सचिन पाटीलच्या निमित्ताने .....

 विवेक मराठी  02-Jul-2018

संभाजी ब्रिगेड आणि बामसेफ यासारख्या विकृत मानसिकतेविरुध्द सिंदखेडराजा येथील तरुण सचिन नेमाडे पाटील याने व्हिडिओच्या माध्यमातून वैचारिक आघाडी उघडली होती. या तरुणावर संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी काही दिवसांपूर्वी प्राणघातक हल्ला केला. या घटनेच्या निमित्ताने पुरोगामी म्हणून ओळख असलेल्या महाराष्ट्रात रुजत असलेल्या नव्या वैचारिक अस्पृश्यतेवर परखड भाष्य करणारा लेख.

वेगवेगळया सार्वजनिक मंचांवर महाराष्ट्राचा उल्लेख करताना वक्ते नेहमीच 'पुरोगामी महाराष्ट्र' हा शब्द आवर्जून वापरतात. यामागे महाराष्ट्राचा गतकालीन इतिहास आणि आपल्या पूर्वसुरींचे कर्तृत्व लक्षात घेतलेले असते. हे पुरोगामित्व कमाविण्यासाठी अनेक महापुरुषांना वेळोवेळी शारीरिक, आर्थिक आणि मानसिक अशा स्वरूपात जबर किंमत मोजावी लागली आहे.

साधारणपणे इंग्रजांचे राज्य स्थिरस्थावर झाल्यावर भारतातील अनेक मंडळी या ना त्या निमित्ताने ब्रिटिशांच्या संपर्कात आली. तोपर्यंत मध्ययुगीन मानसिकतेमध्ये जगणाऱ्या भारतीयांना त्या निमित्ताने पहिल्यांदा सुसंस्कृत जगाची ओळख झाली. आधुनिक पध्दतीच्या शैक्षणिक अभ्यासाने व परदेश वाऱ्यांच्या निमित्ताने झालेल्या तेथील संस्कृतीच्या ओळखीने भारतीयांवर एक प्रकारे लादण्यात आलेल्या गुलामीची जाणीवदेखील यातील कित्येक मंडळींना झाली. त्यानंतर मग भारतीय स्वातंत्र्याचा लढा पुकारला गेला... पण हे एवढेच सांगणे म्हणजे अर्धसत्य आहे.

कारण याच कालखंडाचा नीट अभ्यास केला, तर आपल्या निदर्शनास येईल की आज आपण उपभोगत असलेल्या आधुनिक भारताची पायाभरणीदेखील त्याच काळात झाली होती. एकीकडे भारतीय भूमी स्वतंत्र करण्याचे यज्ञकुंड पेटविले गेले होते, तर दुसरीकडे या संपूर्ण भारतीय समाजाला जखडून ठेवणाऱ्या अंधश्रध्दा, अनिष्ट परंपरा, रूढी, मागासलेले जातीयवादी विचार यांच्या विरोधात रण छेडले गेले होते. व्यवसाय बंदी, शिक्षण बंदी, रोटी-बेटी बंदी यासारख्या मध्ययुगीन संकल्पनांविरोधात लढण्यासाठी कित्येक समाजधुरीण कंबर कसून पुढे सरसावले होते. कुणी वर्तमानपत्रे काढली, कुणी आधुनिक उपासना पध्दती असणारे पंथ, धर्म काढले, कुणी शिक्षण संस्था काढल्या, कुणी सामाजिक संस्था काढल्या. अशा कितीतरी प्रकारे या संपूर्ण भारतीय समाज नामक समुद्राची घुसळण 'विचारकलह' नावाच्या रवीने आपल्या पूर्वजांनी अगदी समूळपणे केली.

ही लढाई खरेच एवढी सोपी होती किंवा आहे का? तर नव्हती/ नाही. तत्कालीन परंपरावाद्यांनी, मूलतत्त्ववाद्यांनी यातील काही समाजसुधारकांवर बहिष्कार घातले, दगडधोंडयांचा मारा केला, तर काही वेळेस अगदी प्राणघातक हल्लेदेखील केले गेले. या सर्व प्रकारची सर्व किंमत मोजल्यावर व संपूर्ण समाजाची वैचारिक घुसळण केल्यावर 26 जानेवारी 1950 रोजी 'भारतीय संविधान' नावाचा अमृतकुंभ या देशातील सर्वसामान्य नागरिकांच्या हातात आला. ते संविधान म्हणजे आम्हीच आमच्याशी केलेला एक करार होता आणि आहे.

