इस्रायलची सर्वसमावेशक शिक्षण पध्दती

 विवेक मराठी  30-Jul-2018


 

ज्यू लोकांमध्ये शिक्षणाला अनन्यसाधारण महत्त्व असते. यामुळेच इस्रायलची निर्मिती झाल्यावर सगळयांनाच हिब्रू भाषेतून शिक्षण अनिवार्य केले गेले. म्हणूनच कदाचित हिब्रू भाषेची छापण्याची लिपी आणि लिहिण्याची लिपी वेगवेगळी आहे. इस्रायली शिक्षण पध्दती ही सर्वसमावेशक शिक्षण पध्दती आहे असे म्हणतात. इस्रायली शाळांमध्ये शिक्षणातील बाकीचे नवनवीन प्रयोगही चालू असतात.

इस्रायलमधील शिक्षण पध्दतीचे मूळ त्यांच्या ज्युईश धर्मपरंपरेत आहे. ज्यू लोक त्यांच्या मूळ स्थानापासून विविध देशांमध्ये पांगले गेले. त्यामुळे त्यांचा धर्मग्रंथ म्हणजेच हिब्रू बायबल हे ज्यू संस्कृती टिकवून ठेवण्याचे एकच साधन त्यांच्याकडे होते. त्यामुळे ज्यू लोक कुठेही गेले, तरी हिब्रू भाषा वाचायला शिकत असत. त्यामुळेच ते त्यांचे हिब्रू बायबल वाचून आपल्या मूळ संस्कृतीशी आपली नाळ जोडून ठेवत असत. म्हणूनच ज्यू लोकांमध्ये  शिक्षणाला अनन्यसाधारण महत्त्व असे. यामुळेच इस्रायलची निर्मिती झाल्यावर सगळयांनाच हिब्रू भाषेतून शिक्षण अनिवार्य केले गेले. तोपर्यंत हिब्रू भाषा ही फक्त बायबलपुरती मर्यादित होती. पण ज्यू लोकांनी हिब्रू भाषेचे पुनरुज्जीवन करून ती सर्वसामान्यांना लिहिता येईल आणि त्यात शिक्षणही घेता येईल अशा पध्दतीने निर्माण केली. म्हणूनच कदाचित हिब्रू भाषेची छापण्याची लिपी आणि लिहिण्याची लिपी वेगवेगळी आहे.

इस्रायली शिक्षण पध्दती ही सर्वसमावेशक शिक्षण पध्दती आहे असे म्हणतात. इस्रायलमध्ये साधारणत: सहाव्या वर्षापासून शालेय शिक्षणास सुरुवात होते, ते अठराव्या वर्षापर्यंत चालते. इस्रायलमधील मूलभूत शिक्षणाचे प्राथमिक (एलिमेंटरी) आणि माध्यमिक (इंटरमीडिएट/हायस्कूल) असे दोन भाग आहेत. इस्रायलमध्ये या दोन भागांतील शिक्षण प्रामुख्याने ज्युईश रिलीजस स्कूल्स, ज्युईश सेक्युलर स्कूल्स, प्रायव्हेट स्कूल्स आणि अरब स्कूल्स अशा चार प्रकारच्या शाळांमध्ये विभागलेले आहे. ह्या शाळांचा अभ्यासक्रमदेखील धार्मिक आणि सांस्कृतिक विविधतेनुसार ठेवलेला आहे. प्रत्येक शाळांमध्ये काही मुख्य विषय असतात, जे अनिवार्य आहेत आणि काही करिअर विशेष असे कोर्सेस असतात. यामुळे विद्यार्थ्यांना त्यांचे करिअर ठरवण्यास मदत होते आणि त्यानुसार कोणत्या करिअरमध्ये उमेदवारी करावी हेदेखील ते ठरवू शकतात. हे सगळे कोर्सेस इस्रायली शिक्षण मंत्रालयातर्फे तयार केलेले असतात.

