मालनीचा गंऽ   पांडुरंगऽऽ...ऽऽ...

 विवेक मराठी  16-Jul-2018


 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सूर्यकिरणांच्या स्पर्शाने फुलं उमलावीत तशा तिच्या मनातल्या साऱ्या इच्छा, खंती, कल्पना यांच्या मूक कळया जात्याच्या खुंटयाचा स्पर्श होताच जाग्या होतात. तिच्या तोंडून शब्दफुलं घरंगळू लागतात. जवळ आई नाही, कुणी सखी असली दळू लागायला तर तिला, नाहीतर जात्यालाच आपलं गूज सांगायचं. ओव्यांमधे गुंफून.मालनींच्या सुटया ओव्यांतून समान विषय असलेल्या ओव्या निवडून इंदिराबाईंनी त्याचे छोटे छोटे वळेसर गुंफले, त्या या मालनगाथा!

भूतकाळातली कुठलीही एक पहाट. कौलांनी शाकारलेलं चौसोपी घर असो वा पानांनी आच्छादलेली झोपडी, जात्याची घरघर ऐकू आल्याशिवाय तांबडं फुटत नसे, अशा काळातली..

घराघरातल्या आयाबाया, त्या घरच्या लक्षुम्या, सुना-कुवारणी-पोटुशा-लेकुरवाळया म्हणजे 'मालनी'. प्रत्येक घरची मालन येरवाळी उठते अन दळायला बसते.

अजून सूर्य उगवायचाय. बाकी सारं जग साखरझोपेत आहे. पण हिला लेकराबाळांच्या, घरदाराच्या तोंडी घास भरवायचाय. त्यासाठी ती आधी जात्याच्या मुखात घास घालते.

पहाटेची शांत वेळ. पाखरंही बोलू लागलेली नाहीत इतकी शांत. एक जात्याचीच काय ती मंद घरघर नि तिच्या हातच्या काकणांचा मधुर नाद. त्या जात्याबरोबर तिचं मनही एका लयीत घुमायला लागतं नि पिठाबरोबर तिच्या ओठातून शब्द झरायला लागतात.

सूर्यकिरणांच्या स्पर्शाने फुलं उमलावीत तशा तिच्या मनातल्या साऱ्या इच्छा, खंती, कल्पना यांच्या मूक कळया जात्याच्या खुंटयाचा स्पर्श होताच जाग्या होतात. तिच्या तोंडून शब्दफुलं घरंगळू लागतात. जवळ आई नाही, कुणी सखी असली दळू लागायला तर तिला, नाहीतर जात्यालाच आपलं गूज सांगायचं. ओव्यांमध्ये गुंफून.

सुखाचंही गाणं करायचं नि दु:खाचंही! ते दगडाचं जातं म्हणजे तिच्यासाठी पाषाणाचा देव होतो, जिवाभावाचा सखा होतो. ओव्या तरी कशा? साधे शब्द, साधे जीवनव्यवहार, पण त्यात रोजच्या जगण्यापलीकडच्या आकांक्षाही नकळत गुंफलेल्या. जगणं आनंदाने स्वीकारायला शिकवणारं तत्त्वज्ञान त्यात हळूच डोकावणारं.

आतून येतानाच त्या गात गातच प्रकटणाऱ्या. त्यांचे हेलकावे, वळणं, उच्चार कसे जात्यासारखे सहज. विषय इतके विविध की जणू मायेची ऊब देणारी विविधरंगी गोधडीच. कुणी रचल्या, कुणी सांभाळल्या कुणास ठाऊक! घरोघरच्या सरस्वत्यांनी हा वारसा माहेरी-सासरी फिरता ठेवला, वाढता ठेवला. एकामागून दुसरी पिढी खुंटयाला हात द्यायला सरसावत होती, तोवर हा झरा जिवंत झुळझुळत राहिला. जातं थांबलं, तसा हा प्रवाहही थांबलाच! अतिशय समृध्द असा हा ठेवा इंदिरा संतांनी कष्टपूर्वक गोळा केला, एकत्र केला व 'मालनगाथा' रूपाने नीट जतन केला. आपल्याही कुणा पणजी-खापरपणजीची एखादी ओळ यात असेल, या कल्पनेने ऊर भरून येतो!