त्या करारात आम्ही एकमेकांना आचार, अर्थ, धर्म या स्वातंत्र्यांबरोबरच आणखी एका महत्त्वाच्या स्वातंत्र्याचे आश्वासन दिले होते, ते म्हणजे 'विचारस्वातंत्र्य'! एकमेकांच्या अवकाशाचा आदर करून आपापल्या परिघात मनमोकळेपणाने मतप्रदर्शन करणे म्हणजे विचारस्वातंत्र्य. यामध्ये आपण प्रकट करत असलेले विचार हे समाजविघातक, राष्ट्रविघातक, व्यक्तिविघातक नसावेत ही एकमेकांच्या सुसंस्कृतपणावर आधारलेली परंतु अनुल्लेखित असलेली एकमेव अट आहे.

या सगळया सामाजिक तसेच वैचारिक लढाईत लोकमान्य टिळक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज, सयाजीराव गायकवाड, वि.दा. सावरकर आणि अनेक मंडळी महाराष्ट्रातील असल्यामुळे आपण आपल्या महाराष्ट्राला गौरवाने 'पुरोगामी महाराष्ट्र' म्हणतो. त्या पुरोगामी शब्दाचा अर्थच पुढच्या दिशेने जाणे या अनुषंगाने आहे.

परंतु गेल्या एक-दोन दशकांत संभाजी ब्रिगेड, बामसेफ यासारख्या संघटनांकडून महाराष्ट्राच्या पुरोगामित्वाला हरताळ फासणाऱ्या घटना वारंवार घडल्या आहेत आणि घडत आहेत. या संघटनांचे प्रमुख धंदे म्हणजे मोठया प्रमाणात इतिहासाची मोडतोड करून जातीयवादाला खतपाणी घालायचे आणि हे करताना वर आपणच शाहू-फुले-आंबेडकरांचे वारसदार आहोत म्हणूनदेखील मिरवायचे हेच आहेत.

हिटलरने ज्याप्रमाणे संपूर्ण ज्यू जमात वध करण्यालायक घोषित केली होती, त्याचप्रमाणे संभाजी ब्रिगेडच्या आणि मराठा सेवा संघाच्या स्थापनेमध्ये पायाभरणी करणाऱ्या पुरुषोत्तम खेडेकर यांनी 'ब्राह्मण स्त्रियांवर बहुजन तरुणांनी बलात्कार करावेत' किंवा 'ब्राह्मण दिसला की त्याच्या थोबाडात मारावी' अशा प्रकारचे लेखन किंवा भाषण वेळोवेळी सार्वजनिक मंचकावर दिलेले आहे. तर दुसरीकडे बामसेफसारखी संघटना आपल्या सर्वांना परमपूज्य असणाऱ्या बाबासाहेब आंबेडकरांचा खून त्यांच्या ब्राह्मण असणाऱ्या द्वितीय पत्नीने पंडित नेहरूंच्या आदेशानुसार केला, अशा प्रकारचे लिखाण असलेली पुस्तके खुलेआम वाटत आहे, या आणि अशाच प्रकारच्या प्रक्षोभक विषयांवर भाषणे देत आहे व त्याला मोठा प्रतिसाददेखील मिळतो आहे हे खेदजनक आहे.

यांच्या विकृत लेखणीला आणि विचारांना आता एवढी विषारी फळे फुटली आहेत की यांच्याच विचारसरणीतून निर्माण झालेल्या 'शिवाजीचे उदात्तीकरण' नावाच्या पुस्तकामधील मांडणीमुळे राहुल फटांगळे या तरुणाची हकनाक हत्या झाली. 1818चे बंड नामक पुस्तकातुन खुलेआमपणे 1 जानेवारी 2018ला जातीय दंगली उसळतील अशी धमकी दिली गेली आणि ती सत्यातदेखील उतरली.

शाहू-फुले-आंबेडकरांचे वारसदार म्हणविणाऱ्या या विकृतांनी संपूर्ण इतिहास चाळून पाहिला, तर या तिन्ही महापुरुषांचे महत्त्वाचे प्रेरणास्थान म्हणून छत्रपती शिवाजी महाराज समोर येतात. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदू धर्मांतर्गत जातिभेद केल्याचे एकही उदाहरण नाही. तसेच शिवछत्रपतींनी स्त्रीवर अत्याचार करणाऱ्या रांझ्यांच्या पाटलाचे कठोरपणे हातपाय तोडले होते, हे उदाहरण कुठे आणि संपूर्ण ब्राह्मण जातीतील महिलांवर आपल्या भडभुंज्यांना बलात्कार करण्याचा आदेश देणारा विकृत पुरुषोत्तम खेडेकर कुठे?

