संतकवी श्री दासगणू महाराज चरित्र

 विवेक मराठी  24-Jul-2018


 

 

संतकवी श्री दासगणू महाराजांचे वैशिष्टय म्हणजे भक्तिरसपूर्ण कीर्तन करणारे कीर्तनकार. त्यांनी गायिलेली संतचरित्रे, 'महिपतीं'च्या काव्यरसासारखीच रसाळ असल्याने ते 'आधुनिक महिपती' या बिरुदाने ओळखले जाऊ शकले. कीर्तनाख्यान रचनाकार म्हणून त्यांचा लौकिक असला, तरी संतचरित्रांची रसाळ निर्मिती ही मराठी वाङ्मयाला त्यांची अनमोल देणगीच म्हणावी लागेल.

संतांचे वैशिष्टयच असे असते की, त्यांच्या हयातीत त्यांचे मोठेपण समाजाला कळणे अवघड जाते. कारण श्री ज्ञानेश्वर माउली म्हणतात त्याप्रमाणे 'अलौकिक न हो आवे लौकिक प्रति।' या लक्षणांनी संतमंडळी युक्त असल्यामुळे त्यांचे मोठेपण विरळपणेच लक्षात येते. त्यांची प्रसिध्दिपराङ्मुखता हेही त्याला कारण आहे. माउलींची ज्ञानेश्वरी लोकांना समजायला त्यांच्या पश्चात अडीचशे वर्षे लागली. याच संतपरंपरेतील पू. दासगणू महाराज व त्यांचे वाङ्मय त्यांच्या अमानित्वामुळे उभ्या महाराष्ट्राला तसे अज्ञातच राहिले.

संतकवी श्री दासगणू महाराजांचे वैशिष्टय म्हणजे भक्तिरसपूर्ण कीर्तन करणारे कीर्तनकार. त्यांनी गायिलेली संतचरित्रे, 'महिपतीं'च्या काव्यरसासारखीच रसाळ असल्याने ते 'आधुनिक महिपती' या बिरुदाने ओळखले जाऊ शकले. पुण्यातील गुणग्राहक, अधिकारी श्री भांडारकर यांनी 'आधुनिक महिपती' या पुरस्काराने श्री दासगणू महाराजांचा सन्मान केला. पू. दासगणूंच्या विशाल वाङ्मयनिर्मितीमुळे त्यांना 'आधुनिक दासोपंत' असेही म्हणतात.

कीर्तनाख्यान रचनाकार म्हणून त्यांचा लौकिक असला, तरी संतचरित्रांची रसाळ निर्मिती ही मराठी वाङ्मयाला त्यांची अनमोल देणगीच म्हणावी लागेल, इतकी ती श्रेष्ठ साहित्यगुणांनी युक्त व भावाने समृध्द आहे. तिचे ऐतिहासिक मूल्यही थोर आहे.

श्रीअमृतानुभव भावार्थमंजिरी, ईशावास्य व मांडुक्य उपनिषदे, भक्तिरसायन यावरील टीका, शांडिल्य आणि नारद भक्तिसूत्राचे अर्थ-विवरणात्मक ग्रंथ, भक्तिलीलामृत, भक्तिसारामृत, संतकथामृत हे संतचरित्र ग्रंथ, श्री गजानन महाराज, श्री शंकराचार्य, श्री मध्वाचार्य, श्री ज्ञानेश्वर आदी विस्तृत चरित्रग्रंथ, उध्दवागमन - एका भावोत्कट खंडकाव्य, समाजप्रबोधनार्थ कीर्तन माध्यम, कीर्तनाची 80च्यावर आख्याने, याशिवाय हजारापेक्षाही जास्त स्तोत्रादी स्फुट रचना, गद्य कथा अशी दीड लाखाहून अधिक ओवी संख्या असलेले वाङ्मय त्यांच्या प्रतिभासंपन्न प्रज्ञेतून निर्माण झाले आहे.

पू. दासगणूंना त्यांच्या शिष्य परिवारात 'दादा' नावानेच संबोधीत असत. पू. दादा मूळचे कोकणातले. रत्नागिरी प्रांतातील रत्नागिरी तालुक्यातील 'कोतवडे' नावाच्या लहानशा खेडयातील रहिवासी. त्यांचे आडनाव 'सहस्रबुध्दे' होते. अधिकाराने खोतपण त्यांच्या घराण्याकडे होते. कुटुंब सुखवस्तू असून त्यांना गावात चांगला मान होता. पू. दादांचे वडील दत्तात्रेय व मातोश्री सावित्रीबाई होत. याच साध्वीच्या उदरी शके 1789 पौष शुध्द एकादशीच्या पुण्यदिवशी, म्हणजे 6 जानेवारी 1868 रोजी नगर प्रांतातील आकोनेर गावी पू. दादांचा जन्म झाला. त्यांचे पाळण्यातील नाव 'नारायण' असे ठेवले होते आणि 'गणपती', 'गणेश' हे नाव रूढ झाले. प्रचारात लौकिक पावले. बालपणीची पाच-सहा वर्षे लाडाकोडात गेली. वयाच्या 21-22व्या वर्षीच इंग्रजी चौथीतच त्यांच्या शिक्षणाला पूर्णविराम मिळाला. मुलगा अत्यंत बुध्दिमान असूनही शिक्षणाचा योग नाही, या धारणेने वडीलधारी माणसे गप्प राहिली. पू. दादा अतिशय मानी होते. शिक्षणावरून घरात काकू बोलली, त्यांचा अपमान झाला. ते पाणी पिण्यासही तेथे उभे राहिले नाहीत आणि म्हणाले, ''काही झाले तरी तुमचे नाव सांगणार नाही, लौकिक मिळाला किंवा उपाशी मेलो, तरी माझ्या एकटयाच्या नावावर सर्व करीन.'' असे तोडून बोलून ते जे घराबाहेर पडले ते कायमचेच!

