क्षणाक्षणाला जन्म नवा...

 विवेक मराठी  28-Jul-2018


 

कवी, लेखक, चित्रकार, गायक वा कोणीही सर्जक कलावंताला नेहमीच 'स्व'च्या पलीकडची ओढ असते. त्याच्या कलेच्या आविष्कारात त्याला काहीतरी असं गवसतं की जे त्याच्या निर्मितीच्याच काय, कल्पनेच्याही पलीकडचं असतं. अशा सर्जक मनाच्या कलावंताला एकाच जगण्यात अनेक जन्म अनुभवण्याचं भाग्य मिळतं. पण अनेक जन्म अनुभवण्यासाठी एकाच जन्मात तो मरणांनाही सामोरा जात असतोच! कवयित्री पद्मा गोळे यांना झालेल्या अशाच अलौकिक अनुभूतीतून जन्मलेली कविता...

पद्मा गोळे! तासगावच्या सरदार घराण्यात जन्मूनही सुखासीनतेत न रमलेली अन् विलक्षण आत्मभान असलेली कवयित्री! 'चाफ्याचे झाड'सारख्या त्यांच्या अनेक कविता आजही तशाच टवटवीत वाटतात. सफल-असफल प्रेमाच्या कविता, कधी स्त्रीत्वाचा शोध घेणाऱ्या बंडखोर कविता, तर कधी तिचं नेमकं सामर्थ्य ओळखणाऱ्या कर्तृत्वाचं क्षितिज ओलांडणाऱ्या कविता. या साऱ्यात विशेष लक्षवेधी वाटतात त्या त्यांच्या अ-लौकिकाची ओढ सांगणाऱ्या कविता.

त्यांच्या अशा कवितांमध्ये त्या माणसाला सीमित करणाऱ्या सुखासीनतेला धिक्कारतात. अडचण, संकट, पराभव, निराशा यातून माणूस घडतो. स्वत:ला शोधणं, उभं करणं याच्या अपरिहार्यतेतून तो नव्याने जन्मतो, यावर त्यांचा विश्वास आहे. त्यामुळे स्त्री म्हणूनच नव्हे, तर माणूस म्हणूनही स्वत:ला शोधलं पाहिजे याची तळमळ त्यांच्या कवितेत दिसते.

कवी, लेखक, चित्रकार, गायक वा कोणीही सर्जक कलावंताला नेहमीच 'स्व'च्या पलीकडची ओढ असते. त्याच्या कलेच्या आविष्कारात त्याला काहीतरी असं गवसतं की जे त्याच्या निर्मितीच्याच काय, कल्पनेच्याही पलीकडचं असतं. अशा सर्जक मनाच्या कलावंताला एकाच जगण्यात अनेक जन्म अनुभवण्याचं भाग्य मिळतं. पण अनेक जन्म अनुभवण्यासाठी एकाच जन्मात तो मरणांनाही सामोरा जात असतोच!

जन्ममरणांच्या फेऱ्यातून सुटका व्हावी ही आपली मुक्तीची आदर्श कल्पना असली, तरी संतदेखील सगुण रूपाची सदेह भक्ती करता यावी, यासाठी पुन्हा पुन्हा जन्मच मागतात. कलावंतालाही या चक्राचा, त्यातल्या निर्मितीच्या आनंदाचा मोह पडला, तर काय नवल!

क्षणाक्षणाला जन्म नवा...

नवं काही लिहिताना मी स्वत:च पुन्हा जन्मत असते खरं तर. पण ते लिखाण सिध्द होणं काही सोपं नसतं. स्वत:ला खूप तासावं, खोदावं लागतं. स्वत:ला शोधावं लागतं नि विसरावंही लागतं. स्वत:च विस्तारत जावं लागतं, त्यामुळे या जन्मसोहळयाची गंमत अशी की जो जन्माला घालतो, तोच जन्मतो. त्यामुळे नवीन जन्माचा आनंदही मला, अन प्रसवाच्या यातनाही मलाच!

पण हा जन्म 'देहाचा', म्हणजे केवळ शब्दांचा नव्हे. निर्मितीचा, कलाकृतीचा नव्हे. तो असतो एका नव्या जाणिवेचा जन्म. लिहिता लिहिता मीच मला नव्याने सापडते. माझ्या संवेदना विस्तार पावतात. नवं काहीतरी माझ्या आकलनाच्या कक्षेत प्रवेशतं नि त्या जाणिवेच्या नवदेहाच्या झळझळीत दर्शनाने मीच दिपून जाते! या नव्या जाणिवा, ज्ञान पुढच्या  वाटचालीतही माझ्या सोबत रहातील.

पण लौकिक जीवनातला माझाच व्यवहार, अनुभव कधीकधी मला खुजे वाटत राहतात! मीच गाठलेली उंची, मापलेली खोली मीच स्पर्शू शकत नाही किंवा कधीकधी इतकं रितेपण येतं की आपल्या आतलं सारं संचित संपून गेलंय असं वाटतं... नि मग मला मरणयातना अनुभवाला येतात! पण हे मरण मला संपवत नाही. याच वेदनेतून, तळमळीतून, पोकळीतून पुन्हा मला नव्याने काहीतरी गवसतं! नवी काहीतरी रचना जन्मते अन् त्यातून मला पुन्हा नवा जन्म मिळतो! ते जे नवं, कोवळं जन्मतं, ते अपूर्व सुंदर असतं माझ्यासाठी. हे ज्या भूमीतून उगवतं, त्या माझ्या मनाहूनही अनुपम सुंदर असं. माझी भूमी जाणिवांनी समृध्द होते, म्हणून असा फुलोरा येतो की या फुलोऱ्यामुळे मी समृध्द होते? या गोड चक्रात मी गुरफटून जाते.