ज्युईश रिलीजस स्कूल्समध्ये अल्ट्रा ऑॅर्थोडॉक्स ज्यू विद्यार्थी शिक्षण घेतात. या शाळांमध्ये बायबलच्या शिक्षणावर सर्वाधिक भर असतो. गणित, शास्त्र हे विषय फार कमी स्तरावर शिकवले जातात. ज्यूईश सेक्युलर स्कूल्समध्ये सर्व विषयांवर सारखाच भर असतो. या शाळांमध्ये बायबलच्या विविध पुस्तकांचा अभ्यास तर असतोच, शिवाय संपूर्णपणे ज्युईश इतिहास शिकवला जातो. त्यामुळे ज्युईश विद्यार्थ्यांना ज्यूंची धार्मिक पार्श्वभूमी आणि इतिहास याची शालेय स्तरावरच माहिती होते. त्यामुळे आर्मीची सेवा अनिवार्य का आहे, याचेही महत्त्व त्यांना पटवून द्यावे लागत नाही. अधिकाधिक विद्यार्थी त्याकडे उत्साहाने पाहतात. यामुळेच इस्रायली लोकांमध्ये देशप्रेम ओतप्रोत भरलेले दिसते. प्रायव्हेट शाळांमध्ये सर्व विषयांवर समान भर असतो. काही प्रायव्हेट शाळा इंग्लिश माध्यमाच्यादेखील आहेत. पण त्यांचे प्रमाण अत्यल्प आहे. मुख्यत: तेल अविवमध्ये अशा शाळा आढळतात. अरब शाळांमध्ये मुसलमान, ख्रिश्चन, ड्रुझ आणि बेडुईन विद्यार्थी सामावलेले असतात. अरब शाळांमध्ये अरब इतिहास शिकवला जातो, तसेच अरब संस्कृतीची, मुसलमान आणि ख्रिश्चन धर्माची शिकवण दिली जाते. या शाळांमध्ये अरेबिक भाषेतून शिक्षण असते. या शिक्षण पध्दतीलाच ते सर्वसमावेशक म्हणजेच 'जो जे वांछील तो ते लाहो' या उक्तीप्रमाणे सर्व धर्म आणि संस्कृती यांना सामावून घेणारी अशी शिक्षण पध्दती असे म्हणत असावेत. शिक्षण पध्दतीतील आणि अभ्यासक्रमांतील फरक हे इस्रायलमध्ये ज्यू आणि अरब यांमधील दरी कमी न होण्याचे कारण असू शकते.

इस्रायली शाळांमध्ये शिक्षणातील बाकीचे नवनवीन प्रयोगही चालू असतातच. इनोव्हेशन ऍंड आंत्रप्रेनॉरशिप हा कोर्स शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यामागे विद्यार्थ्यांमध्ये उद्योजक होण्यासाठी लागणारी विविध कौशल्य वाढवणे - उदा., नावीन्यपूर्ण विचार करणे, सर्जनशीलता, धोके पत्करण्याची प्रवृत्ती, नेतृत्वगुण, त्याचप्रमाणे एकविसाव्या शतकासाठी लागणारी कौशल्ये प्राप्त करण्यास प्रोत्साहन देणे हा हेतू आहे. त्यासाठी ओपन लर्निंग, ऍक्टिव्ह लर्निंग, एक्स्पीरेन्शिअल लर्निंग, ऍन्थ्रोपोसोफिक लर्निंग अशा प्रकारचे विविध प्रयोग अवलंबले जातात. याचाच परिणाम इस्रायलमध्ये स्टार्ट अप्सचे प्रमाण जास्त असण्यामागे ज्युईश व्यक्तिमत्त्वाचा (व्यापारी प्रवृत्तीचा) वाटा तर आहेच, त्याचबरोबर त्यांच्या शिक्षण पध्दतीमध्ये समाविष्ट केलेल्या या कोर्सचा वाटाही मोठा आहे. 2005मध्ये वाईजमन इन्स्टिटयूटमध्ये व्याख्यान देताना गूगलचे एरिक श्मिड यांनी त्यांचे स्टार्ट अप्स आणि इस्रायली व्यक्तिमत्त्व यांच्यातील सहसंबंधासंबंधी काही निरीक्षणे मांडली. ते म्हणाले, ''इस्रायलमध्ये स्टार्ट अप्सचे प्रमाण सर्वाधिक आहे, कारण तुम्ही नियम पाळत नाही.'' उतावळेपणा (इम्पेशन्स), इम्प्रोवाइज करून काहीतरी नवीन करण्याची क्षमता, ऍथॉरिटीला आव्हान देण्याची प्रवृत्ती आणि कोणतेही नियम न पाळणे हे इस्रायली व्यक्तिमत्त्वाचे पैलू इस्रायलमधील हाय टेक डेव्हलपमेंटला कारणीभूत आहेत. इस्रायली शाळांमधील वर्ग खूपच बेशिस्त, गोंगाट करणारे असतात. कारण विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वातील वर दिलेले पैलू. याच पैलूंचा उपयोग इस्रायली उद्योजकतेमध्ये झालेला आहे. त्याचप्रमाणे इस्रायली पालकांमध्ये उच्चशिक्षित पालकांचे प्रमाण खूप जास्त आहे. त्याचा परिणाम शिक्षणाच्या बाबतीतील जागरूकतेमध्ये दिसून येतो.

