रोह्याचे धावीर देवस्थान

 विवेक मराठी  26-Jul-2018


 

रोहा गावाच्या वेशीबाहेरचे धावीर देवस्थान ही त्या गावाची ओळख बनली आहे. धावीर महाराज म्हणजे गावची ग्रामदेवता, गावाची संरक्षक, त्यामुळे कोणत्याही संकटाच्या वेळी गावकऱ्यांना या देवतेचा आधार वाटतो. संपूर्ण गावाला एकसंध ठेवणाऱ्या या देवतेचा महिमा, तिची उपासना आणि उत्सव यांविषयीची माहिती देणारा लेख.

पेशवेकाळात अष्टमी परगणा हे आंग्रे संस्थानात व रोहे हे बंदर राजपुरी प्रांतात होते. कुंडलिका नदी ही पेशव्यांची व सिद्दीची सरहद्द असल्यामुळे रोह्याचा विकास थांबला होता. 1818मध्ये तळे, घोसाळे, बिरवाडी हे किल्ले ब्रिटिशांनी ताब्यात घेतल्यावर राजपूर प्रांताची कचेरी तळयाहून रोहा येथे आणल्यावर रोहे गावाचा विकास सुरू झाला. ब्रिटिशांनी घोसाळे गडाचे दरवाजे पाडल्याने गडासंबंधित राजे-देशमुख, सोमण, कुलकर्णी, जोशी, डबीर रोहे येथे आले. जमीन उपजाऊ करण्यासाठी मेहेंदळे, गांगल, भावे आल्यावर त्यांनी येऊन खोती संपादित केली. शेतसारा वसूल करण्याची जबाबदारी काळे यांनी घेतली. बारटक्के किल्ला येथे आले. 1817मध्ये शेवटचे बाजीराव पेशवे तळे येथे दत्तक मुलगा शोधण्यासाठी आले होते. त्या वेळी रोहा येथे विठोबा देवस्थानाला सनद सुरू केली.

समाजव्यवस्था आळीवर होती. प्रत्येक समाजाची एक एक आळी होती - उदा., ब्राह्मण आळी, सोनार आळी, धनगर आळी, वरचा मोहल्ला, खालचा मोहल्ला, परीट आळी. खाडीचे पाणी कुंडलिका नदीमध्ये भरतीच्या वेळी येऊन जेथे दम घेत असे, त्या भागाला 'दमखाडी' म्हणून लागले. तेथे कुंभार, बुरुड व भंडारी बांधव राहू लागले. बलवंतराव विठोबा मोरे हे वराठी येथे राहत. ते धावीर देवाचे उपासक होते. ते रोह्यात जेथे राहत, त्या भागाला आज मोरे आळी म्हणतात. ते वराठीच्या धावीराचे दर्शन घेतल्याशिवाय अन्नग्रहण करीत नसत. त्यांना दृष्टान्त झाला, त्यानुसार त्यांनी रोहे गावाच्या पश्चिमेस ज्या कातळावरून वराठीच्या डोंगराचे दर्शन होईल, त्या जागेवर 'धावीर' देवाची प्रतिष्ठापना करण्याचे योजले. त्याप्रमाणे माघ शुध्द त्रयोदशी, शके 1769 (इ.स. 1848) रोजी मंदिराचे भूमिपूजन झाले. अडीच महिन्यात इंजायली लाकडाचे मंदिर बांधून फाल्गुन वद्य 11, शके 1769 रोजी धावीर देवाची प्रतिष्ठापना केली.

विठोबाचे मंदिर, राम मंदिर, ॐकारेश्वराचे मंदिर ही खाजगी मंदिरे होती. तेथे ब्राह्मण समाजाचा वावर असे. हनुमान मंदिराला वेशीचा मारुती म्हणत. तेथील पुजारी गुरव आहे. 1857च्या सुमारास पांडुरंगशास्त्री आठवले यांच्या पाचव्या पिढीतील पूर्वजाने मित्राच्या जामीनकीसाठी पेण येथील सर्व खोतीचा त्याग केला व पुढील काळात रोहा येथील भुवनेश्वर मंदिराजवळ संन्यास घेतला. ती समाधी पांडुरंगशास्त्री यांचे स्फूर्तिस्थान आहे.

