मुळाकडे येताय का?

 विवेक मराठी  14-Jul-2018


 

 कधीधीकधी असे होणारच नाही, बदल होणारच नाही अशी ठाम धारणा रूढ होण्यामागे त्या संघटनेची आणि व्यक्तीची पूर्वकालीन कृती जबाबदार असते. मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी (सीपीएम)च्या बाबत असे म्हणायला खूप वाव आहे. सीपीएमचा आजवरचा इतिहास रक्तरंजित आहे.

आपली विचारधारा प्रस्थापित करण्यासाठी त्यांनी सामूहिक हत्याकांडापासून ते धर्मश्रध्दांवर घाला घालण्यापर्यंत सर्व मार्गांचा अवलंब केला. जे आपली विचारधारा मान्य करत नाहीत, त्यांना जगण्याचा अधिकारच नाही अशा प्रकारचा पाशवी व्यवहार मार्क्सवादी कम्युनिस्टांनी जगभर केला आहे. भारतातही ज्या भागात हा विचार रुजला, तेथेही याच मार्गाचे अनुसरण झाले आहे. या मंडळींनी सत्ता काबीज केली, त्यासाठी सामूहिक हत्याकांडे केली आहेत. कम्युनिस्टांच्या विरोधात जो कोणी भूमिका घेईल, तो जिवंत राहता कामा नये ही त्यांची भूमिका आहे. या मंडळीचे तत्त्वज्ञान हे देशाबाहेरचे आणि आणि त्यांची मक्का-मदिना म्हणजे रशियाचा लेनिनग्राड चौक आहे. मार्क्सवादी कम्युनिस्टांनी रशियात जे केले, तेच भारतात करण्याचा त्यांचा मनसुबा आहे. त्यासाठी त्यांनी राजकारणाबरोबरच समाजकारण, साहित्य, कला या क्षेत्रांत आपला प्रभाव निर्माण केला, इथल्या संस्कृती, परंपरा नाकारून सांस्कृतिक प्रदूषण करत अनेक भ्रम निर्माण केले, राष्ट्रीयत्व, हिंदुत्व या विषयांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. धर्माला तर या विचारसरणीने 'अफूची गोळी' ठरवले होते. आपला विचार प्रस्थापित करत इथल्या राजकारणात स्वतःची जागा निर्माण केली. केरळमधील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने याच मार्गाने आजवर प्रवास केला आहे. पण याच पक्षाने वेगळा मार्ग स्वीकारल्याचे दिसत आहे.

केरळमध्ये आजवर या मंडळींनी जो नंगानाच केला, त्याविषयी येथे विस्ताराने लिहिण्याची आवश्यकता नाही. मात्र आता हेच कम्युनिस्ट 'धर्म नावाची अफूची गोळी' खायला तयार झालेत. इतकी वर्षे नास्तिकतेचा टेंभा मिरवणाऱ्या कम्युनिस्ट केरळमध्ये चक्क 15 जुलै ते 15 ऑगस्ट या काळात रामायण हा विषय घेऊन वेगवेगळे उपक्रम होणार आहेत. केरळच्या चौदाही जिल्ह्यांत हा कार्यक्रम होणार असल्याचे संस्कृती संगम राज्य संयोजक टी. तिलकराज यांनी सांगितले असून संस्कृती संगम ही सीपीएमच्या मार्गदर्शनाखाली चालणारी संस्था आहे. या कार्यक्रमातून खरे रामायण आणि राम सांगण्याचा आमचा प्रयत्न असेल, असे त्यांचे म्हणणे आहे. केरळमध्ये सीपीएम अशा प्रकारचा कार्यक्रम पहिल्यांदाच घेत असली, तरी केरळच्या नागरिकांना या काळात रामायणाचे पाठ करण्याची सवय आहे. मल्याळम पंचागानुसार या काळात केरळमध्ये 'कारकीडकम' साजरा केला जातो. म्हणजेच घरोघरी रामायणाचे वाचन होते. अशा प्रकारे पारायण केले असता दारिद्रय दूर होते, अशी तेथील नागरिकांची श्रध्दा आहे. अशी श्रध्दा बाळगणे आणि वर्षानुवर्षे ती जपणे म्हणजे अफूचा अंमल अशी कम्युनिस्टांची इतकी वर्षे धारणा होती. त्यामुळे सर्व पातळयांवर प्रयत्न करून नागरिकांचे निधर्मीकरण केले होते, तरीही केरळात वर्षानुवर्षे कारकीडकम साजरा केला जातो, याचे कारण केरळमधील नागरिकांनी जपलेली संस्कृती आणि संस्कार होय. म्हणजे सरकार, पक्ष यांनी कोणत्याही प्रकारचे आयोजन न करताही केरळमध्ये रामायणाचे पारायण होत होतेच. आता सीपीएम आपल्या संस्कृती संगम या संस्थेच्या माध्यमातून सार्वजनिक स्वरूपात रामायण पाठ आयोजित करत आहे. या निमित्ताने सीपीएमला प्रश्न विचारायला हवा - मुळाकडे येताय का?

