इस्रायली व्यक्तिमत्त्व

 विवेक मराठी  12-Jul-2018


 

 इस्रायली लोक अत्यंत प्रखर देशाभिमानी असतात. म्हणजे अगदी टोकाची डावी विचारसरणी असलेले इस्रायलीदेखील इस्रायलच्या विरोधात बोलताना दिसणार नाहीत. ज्यूंमधील आक्रमक स्वभाव आणि हुज्बा हा स्वभाव बहुतांश इस्रायलींमध्ये दिसतो. इस्रायली लोक आणि इतर देशातील लोक यात प्राथमिकता ठरवायची असेल, तर त्यांची प्राथमिकता कायम इस्रायली व्यक्तीलाच असते.

प्रत्येक प्रदेशातील स्थानिक लोकांमध्ये त्या त्या प्रादेशिक वैशिष्टयानुसार व्यक्तिमत्त्वाचे पैलू दिसून येतात. उदाहरणार्थ, कॅनडामधील लोक खूपच सौजन्यशील असतात. आपला जरी कुणाला धक्का लागला, तरी आपल्या आधी तेच सॉरी म्हणून मोकळे होतात. पण ते तुमच्याशी कारण नसताना बोलणारदेखील नाहीत. व्यक्तिगत स्पेस जपणे हा एक प्रमुख मुद्दा त्यांच्याकडे सगळयात महत्त्वाचा आहे. याउलट इंग्लंडमध्ये गेलात, तर ब्रिटिश लोक तुमच्याकडे बघणारही नाहीत, तर बोलणे फारच दूरची गोष्ट. तुम्ही काही विचारलेत तरी तुम्ही त्या ठिकाणी अस्तित्वात नाही आहात अशा पध्दतीची वागणूक तुम्हाला ब्रिटिश व्यक्तीकडून मिळेल. गर्दीत चुकून धक्का लागला, तर ते तुमच्याकडे अतिशय तुच्छ असा कटाक्ष टाकतील. इस्रायलमधील लोकांच्या व्यक्तिमत्त्वात भूमध्य समुद्री हवामानाचा परिणाम नक्कीच दिसून येतो.

इस्रायलमध्ये पहिल्यांदा उतरल्यावर हैफाला जाणाऱ्या ट्रेनमध्ये आम्हाला पहिल्यांदाच अनुभव आला. ट्रेन खचाखच भरलेली होती आणि सर्वांनी आपले सामान असेच जाण्यायेण्याच्या मार्गात ठेवलेले होते. टिपिकल कॅनडा-इंग्लंड असते, तर हे असे खपवूनच घेतले नसते. पण आमच्या समोरच्या सीटवर बसलेल्या इस्रायली दांपत्याने आमचा उडालेला गोंधळ पाहून आमच्याकडे पाहून स्मित करून आम्हाला सांगितले, ''इथे इस्रायलमध्ये हे चालते. तुमच्या बॅग्ज इथेच ठेवा.'' त्यांचा वागण्यातील तो मोकळेपणा मनाला खूप भावला. एकूणच इस्रायली लोक वागायला एकदम अघळपघळ आहेत. म्हणजे त्यांच्यात पौर्वात्य आणि पाश्चिमात्य स्वभावांचे एकत्रीकरण पाहायला मिळते. आपण बस स्टॉपवर उभे असलो तरी अनोळखी लोक आपल्याकडे पाहून हसतात आणि भारतीय असल्याने ताबडतोब भारताविषयी बोलायला सुरुवात करतात. तिथे सर्वाधिक हिब्रू भाषाच बोलली जाते आणि इंग्लिश फारच कमी लोकांना येत असल्याने आपल्याला भाषेचा प्रश्न उद्भवतो. पण आपण कोणालाही माहिती विचारली, तरी जर इंग्लिश येत असेल तर मोडक्यातोडक्या इंग्लिशमध्ये, नाहीतर खाणाखुणांनी आपल्याशी बोलून आपली मदत करतातच. इस्रायली लोकांचा हा मदत करण्याचा गुण खूप घेण्यासारखा आहे.