देशमुखी वतनाप्रमाणे बहुजन समाजाचे नेतृत्व राजे-देशमुख यांच्याकडे होते. एकदा बापूजी देशमुख चणेरा-बिरवाडी भागात गेले होते. जंजिरा संस्थानातील शिपायांनी त्यांचा पाठलाग केला. त्यांनी धावीराचा धावा केल्यावर त्यांची त्या प्रसंगातून सुटका झाली. त्यामुळे धावीर महाराजांवरील त्यांची श्रध्दा वाढली.

गावात प्लेग, कॉलरा, दुष्काळाची आपत्ती वारंवार येत होती. परंतु धाकसूत या ग्रामदेवतेचे मंदिर एका दिवसात बांधण्याच्या आख्यायिकेप्रमाणे गावाला मंदिर नव्हते. बहुजन समाजाच्या उपासनेसाठी मंदिर आवश्यक होते. त्या काळच्या प्रथेप्रमाणे देशमुखी ज्याच्याकडे चालत असे, ते घराणे गावात शक्तिदेवतेची प्राणप्रतिष्ठा करीत असे. सन 1860 साली बापूजी देशमुख यांनी सर्व बहुजन समाजास एकत्रित केले. धावीर या संरक्षक देवतेमुळे गावाचे संरक्षण होत आहे असे त्यांनी सांगितले. मोरे यांचे वृध्दापकाळामुळे निधन झाले होते. त्यांच्या वारसास विश्वासात घेऊन ग्रामसभेने श्री धावीर महाराजांना ग्रामदेवता व कालकाईला शक्तिदेवता म्हणून स्वीकारण्याचे ठरवले. वतनदार म्हणून प्रत्येक समाजातील प्रमुख लोकांची नेमणूक होऊन त्यांचे हक्क व कर्तव्य सांगितले गेले. कालकाई हे कोलकाता येतील कालिकामातेचे रूप आहे. ती राजे-देशमुख यांची कुलदेवता असून तिचे मूळ स्थान खाजणी येथे आहे. इ.स. 1425मध्ये ताम्हणी घाटमार्गे राजे-देशमुख घोसाळा परण्याचे सुभेदार म्हणून आले, त्या वेळी ते मंदिर बांधल्याचा उल्लेख आहे.

सन 1860मध्ये त्या वेळच्या गव्हर्नरांनी इंग्लंडच्या राणीतर्फे धावीर मंदिराच्या देखभाल खर्चासाठी जमिनीची सनद बापूजी देशमुख यांच्या नावे दिली. सन 1863मध्ये दुर्गादेवीचे खाजगी मंदिर बांधण्यात आले. 1866मध्ये कुलाबा जिल्हा निर्माण करून तालुक्यांची पुनर्रचना करण्यात आली. नागोठणे विभाग जोडून रोहा तालुका निर्माण केला. त्याच वर्षी रोहा गावास अष्टमी जोडून रोहा-अष्टमी नगरपरिषद करण्यात आली.

सन 1904मध्ये रोहा कोर्ट सुरू झाले व रोह्याचा अप्रत्यक्ष उत्कर्ष सुरू झाला. कारण पुढील शतकातील विकासाची बीजे तेथे रोवली गेली. महाड कोर्टात काळे जज्ज होते. त्यांची बदली रोहा येथे झाली. त्यांनी द्वारकानाथ देशमुख व गोपाळ भाटे या दोन्ही वकिलांना रोह्यास येण्यास विनंती केली. यशवंतराव उर्फ वाय.डी. रोह्याचे 28 वर्षे नगराध्यक्ष होते. तसेच गोपाळराव भाटे यांनी अनेक संस्था सुरू केल्या.

इ.स. 1906 ते 1911 या काळात प्लेगची व फ्लूची साथ मोठया प्रमाणावर आली. प्रचंड मनुष्यहानी झाली. लोक भयभीत झाले होते. संकटाचे निराकरण होण्यासाठी वेस बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. वेस बांधणाऱ्या यजमानास आपत्ती येते म्हणून यजमान बसण्यास कोणीही तयार नव्हते. परंतु बापूजी देशमुखांचे चिरंजीव गणेश उर्फ रावसाहेब देशमुख या पती-पत्नींनी ती जबाबदारी स्वीकारली. सर्व ग्रामस्थांचा या कार्यात सहभाग असावा म्हणून त्या दिवशी गावात चूल न पेटवण्याचा व दिवा न लावण्याचा निर्णय गावकीत घेण्यात आला. वेस बांधण्याचा दिवस होता ज्येष्ठ पौर्णिमा शके 1833 (इ.स. 1911), रात्री बारा वाजता. वेशीचे पूजन करून रावसाहेब पती-पत्नींनी गावात प्रवेश केला व गावात दीपोत्सव सुरू झाला.

