सोलापूरचे ग्रामदैवत शिवयोगी श्री सिध्दरामेश्वर

 विवेक मराठी  26-Jul-2018


 

 

सोलापूर शहराला व जिल्ह्याला अध्यात्माचा वारसा लाभला आहे. मुळात हे शहर महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश यांच्या सीमेवर वसलेले असून येथे मराठी, कन्नड, तेलगूसह विविध भाषिक व धार्मिक संस्कृतींचा संगम पाहावयास मिळतो. शिवयोगी श्री सिध्दरामेश्वर हे सोलापूरचे ग्रामदैवत. त्यांच्या वास्तव्याने  सोन्नलगी गावाची (सोलापूर)  'भूकैलास' अशी प्रतिष्ठा बनली. 900 वर्षांची परंपरा असलेल्या श्री सिध्दरामेश्वराच्या गड्डा यात्रेचे वैशिष्टय टिकून आहे. देश-विदेशातील भक्त यात्रेनिमित्त सोलापूरला येत असतात. सिध्देश्वर देवस्थान पंचकमिटीने श्री सिध्देश्वर सुवर्णमंदिर प्रकल्प हाती घेतला आहे.

- महेश अंदेली

मुद्दगौडा व सुग्गलादेवी या दांपत्याच्या पोटी सिध्दरामेश्वरांचा जन्म झाला. श्री सिध्दरामेश्वरांचे संपूर्ण जीवन वैशिष्टयपूर्ण आहे. बालपणी ते नेहमी एकांतवासात ध्यानमग्न असत. या काळात एक वयोवृध्द व तेजस्वी जंगम मूर्ती त्यांना भेटली. त्यंानी 'श्रीशैल मल्लय्या' असे आपले नाव असल्याचे त्यांना सांगितले. या भेटीस 'गुरुभेट' संबोधले जाते. त्यांच्या आज्ञेप्रमाणे सिध्दरामेश्वरांनी सोलापुरात विविध धार्मिक व सामाजिक कार्य केले. सिध्दरामेश्वरांनी कपिलसिध्द मल्लिकार्जुन मंदिराची स्थापना केली. कपिलसिध्द मल्लिकार्जुन हे त्यंाचे आराध्य दैवत आहे. त्यांनी 68 हजार वचने लिहिली आहेत. या वचनांतून त्यांनी समाजप्रबोधन केले. 

मंदिराला बनवले समाजसेवेचे केंद्र

सोलापूर शहराच्या मध्यभागी सिध्दरामेश्वर महाराजांचे मंदिर वसले आहे. मंदिराचे बांधकाम दगडी आहे. मंदिराच्या चारी बाजूस तलाव असून एखाद्या बेटासारखे मंदिराचे दृश्य दिसते.

बाराव्या शतकात शिवयोगी सिध्दरामेश्वरांनी सोन्नलगीमध्ये 68 लिंगांची स्थापना केली. पुढे त्यांनी समाजसुधारणांचे काम हाती घेतले. शिवलिंगांच्या स्थापनेनंतर गोरगरिबांना पाणी मिळावे, यासाठी तलावाची निर्मिती केली. या तलाव बांधणीतून त्यांनी सोलापूरची पाणी समस्या सोडवली. जलव्यवस्थापनातला उत्कृष्ट नमुना म्हणून आजही या तलावाकडे पाहिले जाते. बाराव्या शतकात श्री सिध्दरामेश्वरांना तलावाचे महत्त्व कळले होते. आज भाविक तळयात स्नान करून भक्तीने शिवलिंगाची पूजा करतात. महाराष्ट्राचे लोकदैवत विठोबाचे मंदिर सिध्दरामेश्वरांनी बांधले. (सिध्दरामश्ेवर गर्भ देवालयाच्या श्री हनुमान मंदिरालगत डाव्या बाजूला हे मंदिर पाहावयास मिळते.)  सर्व धर्म-समाजांतील लोकांना आपल्या देवतांचे दर्शन घडावे यासाठी ते प्रयत्नशील असत. त्यांनी सोलापूरच्या पंचक्रोशीत अष्टविनायकांची व अष्टदेवांची प्रतिष्ठापना केली.

सिध्दरामेश्वरांनी गरीब, अनाथ व पीडित जनतेवर आपले लक्ष केंद्रित करून बारमाही अन्नछत्र योजना सुरू केली. त्यांनी सामाजिक सुधारणा करताना परिश्रमाला प्रतिष्ठा प्राप्त करून दिली होती. त्या काळी त्यांनी सामूहिक विवाह सोहळेही पार पाडले होते. वयाच्या 101व्या वर्षी त्यांनी शिवयोग समाधी घेतली.

कुंभारकन्येचा विवाह

शिवयोगी सिध्दरामेश्वर यांच्या कार्याचे आणखी एक विशेष म्हणजे कुंभारकन्येविषयी दाखवलेली उदारता.