मालनींच्या सुटया ओव्यांतून समान विषय असलेल्या ओव्या निवडून इंदिराबाईंनी त्याचे छोटे छोटे वळेसर गुंफले, त्या या मालनगाथा!

यातून दरवळतो त्या मालनींच्या सहज प्रतिभेचा गंध. त्या काळच्या लोकजीवनाचा पोत आपल्याला स्पर्शता येतो. त्यांची चित्रमय शैली आपल्याला बोट धरून त्या काळात त्या प्रसंगात घेऊन जाते.

पंढरपुरात विठूचं मंदिर. त्याचे भक्त अनेक. पण लाडकी बहिणाबाई जनाई! निराधार असलेल्या, अहोरात्र राबणाऱ्या जनीला आधार होता एका पांडुरंगाचाच. तिच्या भक्तीने तो पाझरे. तिचे कष्ट न पाहवून तो तिच्या मदतीला धावून येई. पण तो जगजेठी. त्याच्या दर्शनासाठी, सेवेसाठी पहाटेच्या काकडयापासून भक्त येणार. या जगन्नाथाने तिच्या घरी जावं तरी कसं? तर देवळाच्या शेजघरापासून एक भुयार आहे, ज्यातून तो जनीच्या घरी कामासाठी येरझाऱ्या घालतो! जनी बिचारी दिवसभराच्या श्रमाने थकून रात्री जात्याचंच उसं करून झोपते. तिला तो अपरात्रीच जाऊन उठवतो, कारण तिचं काम आवरायला हवं नि विठूराया काकड आरतीपर्यंत मंदिरात पोहोचायला हवा! तो तिच्यासवे दळायला बसतो. कसा? एक पाय दुमडून नि दुसरा उभा ठेवून. दळताना शरीराला बसणाऱ्या हेलकाव्यांबरोबर त्याची वैजयंती झोके घेते अन कानातली कुंडलं लयबध्द डोलत असतात. तोही काही मुक्याने दळणार थोडाच! तोही आपसूक जनीसह गाऊ लागतो. जनीच्या घरातून दोघांचे आवाज ऐकू येतात नि यांचं हे गुपित फुटतंच!

 

रावळापासूनऽ

गोपाळपूऱ्याला सुरंग ऽऽ

जनीला दळू आलंऽ

रातव्यात पांडूरंगऽऽ

 

इठ्ठल म्हनीतीऽ

जनी माझी सासुरवासीऽऽ

ईळभर कामऽ

उसं देतीया जात्यापासीऽऽ

 

हरि दयाळ म्हनीतीऽ

जने दळायाला ऊठऽऽ

काकड आरतीलाऽ

भक्त पाह्यतील वाटऽऽ

 

इट्टल इट्टलऽ

मोठा भावरथ गडीऽऽ

एका पाया घाली अढीऽ 

दुसऱ्या घाली मुडीऽऽ

 

वैजयंती हालतीऽ

कानी कुंडलं डोलतीऽऽ

जनाबाई बोलंऽ

दळू लागती वैकुंठपतीऽऽ

 

दळीता कांडीताऽ

माळ हालती वैजयंतीऽऽ

देवा पांडुरंगाऽ

जनाबाई वव्या गातीऽऽ

 

फाटंच्या पारामंदीऽ

देव इट्टल कुठं गेलाऽऽ

जनीला दळू लागंऽ

दोघांचा येतो गळाऽऽ

 

अशीच कुणी मालन शेतावरच्या घराच्या ओसरीवर दळत बसलेली. तिच्याही मनात विठ्ठलाची भक्ती ओतप्रोत भरलीय. तिला रामप्रहरी पहिला आठवतो विठ्ठलच. दळताना तिला दिसतं बाहेरचं काळंनिळं आकाश. मध्येच उगवणाऱ्या सूर्याची एखादीच लालस रेष. ते पाहून तिला वाटतं की रखुमाईसुध्दा तिथे दळत बसलीय.