देवीचा नवरात्रौत्सव दसऱ्याला संपल्यावर दुसऱ्या दिवशी सकाळी 7 वाजता श्री धावीर महाराजांची पालखी देवळाच्या प्रांगणातून निघते. पालखीत धावीर बसविण्याचा मान भोपी यांचा व देवीचे प्रतीक म्हणून तलवार ठेवण्याचा मान राजे-देशमुख यांचा, पालखी उचलण्याचा मान गवळयांचा, पालखीच्या वेळी गुलाल उधळण्याचा मान नाभिक समाजातील खराडे यांचा असतो. फुलांसाठी परडी व धूप पेटविण्यासाठी पंखा बुरुड देतात. सुतार मखर व पालखीची डागडुजी करत असे. चाचड देवाचे मुखवटे चमकवीत असत. पालखी उचलताना पूर्वी गवळी समाज, राजे-देशमुख व पोतदार यांची परवानगी मागत असत. होळी पौर्णिमेला, होळी लावण्याचा मान पोतदारांचा आहे. त्रिपुर भोपी लावतो. मांग समाजातील वतनदार समेळ वाजवितो. कृतज्ञता म्हणून धावीर महाराजांची पालखी फक्त देशमुखांच्या वाडयासमोर विश्रांतीसाठी उतरते. आजही ती प्रथा सुरू आहे.

रोहा गावची जडणघडण अशी आहे की धावीर महाराजांचे मंदिर वेशीच्या बाहेर आहे. पूर्वी वेशीबाहेर ठेवलेल्या समाजालाच धावीरच्या पालखीची आरती करण्याची प्रथम संधी मिळते. नंतर ती मोहल्ल्यातून जाते. स्वातंत्र्यपूर्व काळात मशिदीवरून पालखी जात असताना विसंवाद होत असे. एकदा ब्रिटिश कलेक्टर पालखीच्या वेळी हजर होते. त्यांनी देवतेसंबंधी विचारपूस केली. त्यांना सांगण्यात आले की, धावीर देवता सर्वांची संरक्षक देवता असल्यामुळे गावात साथीचे रोग येत नाहीत. त्यांनी तत्काळ प्रतिक्रिया दिली - आमचेही काम संरक्षणाचे आहे. देवता वरिष्ठ संरक्षणकर्ती, मग आम्हालासुध्दा सॅल्युट (सलामी) करावाच लागेल. लागलीच त्यांनी धावीर महाराजांना सॅल्युट केला. तेव्हापासून शासनातर्फे सलामीची प्रथा सुरू झाली आहे. ती आजही अबाधित आहे.

1916च्या सुमारास मंदिराचा जीर्णोध्दार झाला, त्या वेळी सागवानी लाकडे वापरून मजबूत देऊळ करण्यात आले. पुढे सन 1922मध्ये कुलाबा जिल्ह्यातील सर्व मोठया देवस्थानांचा विश्वस्तांकरवी कार्यभार सुरू झाला. आजही देशमुख कुटुंबीय विश्वस्त आहेत. राजे-देशमुख कुटुंबीयांच्या एका कुटुंबाकडे पोलीस पाटीलकी परंपरेने होती. त्यांच्याकडे शिवशाहीपासून तलवार होती. ती नवरात्रौत्सव मंदिरात पूजतात. पालखीबरोबर तिलाही मान मिळतो.

पालखी सर्व आळयांमध्ये फिरते. पूर्वी चार वाजण्याच्या सुमारास सेवादल आळीतील कुलकर्णी यांच्या घराजवळ येत असे. आजही चार वाजता पालखी ज्या ठिकाणी असेल, तेथून कुलकर्णी यांच्या घराजवळ येते. त्या वेळी धावीर महाराजांचा संचार कुलकर्णी कुटुंबीयांमध्ये येतो. पालखीचा दिवस हा रोहे शहरवासीयांसाठी पर्वणीचा असतो.