खुद्द बाबासाहेबांनी आयुष्यभर जातीयवादाचे चटके सोसले, परंतु एका संपूर्ण जातीविरुध्द हिंसक किंवा विकृत मांडणी असणारी एकही ओळ लिहिली नाही की विचार मांडले नाहीत. कारण जातीयवादाचे उत्तर जातीयवाद व हिंसाचाराचे उत्तर हिंसाचार असत नाही, हे हिमालयापेक्षा उत्तुंग व्यक्तिमत्त्व असणाऱ्या या समाजधुरीणांना अवगत होते.

या सगळया पार्श्वभूमीवर संभाजी ब्रिगेड आणि बामसेफ यासारख्या विकृत मानसिकतेविरुध्द सिंदखेडराजा येथील तरुण सचिन नेमाडे पाटील याने व्हिडिओच्या माध्यमातून वैचारिक आघाडी उघडली होती. गेले तीन-चार महिने या तरुणाने या सोशल माध्यमातून पुरावे आणि तर्क या जोरावर अनेक भरकटलेल्या तरुणांच्या डोळयात अंजन घातले होते. या कार्याला यश येते आहे हे दिसताच 'पुरुषोत्तम खेडेकरांची बदनामी का करतोस?' हा ठपका ठेवून गेली 28 वर्षे समाजसेवेत असण्याचा दावा करणाऱ्या संभाजी ब्रिगेडचा जिल्हाध्यक्ष असणाऱ्या पंकज जायले आणि त्याच्या सहकाऱ्यांनी सचिन नेमाडे पाटीलवर काही दिवसांपूर्वी अकोला येथे प्राणघातक हल्ला केला. (28 वर्षांचे सामाजिक कार्य तीन-चार महिन्यात फक्त एक तरुण पुसून काढू शकतो, हे विनोदी आहे.)

अत्यंत जखमी अवस्थेत सचिन स्थानिक पोलीस स्टेशनला पोहोचला, तेव्हा तेथील पोलीस अधिकाऱ्याने सचिनवर सहा तास कुठलेही उपचार करण्याची तजवीज न करता त्याला पोलीस स्टेशनला बसवून ठेवले. यावर कडी म्हणजे सचिनची तक्रार न घेता पोलिसांनी लिहून ठेवलेल्या जबाबावरच त्याची सही घेण्यात आली, ज्यामध्ये प्राणघातक हल्ला केल्यावर लागणारी कलमे न लागता किरकोळ कलमे लागतील अशी व्यवस्था केली. हे सगळे घडण्याचे कारण म्हणजे या ठिकाणी असणारा स्थानिक सत्ताधारी मंत्री या हल्लेखोरांच्या मागे उभा असल्याचा दावा स्थानिक वृत्तपत्रांत छापून आला आहे. हे आणखी संतापजनक आहे.

हा हल्ला केल्यानंतर सोशल नेटवर्कवर संभाजी ब्रिगेडच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी 'यापुढे आमच्या विरोधात कुणी काही बोलल्यास अशाच प्रकारे धडा शिकविला जाईल' अशा आशयाच्या अनेक पोस्ट लिहिल्या. हे करण्याचे धाडस करण्यामागे 'आमचे कुणी काही वाकडे करू शकत नाही' ही प्रवृत्ती आहे.

आणि या सर्व संघटनांची एकूण पार्श्वभूमी बघितली, तर रात्रीच्या अंधारात पुतळे फोडणे, विद्वानांवर शाईफेक करणे, विकृत पुस्तके लिहिणे, प्रक्षोभक भाषणे देणे आणि आता प्राणघातक हल्ले करणे ही एवढीच जमापुंजी आहे. त्यानंतरही आजपर्यंत पोलीस प्रशासनाकडून कठोर कारवाया न झाल्यामुळे हे प्रकार भविष्यकाळातदेखील वाढतच जाणार आहेत.