कुरुंदाच्या लाल दगडाच्या जात्यातून ती बुक्का दळतेय.

माझ्या विठूचाच रंग उधळतोय त्यातून! मग आकाश बदलतं.

तांबडं फुटतं. आता क्षितिजावर सूर्य दिसू लागण्याआधीची सोनेरी लालभडक आभा दिसू लागलीय. तो पाहा, रखुमाईने सोन्याच्या सुपाने गुलाल पाखडलाय! आता सूर्य दिसतोय लखलखीत. सोन्याची पंढरी. त्यात सुवर्णाचं वृंदावन. सूर्याच्या पिवळसर पांढुरक्या किरणांतून आठवतात तुळशीची फिकुटलेली पानं, अजून कोवळी असलेली! अन मग सूर्यदेव चांगला हातभर वर येतो. त्याच्या उजेडात समोरचं शेत लख्ख दिसायला लागतं.

हिरवेगार पसरलेले शेतमळे. या तुळशीच्या बागा बरं पंढरीतल्या! असं तिला वाटतं, पण आता परिसर जागा झाला. दळण आवरतं घ्यायची वेळ झाली.

अन शेवटी मनातली सल बाहेर पडली! हे असं रोजचं पंढरीचं दर्शन म्हणजे खुळया मनाची समजूत फक्त. मलाही खरं ओढ आहे ती त्याच्या प्रत्यक्ष दर्शनाची.

ते भाग्य मला कधी बरं मिळेल? असं म्हणत मालन उठते अन आपल्या दिवसकाजाला भिडते!

इथून दीसती

पंढरी काळीनीळी ऽऽ

कुरुंदाचं जातंऽ

रुक्मीना बुक्का दळीऽऽ

इथून दीसतीऽ

पंढरी लाल लालऽऽ

सोन्याच्या सूपातऽ

रुक्मा पाखडी गुल्लालऽऽ

 

इथून दीसतीऽ

पंढरी गऽ पीवळी

सोन्याचं इंद्रावनऽ

आत तुळस कवळीऽ

 

इथून दीसतीऽ

पंढरी हिरवीगारऽऽ

देवा इठ्ठलाच्याऽ

तुळशीला आला भारऽऽ

 

अशी पंढरी पाह्यताऽ

मना माझ्या समाधानऽऽ

देवा इट्टलाचेऽ

कधी पाहीन चरनऽऽ

 

कधी एखादीचं भाग्य उजाडतं नि तिला खरंच विठूचा सांगावा येतो! दिंडीतून तीही संतांच्या माहेराला जाते. तिथली भूल अशी पडते की दरसाल जाऊनही तिचं मन भरत नाही. उलट एकदा त्या सावळयाच्या अंगणात पाऊल टाकलं की तिथून संसारात परतूच नये असं तिला वाटतं. पण ती पडली सासुरवाशीण. लेकुरवाळी माय. तिला कोण राहू देईल? तिला मात्र वाटतं की इथे संसाराचं जातं रोज ओढत बसण्यापेक्षा त्याच्या दारचा दगडधोंडा होणंही सुखाचं असेल. मी तिथला खराटा झाले तरी चालेल. मी विठूच्या वाटेतला कचरा दूर करेन. पायरीचा दगड होण्याचं भाग्य लाभलं, तर जाता-येता हरीचे पाय लागतील. दरवाजा झाले, तरी येणारे साधुसंत माझा आधार घेतील. अगदी एखादी तांब्या-पितळेची परात का होईना, माझ्यातून वाढलेला साखरभात विठ्ठलाच्या मुखी जाईल. त्याच्या पंक्तीत सांडलेलं उष्टं टिपणारी चिमणी झाले तरी मला चालेल.

आणि खरं विचाराल तर मला पंढरपुराच्या मंदिरात घुमणारा पारवा व्हायला आवडेल. मग मी मंदिरात रात्रंदिन सांडणारा हरिनामाचा सरवा टिपून जगेन!