धावीर पालखीचे स्वरूप दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे नवरात्र उत्सव समिती नेमली. त्या समितीतील सर्व सभासदांना मानाचे श्रीफळ देण्यात आले.

धावीर देवस्थानांचे जीर्णोध्दार करण्याचे पुष्कळ वर्षे ठरले होते. परंतु काम मार्गी लागत नव्हते. पांडुरंगशास्त्री आठवले यांच्या हस्ते भूमिपूजन झाल्यावर 50 लाख रुपयांचे सुशोभित मंदिर झाले असून महाराष्ट्र शासनाने ते तीर्थक्षेत्र म्हणून जाहीर केले आहे. या मंदिराचे वैशिष्टय असे की कोणाही देणगीदाराची पाटी नाही.

श्री धावीर देवस्थान ट्रस्ट

(1) श्री धावीर देवस्थानची देखभाल व भक्तांसाठी सोयी करणे ही श्री धावीर देवस्थान ट्रस्टची मुख्य जबाबदारी आहे. देवस्थानचे विविध उत्सव तसेच नवरात्रौत्सव व पालखी सोहळा ट्रस्ट पार पाडतो. महाराष्ट्र सरकारच्या/रोहा नगरपरिषदेच्या निधीतून भक्तनिवास बांधलेले आहे व त्यामुळे बाहेरील भक्तांची राहण्याची सोय केली जाते. दहा दिवसांच्या उत्सवाचीर् पूण जबाबदारी
श्री धावीर देवस्थान ट्रस्ट व नवरात्रौत्सव समिती यांची असते.

(2) श्री धावीर देवस्थानाचा परिसर मोठा असल्याने त्याची स्वच्छता, सुशोभीकरण करणेही महत्त्वाचे असल्यानेर् पूण परिसरात झाडे लावून बाग केली आहे. त्याचप्रमाणे भक्तांना निवांतपणे बागेत बसून प्रसन्नही वाटण्यासाठी कारंजे लावलेले आहे.

(3) मंदिराचे सुशोभीकरण झाल्यानंतर भक्तांकडून येणाऱ्या निधीचा वापर सामाजिक उपक्रमासाठी करायचा ट्रस्टचा मानस आहे. याबाबत गावकीत विचारविनिमय करून र्निणय घेतला जाईल.

(4) आपली वैदिक संस्कृती टिकावी व त्याचे संवर्धन व्हावे, म्हणून वेदपाठशाळा संयुक्तपणे सुरू  करण्याबाबत चर्चा सुरू आहे.   

(5) शैक्षण्ािक, आरोग्य, स्वच्छता इत्यादी विविध सामाजिक उपक्रम लवकरच हाती घेतले जातील.

 

धावीराची पालखी

विजयादशमीच्या दुसऱ्या दिवशी - म्हणजे आश्विन शुध्द एकादशीला सकाळी 5.30 वाजल्यानंतर धावीराची आरती सुरू होऊन सर्व वस्त्र-अलंकारासहित देवाला पालखीत बसवतात. देवाला पोलिसांकडून मानवंदना दिली जाते. ब्रिटिश काळापासून कलकत्त्याच्या देवीजवळ व धावीराच्या पालखीजवळ ही मानवंदना देण्याची प्रथा आहे. देवाची पालखी उचलण्याचा मान गौळवाडीच्या लोकांचा आहे. गौळवाडीच्या महिलांनीच पहिल्या आरत्या करावयाच्या आहेत. मंदिराला प्रदक्षिणा झाल्याशिवाय इतरांनी आरती करू नये, असा नियम आहे. प्रथम हरिजन-गिरिजन यांच्या आरत्या घेत धावीराची पालखी मशिदीवरून जाण्याची प्रथा आहे. मुस्लीम समाजाचे शेख आदम नुराजी, दर्जी परिवार हे पालखीबरोबर असणाऱ्या भाविकांना फलाहार आणि थंड पेये देऊन स्वागत करतात. कित्येक वेळा धावीराची पालखी व मोहरम एकत्र आलेले आहेत. उलट शेख सल्ला बाबाच्या उरसाला आमच्या गावाच्या महिला-पुरुष जातात. त्यांचा दर्गा कुंडलिकेशेजारी आहे.