असीम प्रज्ञावंतश्री गुलाबराव महाराज

 विवेक मराठी  24-Jul-2018


 

प्रज्ञावंत श्री गुलाबराव महाराजांनी आपली जीवन भूमिका, अवतारकार्याचे प्रयोजन अत्यंत स्पष्ट शब्दात विशद केलेले आहे. विविध उपासना पंथ व धर्म यांच्यातील साम्यस्थळे शोधून त्यांचा महाराजांनी केलेला समन्वय अत्यंत विलक्षण आहे. म्हणून त्यांना 'समन्वय महर्षी'देखील संबोधले जाते. म्हणूनच नव्या पिढीने त्यांच्या मूलगामी विचारांचा अभ्यास करून आपल्या प्राचीन उज्ज्वल परंपरेची मूळ वैचारिक भूमिका समन्वयपूर्वक समजून घेण्यासाठी श्री गुलाबराव महाराजांचा मागोवा घेणे अगत्याचे आहे. आपणास मार्गदर्शक ठरणारे आहे.

- प्राचार्य अरविंद व. देशमुख

श्री गुलाबराव महाराज या विसाव्या शतकातील एक अलौकिक विभूती. त्यांचा काळ अव्वल इंग्रजी गुलामगिरीचा. त्यांनी आपल्या अल्प अशा मौलिक जीवनातील बराचसा काळ अमरावती परिसरात घालविला. त्या दृष्टीने आम्ही भाग्यवान. परंतु महाराज अतिशय प्रसिध्दिपराङ्मुख असल्यामुळे बऱ्याच जिज्ञासूंना त्यांच्या अवतारकार्याची जाण होऊ शकली नाही. महाराजांनी आपली जीवन भूमिका, अवतारकार्याचे प्रयोजन अत्यंत स्पष्ट शब्दात विशद केलेले आहे. ते म्हणतात, ''आर्याचे म्हणणे योग्य आहे, हे सिध्द करण्याशिवाय मला व माझ्या हिंतचिंतकांना कोणतेही काम नाही.'' असे स्पष्ट करून महाराजांनी या कामी साहाय्य करण्यासाठी मंडळींना पुढील शब्दात विनंती केलेली आहे. ''जे माझ्याहून लहान आहेत त्यांनी मला मुख्य समजून म्हणा, व माझ्याहून हे वडील आहेत त्यांनी आपल्या पुत्राच्या कृतीला अनुमोदन दिले पाहिजे, असे समजून म्हणा, मला साह्य करावे अशी मी याचना करतो.'' वरील शब्दांमधून महाराजांनी आपले राष्ट्रीय व सांस्कृतिक ध्येय जोरदार शब्दात व्यक्त केलेले असून यातून त्यांची जीवननिष्ठाही व्यक्त होते. कारण जगात कितीही जड सुधारणा झाली, तरी तिचा जेव्हा कंटाळा येईल तेव्हा सर्वांना आर्यावर्तातच, भारतातच शांती मिळेल. त्याचमुळे आर्यवंश (हिंदुस्थान) व आर्य धर्म (हिंदू धर्म) टिकला आहे आणि टिकणार आहे असे अत्यंत दृढपणे सांगून जगातील सर्व उपासना आणि तत्त्वज्ञाने आर्यधर्माच्या एकेका अक्षरावर आधारलेली आहेत, हे त्यांनी विस्ताराने दाखवून दिलेले आहे. विविध उपासना पंथ व धर्म यांच्यातील साम्यस्थळे शोधून त्यांचा महाराजांनी केलेला समन्वय अत्यंत विलक्षण आहे. म्हणून त्यांना 'समन्वय महर्षी'देखील संबोधिले जाते. महाराज बालांध, म्हणजेच जवळजवळ जन्मांधच. अवघे नऊ महिन्यांचे असताना डोळे येण्याचे निमित्त होऊन जन्मांध असून अवघ्या चौतीस वर्षांच्या आयुष्यात विविध विषयांवरील त्यांनी निर्माण केलेली प्रचंड ग्रंथसंपदा पहिल्यानंतर अत्यंत बुध्दिमान मनुष्यदेखील स्तंभित होऊन जातो. म्हणून त्यांना 'प्रज्ञाचक्षू' म्हटले जाते.