सर्वच इस्रायली लोक अत्यंत प्रखर देशाभिमानी असतात. म्हणजे अगदी टोकाची डावी विचारसरणी असलेले इस्रायलीदेखील इस्रायलच्या विरोधात बोलताना दिसणार नाहीत. इस्रायली लोक आणि इतर देशातील लोक यात प्राथमिकता ठरवायची असेल, तर त्यांची प्राथमिकता कायम इस्रायली व्यक्तीलाच असते. मग अनेक बाबतीत त्यांचा देशाभिमान हा कधी 'तुम्ही बाहेरचे' यामध्ये प्रतिबिंबित होताना दिसतो. त्यांच्यात एक प्रकारचा कडवेपणा दिसून येतो. उदाहरणार्थ, मी ज्या डिपार्टमेंटमध्ये संशोधक म्हणून होते, तिथे सगळया चर्चा हिब्रूमध्येच होत असत. अगदी इतरांना इंग्लिश येत असूनही सगळे हिब्रूमध्येच बोलत असत. कारण त्यांचे असे म्हणणे की ते त्यांच्या मातृभाषेत अधिक वेगाने आणि स्पष्ट विचार करू शकतात. यात अमान्य करण्यासारखे काहीच नाही. फक्त ज्याला हिब्रू भाषा येत नसते, त्या व्यक्तीला विशेषत: संशोधनाची, ऍकॅडमिक चर्चा इंग्लिशमध्ये नसेल तर काहीच समजणार नाही आणि फायदाही होणार नाही. मी एकदा तेल अविवला एका डॉक्टरकडे गेले होते. तेव्हा त्यांनी मी भारतीय आहे आणि इस्रायलमध्ये नवीन आहे हे माहीत असूनही माझ्याशी हिब्रूतच बोलायला सुरुवात केली. मग मी जेव्हा त्यांना सांगितले की मला हिब्रू येत नाही, तेव्हा त्यांनी ताबडतोब प्रतिक्रिया दिली - ''येस, अन्फर्ॉच्युनेटली वुई हॅव टु स्पीक इन इंग्लिश.'' हिब्रू भाषेच्या बाबतीतला कडवेपणा एका दृष्टीने चांगलाच आहे. कारण तो कडवेपणा नसता, तर आज इस्रायल एक स्वतंत्र राष्ट्र म्हणून उभे राहिले नसते. हिब्रू ही मृतप्राय झालेली भाषा पुनरुज्जीवित झाली नसती आणि विविध देशांतून आलेल्या ज्यूंना सामाईक भाषा म्हणून इंग्लिशच्या कुबडया घ्याव्या लागल्या असत्या. पण त्यामुळे इस्रायल हे एक ज्यू राष्ट्र राहिले नसते. पण ज्याला हिब्रू येत नसते, त्याच्यासाठी हा कडवेपणा म्हणजे एक आक्रमकता वाटते. काही प्रमाणात ज्यूंच्या बाबतीत हिब्रूचाच आग्रह धरणे हे त्यांच्या आक्रमक स्वभावाचे द्योतक आहे. यावरून मला असे वाटते की आपल्या देशात सुरुवातीलाच संस्कृत भाषेला असे महत्त्व दिले असते, तर आज आपली राष्ट्रीय भाषा संस्कृत असती, इंग्लिश नसती. आज दोन भारतीय जेव्हा एकमेकांशी इंग्लिशमध्येच संभाषण करतात, (मीदेखील याला अपवाद नाही) तेव्हा मनाला खरेच यातना होतात. आपण एकमेकांच्या प्रादेशिक भाषा नाकारायच्या म्हणून एका परकीय भाषेला आपलेसे केलेले आहे. भाषा आली की संस्कृती हातात हात घालून येते. याविषयी स्वतंत्र लेखच होऊ शकतो.

मागच्या एका लेखात मी शब्बात पाळण्यासंदर्भात लिहिलेले होते. अधिकांश इस्रायली ज्यू शब्बात पाळतात. कितीही शिकलेले, उच्चपदस्थ असले, तरी शब्बातमध्ये वाहन न चालवणे, स्विचेस ऑॅफ न करणे, लिफ्ट न चालवणे, फोनवर न बोलणे इत्यादी गोष्टी अतिशय कडवेपणाने पाळतात. आत्ता साधारण साठीच्या घरात असलेल्या इस्रायली ज्यू लोकांच्या आई-वडिलांच्या पिढीने हॉलोकॉस्ट पाहिलेले आहे. कित्येक हयातदेखील नाहीत. पण त्यांच्यामध्ये त्या सगळयाची जाण दिसते. ही पिढी खूपच मनमोकळी, इतरांना स्वीकारणारी अशी आहे असे जाणवले. त्यांच्या आई-वडिलांनी भोगलेल्या हॉलोकॉस्टच्या आठवणी त्यांच्या मनात अजूनही जाग्या आहेत. त्यामुळे स्वतंत्र ज्यू राष्ट्र म्हणून इस्रायलच्या अस्तित्वाविषयी त्यांना खूपच अभिमान आहे. इस्रायलच्या तरुण पिढीत हीच भावना आढळत नाही. पण त्यांच्या अनिवार्य लष्करी सेवेमुळे त्यांच्या मनात इस्रायल एक राष्ट्र याविषयी अभिमानाची, प्रेमाची भावना आहे हे दिसून येते.