या संदर्भात एक आख्यायिका सांगितली जाते, ती अशी - एक सुंदर, तरुण कुंभारकन्येने सिध्दरामाची भक्ती, सेवा दीर्घकाळ करून कृपा संपादन केली व सिध्दरामेश्वरांनी आपल्याशी लग्न करावे अशी इच्छा व्यक्त केली. तसे करणे योग्याला निषिध्द असल्याने सिध्दरामांनी तिला आपल्या योगदंडाशी विवाह करण्याचे सुचवले. त्याप्रमाणे तिने योगदंडाशी लग्न लावून घेतले. आपणास आध्यात्मिक मुक्ती मिळाली असे मानून होमकुंडात उडी घेऊन ती सती गेली. या घटनेचे प्रतीक म्हणून मकरसंक्रातीस श्री सिध्दरामेश्वर यात्रेत्र्या वेळी सिध्दरामेश्वरांच्या योगदंडाचे प्रतीक म्हणून नंदीध्वजांची मिरवणूक काढून अक्षताचा व दुसऱ्या दिवशी सती जाण्याचा - म्हणजेच होमाचा धार्मिक व रूपक कार्यक्रम पूर्वापार परंपरेने दर वर्षी केला जातो. या विवाहस्थानास 'सम्मती कट्टा' म्हणून संबोधले जाते. 

     गड्डा यात्रेचे महत्त्व

ग्रामदैवत शिवयोगी सिध्दरामेश्वर गड्डा यात्रेला विशेष महत्त्व आले असून ही यात्रा जानेवारी महिन्यात 12 तारखेपासून सुरू होते. गड्डा यात्रेचे वेगळेपण म्हणजे नंदीध्वजाच्या मिरवणुकीत शहरातील सर्व जातिधर्मांचे लोक सहभागी होतात. यात सात नंदीध्वजांची मिरवणूक काढली जाते.

शिवयोगी सिध्दरामेश्वर महाराजांच्या यात्रेची ओढ शहरवासीयांप्रमाणे परदेशी पाहुण्यांनाही लागली आहे. भारताच्या सर्व भागांतून लाखो भाविक, यात्रेकरू जमतात. जेथे ही यात्रा भरते, ते गड्डा मैदान व होम मैदान यांचा परिसर मध्यकाळापासून पवित्र मानण्यात आला आहे.

सिध्दरामेश्वरांचे कार्य 12व्या शतकात संपले असले, तरी त्यांच्या कार्याचा जागर आजही केला जातो. बाराव्या शतकात त्यांनी मानवतावादी विचार केला. त्यांनी अनेकांना आधार दिला. हा आधार आत्मिक होता म्हणून ते आपले वाटतात. त्यासाठी सिध्दरामेश्वर देवस्थान कमिटीच्या वतीने सिध्दरामेश्वरांचे कार्य लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असते. श्री सिध्देश्वर देवस्थान पंचकमिटीच्या वतीने सोलापूरमध्ये शैक्षणिक, सामाजिक यासह विविध उपक्रम चालवले जातात. यामध्ये शाळा, महाविद्यालय, हॉस्पिटल, पुरोहित पाठशाळा, दैनंदिन अन्नछत्र, यात्रिक निवास अशा उपक्रमांचा समावेश आहे. यंदाच्या वर्षी महाराष्ट्र सरकारने सोलापूर स्मार्ट सिटी योजने अंतर्गत सिध्देश्वर तलाव सुशोभीकरण करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या समितीत श्री सिध्देश्वर मंदिर देवस्थान पंचकमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी, जिल्हाधिकारी व महापालिका आयुक्त यांचा समावेश आहे.

 सोलापूर ग्रामदैवत सिध्दरामेश्वर मंदिराचा विकास होण्यासाठी धार्मिक पर्यटन केंद्र म्हणून नकाशावर आले पाहिजे, कारण मंदिराचा सर्व परिसर पर्यटनाने व्यापला आहे. शिवयोगी सिध्दरामेश्वर मंदिर पर्यटकांना नक्कीच आवडेल.

श्रीसिध्दरामेश्वर मंदिरास सोन्याची झळाळी!

अमृतसर येथील सुवर्णमंदिराच्या धर्तीवर श्रीसिध्देश्वर देवस्थान कमिटीने श्रीसिध्देश्वर सुवर्णमंदिर प्रकल्प हाती घेतला आहे. गर्भमंदिर चांदीने सुशोभित करणे, शिखर सुवर्णलेपन करणे, सभामंडपासह योगीनाथ समाधी व परिसर सुशोभित करणे, तलाव व तलावाचा परिसर प्रेक्षणीय करणे या कामाचा प्रकल्पात समावेश आहे. या प्रकल्पास काही प्रमाणात मूर्त रूप प्राप्त झाले आहे. सुवर्ण सिध्देश्वर मंदिराची संकल्पना प्रत्यक्ष साकारण्यासाठी सामान्य भक्तांपासून दानूशर व्यक्ती, संस्था, समाज यांच्याकडून सोने व चांदीची देणगी घेण्यात येत आहे. या कामास 8 ते 10 कोटी रुपये खर्च येणार असून भक्तांनी आपली देणगी 'स्टेट बँक ऑफ इंडिया, श्री सिध्देश्वर देवस्थान, चालू खाते क्र. 34175811280' या ऑनलाइन खात्यावर जमा करावी.

 

& 9823179477