व्यवहारात पाहिले, तर महाराजांना कोणीही शिकविले नाही किंवा शालेय शिक्षणदेखील त्यांना फारसे प्राप्त झाले नाही. ते म्हणतात, ''मला ज्ञानेश्वर माउलीने मांडीवर घेतले, कृपाकटाक्षे निहाळीले, माझी पात्रताही पाहिली नाही, पण त्यांना माझी करुणा आली आणि आपल्या स्वनामाचा मंत्र त्यांनी मला (सन 1901) दिला. मी स्वतःला ज्ञानेश्वरांची कन्या समजते.'' ज्ञानेश्वर 'तात' आणि श्रीकृष्ण 'पती' असा त्यांचा दांडगा भक्तिभाव होता. त्यांनी पत्नी म्हणून श्रीकृष्णाची आराधना केली. यासाठी स्वतंत्र अशा मधुराद्वैत संप्रदायाची निर्मिती केली. श्रीकृष्णाची पत्नी या नात्याने वेळप्रसंगी लोकनिंदेचे असंख्य घाव सहन करूनही त्यांनी स्त्रीवेष धारण केला व सौभाग्यलेणी गोपालकृष्णाच्या नाावाने जपली, परंतु आपला भक्तिभाव कदापि ढळू दिला नाही. ते म्हणतात, ''तुम्ही परमार्थ विषयी आंधळे, मी जगाविषयी आंधळा, ज्ञानेश्वर महाराज समाडोळे लावून बसले आहेत, तर भगवान शंकर स्मशानात डोळे लावून बसले आहेत. श्रीकृष्ण गोपीने गुलाल टाकल्यामुळे रासात डोळे लावीत आहे. अशी ही अंध परंपरा तुमच्या आमच्या सुखाला कारणीभूत होणार आहे.'' म्हणूनच ते इतक्या जबरदस्त आत्मविश्वासाने म्हणतात की ''धर्माचा निर्विकार पध्दतीने विचार करणारा, शूद्र वर्णात संपूर्ण सृष्टीमध्ये मी एकटा आहे असे तू पक्के समज. धर्मविचाराच्या ठिकाणी मला केव्हाही कधीही भ्रम उत्पन्न होत नाही.'' पुढे ते असेही म्हणतात की, ''परिस्थितीने बलेकरून मला अधर्मात ओढून नेले, तरी मी तोंडाने धर्म सुचवून मरेन हा माझा निश्चय आहे आणि युक्तीने पटवून देण्याचा माझा बाणाच आहे.'' सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे महाराजांना स्वतःच्या धार्मिक अधिकारासंबंधी आणि बुध्दीच्या उहसामर्थ्याविषयी विलक्षण खात्री होती. एका पत्रात ते लिहितात - 'मी शब्द सामर्थ्यात नसलो तरी अर्थज प्रक्रिया रचण्यात आपल्या कृपेने प्रबल आहे. हाच माझ्यातील विशेष आहे.' नाथ-तुकारामादिकांतही शब्दसामर्थ्याविषयी हाच विशेष होता. म्हणूनच मला जगातील कोणत्याही पंडिताची आपल्या कृपेने भीती वाटत नाही. शेवटी आपल्या शिष्यांना व लेखकवृदांना आत्यंतिक नम्रता महात्म्याने दर्शविली. वयाच्या एकोणिसाव्या वर्षी 'सर्व भावे दास झालो तुमचा' या दृढ श्रध्देने महाराजांच्या सेवेत रुजू झाले व शेवटपर्यंत महाराजांची अत्यंत मनोभावे सेवा केली. या आपल्या शिष्योत्तमाबद्दल महाराजांनी, ''पंडित, मी तुझ्या सेवेला वश झालोय'' असे उद्गगार काढले. हेच महाराजाचे उत्तराधिकारी वेदान्त केसरी नारायण पैकाजी उपाख्य बाबाजी महाराज पंडित. आपल्या गुरूप्रमाणोच प्रसिध्दिपराङ्मुख अशा शिष्यपंचायतनाला महाराजांनी आपल्या सांप्रदायिक मंगलचरणामध्ये नमन केलेले आहे. इतके त्यांचे अलोट शिष्यप्रेम व स्वतःबद्दल लघुता. याच संदर्भात ज्यांनी महाराजांवर निष्ठा ठेवली, अशा शिष्यांबाबत आपले तात आणि गुरू ज्ञानेश्वर माउलीला त्यांनी केलेली विनवणी लक्षणीय आहे. त्यांच्यावर खऱ्या अर्थाने भरवसा ठेवणाऱ्यांना आश्वस्त करणारी आहे - 'मी अतिशय पतित आहे. माझ्या उध्दार उशिरा केल्यास चालेल. पण ज्यांनी माझ्यावर भरोसा ठेवला, त्यांचा उध्दार माझ्या आधी करा. माझ्या शिरावर त्यांचे ओझे आहे. ते आपल्या प्रतापाने तुम्ही उचलून घ्या, म्हणजे माझ्या प्रतिज्ञेचा भंग होणार नाही. माझी एवढी इच्छा, हे ज्ञानेश्वर माउली तू पूर्ण कर.'

