कर्मयोगी संत ह .भ. प. श्री भगवान महाराज आनंदगडकर

 विवेक मराठी  24-Jul-2018


 

समता, ममता, समरसता हीच त्रिसूत्री आपल्या समाजाला संघटित करू शकेल, असा विश्वास आनंदगदडावरून श्री बाबा देत असतात. आपली पुण्यपावन भारतमाता जगाच्या गुरुपदी पोहोचून हे संपूर्ण विश्व आनंदमय करण्याचा मार्ग ह.भ.प. श्री भगवान महाराज आनंदगडकरांनी प्रशस्त केला आहे. या मार्गावर किमान काही पावले चालून सगळयांनी आपले जीवन पावन केले पाहिजे. वारकरी परंपरा गेल्या 55 वर्षांपासून समृध्द करणाऱ्या ह्या महान संतश्रेष्ठ विभूतीचे संक्षिप्त जीवन दर्शन ह्या लेखातून व्हावे, यासाठी हा एक छोटा प्रयत्न.

- डॉ. दिवाकर माणिकराव कुळकर्णी

समता, ममता, समरसता - मित्रमंडळ मेळावा, चिकलठाण संभाजीनगर असे शीर्षक असलेले एक माहिती पत्रकवजा निमंत्रण पत्रक हातात पडले. ह्यातील समता, समरसता हे शब्द तर कायम ऐकण्यात वाचण्यात बोलण्यात होतेच. सामाजिक समरसता मंचाच्या कामात होतो. त्यापूर्वी अभाविपचे काम करीत असतानाही समता दिन म्हणून परमपूजनीय डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिन म्हणून अनेकदा सहभागी झालो होतो. परंतु जे माहिती पत्रक किंवा निमंत्रण पत्रक हातात होते, ते ना सामाजिक समरसता मंचाचे होते, ना अभाविपचे होते, तर त्या पत्रकावर प.पू. ह.भ.प. श्री भगवान बाबा आनंदगडकरांचे नाव होते. त्यांचे फेटा बांधलेले, अत्यंत आश्वासक छायाचित्र होते. ह.भ.प. श्री भगवान महाराज आनंदगडकर भक्त-मित्रमंडळाने काढलेले हे पत्रक होते. ह्या मित्रमंडळाने ठरविलेल्या कार्यक्रमाचे शीर्षक विशेष लक्ष वेधून घेणारे होते. वर्ष असेल 2000. चिकलठाण्याच्या स्व. श्री मदनभाऊ नावपुते यांच्या शेतावर दिवसभराचा हा कार्यक्रम होता.

चौकशी केली, तर ह.भ.प. श्री भगवान महाराज आनंदगडकरांच्या भक्तमंडळांनी त्या त्या ठिकाणी वर्षातून किमान एक कार्यक्रम - दिवसाभराचा 'समता, ममता, समरसता' ह्या विषयाचा मेळावा भोजनासह करावा, हा श्री बाबांचा आग्रहाचा विषय. ह्यामुळे अधिक लक्ष वेधले गेले. ह्या कार्यक्रमात गेलो. त्या वेळी सामाजिक समरसता मंचाचा कार्यकर्ता असल्यामुळे उत्सुकता होती. वारकरी संप्रदायाच्या बंधुभाव प्रस्थापनेच्या कार्यात गेल्या पन्नास वर्षांपासून अखंड योगदान देणाऱ्या चळवळीचे नेतृत्व करणाऱ्या ह.भ.प. श्री भगवानबाबा आनंदगडकरांची भेट घ्यावी, त्यांचे कार्य समजून घ्यावे, त्यांचे जीवनचरित्र समजून घ्यावे अशी तळमळ तेव्हापासून लागून राहिली होती.

अत्यंत विनम्रता, पृथ्वी मातेसमान क्षमाशीलता, शीतलतम मातृत्वाचा अखंड झरा, उपेक्षित-पीडित-दु:खितांविषयी ममतायुक्त कळकळ, शाश्वत सत्याचा सहज, सोपा, सामान्यातील सामान्य माणसाला उमजेल, समजेल, रुचेल असा अन्वयार्थ सांगणारा, भक्तास त्या मार्गावर चालण्यास सहज उद्युक्त करणारा कर्मयोगी संत म्हणजे ह.भ.प. श्री भगवान महाराज आनंदगडकर!

ह.भ.प. श्री भगवान बाबांचा जन्म मार्गशीर्ष वद्य एकादशीस 1950 साली (11, मार्गशीर्ष शके 1872) पीर पिंपळगाव, ता. जि. जालना येथे झाला.

