपला प्रयोगाचा पहिला टप्पा अपेक्षेहून अधिक यशस्वी झाला, या समाधानाने आम्ही तिघीही सुखावलो होतो आणि अशातच विमानाने आकाशात उंच भरारी घेतली.

& 9273609555, 9823879716