केरळात सीपीएमच्या वतीने असा उपक्रम हाती घेतला जातो, तेव्हा अनेकांना त्याचे कौतुक आणि आश्चर्य वाटण्याची शक्यता नाकारता येत नाही. आमच्या मते सीपीएमची ही राजकीय गरज आहे. केवळ सीपीएमच नाही, तर इतके दिवस हिंदू धर्माला, हिंदू संस्कृतीला नाकारणाऱ्या सर्वच पक्षांना याच मार्गाने जावे लागणार आहे. राजकारणात टिकून राहायचे असेल, तर हिंदू समाजाला दुखावून चालणार नाही, हे उशिरा का होईना, त्यांच्या लक्षात आले हे बरेच झाले. केरळमध्ये सीपीएमने आपल्या कारकिर्दीत निधर्मीकरणासाठी आतोनात प्रयत्न केले आहेत. पण आता बदलत्या परिस्थितीत त्यांना हिंदूंच्या भावना दुखावणे परवडणारे नाही. गुजरातमधील आणि कर्नाटकातील विधानसभा निवडणुकीत जानव्यापासून ते मंदिरापर्यंत अनेक प्रयोग आपण पाहिले आहेत. केरळमध्ये सीपीएमच्या माध्यमातून होणारा रामायण पाठ हाही त्यातीलच एक प्रयोग आहे. अर्थात गुजरात, कर्नाटक आणि आता केरळमधील हे प्रयोग केवळ राजकारणासाठी आहेत, हिंदू समाजात आपला जनाधार निर्माण करण्याच्या प्रयत्नांचा तो एक भाग आहे. असे असले, तरी केवळ राजकारणासाठी अशा प्रकारचा देखावा करणारे नाकारले जातात. केरळमधील सीपीएमने संस्कृती संगम या संस्थेच्या माध्यमातून या देशच्या मुळाकडे, अस्ताकडे जाण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्याचे स्वागत केले पाहिजे. परकीय विचारांची आणि तत्त्वज्ञानाची धुंदी उतरू लागल्याची ही पोचपावती आहे. जगभर अस्ताला लागलेला मार्क्सवाद आणि नित्यनूतन सर्वसमावेशक सांस्कृतिक राष्ट्रवाद यापैकी एकाचा स्वीकार करणे गरजेचे आहे. बहुदा सीपीएमला त्याची जाणीव झाली असावी. म्हणूनच एक महिनाभर रामायण पाठ आणि त्यावर आधारित विविध कार्यक्रम सीपीएमच्या माध्यमातून होत आहेत.

आज आपल्या देशाला सांस्कृतिक राष्ट्रवादाची गरज आहे. देशाचा गौरवशाली वारसा, इतिहास आणि विविधतेतील एकात्मता यांचा परिचय नव्याने करून देण्याची वेळ आली आहे. मागील काही वर्षांपासून सांस्कृतिक क्षेत्रात जी भेसळ झाली आहे, ती दूर करत मूळ स्वरूपातील चिरंतन ठेवा आपण अंगीकारला पाहिजे, अशी आजची स्थिती आहे. सीपीएमने या स्थितीला अनुरूप वाटचाल सुरू केली आहे. प्रश्न केवळ सीपीएमचा नाही, तर कालौघात जे या सांस्कृतिक धागापासून दूर झाले आहेत, दूर होऊ पाहत आहेत, त्यांना मुळाकडे आणणे आणि त्यांना आपलेपणाने सामावून घेणे यातच सर्वाचे भले आहे, हे आपण समजून घेतले पाहिजे. धर्म म्हणजे अफूची गोळी असे सांगणारे जर एक पाऊल पुढे येत असतील, तर त्यामागची राजकीय भावना वगळून त्यांना सामावून घेण्यात आपले हित आहे. त्याचप्रमाणे केवळ राजकारणासाठी रामायणाचा उपयोग न करता खऱ्या अर्थाने  या देशाच्या संस्कृतीशी एकरूप होण्यात सीपीएमचे हित आहे.