ह.भ.प. श्री भगवान बाबांचे प्रारंभिक कार्य सुमारे 1965 साली सुरू झाले. शालेय वयापासूनच ह.भ.प. श्री भगवान बाबांनी प्रवचन, कीर्तन करायला सुरुवात केली होती. शिक्षणानंतर जंगल खात्यात नोकरी, जालन्यात सेवादलात नोकरी (शके 1888), तलाठी आणि मिल्ट्रीमध्ये रुजू होण्याचे पत्र मिळाले असतानाही ती नोकरी न स्वीकारणे, घरात लग्नाचा विषय निघाल्यानंतर संसारी मायाजाळात न अडकता गृहत्याग करून रामटेक, पैठणला जाणे, पैठणच्या नाथमंदिरात सलग तीन दिवस एकनाथी भागवत पारायण करणे, ह.भ.प. श्री भारदे महाराजांची भेट, विदर्भात श्री बाबा आमटेंसोबत काम, श्री क्षेत्र आळंदीस कै श्री किशन महाराज साखरे महाराजांकडे जाऊन दीक्षेसाठी विनंती करणे आणि त्यांनी पंढरपूर येथील ह.भ.प. श्री धारूरकर शास्त्री यांच्याकडे पाठवणे, तिथे आपले गुरू ह.भ.प. श्री धारूरकर शास्त्री यांच्याकडून ह.भ.प. श्री भगवान बाबांनी वारकरी संप्रदायाची दीक्षा घेणे, श्रीगुरूंच्या प्रेरणेने तिथेच अभ्यास, विविध ठिकाणी कठोर तपश्चर्या आणि जनांच्या शाश्वत कल्याणाची परिपूर्ण योजना तयार करून ती कार्यरत करणे हा सगळा ठळक घटनाक्रम काही वेगळे कार्य करण्यासाठीचा परमेश्वरी संकेत म्हणजे ह.भ.प. श्री भगवान बाबा, हे आपल्या लक्षात येते.

न्हावा शेवा, ता. जि. जालना (आश्विन वद्य 13, शके 1905) येथील मठात ह.भ.प. श्री भगवान बाबा राहिले. ह.भ.प. श्री रंगनाथ महाराज परभणीकर यांनी हा मठ स्थापन केला आहे. ह.भ.प. श्री भगवान बाबा या मठाचे मठाधिपती झाले. हे संस्थान तसे संपन्न संस्थान. या संस्थानाच्या भौतिक कार्यकलापात शुध्द वारकरी परंपरेला शोभणार नाही अशा काही घटना-प्रसंग झाले. ह.भ.प. श्री भगवान बाबा आनंदगडकरांनी 'सोने-रुपे आम्हा मृत्तिकेसमान' ह्या संत वचनाप्रमाणे न्हावा शेवा संस्थान तत्काळ सोडले. जालना शहरापासून 10 कि.मी. अंतरावर असलेल्या जांबवाडी गावाजवळ माळरानात देऊळगावराजा रोडवर ह.भ.प. श्री.भगवान बाबांनी वस्ती केली.

सर्वत्र आनंदाचे तरंग पसरविणाऱ्या जगन्माता भवानी श्री आनंदेश्वरी मातेचे मंदिर या माळरानावर (गोंदेगाव शिवार) 13 एप्रिल 1995 रोजी निर्माण केले. ह.भ.प. श्री भगवान बाबांनी आपल्या पुण्यपावन वास्तव्याने ह्या ओसाड, दु:खदायी माळरानावर आनंददायी वारकरी परंपरेला पुष्ट करणारा आनंदगड वसविला आहे. आनंदाचा सोनमळा पिकविला आहे. ह्याच वडार वस्तीतील बांधव त्यांच्या पूर्वसुकृत पुण्याईमुळे श्री भगवान बाबांचे भक्त झाले. माळकरी टाळकरी वारकरी झाले. चोऱ्या सुटल्या, दारू सुटली, दरोडे-खून सुटले. सर्वत्र आनंद झाला. ह.भ.प. श्री भगवान बाबांनी या वडार बांधवांबरोबर त्यांच्याच फडक्यात असलेली मीठ-भाकर खाऊन आनंदगडाच्या पायऱ्यांचे दगड घडविले. मेहनत केली. घाम गाळला. ह.भ.प. श्री भगवान बाबांना वडार भाषा उत्तम येते. ह्या भक्तमंडळींमध्ये श्री तुळशीराम आण्णा आहेत. त्यांनी ह.भ.प. श्री भगवान बाबांच्या प्रेरणेने वडार (तेलगू) भाषेत अभंग रचलेले आहेत. त्यांना ते पाठ आहेत. ते त्या अभंगांचे मराठीत निरूपणही करतात. त्यांनी कुठलेही लौकिक शिक्षण घेतलेले नाही, हे इथे उल्लेखनीय.