परि जया वाटे माझाचि आधार। तयांचा उध्दार तुम्ही कीजे॥

अपुऱ्या प्रतापे उचलोनी ओझे। माझे आधी कीजे भक्तजन॥

न करता माझ्या प्रतिमेचा भंग। वासना तरंग निवारी हे॥

असा त्यांना आपल्या शिष्याबद्दल वाटणारा दांडगा कळवळा आहे. असाही महात्मा विरळाच. साहित्यिक, धार्मिक, सामाजिक, आध्यात्मिक व भक्तिशास्त्रदृष्टया अत्यंत बहुमोल व प्रचंड वैचारिक योगदान देणाऱ्या महाराजांनी संस्कृत, मराठी, हिंदी-ब्रजभाषा व वऱ्हाडी बोली या पंचभाषांतून आपली सर्व रचना केलेली आहे. त्यांनी स्वतंत्र अशा नावंग लिपीचाही शोध लावलेला आहे. पशुपक्ष्यांची भाषादेखील त्यांना उमगत असे. परंतु त्याचबरोबर ''इंग्लिशच काय, पण मराठीदेखील मला पोपटपंचीप्रमाणे येत नाही'' असेही ते म्हणत असत. महाराजांच्या वाङ्मयाचा आवाका बराच मोठा आहे. त्यांच्या वाङ्मयात प्राचीन व आधुनिक विषयांची इतकी रेलचेल आहे की साहित्यसम्राट न.चिं. केळकरांनी म्हटल्याप्रमाणे 'महाराजांचे ग्रंथ म्हणजे एक मोठा ज्ञानकोशच झाला आहे.'

महाराजांच्या साहित्यात विशेष असे की, त्यात 'अ आ आर्जवाला न सोडिजे या मुळाक्षर बाराखडीपासून तुंबडी, लोकगीते तर प्रेमनिकुंजासारख्या पंडिती थाटाच्या शास्त्रीय ग्रंथरचना आहेत. अशी साधारण शाखा आढळत नाही, ज्यात महाराजांनी आपले मौलिक वैचारिक योगदान दिलेले नाही. आणि म्हणून आज त्यांच्या साहित्याच्या आधारे विद्यापीठ स्तरावर आचार्य उपाधी प्राप्त करणाऱ्यापासून जागतिक धर्म, तत्त्वज्ञान परिषदेमध्ये शोधनिबंध वाचणारे अभ्यासक निर्माण होत आहेत. म्हणून नव्या पिढीने त्यांच्या मूलगामी विचारांचा अभ्यास करून आपल्या प्राचीन उज्ज्वल परंपरेची मूळ वैचारिक भूमिका समन्वयपूर्वक समजून घेण्यासाठी श्री गुलाबराव महाराजांचा मागोवा घेणे अगत्याचे आहे. आपणास मार्गदर्शक ठरणारे आहे.

प्राचार्य, श्रीराम कला महाविद्यालय, कुऱ्हा, जि. अमरावती