इस्रायली विद्यार्थ्यांचे पीसा या आंतरराष्ट्रीय परीक्षांमधील गणिताच्या गुणांचे पृथक्करण करताना ग्रुबेर यांनी इस्रायली वर्गांमधील बेशिस्त हे इस्रायलचे पीसामधील गणिताच्या कमी गुणांचे कारण दिले आहे. इस्रायलचा क्रमांक 34 देशांच्या तुलनेत शेवटून पाचवा आहे. या बेशिस्तीमुळे हळूहळू इस्रायली शाळांतील विद्यार्थी जागतिक स्पर्धेमध्ये टिकतील की नाही, अशी शंकाच ग्रुबेर यांनी व्यक्त केली. अरब आणि ज्युईश शाळांमधील शिक्षणाच्या दर्जातील जमीन-अस्मानाचा फरक हे या कमी स्कोअर्सचे आणखी एक कारण ग्रुबेर यांनी सांगितले. अल्ट्राऑॅर्थोडॉक्स ज्युईश विद्यार्थ्यांचा गणिताच्या शिक्षणातील दर्जा यथातथाच आहे, असेही निरीक्षण त्यांनी नोंदवले. ग्रुबेर यांच्या मते इस्रायली शिक्षण पध्दती ही विद्यार्थ्यांमध्ये सर्वसमावेशक शिक्षण देण्यास नापास झालेली आहे आणि त्यामुळे विविध सामाजिक स्तरांमध्ये फारशी मोबिलिटी उरलेली नाही. म्हणजे थोडक्यात ज्यांचा आर्थिक-सामाजिक स्तर उत्तम आहे, त्यांची स्थिती दिवसेंदिवस उत्तम होत आहे, पण ज्यांचा आर्थिक-सामाजिक स्तर कमी आहे, त्यांची स्थिती दिवसेंदिवस 'जैसे थे'च आहे. इस्रायली ज्युईश विद्यार्थ्यांमधील सुशिक्षित आयांचे प्रमाण सर्वाधिक असल्याने ज्युईश विद्यार्थ्यांच्या गणिताच्या गुणांवर त्याचाही परिणाम झालेला आहे, असे ग्रुबेर यांनी अत्यंत महत्त्वाचे निरीक्षण नोंदवले आहे. याचाच अर्थ जिथे आया सुशिक्षित नाहीत, त्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीवर वाईट परिणाम झालेला दिसून येतो. अरब समाजात सांस्कृतिक आणि धार्मिक कारणांमुळे स्त्रियांच्या शिक्षणाचे प्रमाण कमी आहे. यामुळेच अरब विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीवर परिणाम झालेला असण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