 

पंढरपूरीचाऽ

मी का व्हयीन खराटाऽऽ

इट्टलाच्या बाईऽ

लोटऽनंऽ चारी वाटाऽऽ

 

पंढरपूरीचीऽ

व्हयीन देवाची पायरीऽऽ

ठेवील गऽ पायऽ

सये येता जाता हरीऽऽ

 

पंढरपूरामंदीऽ

व्हयीन देवाचा दरोजाऽऽ

साधूसंतांच्या गऽ

लागतील भूजाऽऽ

 

पंढरपूरीचीऽ

मी गऽ व्हयीन परातऽऽ

विठूच्या पंगतीलाऽ

वाढीनऽ साखरभातऽऽ

 

पंढरपूरामंदीऽ

मी गऽ व्हयीनऽ चीमनीऽऽ

इट्टलाच्याऽ पंगतीचंऽ

बाई येचीनऽ दानापानीऽऽ

 

पंढरपूरामंदीऽ

मी का व्हयीनऽ पारवाऽऽ

येचीन मंडपातऽ

हरिनामाचा सरवाऽऽ

या घरोघरीच्या साध्यासुध्या मालनी नि त्यांचे हे साधेभोळे भावाविष्कार! पण यातली एखादी बकुळमाळ अशी घमघमते की या मालनींनी गाठलेली उंची आपल्याला थक्क करून सोडते.

एका मालनीने त्याला मायेने घरी बोलावलंय. युगानुयुगाचा उभा आहे गं बिचारा, म्हणत त्याला बसायला चौरंग दिला. गंध कस्तुरी लावून गरम पाण्याने न्हाऊ घातला. त्याचा आवडता साळीचा भात केला. आपल्या अंगणातल्या तुळशीकट्टयाशी कीर्तनाचा दंगा मांडून त्यात त्याला उभा केला.

पण हे काय? हिला अशी गुंगवून हा कधी पसार झाला? ती श्रमाने लवंडली अन हा खुणेचा बुक्का उंबऱ्याला लावून निघूनही गेला!

 

इट्टल पाव्हनाऽ

मी गऽ झोपेच्या भारामंदीऽऽ

अभीर बुक्क्याचीऽ

साक्षा ठेवीली दारामंदीऽऽ

 

अभीर बुक्क्याचा गऽ

वास शेल्याला कूठलाऽऽ

बारा वरसं झालीऽ

मला पंढरी गेल्यालाऽऽ

 

मालन जागी झाली. उंबऱ्यावर खूण पाहिली अन इकडे पाहते तो अंगावर शेला! त्याला अबीर बुक्क्याचा गंध! बारा वर्षं झाली तरी तो दैवी सुवास अजून मनात ताजा. त्याच्या पायावर डुई ठेवली तेव्हा मनात भरून राहिलेला हाच तो दरवळ! नक्कीच विठूला रात्री गारवा लागला असणार. तोच हा शेला पांघरून कीर्तनात बसला, अन माझा डोळा लागलेला पाहून जाताना मायेने मला तो शेला पांघरून गेला! त्याच्या शेल्याच्या जुईच्या फुलांच्या सुगंधाने अन उंबऱ्यावरच्या बुक्क्याच्या चिमटीने तिला खात्री पटली की तो आला होता खास!! साक्षात्काराचं याहून सुंदर, भाबडं वर्णन काय असू शकेल! तो गेला. त्याला जावं लागतं, तिथं भक्तांसाठी उभं राहावं लागतं, म्हणून. पण तो अंतरीची खूण पटवून गेलाय.

आता तो संसाराच्या रामरगाडयात सतत माझ्यासोबत असणार आहे, याची तिला खात्री आहे.

आपल्यालाही ती मालन समजावते आहे...

 

पंढरीचा विठूरायाऽ

न्हायी ऱ्हात देव्हाऱ्यातऽ

तो ग भक्ताच्या हुरुद्यातऽऽ

9890928411