पण ते जे सुभग, सुंदर उमलतं, त्यावर त्या अलौकिकाचाच ठसा असतो. त्या उमलत्या नवजीवनाला तुझा गंध असतो. अपार्थिवाचा गंध. म्हणूनच तर ते इतकं लोभस असतं. त्या आकृतीतून उमलणाऱ्या प्रेरणा, कल्पना आता आणखी उंच उंच उठतात. एकमेकींचा हात धरून, त्या सर्जक क्षणांच्या बलाकमाला दिगंतरात भरारी घ्यायला उत्सुक होतात.

ही जी मी प्रकटते आहे, ती मी नव्हेच. माझ्या अंतरात वसती करणारा तूच तर यातून प्रकट होतोस! पण या प्रकटण्याला माझ्याही भावभावनांचं अस्तर आहे. त्यामुळे हे तुझं आहे, पण हा तू नव्हेस! तुझ्या असण्याने मला बळ मिळतं गरुडभरारी घेण्याचं. माझे विचार, माझ्या कल्पना याला आकाश ठेंगणं वाटू लागतं. पण भरारी घेण्याच्या माझ्या क्षमता, माझ्या आकलनाच्या, आविष्काराच्या मर्यादा अपुऱ्या पडतात! फूलपाखराच्या पंखांबरोबरच गरुडाची नजर देतोस तू! मलाच कळत नाही की मी नक्की कोण आहे! या आयुष्याच्या बागेच्या सीमारेषेपर्यंतच धाव असणारं नाजूक अल्पजीवी फूलपाखरू आहे, की गगनाला गवसणी घालू शकणारा गरुड आहे मी?

पण मग या साऱ्या मंथनातून एखाद्या क्षणी जाणिवेचं शुभ्र मुलायम नवनीत हाती येतं. तो ज्ञानाचा इवला क्षण मला नवं भान देतो. नवं परिमाण, नवी चेतना देतो. माझ्या असण्याचं कोडं त्या लुकलुकत्या ज्ञानकणाच्या प्रकाशात मला उलगडतंयसं वाटतं! असण्या-नसण्याच्या सीमारेषेवर कधीतरी ही अनुभूती मला गवसते अन् त्या अद्भुत अनुभवाने मी भारून जाते!

तूच तो प्रिय, ज्याची मी माझ्यात रुजवण केली आणि तूच तो, जो माझ्यातून उगवून येतो. तुझाच, प्रियतमा, मी सदैव पाठलाग करत राहिले. तुझ्या पाऊलखुणांचा मागोवा घेत ज्या तुला मी धरू पाहत होते, त्या तुझ्यातूनच मला जन्माला येताना मी पाहते.

काय विलक्षण नातं आहे हे! काय अद्भुत सत्य आहे हे! ही कसली चैतन्याची देवघेव आहे रे! तुझ्यात विरघळून तुझ्यातूनच पुन्हा उमटण्याचा छंद मला जडलाय! या जन्म-मरणांवर, याच्या जन्मवेणांवर लोभावले आहे मी पुरती!!

पद्माताईंच्या या कवितेत त्यांची अ-लौकिकाची ओढ तर दिसतेच, तशीच एखाद्या निर्मिकाची भावावस्थाही फार सुंदरपणे उलगडते. प्रत्यक्ष परमेश्वर संकल्पनेचा कुठेही निर्देश न करता त्या  निर्मितीमागच्या त्याच्या हातांविषयी कृतज्ञता व्यक्त करतात. शेवटी प्रियतमा असा त्या उल्लेख करतात, तेव्हा ही कविता मधुरा भक्तीची आठवण करून देते!

क्षणाक्षणाला जन्म नवा...

क्षणाक्षणाला जन्म नवा अन

क्षणोक्षणी वेदना नवी

जन्म मला अन् प्रसववेदना

मलाच का व्हायास हवी?

 

देहावाचुनि जन्म आणखी

नाशावाचुनि मरण मिळे,

मनाहुनीही निरुपम सुंदर

काहितरी हृदयांत फुले.

 

जन्मांतरीही त्या काहींची

धाव परी तुजकडेच का?

ठसा तुझा घेऊन उमलती

क्षण एकामेकांतुनि का?

 

तुझी असुनिही तूं नाही अन

मी असुनी मज अनोळखी,

डोळे माझे गरुडाचे अन

जात जिवाची फुलपंखी.

 

जननमरण हे लंघुनि जेव्हा

संज्ञा क्षण जागृत होते,

त्या संज्ञेच्या तीरावरती

कोडे माझे उलगडते.

 

तूच जन्म मज देसि प्रियतमा!

अद्भुत हे कैसे घडते,

त्या जन्मांचे, त्या मरणांचे

वेड जिवा जडते जडते.

 

9890928411