हायस्कूल पूर्ण झाल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना इस्रायली आर्मीमध्ये सेवा करणे अनिवार्य असते. रिलीजस ज्यू लोक, लग्न झालेल्या मुली, दिव्यांग व्यक्ती यांना आर्मीच्या सेवेमधून मुभा मिळते. पण जे लोक ही मुभा घेतात, त्यांना किमान दोन वर्षे स्वयंसेवक म्हणून कोणत्यातरी प्रोजेक्टवर काम करावेच लागते. आर्मीच्या सेवेचा कालावधी हा मुलींसाठी दोन वर्षे, तर मुलांसाठी तीन वर्षे आहे. अरब शाळांतील फक्त बेडुईन मुलांना इस्रायली आर्मी सेवेमध्ये सहभागी करून घेतले जाते. साधारणत: हायस्कूलमध्ये आल्यावर या विविध शाळांमधील एकदम हुशार विद्यार्थी हेरून त्यांची एक वेगळी परीक्षा घेतली जाते. अशा मुलांना हायस्कूल पूर्ण झाल्यावर इस्रायली आर्मीमध्ये गुप्तहेर खात्याशी निगडित कामाशी जोडले जाते आणि त्याचे वेगळे प्रशिक्षण दिले जाते. हीच मुले पुढे मोसाद या इस्रायलच्या गुप्तहेर संघटनेत दाखल होण्यास पात्र ठरतात. आर्मीची अनिवार्य सेवा कालावधी संपल्यानंतर या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी एक स्वतंत्र परीक्षा पास व्हावी लागते. ज्यांनी आर्मीची सेवा पूर्ण केलेली आहे, अशांना पुढील शिक्षणासाठी अत्यल्प फी आकारली जाते किंवा अनेक वेळा मोफत शिक्षण दिले जाते. इस्रायली आर्मीत सेवा करण्यास जर कोणी नकार दिला, तर त्या व्यक्तीस तुरुंगवासही भोगावा लागू शकतो. त्याचबरोबर शासनाकडून मिळणाऱ्या सोईसुविधा मिळत नाहीत. इस्रायली आर्मीबाबत असेही अपवाद ऐकायला मिळाले की मुलींसाठी आर्मी सुरक्षित नाही. आर्मीत गेल्यानंतर ऑॅफिसर्सकडून काहींचे लैंगिक शोषणही होते. त्यामुळे काही पालक आपल्या मुलींना आर्मीमध्ये पाठवण्यास अनुत्सुकही असतात.

इस्रायली आर्मीत सेवा देण्यासाठी कमाल वयाची अट 21 वर्षे आहे. त्यापुढील वयोगटात आर्मी प्रशिक्षणासाठी घेतले जात नाही. या आर्मी प्रशिक्षणात अत्यंत कठोर असे शारीरिक आणि मानसिक प्रशिक्षण दिले जाते. त्यामुळे वयाच्या एकविसाव्या वर्षी इस्रायली तरुण मानसिक आणि शारीरिकदृष्टया एकदम सक्षम होतात. त्यानंतरच त्यांचे पुढचे करिअर चालू होते. सर्व शिक्षण, प्रशिक्षण, बोली भाषा हिब्रूत असल्याने त्यांचे इंग्लिश फारसे चांगले नसते. पण इस्रायलमध्येच उच्च शिक्षणासाठी वाईजमन इन्स्टिटयूट, टेक्नीऑॅन, हैफा युनिव्हर्सिटी, हिब्रू युनिव्हर्सिटी, तेल अविव युनिव्हर्सिटी इत्यादी उत्तम विद्यापीठे असल्याने अधिकाधिक विद्यार्थी इस्रायलमध्येच राहून आपले उच्च शिक्षण पूर्ण करतात. त्यामुळे उच्च शिक्षणासाठी अमेरिका-युरोपमध्ये जाण्याचा कल आता राहिला नाही. पूर्वी जेव्हा उत्तम विद्यापीठे तयार झालेली नव्हती, तेव्हा उच्च शिक्षणासाठी ज्युईश लोक इंग्लंड, अमेरिका, कॅनडा यासारख्या देशांमध्ये जात असत. पण उच्च शिक्षण घेऊन परत येणाऱ्याचेच प्रमाण अधिक असल्याने त्यांना इस्रायलमध्येच उत्तम विद्यापीठे तयार करणे शक्य झाले. त्याचबरोबर अमेरिकेतील धनाढय ज्यू लोक इस्रायलमधील संशोधन, स्टार्ट अप्स यासाठी सढळ हस्ते पैसा गुंतवतात. यामुळेच राष्ट्रप्रेम, देशाभिमान जागृत ठेवून, इतक्या कमी कालावधीत इस्रायलची प्रगती झालेली आहे. अर्थातच सुरुवातीला ज्यांनी ही धोरणे ठरवली, त्यांनी ज्यूंच्या हॉलोकॉस्टमधील शिरकाणांचा विचार केलाच. तीव्र झायोनिस्ट चळवळ आणि ज्यूंचेच स्वतंत्र राष्ट्र हाच त्यामागील विचार होता. या ठरवलेल्या धोरणांची तितक्याच परिणामकारकतेने अंमलबजावणी केल्यामुळेच आपल्याला आजचा इस्रायल दिसतो आहे, यात शंकाच नाही.

9742045785 [email protected]