व्यवसायासाठी कुटुंबाचा पाठिंबा महत्त्वाचा

 विवेक मराठी  17-Jul-2018


 

 

व्यवसाय सुरू करण्याची कल्पना सुचणे आणि ती प्रत्यक्षात उतरवणे या दरम्यानचा प्रवास 'आले मनात, केले क्षणात' इतका सहज-सोपा नसतो. उद्योग सुरू करण्यापूर्वी आणि नंतरही त्या व्यक्तीला कुटुंबातून पाठिंबा असणे अत्यंत आवश्यक असते. आई-वडील-पत्नी-मुले किंवा नातलग-मित्र यांचा आपल्या कार्याला विरोध असेल, तर त्याची कारणे शांतपणे जाणून घ्यावीत. उतावीळपणे किंवा हेकेखोरपणे निर्णय घेतल्यास नंतर मनस्ताप वाटयाला येऊ शकतो. समुद्रसफरीचा एक नियम व्यवसायालाही लागू पडतो - 'वारा अनुकूल नसेल, तर शीड उभारण्याची घाई करायची नसते.'

आपल्या या लेखमालिकेला वाचक देत असलेल्या प्रतिसादाचा मला खूप आनंद वाटतो. काही दिवसांपूर्वी एका वाचकाने विचारले, 'मला माझ्या दिवंगत वडिलांच्या प्रतिष्ठेसाठी सरकारी नोकरी करायची आहे. ते हयात असते, तर मी नक्की व्यापारात उतरण्याचा विचार केला असता. परंतु काही गोष्टी कुटुंबाची प्रतिष्ठा सांभाळण्यासाठी कराव्या लागतात. यावर आपले मत काय आहे?'

 उत्तरादाखल मी म्हणेन की व्यवसायात उतरण्यासाठी तुमच्या मनाची पुरेशी तयारी नसेल अथवा आसपासची स्थिती अनुकूल नसेल, तर तसा निर्णय घेण्याचा उतावीळपणा करू नका. सरकारी किंवा खासगी नोकरी करायचा विचार प्रबळ असेल तर तेच करा. द्विधा मनःस्थिती होऊ देऊ  नका. मुख्य म्हणजे नोकरी पत्करलीत तरी त्यात देतील ते काम आनंदाने आणि मनापासून करा. आदिशंकराचार्यांचे एक वचन नजरेसमोर ठेवावे -

यद्यपि शुध्दं, लोकविरुध्दं, नाकरणीयं, नाचरणीयं।

(एखादे मत किंवा कृती शुध्द असेल, पण लोकांच्या इच्छेविरुध्द असेल तर ती करू नका, तसे आचरणही करू नका.)

येथे मी एका महत्त्वपूर्ण गोष्टीकडे लक्ष वेधू इच्छितो. आपल्या मनात व्यवसाय करण्याची खूप इच्छा असेल, पण त्याला प्रेरणादायक वातावरण नसेल, आर्थिक अडचणी येण्याची शक्यता असेल किंवा कुटुंबाचा आपल्या धंद्याच्या कल्पनेला पाठिंबा नसेल, तर हेकेखोरपणाने निर्णय न घेता फेरविचार करा. येथे 'ऐकावे जनाचे करावे मनाचे' ही म्हण लागू पडणार नाही, तर 'पाचामुखी परमेश्वर' ही म्हण योग्य ठरेल. नोकरीच्या तुलनेत व्यवसाय ही जोखीम असते आणि धंद्यातील उत्पन्नात चढ-उतार असतात. व्यवसाय चांगला चालला तर माणूस नोकरदारापेक्षाही कैक पटींनी श्रीमंत होऊ  शकतो; पण तेच व्यवहारी वृत्तीने राहिले नाही, तर व्यवसायाचे बारा वाजायला किंवा लाखाचे बारा हजार व्हायला वेळ लागत नाही.