बरे, या प्रकारच्या विषारी प्रवृत्ती समाजात फोफावत आहेत याचे कारण म्हणजे आजच्या राजकारणात सत्ताधारी आणि विरोधक या दोघांनाही आपापले मतलब साधण्यासाठी यासारख्या उपद्रवी संघटनांची वेळोवेळी गरज लागते हे विदारक आहे. राजकीय तडजोडी म्हणून या समाजकंटकांना जबर शासन करण्याऐवजी त्यांचीच पाठराखण केली जाते. मग अशा प्रवृत्ती 'सचिन नेमाडे हा नेमाडे नसून पटवर्धन नावाचा ब्राह्मण आहे' अशा खोटयानाटया कथा रचतात व तो ब्राह्मण आहे हे एकदा घोषित केले म्हणजे आम्ही आमच्या बळाच्या आधारे त्याच्यावर शारीरिक हल्ला करू अथवा देहदंड देऊ, आम्हाला कोण विचारणार? अशा मुजोरीत राहतात. आणि मतांच्या बेगमीसाठी लाचार असलेले शासक व कायदा हतबल होऊन हे सर्व प्रकार पाहत राहतात.

बरे, या मुजोरी व हिंसक विचारांविरुध्द ज्यांनी आवाज उठवायचा, ते विचारवंत अथवा विचारस्वातंत्र्याचे ठेकेदार असलेले पत्रकार सचिन नेमाडे म्हणजे 'हिंदुत्ववादी युवक' या एका शिक्क्यामुळे किंवा अशाच काही कारणांमुळे नेहमी अशा प्रकरणांपासून लांबच राहतात.

तर दुसरीकडे हेच पुरोगामी विचारवंत व पत्रकार 'हे जातीयवादी हिंदुत्ववादी सरकार आहे' असा विविध माध्यमांतून दिवसरात्र कंठशोष करतात. परंतु त्याच तथाकथित हिंदुत्ववादी सरकारच्या अखत्यारीत 'हिंदुत्ववादी' असा शिक्का असणाऱ्या युवकावरच हल्ला होऊन आरोपींना शासन सोडा पण अटकदेखील होत नाही, हे आणखी आश्चर्यजनक व विचार करण्याजोगे आहे.

अत्यंत खेदाची बाब म्हणजे आजवर फक्त हिंसाचाराची अथवा तोडफोडीचीच पार्श्वभूमी असलेल्या या प्रवृत्तीवर चार ओळी लिहाव्यात असे या पुरोगामी महाराष्ट्रात कुणालाही वाटत नाही, कारण सध्याच्या महाराष्ट्रात पुरोगामित्वाच्या व्याख्येत 'हिंदुत्ववादी' शिक्का असणाऱ्या कुणालाही आपले विचार मांडण्याचा अधिकार नाही. व असा अपराध कुणी केला, तर अफगाणिस्तानील टोळयांच्या कायद्याप्रमाणे देहदंड देणे अथवा त्याचे शारीरिक नुकसान करणे योग्य आहे असा एकूण समज पुरोगामी वर्तुळात आहे. त्यामुळे आम्ही अशा प्रवृत्तीबरोबर वैचारिक लढाई लढण्याचे पाप करणाऱ्या अपराध्यासाठी आमचे तोंड आणि पेन अजिबात चालवणार नाही, ही एक प्रकारची नवी वैचारिक अस्पृश्यता या तथाकथित पुरोगाम्यांनी येथे रुजविली आहे.

असो, अनेक मतभेद असूनदेखील एकमेकांशी सुसंस्कृत नागरिकांप्रमाणे वागणाऱ्या, चर्चा करणाऱ्या, आपले मुद्दे मांडणाऱ्या व संवैधानिक मार्गाने लढाई लढणाऱ्या आपल्या पुरोगामी पूर्वजांचे खरे वारसदार कोण आहेत, हे येणारा काळच सांगेल. कारण हा वैचारिक वारसा जन्मावर, जातीवर आधारलेला नसून विचारांवर आधारलेला आहे, हे आपल्या सर्वांचे सुदैव आहे.

पण अधिकारवाणीने तो वारसा सांगण्याआधी समाजात विषवल्ली पसरविणाऱ्या व दुफळी माजविणाऱ्या ब्रिगेडी व बामसेफी विचारांशी दोन हात करण्याची तयारी आपल्याला ठेवली पाहिजे. या प्रकरणांचा फक्त निषेध करून नव्हे, तर या प्रवृत्तींना पाठीशी घालणाऱ्या परक्याच नव्हे, तर आपल्या लोकांनादेखील जाब विचारला पाहिजे. अन्यथा भांडारकर इन्स्टिटयूट, गडकरी पुतळा, कोरेगाव भीमा दंगल, राहुल फटांगळे, सचिन पाटील अशी विध्वंसक घटनांची मालिका यापुढेही सुरूच राहील.