पू. दादांनी पोलिसात नोकरी धरली. श्रीगोंदे या नगर जिल्ह्यातील तालुक्याच्या ठिकाणापासून नोकरीस आरंभ झाला. नोकरीवर असतानाच श्री दासगणूंच्या काव्यगुणांचे विविध पैलू तेजाने चमकू लागले. घराण्याच्या प्रतिष्ठेचे कोणतेच बंधन आता उरले नव्हते. त्यामुळे त्यांच्या कवितेस तमाशाच्या रंगेल क्षेत्रात उघड उघड क्रीडा करण्यास अडचण नव्हती.

श्री दासगणूंची या वेळेची कविता तमाशाकरिताच रचली गेली असली, तरी तिच्या विविधतेचे क्षेत्र विपुल व सर्वंकष आहे. त्यांची ही कविता इतिहासाचा मागोवा घेत बाजीराव मस्तानीची भेट पोवाडयात करून देई, तर कधी गावातल्या मामलेदारापासून हवालदारापर्यंत अधिकाऱ्यांची नावानिशी मजेदार पध्दतीने सादर करी. कधी निर्भेळ शृंगाराचे उत्तान वर्णन करण्यास रसिकतेने रममाण होई, तर कधी निसर्गाच्या सौंदर्याचा आस्वाद घेत जोंधळा-बाजरीचे काव्यमय लग् लावून सर्व पिकांची डौलदार वरात काढी. कधी प्रल्हाद महाराजांसारख्या संताचे गुणनुवाद गाई, तर कधी गावातील लब्धप्रतिष्ठितांची कुलंगडी फटकळपणाने चव्हाटयावर आणून झुळझुळीत पडद्यामागील अनाचाराचे दर्शन घडवी व श्रोत्यांना खदखदून हसावयास लावी.  

श्रीगोंद्यास असताना रामदासी सांप्रदायिक श्री वामनशास्त्रींकडून अनुग्रह घेतल्यावर ते 'दासगणू' या नावाने प्रसिध्दीस आले. आपल्या सद्गुरूंवर असलेली अनन्य भावना आपल्या कवनातून व्यक्त करताना त्यांना सद्गुरुप्रेमाचे भरते येई. आपले काव्य हे त्यांच्या कृपेने होते असे त्यांचे म्हणणे असे. ते म्हणत, 'गणुदास रची हे कवनकथा सुंदर। वामनशास्त्रींचा हस्त मस्तकावर॥' या घटना घडत असताना त्यांची नोकरी चालूच होती. नगरपासून 25-26 कोस दूर असलेल्या जामखेड या गावी महाराजांची बदली झाली. गुरुपदेशाने अंतरंगात रुजलेल्या भक्तीच्या सूक्ष्म बीजाला पहिला अंकुर याच ठिकाणी फुटला.

नोकरीचा त्याग

श्री साईबाबांच्या आज्ञेप्रमाणे संतचरित्रे लिहण्यास प्रारंभ झाल्यानंतर श्री दासगणू श्री बाबांच्या दर्शनाकरिता बरेच वेळा जात असत. नोकरी सोडल्यानंतर काही दिवसांनी श्री दासगणू महाराजांनी मागे वळून पाहिले नाही. आयुष्यभर रसाळ संतचरित्रे कीर्तन, आख्यान, ग्रंथ यांच्या रूपाने काव्यबध्द करण्याचे कार्य चालूच राहिले. ते संतकवीच नाही, तर श्रेष्ठ संतच होते. प्रसिध्दिपराङ्मुख, परखडपणे मत व्यक्त करणारे, सडेतोड आणि नि:संदिग्ध भूमिका ठामपणे घेणारे एक समाजहितैषी निस्सीम देशभक्त होते. तमाशाचा फड उभा करून लावणी आणि शृंगारिक काव्यरचनेत रमलेली त्यांची लेखणी पुढे मात्र संतांचे पोवाडे गाण्यात विनम्र झाली, ती सर्वभावाने.

संपादन : डॉ. कल्याणी माधव नामजोशी