ज्यूंचा आणखी एक गुण म्हणजे त्यांचा दानशूरपणा. झायोनिस्ट चळवळीला पाठिंबा म्हणून अमेरिकेत असलेले अनेक ज्यू लोक इस्रायलमध्ये हजारो डॉलर्सचे दान करतात. यातीलच पैसा ज्यूंच्या इस्रायलमधील एस्टॅब्लिशमेंटसाठी वापरला जातो. अनेक ज्यू लोक त्यांच्याकडील कमी वापरलेल्या पण चांगल्या आणि त्यांना नको असलेल्या वस्तू रस्त्याच्या बाजूला फुटपाथवर ठेवून देतात. इस्रायलमध्ये सेकंड हँड गोष्टी वापरणे अजिबात कमीपणाचे मानले जात नाही. त्यामुळे अधिकाधिक इस्रायली लोकांना या पध्दतीचा फायदाच होतो. कारण बरेच वेळा तुम्हाला रस्त्याच्या बाजूला फुटपाथवर उत्तमोत्तम गाद्या, सोफे, खर्ुच्या, फ्रीज, टीव्ही, मायक्रोवेव्ह, रूम हीटर्स, फॅन्स अशा वस्तू ठेवलेल्या दिसतात. ज्यांना गरज असेल ते त्या वस्तू घेऊन जातात आणि वापरायला सुरुवात करतात. हा गुणधर्म ज्यूंमध्ये बहुधा त्यांच्या इतर देशांत उपरेपणाने राहावयास मिळाल्याचा परिणाम असावा किंवा हॉलोकॉस्टमध्ये साधन कमतरतेचा जो अनुभव त्यांच्या पूर्वजांना मिळाला, त्यामुळे आलेला असावा. इस्रायलमध्ये संध्याकाळी दुकाने, हॉटेल्स बंद होण्याच्या सुमारास जर बाजारातून फेरफटका मारला, तर एक विलक्षण गोष्ट पाहावयास मिळते. दुकान/हॉटेल्स बंद करायच्या आधी ती स्वच्छ केली जातात आणि हॉटेल्समध्ये किंवा स्टॉल्सवर उरलेले अतिशय उत्तम क्वालिटीचे आणि गरम गरम अन्न असेल ते छान पॅकिंग करून बाहेर एका जागी व्यवस्थित ठेवले जाते. ज्यांना हवे असेल ते लोक ते अन्न घेऊन जातात एकही शेकल न देता. नाहीतर आपल्याकडे हॉटेल्स बंद व्हायच्या वेळेस उरलेले अन्न अक्षरश: गटारात फेकले जाते.

पूर्वी इस्रायलींमध्ये घटस्फोटांचे प्रमाण नगण्य होते. आता हेच प्रमाण खूप वाढलेय. पण तिथे जोडपी विभक्त झाली, तरी आपल्या मुलांसाठी म्हणून ते एकाच घरात राहतात आणि परस्पर सहमतीने दुसऱ्या व्यक्तीशी विवाहबाह्य संबंध ठेवतात. पण एकूणच त्यांच्यामध्ये कुटुंबवत्सलता दिसून येते. त्यामुळे शब्बातचे रात्रीचे जेवण ते कुटुंबात एकत्र येऊनच घेतात. अनेक आधुनिक जोडपी करिअर करताना दिसतात. त्यामुळे घरातील मुलांच्या जबाबदाऱ्यादेखील त्यांनी समसमान वाटून घेतलेल्या आढळतात. म्हणजे नवऱ्याचे आणि बायकोचे मुलांकडे लक्ष देण्याचे, मुलांना शाळेतून आणणे-नेणे, त्यांचा अभ्यास घेणे, त्यांच्याशी खेळणे, त्यांना खाऊ घालणे, वाणसामान आणणे या घरगुती जबाबदाऱ्या दिवस ठरवून वाटून घेतलेल्या असतात. तसे कामाच्या ठिकाणीही सांगितलेले असते. त्यामुळे इस्रायलमधील आधुनिक जोडपी खऱ्या अर्थाने जबाबदाऱ्या शेअर करतात आणि करिअरही करतात. नाहीतर आपल्याकडे अनेक मुलींना लग्नानंतर मूल झाल्यावर मुलाच्या संगोपनासाठी करिअर सोडून द्यावे लागते. इस्रायलमधील अधिकाधिक स्री-पुरुष वयाच्या सत्तरीतही एकदम फिट असलेले दिसतात. याचे कारण त्यांचे लष्करी प्रशिक्षण. तिथे स्त्रियांसाठी निवृत्तीचे वय 64 वर्षे आहे, तर पुरुषांसाठी निवृत्तीचे वय 68 वर्षे आहे. त्यानंतरही लोक एकदम तंदुरुस्त असतात. इस्रायलमध्ये पाश्चात्त्य संस्कृतीचा जास्त पगडा आहे. त्यामुळे शब्बातसाठी कुटुंबे एकत्र येत असली, तरी इतर वेळी विभक्त कुटुंबेच असतात. त्यामुळे एकेकटया वृध्दांच्या समस्या वाढलेल्या आहेत. या वृध्दांची काळजी घेण्यासाठी म्हणून भारत, मलेशिया यांसारख्या थर्ड वर्ल्ड देशांमधून वृध्दांची काळजी घेण्यासाठीच्या कामासाठी स्त्री-पुरुष येतात. तरुण इस्रायली अजूनही या क्षेत्रात दिसत नाहीत.