आपल्या मनात उत्पादनाची अथवा सेवेची छानशी कल्पना घोळत असते आणि आपण त्यात यशस्वी होऊ  असा आत्मविश्वासही असतो. पण त्याच वेळी त्याबाबत जवळच्या व्यक्तींना काय वाटते, हे जाणून घेणेही महत्त्वाचे असते. त्यातल्या त्यात तरुण वय असेल तर माणूस जरा स्वप्नाळू असतो. तो भावनाशील होऊन विचार करतो, पण आजूबाजूचे लोक मात्र व्यवहारी विचार करतात. उद्योग करण्याची आकांक्षा प्रौढ वयात अंकुरली, तर इतरांचा विचार करणे अपरिहार्यच ठरते. आई-वडील आपल्या आधाराने राहत असतात. त्यांचा वैद्यकीय खर्च असतो. पत्नी संसाराचे व्यवस्थापन आणि मुलांचे संगोपन करत असते. मुलांच्या शिक्षणाचा खर्च पुढे वाढणार असतो. अशा वेळी जोखीम अंगावर घ्यायची का, हा विचार विवेकी ठरतो.

कुटुंबाचा पाठिंबा असल्यास काय होऊ  शकते आणि विरोध असेल तर काय होते, या दोन्ही प्रकारची उदाहरणे मी बघितली आहेत. मी दुबईत एकदा एका मित्राच्या घरी गेलो होतो. त्यांनी मला भोजनासाठी आग्रहाने थांबवून घेतले. त्यांच्या कुटुंबात एक वयोवृध्द दादाजी होते. भोजनाच्या वेळी मी त्यांच्या कुटुंबातील एक आगळी प्रथा बघितली. जेवण सुरू करण्यापूर्वी सर्व वडीलधाऱ्या मंडळींनी वयाने लहान असलेल्यांना एक घास भरवला. मला तो प्रसंग फार हृद्य वाटला. मी त्याविषयी मित्राला विचारले असता तो म्हणाला, ''धनंजय, आज आम्ही जी समृध्दी पाहतोय, ते माझ्या दादाजींच्या मेहनतीचे फळ आहे. फाळणीच्या वेळी आमच्या समाजातील बहुतेकांनी भारतात आश्रय घेतला, पण माझ्या आजोबांनी मात्र आपल्या परिवारासहित जहाजात बसून पश्चिमेला प्रवास करत आखाती देश गाठला. ते इकडे आले, तेव्हा कफल्लक होते. त्यांनी चरितार्थासाठी दाभणाने फाटकी पोती सुतळीने शिवून देण्याचे काम पत्करले. हळूहळू इतर व्यापाऱ्यांचे बघून छोटे मोठे खरेदी-विक्रीचे व्यवहार सुरू केले. रस्त्यावर उभे राहून वस्तू विकल्या. त्यांच्या या प्रयत्नाला कुटुंबातील सर्वांनी पाठिंबा दिला. प्रत्येकाने आपापल्या जबाबदाऱ्या वाटून घेतल्या. माझे वडील आणि काका लहान वयापासून आजोबांना कामात हातभार लावू लागले. आजीने कोंडयाचा मांडा करून संसार चालवला. कुटुंबातील कुठल्याच महिलेने - अगदी आमच्या पिढीपर्यंत अन्य घरांतून आलेल्या सुनांनीही कशासाठी हट्ट केला नाही, की आमचे एकत्र कुटूंब तोडण्याचा प्रयत्न केला नाही. त्यामुळेच आम्ही आज परमेश्वरकृपने भरपूर श्रीमंत आहोत. त्या हलाखीच्या काळात अनुभवलेल्या प्रसंगांची कायम आठवण राहावी, म्हणून दादाजींनी ही घास भरवण्याची प्रथा सुरू केली. तो घास आमच्यातील प्रत्येकाला एक शपथेची आठवण करून देतो, की आपल्या सर्वांना सुख-दु:ख वाटून घ्यायचे आहे, प्रगती करायची आहे आणि एकोप्याने राहायचे आहे.'' ते ऐकल्यावर मीही भारावून गेलो. हीच कहाणी थोडया वेगळेपणाने आमच्याही घरात घडली होती. बाबांच्या धाडसाला आईने आणि आम्ही भावंडांनीही साथ दिली होती. सगळे सदस्य एकमताने चालले, तर कुटुंबाचा उत्कर्ष व्हायला वेळ लागत नाही.