आनंदगडावर श्री आनंदेश्वरी माता, श्री गणेश, श्री महादेव, श्री हनुमान, श्री शबरी माता यांची मंदिरे आहेत. या गडावर भक्तजनांचा अखंड प्रवाह अखंडपणे वाहत असतो. येणारा प्रत्येक जण आपल्या आयुष्यातील परमोच्च आनंदाचे क्षण या श्री क्षेत्र आनंदगडावर अनुभवून तृप्त होत असतो.

याबरोबरच, विसावा स्थान म्हणून गडावर असंख्य वाऱ्या सातत्याने थांबत असतात. ह्या सर्व वाऱ्यांमध्ये एका आगळया वारीचा उल्लेख केला पाहिजे. देऊळगावराजा येथील ह.भ.प. श्री भगवान बाबांचे भक्त श्री मालोजीराव यांच्या नेतृत्वात निघणारी वारी. ही वारी दर वर्षी रंगपंचमीच्या दिवशी निघते. श्री मालोजी यांच्या नेतृत्वात, मुखात अखंड हरिनाम, पवित्र वीणा-टाळ-मृदंगाच्या गजरात श्री आनंदेश्वरी मातेचा आणि ह.भ.प. श्री भगवान बाबांचा जयजयकार करीत ही भक्तमंडळी देऊळगावातून पायी निघतात. मग दुपारपर्यंत श्री आनंदगडावर पोहोचतात. ह्या दिंडीत गावातील प्रामुख्याने मातंग बांधव आणि अन्य भक्तमंडळी मोठया संख्येने सहभागी होतात. गडावर पोहोचल्यानंतर प्रबोधनात्मक प्रवचने, भाषणे होतात. शेवटी ह.भ.प. श्री भगवान बाबांचे आशीर्वादपर बोलणे होते. मातंग समाजाची शौर्यपरंपरा, क्रांतिगुरू लहूजी साळवे यांचे पुण्यस्मरण करीत ह्या समाजाचे असलेले मोठे सामाजिक योगदान ह्या सर्वावर प्रकाश टाकला जातो. समरसतेच्या वाटेवर एक दमदार खूण उमटविणारा हा उपक्रम सहज घडत जातो. आपल्याच हाडामासाचे, परमेश्वरचा अंशच नव्हे, तर प्रत्यक्ष भगवंतच असलेले हे समाजबांधव आहेत. त्यांना प्रेमाची, बंधुभावाची वागणूक दिली पाहिजे हे ह.भ.प. श्री भगवानबाबांचे उद्गार उराशी कवटाळत हे मातंग बांधव श्री मालोजींच्या नेतृत्वात, परमेश्वर सानिध्यात रंगपंचमी खऱ्या अर्थाने साजरी करतात.

भटक्या विमुक्त समाजाचा मेळावा, संत संमेलन, धर्माचार्य सभा... एक ना अनेक उपक्रम श्री आनंदगडावर सातत्याने सुरू असतात. ह.भ.प. श्री भगवान बाबा विश्व हिंदू परिषदेच्या केंद्रीय मार्गदर्शक मंडळाचे सदस्य आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या राष्ट्रीय कार्यास ह.भ.प. श्री भगवान बाबांचा पुण्यपावन आशीर्वाद सतत लाभत असतो.

आनंदगडावर फक्त आणि फक्त आनंदसोहळाच सातत्याने होत असतो. कर्मकांड, लहान-मोठा, अनावश्यक उपचार हे कुठेच दिसत नाहीत. समता, ममता, समरसता हीच त्रिसूत्री आपल्या समाजाला संघटित करू शकेल, असा विश्वास आनंदगदडावरून श्री बाबा देत असतात. आपली पुण्यपावन भारतमाता जगाच्या गुरुपदी पोहोचून हे संपूर्ण विश्व आनंदमय करण्याचा मार्ग ह.भ.प. श्री भगवान महाराज आनंदगडकरांनी प्रशस्त केला आहे. या मार्गावर किमान काही पावले चालून सगळयांनी आपले जीवन पावन केले पाहिजे.

- अध्यक्ष, सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळ

9822435531

[email protected]