ज्यूंमधील आक्रमक स्वभाव आणि हुज्बा (म्हणजे एखादी गोष्ट करण्यास मनाई केल्यास ती इरेला पेटून मुद्दाम करणे) हा स्वभाव बहुतांश इस्रायलींमध्ये दिसतो. ते एकमेकांशीदेखील सौजन्याने बोलत नाहीत. एकूणच त्यांच्या स्वभावातली आक्रमकता दिसून येते. रस्त्यावर वाहतुकीचे नियम सगळे पाळतात, पण जर का चुकून कुठल्या कारणाने दोन ज्यू/ इस्रायली भिडले, तर त्यांच्यामध्ये वादावादीच पाहायला मिळते. आपल्याला हिब्रू समजत नसेल, तर ते लोक नक्की कधी भांडत आहेत आणि कधी नॉर्मल बोलत आहेत हे समजत नाही. ज्यूंच्या इतिहासात डोकावले, तर फक्त आणि फक्त अस्थिरताच दिसते. त्यांना भूमिपुत्र म्हणून दर्जा - म्हणजेच शेती करण्यासाठी जमिनीची मालकी कधीच मिळाली नाही. त्यामुळे त्यांना जिथे जाऊ तिथे अस्तित्व टिकवण्यासाठी शेती न करता व्यापार करणे, शिक्षण घेणे, त्या भाषा शिकणे अशा प्रकारे काम करावे लागले. त्यामुळेच त्यांच्यात व्यापारी प्रवृत्ती, अधिकाधिक उच्चशिक्षित लोक आढळतात. अमेरिकेत फक्त 2% ज्यू आहेत. पण सगळे उच्चपदस्थ, डॉक्टर्स, बँकर्स, शास्त्रज्ञ, वकील, इकॉनॉमिस्ट, उद्योजक, इंजीनिअर्स, फिल्म डायरेक्टर्स अशा प्रकारच्या व्यवसायात आढळतात. त्यांच्याकडे प्रचंड व्यापारी प्रवृत्ती असल्याने कोणत्याही इस्रायली ज्यू व्यक्तीशी व्यवहार करताना अतिशय सावधानता बाळगूनच व्यवहार करावा. कारण फसवले जाण्याची शक्यता अधिक असते. ज्यूंकडे शिक्षण अनिवार्य आहे. त्यामुळे इस्रायली ज्यूंमध्ये अशिक्षितता, निरक्षरता दिसत नाही. याउलट अरब मुसलमानांमध्ये निरक्षरता, अशिक्षितपणा यांचे प्रमाण खूप आहे. इस्रायल हे अरब राष्ट्रांनी घेरलेले असल्याने त्यांच्यावर कायमच या अरब राष्ट्रांकडून हल्ले होत असतात. त्यामुळे या युध्दसदृश परिस्थितीची त्यांना सवय आहे. कधीही कोणताही प्रसंग उभा राहिला तरी त्याला एकसंधपणे सर्व शक्तीनिशी तोंड देण्याची वृत्ती, लढाऊ वृत्ती त्यांच्यामध्ये दिसून येते. अन्याय सहन न करणे आणि कोणी आगळीक केलीच तर त्याला जशास तसे या भाषेत उत्तर देणे, ही प्रवृत्ती खूप महत्त्वाची आहे. तीन एकेश्वरवादींच्या धार्मिक गुंत्यात, तसेच इस्रायलच्या सांस्कृतिक गुंत्यामुळे अशा प्रकारची देशप्रेमाची भावना निर्माण करून ती कायम जागृत ठेवणे हे अत्यंत अवघड काम इस्रायलच्या अनिवार्य लष्करी सेवेमुळे, तसेच हिब्रू भाषेचाच वापर आणि ज्युईश संस्कृतीचे (धर्माचे) काटेकोर पालन यामुळेच शक्य झाले आहे.

9742045785- [email protected]