दुसरीकडे कुटुंबाचा पाठिंबा नसताना हट्टाने उद्योग सुरू केला आणि नंतर मनस्ताप वाटयाला आला, याचेही उदाहरण मला बघायला मिळाले. मुंबईत माझा एक मित्र बहुराष्ट्रीय कंपनीत भरपूर पगारावर नोकरी करत होता. एका व्यवसायात संधी दिसल्याने त्याने ती सुखाची नोकरी सोडून आत्मविश्वासाच्या जोरावर स्वत:चा व्यवसाय सुरू केला. असे करण्याला त्याची पत्नी व मुले यांचा प्रथमपासून विरोध होता. साहजिक आहे, व्यवसाय स्थिर करण्यासाठी सुरवातीची तीन वर्षे जावी लागतात. प्रसंगी नुकसान सोसून व्यवसायाला भांडवलाची संजीवनी द्यावी लागते. माझ्या मित्राला हाच अनुभव आला. नोकरी सोडून व्यवसाय स्वीकारल्यावर या टप्प्यात माझ्या मित्राची आणि त्याच्या कुटुंबाची जीवनशैली बदलली. इतके दिवस भरपूर पगाराची रक्कम दरमहा ठरावीक तारखेला हातात येत असल्याने घरचे खर्च भागून त्यांना त्यातील काही भाग चैनीसाठी खर्च करता येत होता. व्यवसायामुळे प्रथमच त्यात खंड पडला आणि आर्थिक अनिश्चितता निर्माण झाली. ती आव्हानात्मक व काटकसरीची स्थिती संयमाने व कौशल्याने हाताळण्यात मित्राचे कुटुंबीय अपयशी ठरले. पती-पत्नी-मुलांमध्ये पैशाच्या तंगीवरून वाद होऊ लागले. ''बाबा, तुम्ही नोकरीत होताच तेच बरे होते. तुमच्या धंद्यामुळेच आपल्यावर काटकसरीची वेळ आली'' असे मित्राला ऐकायला लागत होते. एकीकडे धंद्यातील ताण-तणावाला तोंड देताना त्याला घरच्या आघाडीवरही असहकारामुळे मनस्ताप वाटयाला आला. वादविवाद तर नित्याचेच झाले. या सगळया कटकटींना कंटाळून त्याची पत्नी मुलांना घेऊन माहेरी जाऊन राहिली. अखेर या मानसिक दडपणापुढे हार मानून माझ्या मित्राने व्यवसाय गुंडाळला आणि तो पुन्हा दुसऱ्या कंपनीत नोकरीवर हजर झाला. पाच वर्षांचा काळ निव्वळ मनस्तापात गेला. खरे तर कुटुंबातील इतरांनी थोडा धीर धरून कर्त्या माणसाला पाठबळ व मनोधैर्य दिले असते, तर त्यांना मोठा लाभ झाला असता. माझ्या मित्राची धंद्याची कल्पना अनुभवाधारित असल्याने त्यात भरपूर नफा मिळवून देण्याचे सामर्थ्य होते. पण उतावीळपणाने कार्यनाश झाला.

मित्रांनो! कोणत्याही व्यवसायाचे पहिले उद्दिष्ट नफा मिळवण्याचे असते. त्यातूनच उद्योजकाच्या कुटुंबाचे कल्याण आणि मनाचे समाधान साधते. पण याकामी कुटुंबातूनच प्रेरणा मिळणार नसेल, तर मग काय उपयोग? शेवटी आपण सगळे कष्ट करतो ते कुणासाठी? कुटुंबाच्या चेहऱ्यावर आनंद बघण्यासाठीच ना? मग आपल्या कामामुळे इतरांना समाधान मिळणार नसेल, तर अट्टहास कशाला करायचा? एक बोधप्रद संस्कृत सुभाषित आहे. त्याच्या अर्थामध्ये कुटुंबाचा पाठिंबाही समाविष्ट करावा, असे मला वाटते.

क: काल: कानि मित्राणी को देश: को व्ययाऽऽ गमौ।

कस्याहं का च मे शक्तिरिती चिन्त्यं पुन: पुन:॥

(वेळ कुठली, मित्र कोण, प्रदेश कोणता, खर्च किती, जमा किती, मी कोण, माझी शक्ती किती हा विचार पुन्हा पुन्हा करावा.)

 

(या लेखांवर वाचकांच्या प्रतिसादाचे स्वागत असून ते आपल्या प्रतिक्रिया, सूचना, विचारणा [email protected] या पत्त्यावर पाठवू शकतात.)